Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ भरत,

अधिकचे कपडे, भांडी डिस्पोजल फारच छान.

तुम्ही त्या मनगटी घडाळ्यांचं काय केलंत ? उगाच उत्सुकता.

.... डायबिटीस/ओबेसिटी/बीपी/थायरॉईड हे गरीब वर्गातही आहे.... होय.

घड्याळांचं अजून काही केलं नाही. आमच्या इथली वॉल सध्या बंद आहे.

घरी तीन इस्त्र्या झाल्या होत्या. दोन भंगार वाल्याला विकल्या. त्याचा फायदा करून दिला.

@भरत,
तुम्ही माझ्या प्रतिसादातील /s बघितला नाही बहुधा. तरीहि तुम्ही रागावला असाल तर क्षमस्व.

इ वेस्ट बद्दल :

एक छान उपक्रम नुकताच पाहिला.

सर्व TATA Croma क्रोमा दालनांमधे असे इ-वेस्ट काउंटर केले आहेत आता.
50f477cb-276a-4095-af7f-9ea0b58dcec7.jpeg

मुंबई आणि पुण्यात दोन्हीकडे बघितले. ते व्यवस्थित विल्हेवाट लावतात. फक्त तिकडे जातांना इ- वेस्ट आठवणीने न्यायचे लक्षात ठेवावे लागेल Happy

लेख अतिशय आवडला आहे. मी कॉपी पेस्ट करून तुमच्या नावासकट पुढे ढकलणार आहे.
पुन्हा पुन्हा वाचून समजून घेऊन करण्यासारखं आहे.

Update -

सतत चा गृहपाठ म्हणून काही जुन्या वस्तूंची नव्याने लावलेली विल्हेवाट :

- T Shirts. समोरच्या घरात पेंटिंगचे काम चालू होते. त्या कामगारांना उपयोगी होते, त्यांनी नेले.

- घरात समहाऊ ३ प्रेस झाल्या होत्या आणि दर सफ़ाई मोहिमेत बचावल्या होत्या. त्यातील दोन भंगारवाल्याला दिल्या.

- बूट. हे मात्र कुणीच नेले नाहीत. दोष माझ्या १३ नंबरी पायांना देऊन डस्टबीनला टाकले.

- आजवर बचावलेल्या काही Audio Cassettes / CDs बरीच वाट बघून मग फेकून द्याव्या लागल्या.

- Expiry date उलटलेल्या shaving foam ने सर्व काचा आणि आरसे स्वच्छ केले. So it was used in-house and not wasted. सेम फॉर expired टूथपेस्ट. त्यानी चांदीची भांडी स्वच्छ केली.

- कन्येची सायकल, ग़म बूट्स, स्केटिंग गियर आणि रंगकामाचे साहित्य तिच्या परवानगीने सारथ्याच्या मुलीला दिले. पाठ्यपुस्तके तिने स्वतःच कुणालातरी दिली.

- ४ कुलुपे किल्ल्यांसकट ऑफिसच्या सहायकास दिली, त्याने नवा व्यवसाय सुरु केला त्या दुकानाला लावेल म्हणाला. काही सजावटी वस्तूही दिल्या, सेम परपज.

- किल्ल्या “लंबी जुदाई” अवस्थेत असलेली बिनकामी कुलुपे २०० रु किलो ने मोड घेणाऱ्या माणसाने नेली. त्याने जुन्या खुर्च्याही नेल्या.

- हौसेने जमवलेल्या की चेन सोसायटीच्या दाराशी ठेवल्या ; हवे त्यानी न्यावे अशा संदेशासोबत. All gone in single day Happy

- ब्यांकेत स्वतः जाऊनच बंद करता येतील अशी सेविंग अकाउंटस आणि लॉकर्स अजेंड्यावर आहेत खूप दिवस. पैकी एक अकाउंट+ लॉकर बंद केले. रिकामे होते. खात्यात असलेले थोडके पैसे मात्र कामी आले Happy

- भेट म्हणून मिळालेल्या काही कोऱ्या भेटवस्तू अजून आहेत पडून. वीकांताला त्यांना मोक्ष देणार !!

अरे वा, छानच की !
घरी कौटुंबिक फोटोचे एकूण पाच संग्रह आहेत. त्यातला एक माझ्या तारुण्यातला विद्यार्थीदशेतला होता. त्यातले बरेचसे फोटो सरळ फाडून टाकले आणि एक संग्रह पूर्ण रिकामा करून रद्दीत टाकून दिला.

काही शंका -

टीशर्ट्स, बूटांसाराख्या वस्तू आज विल्हेवाट लावल्या आणि उद्या नवीन घेतल्या असं होत असेल तर त्याला Döstädning का म्हणावं? आता या पुढे क्ष कपडे आणि य बूट इतक्यांवरच निभाऊन नेईन (त्यातही क्ष आणि य हे कमीत कमी असावे) असं काही ठरवलं तर ठीक आहे. नाही तर आमच्यासारख्या non-Döstädning लोकांसारखेच तुम्ही "जूना दो नया लो" करताहात असं वाटलं.

Döstädning तेंव्हाच अर्थपूर्ण असेल, जेंव्हा आधी मी माझ्या गरजा कमी करेन आणि मग माझ्याकडच्या जास्तीच्या गोष्टींची विल्हेवाट लावेन. आज विल्हेवाट लावली आणि उद्या पुन्हा गरज भासली म्हणून परत वस्तू घेतली याला Döstädning का म्हणावे?

मुलीच्या गोष्टी तुमच्या Döstädning मध्ये का असाव्यात?

पहिलेच वाक्य “सतत चा गृहपाठ” असे आहे. गरजा कमी करणे ही स्लो प्रोसेस आहे आणि मला अजून पुरेसे जमलेले नाही !

वस्तू विल्हेवाट लावल्या आणि उद्या नवीन घेतल्या असं होत नाही. तरीही संग्रह खूप आहे आधीचा.

मुलीच्या गोष्टी …

आता घर Empty nest म्हणून माझी जबाबदारी Happy

FB वर गृप आहे, फ्री गिव्ह अवे म्हणून. फोटो टाकले की बरेच लोक सांगतात हवेय म्हणून. त्यांना सांगू शकतो, फक्त DM करा, फक्त कुरियरने घेऊन जा वगैरे. लोक काय काय देतात हे बघून आपल्याही मनाची हिम्मत होईल म्हणून जॉईन केला. काही लोक वापरलेले चष्मे, गॉगल, रया गेलेले वोलेट्स, फर्निचर वगैरे पण देतात आणि ते घेण्यातही बऱ्याच लोकांना रस असतो. असे देणारे लोक एखाद्या मृत व्यक्तीचेही कपडे, वस्तू देत असतील का अशी मला शंका येते. गेलेल्या व्यक्तीच्या वासना अडकलेल्या असतात असे ऐकले आहे, त्यामुळे घेणाऱ्यांचे काय होणार अशी उगाच उत्सुकता किंवा काळजी वाटते.

चष्मे, गॉगल …

चष्मा नवीन करतांना जुना विक्रेत्यालाच देऊन टाकावा. ते विक्रेते रोटरी सारख्या संस्थाना देतात. Fully recyclable !

मुंबईत मुलुंड आणि पुण्यात औंधला Polyclinic आहेत तिथे फ्रेमसकटचे पुन्हा वापरता येण्याजोगे चष्मे दान करता येतात. त्या संस्था refurbish करुन गरजूंना वाटतात. गॉगल ऑपरेशन झालेल्या रुग्णांना देतात.

मी माझ्या आईबाबांच्या tripod walking sticks आणि medi feet soft shoes अशा वस्तू फेसबुक ग्रूपवरून दिल्या आहेत. आईच्या साड्या ताई वापरते. बाबांचे कपडे मी आणि भाचा , स्वेटर - कानटोपी त्यांचा जावई वापरतो.
ताई कडून कळलं की माणूस मेला की त्यांच्या मृतदेहापाठोपाठ त्यांचे सगळे कपडे व वस्तू घराबाहेर काढतात व त्यांची विल्हेवाट लावतात. - तशी प्रथा आहे. तेव्हा धक्का बसला होता. मी व ताई, आम्ही दोघेही ती मानत व पाळत नाही.
आईबाबा दोघांचीही मरणाला सामोरे जायची तयारी कधीचीच होती. बाबांनी तर देहदानाचा फॉर्म भरला होता.अर्थात शेवटची घटका तशी अचानकच आली व त्या क्षणी तरी अनपेक्षित होती.
आता त्यांच्या वस्तू मी फेसबुक ग्रूप मार्फत दिल्या नसत्या आणि त्या मोडतोड न करता भंगारात वा तशा प्रकारे दिल्या असत्या तरी त्या रिसायकल झाल्याचं असत्या.

गरजा कमी करणे ही स्लो प्रोसेस आहे आणि मला अजून पुरेसे जमलेले नाही >>> इतक्या प्रामाणिक उत्तराबद्दल धन्यवाद.

'अपरिग्रह' शब्दाशी पहिल्यांदा ओळख झाली तेंव्हा तो खूप सोपा वाटला होता. तेंव्हा माझ्याकडचे काही संग्रह कमी केले. पण ते काही खरे नव्हते कारण त्या गोष्टींत माझा जीव नव्हता अडकलेला. पण मग जेंव्हा अधिक खोलात शीरलो आणि गरज नसलेल्या पण जीव अडकलेल्या वस्तू कमी करायचा विचार केला तेंव्हा जीव कासावीस व्हायला लागला. मग हे आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून दिला तो विचार. आता एकदा परत प्रयत्न करायचा विचार आहे. तुमच्या प्रामाणिक उत्तराला म्हणून धन्यवाद दिले.

@ माधव,

धाग्यावर आधीही बऱ्याच प्रतिसादांत कबूल केल्याप्रमाणे मी 'सुखलोलुप' श्रेणीतला मानव आहे, माझ्यासाठी अपरिग्रह अवघड पेपर आहे Happy त्यामुळे 'कमीत कमी' संग्रह आणि त्यात 'कमीत कमी नवी भर' असे जमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र करतो आहे.

.... एकदा परत प्रयत्न करायचा विचार आहे ....

जय हो ! शुभेच्छा.

मला ही संकल्पना खूपच आवडली. नव्या पिढीत याला आधीच सुरुवात झाली आहे. Minimalism नावाने याची लॉक डाऊन मध्ये पाश्चात्य तरुणाईने सुरुवात केली आहे. ते लोण भारतात यथावकाश आले. एक मुलगा 44 वस्तुंनिशी राहतो. लोकमतला लेख आला होता. हा मुलगा गेम डिझाईन क्षेत्रात होता. आलिशान फ्लॅट. सर्व किंमती वस्तू. अमेरिकेत. कालांतराने सर्व सोडले. आता शांतपणे फिरतो. जे व्हिडिओ करतो तेही भाड्याच्या कॅमेऱ्याने.
https://youtu.be/iKVF3bvxLG8?feature=shared

ऐकायला विचित्र वाटेल, पण आईच्या आणि साबांच्या साड्या आम्ही वापरतो.आपल्या माहितीतले स्वच्छ धुतले-इस्त्री केले गेलेले, अनेक वर्षे कपाटात पडून क्वचितच वापरलेले आणि संसर्गजन्य रोगाने न गेलेल्या व्यक्तीचे कपडे त्यांच्या स्मृती म्हणून वापरायला हरकत नसावी.(एरवी त्या दोघी जिवंत असताना 'वापरा वापरा' म्हणायच्या तेव्हा स्वतःच्याच साड्या अतिशय क्वचित वापरल्या जातात म्हणून त्यांच्या वापरायला नकार द्यायचो.पण आता योग्य प्रसंग बघून त्यांच्या जरी काठ साड्या वापरतो, थोडं माणूस जवळ असल्या सारखंही वाटतं.
अर्थात एकेकाचा चॉईस. ज्या वापरता येणार नव्हत्या(जॉर्जेट प्रिंटेड/अगदीच भडक एम्ब्रॉयडरी) त्या धुवून गुडविल ला दिल्या.काही मऊ आणि थोड्या विरलेल्या साड्या गोधडी म्हणून शिवून रियुज केल्या.

रॉबिनचे उदाहरण छान, पण minimalism कंसेप्ट जरा वेगळा आहेय. आजच्या जगात ४४ वस्तूत आयुष्य जगणे म्हणजे मनोनिग्रहाची परिक्षा Happy

वर रॉबिन अमेरिकन आहे, त्याच्यासाठी हे अधिकच कठीण असणार कारण तो देश आणि त्यांची संस्कृती use and throw/ maximalism / abundant consumption कडे झुकलेली आहे.

Any body slightly aware of extreme Indian poverty will hesitate to say that minimalism came from USA to India. Many families here do not have 44 things to begin with.

I am shifting to a smaller place so mass throw away of things which were meaningful once but now my heir will have problems managing is happening. I have also started giving away good quality clothes people can use and switched to recycled clothes. Once you are a stay at home old person you can get by with do Jodi kapda for 10 days. Death cleaning is a very good concept for motivation Happy

Many families here do not have 44 things to begin with…

Absolutely !

That raises responsibility of those like me who have had wasteful lifestyle. Course correction is not a bad thing Happy

Wishing you luck and contentment !

@ भरत, mi-anu

निवर्तलेल्या व्यक्तीच्या वापरातल्या वस्तू एक भावनाभारित विषय आहे. तो मागे राहाणाऱ्यांसाठी सोपा व्हावा हेच Döstädning चे मर्म आहे - कमीत कमी पसारा, नीट आवरलेला !

भरत यांचा मुद्दा बरोबर आहे. व्यक्ती जाण्याआधी दीर्घ आजारपण असेल तर विविध उपकरणें, medical support equipment वगैरे जमा होते. महाग असतात त्या वस्तू. शक्य तितका पुनर्वापर होणे उत्तम. त्या विकत घेणे न परवडणारे आपल्या देशात हजारोंनी असावेत. सेवादाते आणि हॉस्पिटल्स त्यांना स्वच्छ-निर्जंतुक करून पुन्हा वापरु शकतील असे वाटते.

कपडे, सामान टाकून देण्यामागे “आठवणी” नको हा भाव प्रबल असतो. काहींना सुखद आठवण म्हणून गेलेल्या व्यक्तीची एखादी वस्तू वापरावी वाटेल तर कुणाला तसे केले तर वियोग भावना दाटून दुःख वाटू शकेल. व्यक्तीपरत्वे बदलेल हे. स्वमुखत्यार व्हावे, पटेल ते करावे हेच योग्य वाटते.

अनिंद्य, खरे आहे तुमचे म्हणणे.
अजून एक मुद्दा ऍड करावासा वाटतो..
जसे तुम्ही म्हणता,
कपडे, सामान टाकून देण्यामागे “आठवणी” नको हा भाव प्रबल असतो.
तर त्या आठवणी दुःखद, नकोशा अशाही असू शकतात.
तर त्यांची वस्तू डोळ्यासमोरही नको असे...

खूप गुंतागुंतीचे आहे आपले मन, नाही का? Happy

<< ४४ वस्तूत आयुष्य जगणे म्हणजे मनोनिग्रहाची परिक्षा >>

माझ्या मते मिनिमॅलिझम हे एक फॅड आहे. पैसे असतील, परवडत असेल आणि आवड असेल तर जरूर नव्या गोष्टी विकत घेऊन त्यांचा उपभोग घ्यावा. (म्हणजे उपलब्ध रिसोर्स वापरावेत, नुसते गोळा करून ठेऊ नयेत.) मात्र enough (पुरेसे) किती, needs vs wants (गरज vs चैन) ते कळले पाहिजे. मी या मताचा आहे. परवडत असून आणि आवड असूनही मिनिमॅलिझमच्या नावाखाली मन मारून जगणे मलातरी आवडत नाही. परवडत नसेल किंवा आवडत नसेल तर लोक तसेही लोक मर्यादित गरजांमध्ये जगतातच, त्यासाठी मिनिमॅलिस्ट व्हायची गरज नाही.

Optimum utilization of any resource is the most critical point, not elimination of resources. जगातील कुठलाही रिसोर्स Reduce, Reuse, Recycle या तत्त्वाने वापरला की बस, मग ते रिसोर्सेस म्हणजे घरातील भांडीकुंडी, कपडे असोत किंवा निसर्गातील ऑईल, पाणी असोत.

गंमत म्हणजे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा रिसोर्स म्हणजे वेळ. पण दुर्दैवाने त्याचा विचार करताना कुणीच दिसत नाही.

… आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा रिसोर्स म्हणजे वेळ.….

….. Optimum utilization of any resource….

Couldn’t agree more !!!

मन मारून काहीच करू नये ; Minimalism, Döstädning वगैरे सोडा, “मन मारुन” मी तर नावडते जेवण सुद्धा चाखणार नाही Happy

द क्राऊनच्या शेवटच्या सीझनमध्ये राणी ८० वर्षांची होते तेव्हा तिच्या भविष्यातल्या अंत्ययात्रेचं रीतसर प्लॅनिंग होतं.
ते बघताना हा धागा आठवला.

एकाला १५ वर्ष जुन्या हार्ड डिस्का,वायरी (गंजलेले टुल्स), तुटलेली छत्री, लॅपटोप्स, मुलं मोठी होऊन फडाफड बोलत असून फोनिक्स पुस्तकं जपून ठेवायची असली आणि दुसर्‍याला हा पसारा फेकून द्यावा म्हणजे नवी पुस्तकं, छत्री, सामान ठेवायला जागा होईल असे वाटत असले तर खरा यक्ष प्रश्न निर्माण होऊ शकतो.. Sad
कधीतरी लागेल म्हणुन ठेवलेलं पण १० + वर्षांत ढुंकून न वापरलं गेलेलं सामान फेकण्या विषयी क्रॅश कोर्स असायला हवेत.

Pages