Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० + वर्षांत न वापरलं गेलेलं सामान फेकण्या विषयी क्रॅश कोर्स

Happy

१० ते ५० कितीही वर्ष असू शकतो हा कालावधी. आमचे एक परिचित आलेल्या लग्नपत्रिका २०-३० वर्ष जपून ठेवतात !!!!

लग्नपत्रिका २०-३० वर्ष जपून ठेवतात >> त्यावरून आठवलं. मी लहान होतो तेव्हा सगळ्या पत्रिकांवर त्यावेळी गणपतीचं चित्र असे आणि ते रद्दीत टाकणं मला बरोबर वाटत नसे. शेवटी मी एकदा गणेश चित्रांचा संग्रह करावा असं ठरवून ती सगळी चित्रं कापून एका वहीत चिकटवली. त्यानंतर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात वृत्तपत्रांतून मी ही चित्रकात्रणं काढत असे व घरच्यांच्या हाती बातम्या वाचायला चाळणी शिल्लक रहात असे. पुढे पुढे त्या वह्या फारच जड होत चालल्या, माझाही उत्साह मावळला आणि मग नवीन पत्रिका रद्दीत जायला हरकत नाही हे स्वतःला समजावलं. अनेक वर्षं त्या वह्या मात्र मी जपून ठेवल्या होत्या. नंतर कधीतरी अश्या साचत गेलेल्या गोष्टी विल्हेवाट लावताना त्या वह्याही बाहेर काढल्या.

“सततचा गृहपाठ” म्हणून या महिन्यात बरीच वस्तुकपात केली.

- सर्वात मोठी उपलब्धी जुन्या कागदपत्रांची विल्हेवाट.
बिले, छापिल पावत्या, छापिल वर्तमानपत्र बंद करून पेपरलेस कारभार होऊन ५-६ वर्ष झालीत तरी हे करावे लागले, या ना त्या मार्गाने घरात आलेले कागद स्वाहा !!
घरातली सर्व कागदपत्रे आता 2x2 खणात सहज मावत आहेत. Super happy on this achievement.

- २२ पुस्तके मित्राच्या वाचनालयाला दिली, खूपदा फोन करून हैराण केले तेव्हांच त्यानी pick up केलीत.

- मागच्या वर्षी घरातली प्रकाश व्यवस्था पूर्ण बदलली होती. त्यात पूर्वीचे बल्बस्, सजावटी lampshade वगैरे “नंतर बघू” category झाले होते, त्यांना घराबाहेर पाठवले.

- एक स्टडी टेबल + २ खुर्च्या इच्छुकांना दिले.

- दीपावली साठी म्हणून ठेवलेल्या चार लाईट माळांपैकी एक शहीद झालेली होती, दोन वाटून एकच पुढच्या वर्षीसाठी ठेवली. तीन नवीन आकाशकंदील भेट म्हणून आले, इच्छुकांना ताबडतोब वाटून टाकले. मातीच्या पणत्या repotting करतांना कुंड्यांच्या तळाशी Happy

- टेरेस गार्डनच्या २० मोठ्या कुंड्या कमी केल्या, मोठाल्या झाडांसकट. हा निर्णय कठिण होता कारण झाड़े, बागकाम फार आवडता विषय आहे. उस्तवार खूप आणि वजनी कुंड्या एकट्याने सरकवणे वगैरे जमत नव्हते, सो taken practical steps and reduced workload. आवडती फुलझाडे अर्थातच तीट लाऊन नीट केलीत Happy

- कुटुम्बाच्या परवानगीने काही भांडीकुंडी सहा- आठ महिने एका गोणीत बांधून ठेवली होती - लागली तर काढून देईन या बोलीवर. कुणीच त्यांची आठवण न काढल्याने त्यांना “बेवारस” घोषित केले नी मदतनीस ताईला ती गोणी न उघडता घेऊन जायला सांगितले.

इतकी कामे केली तर स्वत:ला रिवॉर्ड + वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून spa date आणि एक टीशर्ट घेतला, २०१९ नंतर घेतलेला एकमेव कपडा Happy

बापरे.. अनिंद्य..आहात खरे निर्लेप!!
सध्या मी स्टोरेज डिलीट करण्याच्या मागे आहे!
लार्ज फाईल्स, स्क्रीन शॉट्स, स्पॅम इ मेल्स.....!

… स्टोरेज डिलीट करण्याच्या मागे आहे…

Thanks for this pointer. फोन जुना आहे आणि स्टोरेज ओसंडून वाहते आहे. फोटो-व्हिडिओ- फाइल्स डिलिट करतो अधून मधून पण आता धडक मोहीम हाती घेणार !

Hi I instead created a new Deoghar. To help me with the path forword. It faces east and I get early morning sun on the idols. Positive energy for the mandatory overs. I have idols of most religions. Lakshmi Ganesh Buddha Mary with baby Jesus. Vithoba rakhumai. It is like my foster parents. Without them birth mother would have thrown me in a dumpster.

I have my foster mother's saibaba photo frame coz foster family took away all our other idols including Balaji. So got one.

They think they are pure bred while I am not. Gave up this stupid tangle totally.

The other day daughter got me long stem red roses. Get those. It helps the spirit. Ultimately death cleaning is a German concept we know how much to stick to these idiots. All the best. Our indian philosophy is to let God help.

इथे अवांतर होइल पण ....

-------------------------- मिनी डेथ-------------------------------

आज मी माझ्या खाजगी ब्लॉग मधली एक एन्ट्री डिलीट केली. खूप उत्कट होती, फार इन्टेन्स व मॅजिकल होती. खूप अ‍ॅटॅच झालेले इमोशनली. परत परत वाचून अनुभवत राहीले. डिल्युजनल होत राहीले. बस्स!!! आज एकदाची डिलीट केली. परत परत वाचणे नको, अनुभवणे नको. माझ्या मूडचा लेखाजोखा, हाऊ आय गेट कॅरिड अवे त्याची आठवण होती ती. पण फायदा काहीच होत नव्हता. त्रासच होत होता. त्या जागी रोजची काय शिस्त बाणवायची आहे त्याची नोंद टाकलेली आहे.

पण आपला एखादा अवयव (नासूर/ गँगरिन) कापावा लागतो तसे काहीसे ... Sad तसाही आज सन-प्लूटो छान ग्रहमान आहे. चांगला योग आहे. रिडंडंट, आऊटडेटेड गोष्टी काढूनच टाकायला असा मुहूर्त नाही.

Ewww

अनिंंद्य महान आहात _/\_ निर्मम राहून इतकं कसं जमवता?
ऑन माय साईड, दिवाळी किंवा भारत वारी पॅकींग च्या वेळेस तुटलेलं/न वापरातलं सामान मी डोनेट किंवा फेकायला काढते. पण नवरा परत ७०% सामान स्टोर रूम मधे घुसवतो, Sad अशा रितीने स्टोर रूम भरलेलंच राहतं. मुलं वाढती अस्ल्याने त्यांचे लहान झालेले कपडे गावी देते. आता ते ही लोकांचे स्टेटस झाले आहे. की दुसर्यांचे घेऊ नये, सो ज्यांना हरकत नाही अशांनाच देते नेहमी.

death cleaning is a German concept>>>> अमा. मग काय झालं? दुसर्यांच्या चांगल्या & अनुकरणीय गोष्टी अंगिकारायला काय हरकत आहे? आणि गॉड येऊन नाही साफ करत आपलं भंगार सामान, आपलं आपल्यालाच करावं लागतं ना.

मी चार दिवसांपूर्वीच गेल्या दोन वर्षात नं वापरलेलं सामान काढून टाकलं.
NAB ला फोन केला की ते लोकं येऊन घेऊन जातात.

Thank you for your lovely wishes aashu . God Bless. And have good health.

खूप उत्कट होती,>>>>
@सामो मी एक पॉझिटिव्हिटीचं वर्कशॉप अटेंड केलं होतं
त्यात हीच कन्सेप्ट सांगितली होती. जेव्हा तुम्ही एखादी आठवण काढता त्यावेळी तुम्ही तिच्याशी निगडीत इमोशन्स रिन्यु करता. त्या इमोशन्स दुःखद असतील तर साहजिकच तुम्हांला दीर्घकाळ त्रास होतो. Letting go is the only solution in such cases. तुम्ही अगदी तसंच केलंय.

अनिंद्य, भारी. तुम्ही लिहिलेल्या कामांतली अनेक मलाही करायची आहेत. आळस नडतोय.

.. इमोशन्स दुःखद असतील तर साहजिकच तुम्हांला दीर्घकाळ त्रास होतो…

@ माझेमन , बुल्स आय.

@ सामो,

.. सन-प्लूटो छान ग्रहमान आहे. चांगला योग…

Declutterring साठी दर दिवस उत्तम योग. Emotional असो की physical.

@ aashu29

… मी सामान फेकायला काढते. नवरा परत ७०% सामान स्टोर रूम मधे घुसवतो..

कहानी घर घर की ! एकमत होणे फार अवघड. मलाही टाकून देण्याच्या वस्तूंसाठी “बहुत कठिन है डगर पनघट की” होतं Happy पण प्रयत्न करत राहावे. तुमच्या पुढाकाराने घरातले बिनकामाचे सामान ३०% कमी होणे ०% पेक्षा चांगलेच. Improvement !

@ SharmilaR, बेस्ट ! सतत चा गृहपाठ Happy जास्त साचू द्यायचच नाही.

@ भरत, जरूर करा. Step by step करा, होईल.

… I instead created a new Deoghar….

@ अमा, देवघर / shrine घरात असणे ही एक छान कन्सेप्ट आहे. Fully understood your feelings in creating one at new home and enshrining the idols and things dear to you there.

लेखातला मुद्दा क्र. ५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे हाच आहे. Things essential for our mental well-being. आवरलेले घर म्हणजे रिकामे, lifeless, भकास घर नाही Happy

थोड़े व्यक्तिगत होईल पण दोन टोकाची मते असलेले पालक असले की आपोआपच balance साधणे शिकतो आपण. माझ्या आईच्या माहेरी खूप धार्मिक वातावरण होते, घरात गायत्रीचे मंदिर, अग्निहोत्र वगैरे. ती पहाटे स्नान, देवपूजा, मंत्रपठण झाल्याशिवाय पाणीसुद्धा पीत नसे. याउलट बाबा देव मानत नाहीत. आईनी देवापुढे दिवा लावला रे की ते त्या वातीनी सिगरेट पेटवत, वर्षानुवर्षे दररोज ! दोघे आपापल्या भूमिकेवर ठाम, नो चिडचिड नो भांडण. एकमेकांवर अलोट प्रेम ❤️ आणि enviable परस्पर अनुराग.

म्हणूनच की काय या बाबतीत आम्ही भावंडे मध्यममार्गी. ना atheist ना देव-देव वाले. अजूनही घरात देवघर आहे, त्यातले सर्व विग्रह खूप जुने आहेत. सर्वात तरुण ३० ते सिनियर १२६ वर्ष वयाचे. कुणीही नवीन भर घातली-घालत नाही. मी मानसपूजा वाला माणूस आहे त्यामुळे no regualr pooja-prayer - worship etc. जमेल, मूड असेल तसे कधीतरी दिवा दाखवतो, खूप ताजी फुले असतील तर सजावट करतो. बाकी मेरा भगवान मेरे दिल में रहता है. मेरा दोस्त है वो.

येनी वे फार मोठी पोस्ट झाली.

@ .. stick to these German idiots….

Avoid hating/ criticising in plurals, just a gentle suggestion.

Wishing you peace and contentment in the new home.

अनिंद्य, तुमच्या या पोस्टसाठी ❤️

समासांचा विग्रह तेवढा माहीत होता. तुम्ही वापरलेला पाहून अर्थ शोधला - विग्रह-पु. लीलेनें धारण केलेलें शरीर; भक्तांच्या इच्छा पुरविण्याकरितां देवानें धारण केलेला देह.

हाच अर्थ तुम्हांला अभिप्रेत आहे का?

हो. हा शब्द सुनिता देशपांड्यांच्या पुस्तकात वाचल्यासारखं वाटतं. किंवा संदिप खरेची कुठली कविता आहे हा शब्द वापरलेली?
मला ही अनिंद्य यांची पोस्ट फार मच्युअर ( प्रगल्भ) वाटली. प्रेमाने कसं लिहायचं याचा नमुनाच. Happy

माझेमन किती छान वास्तव सांगीतलेस. होय आपण रिन्यु करतोच करतो. आणखिन एक माहीते का तुला - एव्ह्रीटाईम, वी रिन्यु टत, आपण फॉल्स मेमरीही फॉर्टिफाय करत असतो. कारण आपल्याला डिस्टॉर्टेड आठवते आणि तेच खरे वाटते.

हो, मीही आठवायचा प्रयत्न करते आहे - इरावतीबाईंच्या पुस्तकात का? त्या जगन्नाथपुरीवरच्या लेखात वगैरे?

>>> अनिंद्य यांची पोस्ट फार मच्युअर ( प्रगल्भ) वाटली. प्रेमाने कसं लिहायचं याचा नमुनाच
हो! आणि मला तो 'सततचा गृहपाठ'ही फार प्रेरक वाटलेला आहे. Happy

अनिंद्य, ही लेटेस्ट पोस्ट खूप पटली. देव हा माझाही दोस्त आहे हे खरेच. गरज असेल तेव्हा(च) श्रद्धेने बिंधास हाक मारायची.

वर्षातून दोन वेळा सिजन प्रमाणे किमान कपडे कमी करणं केलं जाते. हिवाळ्याच्या सुरवातीला आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला. जुने झालेले आणि लहान होणारे ( स्पेशली वाढत्या वयाच्या मुलाचे) कपडे तर बाजूला काढले जातातच पण व्यवस्थित होत असूनही , चांगले असले तरी फारसे वापरले न जाणारे कपडे पण देण्यासाठी बाजूला काढले जातात. यावर्षी गरज नसलेल्या रजया, चादरी आणि ब्लांकेट पण बाजूला काढले. कशा कोण जाणे पण बऱ्याच बॅगा आणि सुटकेस पण झाल्यात घरात. तितक्या लागत नाहीत त्या पण कमी केल्या.
न लागणारी पोतेभरपेक्षा जास्तच भांडी मध्यंतरी ड्रायव्हर काका, नव्याने नोकरीला लागलेली आणि एकटी राहणारी पुतणी आणि घरकाम करणारी बाई यांना दिली. दर वर्षी थोडी थोडी करत मुलाची ८०% खेळणी आणि बोर्ड गेम कुणाला ना कुणाला देवून टाकलेत. घरी पाहुणे म्हणून येणाऱ्या लेकरासाठी म्हणून थोडी ठेवलीत. यावर्षी त्यातल्या पण नेमक्या २-४ वस्तू ठेवून बाकी देवून टाकणार.
अभ्यासाची बरीच पुस्तके आणि मुलाची लहानपणीची पुस्तके दिली जातात. बाकी पुस्तकं, क्राफ्ट चे सामान, रंग, काचेच्या बाटल्या, पत्र्याचे डबे, फुटकी आणि जुनी क्रोकरी मात्र साठत चालली आहेत. इतरही काही अडगळीच्या वस्तू माझ्या क्राफ्ट मध्ये वापरायच्या आहेत पुढे कधीतरी म्हणून साठत चालल्या आहेत. हा मोह मात्र अजून कमी नाही झाला. असेच नवऱ्याने वायरी आणि जुने इलेक्ट्रिक - इलेक्ट्रॉनिक सामान ठेवलं आहे. कधीतरी काहीतरी त्यातून नवे काही बनवू म्हणून. ( ४-५ वर्षातून एकदा काहीतरी बनवतो तो) पण माझे क्रफ्टचे सामान जास्त असल्याने मला याबद्दल काही बोलता येत नाही.

अनिंद्य, तुमचा हा लेख मी आधीही वाचून बऱ्याच जणांना लिंक फॉरवर्ड केली,आत्ताही परत वाचला आणि दोघा तिघांना फॉरवर्ड केला आणि लक्षात आलं की मी इथे प्रतिक्रिया लिहीलीच नाही. , तेव्हा ही राहून गेली. बरं आधी सांगते , अफाट आहे लेख. हि कल्पना आवडली, पण जमेल कितपत माहिती नाही. माझं मन तर कागदांमधे इतकं अडकंय, वरती कोणीतरी लिहीलाय कि काही जणं लग्पनत्रिका २०-३० वर्ष जपून ठेवतात. मी कागदासाठी ठेवते. त्याचं कधीतरी काहीतरी करीन म्हणून. लिफाफे करताना जी टोकं, बाजूच्या पट्ट्या कापते त्याही ठेवते दुसऱ्या कार्डला लावायला.. अत्ता खरं तर घराच्या शिफ्टींगच्या वेळी चान्स होता सगळं नको असलेलं काढून टाकायला.शिफ्ट होऊन वर्ष होऊन गेलं पण तरी सगळं घर अजून नीट लागलं नाही.जून्या कपड्यांच्या बाबतीत असं होतं की जे मी भरतकाम केलेले ड्रेस आहेत ते मला टाकवत नाही. कसं जमणार?

>>>>>>लेख आणि तुमचे प्रतिसाद सगळंच अतिशय वाचनीय आहे.
+१
सुसंस्कृत वावर म्हणतात त्याला. टोटली सुसंस्कृत.

खूप छान पोस्ट अनिंद्य... फार आवडली.
हळूहळू क्लटर कमी करतेय जिवनातलंही आणि घरातलं पण.. One step at a time करत!
एका वेळी एकच कोपरा आवरायला घेते. म्हणजे फार overwhelming पण होत नाही.
ही फेज वयानुसार आपोआपच येत चालली आहे असं वाटतं. जितकं कमी तितकं बरं. कशाचा फोमो पण होत नाही आताशा.

Pages