या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.
तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !
सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
@ अल्पना, अगदी योग्य तेच करत
@ अल्पना,
अगदी योग्य तेच करत आहात.
…. माझे क्रफ्टचे सामान जास्त असल्याने मला याबद्दल काही बोलता येत नाही….
माझी अशीच गोची gardening tools and plants बद्दल होत होती. या खेपेला ते ही कमी केले
@धनुडी,
… घर अजून नीट लागलं नाही…
मग स्कोप आहे खूप. “आज” जर घर बदलले आणि ते सामान उचलून नेणारे लोक आलेच नाहीत तर यापैकी काय वस्तु आपण “स्वत: उचलून” नेऊ असा विचार करुन पहा. खूप सामान तुम्ही “not worth” म्हणून आजच टाकून द्याल
@ अंजली,
… ही फेज वयानुसार आपोआपच..,
नाही नाही. ही तुमची स्वत:ची विचारप्रक्रिया आणि achievement आहे. भरपूर वय होऊनही अतिशय हुशार-प्रगल्भ लोकांना तुच्छ वस्तुंचाही मोह सोडवत नाही. फोमो होत नाही म्हणजे तुम्ही जिंकला आहात.
More Power to you !
अमितव,,
अमितव,
स्वाती_आंबोळे,,
मामी,
स्वाती२,
धनुडी,
सामो,
अंजली_१२
आणि
अस्मिता.
तुमच्या कॉम्प्लिमेंट्स नी संकोचून गेलो. You are so generous with praise. थँक्यू म्हणतो
अनिंद्य उत्तम प्रतिसाद. मला
अनिंद्य उत्तम प्रतिसाद. मला व्यक्त होणयाची संधी दिल्यबद्दल धन्यवाद. मी इथे लिहायचे थांबवते कारण मला रि जनरेशन व मरणा पुर्वीचे छान से रिव्हायवल ह्या बद्दल लिहायचे आहे. घरातील भौतिक कचरा काढणे हे फार प्राथमिक स्वरुपाचे चॅलेंज आहे. त्यामुळे गल्लि चुकली असे वाटत आहे . बरे देवावर विश्वासच नसलेले इथे बरेच सभासद आहेत त्यांना ऑफेंड झाले असावे. तर क्षमस्व. वाड्यातील आदर णीय सभासदांना त्रास होउ नये म्हणून मी तो गृपच सोडला आहे . महिन १५ दिवस झाले असतील. तुमच्या प्रतिसादांचा आदर आहे. माझी युनिक परिस्थिती कोणा स समजेल अशी आजिबातच अपेक्षा नाही.
मामी सपोर्ट बद्दल धन्यवाद. जमेल तसे देवघराचे फोटो नवीन बाफ काढून तिथे लिहीन. सततचा गृहपाठ कन्सेप्ट छान आहे. बेस्ट विशेस
अनिं द्य.
देव घराचा प्रतिसाद काढून
देव घराचा प्रतिसाद काढून टाकावा ही अॅडमिन साहेबांना विनंती.
अरे अमा, आप बुरा नक्को मानो.
अरे अमा, आप बुरा नक्को मानो. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. पर्सनली मेरी कोई बात चुभी तो मेरे कू माफी होना. _/\_
उधर अपने हैदराबादी गुरुप पे आओ, तुम ने कुछ नै लिखे भोत दिनां हो गए ना.
अनिंद्य तुमची नवीन पोस्ट आणि
अनिंद्य तुमची नवीन पोस्ट आणि नवीन प्रतिसाद ही खूप आवडले.
आमच्याकडे काय ठेवायचं आणि काय टाकायचं ह्यातून मी पूर्णपणे मन काढून घेतलं आहे. ते सर्व निर्णय नवीन पिढीकडे आहेत, तरी ही मला मोठेपणा देऊन घरातली एखादी वस्तू आई तुला हवीय का टाकू असं त्यांनी मला विचारलं तर क्षणाचा ही विलंब न लावता मी मला नको आहे असं सांगते.
घरातील जुनी ,मोडलेली, आता उपयोग नसलेली वस्तू ही केवळ मी तेव्हा दोन रुपयाला घेतली होती म्हणून मी ती टाकायला देणार नाही अशा वृत्तीचे ज्ये ना बघितले आहेत , जुन्या वस्तू गेल्याशिवाय मुंबई सारख्या खान घरं असणाऱ्या शहरात नवीन वस्तू घेणं शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण जुन्याला किंवा रादर कशालाच चिकटून राहायचं नाही हे मी ठरवल होतं पण मी ते प्रत्यक्षात ही आणू शकतेय म्हणून बरं वाटतंय. भविष्यात बुद्धी भ्रष्ट न होता हे शेवट पर्यंत असच टिकू दे ही प्रार्थना.
अमा, तुमच्या प्रतिसादातला
अमा, तुमच्या प्रतिसादातला जर्मन लोकांचा उल्लेख सोडला तर देवघराबद्दलचा भाग पटण्यासारखाच आहे. तुम्ही कृपया मनाला लावून घेऊ नका.
इतरांनी अनिंद्य यांचं कौतुक केलं म्हणजे तुम्हांला नाव ठेवली असं नाही.
तुम्ही तुमच्या देवघराबद्दल लिहा. मलाही तिथे लिहिण्यासारखं आहे.
घरातील जुनी ,मोडलेली, आता
घरातील जुनी ,मोडलेली, आता उपयोग नसलेली वस्तू ही केवळ मी तेव्हा दोन रुपयाला घेतली होती म्हणून मी ती टाकायला देणार नाही अशा वृत्तीचे ज्ये ना बघितले आहेत , जुन्या वस्तू गेल्याशिवाय मुंबई सारख्या खान घरं असणाऱ्या शहरात नवीन वस्तू घेणं शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे. >>> १००++
भरत+१
भरत+१
मी पूर्णपणे आस्तिक आहे आणि वाडा/माबोवर कुठेही कधीही कुणाला दुखावलेले नाही. आताही कुणीही तुमच्या भावना invalidate करत नव्हते. बहुतेकांना अनिंद्य यांची पोस्ट खूप आपुलकीने लिहिलेली वाटली, सांगण्याची पद्धत आवडली, त्यांच्या घरचे वातावरण आवडले म्हणून कौतुक करावेसे वाटले.
मला खात्री आहे ज्यांनी अनिंद्य यांच्या पोस्टीचं कौतुक केलं आहे, त्या सर्वांच्या सदिच्छाच आहेत तुमच्या पाठीशी.
भरत+१
भरत+१
अमा, तुम्ही कशातुन जात आहात त्याची आम्ही कल्पनाही करु शकत नाही हे खरेच आहे पण माबोवर काय आणि वाड्यावर काय बरीच मंडळी आस्तिक आहेत. आमच्या प्रार्थना तुमच्या सोबत आहेतच. अनिंद्य यांनी खूप प्रेमाने लिहिले म्हणून त्याचा उल्लेख केला गेला एवढेच.
Submitted by अनिंद्य on 22
Submitted by अनिंद्य on 22 November, 2024 - 18:53 >> संपूर्ण पोस्ट आवडली.
दर वेळी सर्वांचे सर्वच मुद्दे पटतात असं नाही, पण त्यावर योग्य शब्दात प्रतिसाद कसा द्यायचा हे अनिंद्य यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
इतरांनी अनिंद्य यांचं कौतुक
इतरांनी अनिंद्य यांचं कौतुक केलं म्हणजे तुम्हांला नाव ठेवली असं नाही. तुम्ही तुमच्या देवघराबद्दल लिहा. मलाही तिथे लिहिण्यासारखं आहे. >> +१
अनिंद्य यांची पोस्ट खूप
अनिंद्य यांची पोस्ट खूप आपुलकीने लिहिलेली वाटली, सांगण्याची पद्धत आवडली, त्यांच्या घरचे वातावरण आवडले म्हणून कौतुक करावेसे वाटले........ खरंय (कौतुक करण्याचे राहून गेले होते खरंतर).
... मी तेव्हा दोन रुपयाला
... मी तेव्हा दोन रुपयाला घेतली होती म्हणून मी ती टाकायला देणार नाही अशा वृत्तीचे ज्ये ना…
यात वयाचा फार फरक पडतो असे नाही वाटत. लहान-तरुण मुले सुद्धा hoarding करतात, माझ्या सामानाला हात लाऊ नका, ते सर्व कामाचे(च) आहे असे म्हणतात. MacD च्या प्लास्टिक खेळण्यांपासून collection ची सुरुवात होते, वय आणि समृद्धी वाढते तसे-तसे जास्त संधी, जास्त सामान. मागे कुणी लिहिल्याप्रमाणे आपल्यापैकी काहीजण जास्त “सामान/ वस्तू” म्हणजे जास्त समृद्धी असा समज असलेले असतात. ओसंडून वाहणारी घरे-कपाटे त्याचा नित्य दिसणारा 3D view.
वस्तूंची “सवय” होते हे ही आहेच. मग वयाने सीनियर लोकांकडे जास्त सामान हे ओघाने आले.
एक मात्र आहे : वस्तूंचा “होणारा वापर” हा निकष लावला तर आपली घरे अर्धी रिकामी होतील
होणारा वापर..हे ठीक आहे..पण
होणारा वापर..हे ठीक आहे..
पण पुढे कधी लागले तर असो. पुन्हा विकत घ्यायला गेले तर याच्या तिप्पट किंमत असेल..
ह्या इनसिक्युरिटी चे काय करावे कळत नाही.
… पुढे कधी लागले तर…
… पुढे कधी लागले तर…
आपल्या कामी येणाऱ्या वस्तू अर्थातच नाही टाकायच्या. पण “कधीतरी” चा पेपर अवघड आहे.
दुसरीकडे घरोघरीचे खच्चून भरलेले माळे आहेत साक्षीला तिथे काय ठेवलयं हेच आठवत नसेल तर पुढे कधी वापर होणार तरी कसा ?
रच्याकने: “ठेवू माळ्यावर”ची आमची सवय मोडण्यासाठी मी शोधून माळा नसलेले घर विकत घेतले
माळा ही एक अमूर्त संकल्पना
माळा ही एक अमूर्त संकल्पना आहे. डोक्यावर असलेला कडप्पा हे एक त्याचं मूर्त रूप असलं तरी ते नसल्यास इतर जागा त्याची नसलेली जागा भरून काढतात असा अनुभव आहे.
माळा नसल्यास इतर जागा त्याची
माळा नसल्यास इतर जागा त्याची नसलेली जागा भरून काढतात …
True that
म्हणून मग “त्या” जागांवर सौंदर्यपूर्ण अतिक्रमण करावे. तिथे Live plants and flowers किंवा decorative objects ठेऊन (घरोघरी हे objects नेहेमी छान pack करून कुठेतरी “नीट” आणि “जपून” ठेवलेले असतात. मोस्टली माळ्यावर)
पुढे कधी लागले तर…
पुढे कधी लागले तर…
पुढे कधीच लागणार नाही अशी खात्री वाटून घरातले घमेले कामवाल्या बाईंना देऊन टाकले होते.
करोना काळात मैत्रिणीच्या मुलाचे लग्न निघाले तेव्हा तिची घरच्या होमाच्या वेळी हवे म्हणून घमेल्याची शोधाशोध चालू होती. मग माझ्या बाईकडून ते आणून मैत्रिणीला दिले.
पुढे चार लग्न करून माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी ते माझ्याकडे परतले.
मागच्याच आठवड्यात दुसऱ्या एका मैत्रिणीकडे ते लग्न होमाकरता देऊन आले. आता तिला ते तसेच पुढे फिरवायला सांगितले.
अनिंद्य यांची पोस्ट खूप
अनिंद्य यांची पोस्ट खूप आपुलकीने लिहिलेली वाटली, सांगण्याची पद्धत आवडली, त्यांच्या घरचे वातावरण आवडले म्हणून कौतुक करावेसे वाटले........ खरंय (कौतुक करण्याचे राहून गेले होते खरंतर).>+११११११
आणि भरत, अस्मिता,स्वाती यांना मम
अनिंद्य हा लेख आणि त्या वरचे प्रतिसाद ही रोज वाचून आचरणात आणण्याची क्रिया आहे.. (मला नीट लिहीता आलं नाही, भावना समजून घ्या)
माळा नसल्यास इतर जागा त्याची नसलेली जागा भरून काढतात …>>> हे खरंय. आमच्या नव्या घरात माळा नाही. पण जी तिसरी बेडरूम आहे त्यात सगळं जुनं सामान ठेवलंय. जुन्या कपाटांच्या वर पण.
घरोघरी हे objects नेहेमी छान
घरोघरी हे objects नेहेमी छान pack करून कुठेतरी “नीट” आणि “जपून” ठेवलेले असतात >> मनकवडे असतात तसे तुम्ही घरकवडे आहात
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
आमच्या घरी व्यवस्थित ठेवले की
घरोघरी हे objects नेहेमी छान pack करून कुठेतरी “नीट” आणि “जपून” ठेवलेले असतात >> मनकवडे असतात तसे तुम्ही घरकवडे आहात
>>>> मस्त पोस्टी.
आमच्या घरी व्यवस्थित ठेवले की सापडतच नाही, त्यामुळे वस्तू सापडेना गेली की आम्ही 'व्यवस्थित ठेवली असेल' असे म्हणतो.
माळा, टेबल, टिव्हीचे शेल्फ, स्वयंपाकघरातील वट्टा हे असले की सामानाने भरतातच, हे नसते तर आपण पसाराच केला नसता. स्मरणशक्ती स्पर्धेत मेंदूला आव्हान देण्यासाठी जसे पूर्णपणे वेगवेगळे सामान, बारीकसारीक गोष्टी ठेवलेल्या असतात तशा आमच्या ओट्यावर गोळा होतात. काय जादूटोणा आहे काय माहीत.
पुढे कधी लागले तर - यासाठी मी थंबरूल केला आहे, एखादी गोष्ट दोन वर्षे लागली नाही तर ती आयुष्यभर लागत नाही. कारण दोन वर्षांत सगळे ऋतू, सणवार, पाहुणे, कार्य, सुट्टी, प्रवास व विक्षिप्त लहरींचे प्रकार येऊन जातात. त्यामुळे तो एक ग्रीन सिग्नल समजून वस्तू डोनेट करणे/ विकणे/टाकून देणे ई करण्यासाठी आपण 'सेफ' असतो.
आणि डोनेट केल्यावर दुसऱ्याच
आणि डोनेट केल्यावर दुसऱ्याच दिवशी ती वस्तूच लागते.
नवं बकेट लिस्ट एस्प्रेसो मशीन घेतल्यावर जुनं क्युरीग मशीन (हे मार्केट प्लेस वरूनच घेतलेले सेकान्हांड) मी बेसमेंट मध्ये असू दे. एस्प्रेसो बिघडलं तर कॉफी चे वांदे नको, क्युरिग री युजेबल कप घेतलेत ते बेवारस होतील इ. काळज्यनपोटी ठेवलंय.
हे वाचताना मलामाझा होर्डिंग
हे वाचताना मला
माझा होर्डिंग ओसीडी हा धागा आठवला. अनिंद्य खूप जिव्हाळ्याचा विषय मांडलात. वाचायचा राहून गेला होता. अलिकडे माझा विरक्तीचा वाढलेला वेग व बायकोचा जगण्याविषयी वाढलेला आसक्तीचा वेग यामुळे आमच्यातील अंतर फारच वेगाने वाढत चाललय. 180 अंश आउट ऑफ फेज जाईल अशी भीतीवजा शक्यता वाटते. माझ्या वैवाहिक सहजीवन या धाग्यात काही भाग मांडलाही आहे.
वस्तू इतरांना देतानाही आपण कसे उदात्त ही भावना सुखावून नेते. पण त्यावेळी त्यांना त्याची गरज आहे की नाही व त्यातील व्यवहार्यता विचारात घेतली जात नाही. मध्यंतरी माझ्या बायकोने अथेर ई स्कूटर हौसेपोटी घेतली. गॅरेजवाला म्हणत होता तुमची ती गरज नाहीये. आहे ती स्कूटर अतिशय उत्तम आहे. पण हौसेला मोल नसते. आता जुनी व्हिगो स्कूटर आमच्या कामवाल्या बाइला देउन टाकली. तिला सायकल देखील चालवता येत नाही. शिवाय तिच्या नवर्याकडे एक स्कूटर आहे. मी सांगत होती की स्कूटर विकून जे पैसे येतील ते तिला दे. पण आपली कामवाली स्कूटरवरुन आपल्याकडे कामाला यावी स्वप्नवत इच्छेपोटी तिने बळेवळॆ तिला ती स्कूटर दिली. शिकून घेण्याविषयी लकडा लावला. इच्छाशक्ती असेल तर सगळॆ काही करता येते. सायकल येत नसतानाही स्कूट्रर चालवता येईल. खर तर त्या मध्यमवायीन कामवाल्या बाईला पुण्यात या वयात स्कूटर शिकून घेऊन वापरणे हे फार रिस्की वाटले. शिवाय तिची तशी इच्छाही नव्हती.पण मालकीणबाईंच्या प्रेमळ सक्ती वजा आग्रहापोटी तसे म्हणण्याचे धाडस ही होत नव्हते. शिवाय तिला ती स्कूटर नावावर करुन घेण्यासाठी खर्चही करावा लागला. दर वेळी नवर्याकडून शिकून घे अन्य नातेवाईकाकडून शिकून घे असा दरवेळी आग्रह होत गेला. प्रत्येक वेळी ती काही तरी कारणॆ सांगून विषय टाळत असे. नंतर तिचे एक मोठे ऑपरेशन झाले. त्यावेळी तिला स्कूटर ऐवजी पैशे दिले असते तर उपयोगाला आले असते असे मी बोलून ही दाखवले. मग तिने अतिरिक्त पैसे बाईला दिले. शिवाय आजारपणाच्या काळात पगारी रजा दिली. आता स्कूटर बद्दल तिला जाब द्यावा लागत नाही. त्या स्कूटर चे तिच्याकडे पुढे काय झाले हेही आता माहित नाही. वयाच्या चाळीशी नंतर आपल्या मोलकरणीने स्कूटर शिकून घेउन आपल्याकडे कामाला येतान ती स्कूटर घेऊन यावी ही बायकोची इच्छा अपूरीच राहीली.
आमच्या सोसायटीत विनावापर धूळ खात पडलेल्या सायकली दान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. खर तरे तसे आवाहन मीच केले होते.सोसायटीत सायकल सुरवातीला सायकली उत्साहाने घेतल्या जातात. थोड्या दिवसांनी त्याचा कंटाळा यायला लागतो मग त्या वापरण्याकडे कल कमी होतो. हळू हळू त्या वापरायच्या बंद होतात. नंतर वापरु असे म्हणत त्या विनावापर धूळ खात पडतात. हवा कमी झाल्याने टायरला क्रॅक जाउन रिम ही गंजायला लागते. तरी दुरुस्त करुन वापरु असे म्हणत सायकली पुढे माहिनोन्महिने व वर्षानुवर्षे तशाच ठेवल्या जातात. अशा धूळ खात गंजत पडलेल्या सायकली एक तर जागाही खातात व सोसायटीच्या सौंदर्यालाही बाधा आणतात. खरे तर वास्तू शास्त्रानुसार तर अशा वस्तू आपल्या घरात वा जागेत निगेटीव्ह उर्जा निर्माण करतात .त्यापेक्षा त्या आत्ता डोनेट केल्या तर गरजू लोकांना त्या उपयोगाला तरी येतील. खेड्यातील व गरीब विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्यावर त्यांच्या चेहर्यावर एक आनंद दिसतो. या सायकलदाना निमित्त आपण तो त्यांना मिळवून देउ शकतो. याचा जरुर विचार करा. आमच्याकडे गेली किमान दोन वर्षे धूळ खात पडलेली सायकल होती. ती दान करण्यासाठी मी बायकोला सांगितले तिने ते अजिबात ऐकले नाही. आम्ही दुरुस्त करुन नंतर वापरु असे सांगितले. मुलगी सुद्धा ती सासरी वापरणार नाहीये हे माहित आहे.
माळा ही एक अमूर्त संकल्पना
माळा ही एक अमूर्त संकल्पना आहे. डोक्यावर असलेला कडप्पा हे एक त्याचं मूर्त रूप असलं तरी ते नसल्यास इतर जागा त्याची नसलेली जागा भरून काढतात असा अनुभव आहे. >>>>
@ प्रकाश घाटपांडे
@ प्रकाश घाटपांडे
… होर्डिंग ओसीडी हा धागा …
त्यावर पहिलाच प्रतिसाद माझा आहे
तुमचा स्कूटर चा किस्सा धमाल. लेखातला मुद्दा क्रमांक ४.
.. सोसायटीत विनावापर धूळ खात पडलेल्या सायकली…
हे माझ्या संकुलात करण्याचा प्रयत्न केला. यश आले नाही. Most people said they will “decide later” त्या आधीच रंजल्या गांजल्या सायकली पार कुजेपर्यंतचा काळ “विचार करण्यासाठी” लागणार असेल तर …
तुम्ही घरकवडे आहात
…. तुम्ही घरकवडे आहात ..,
>>सायकली पार कुजेपर्यंतचा काळ
>>सायकली पार कुजेपर्यंतचा काळ “विचार करण्यासाठी” लागणार असेल तर >> हे कळतं पण वळत नाही प्रकारचं आहे.
मी बिर्याणी केली की साधरण जास्त करतो/ होते. दुसर्या दिवशी आवडीने खाल्ली जाते अर्थात. पण जर ती दुसर्या खाण्यातही संपली नाही आणि थोडी उरलीच तर ती तेव्हाच टाकवत नाही आणि फ्रीज मध्ये सारली जाते. मग आठवडाभराने त्यावर यथासांग बुरशी येते. मग टाकली जाते.
ती दुसर्या दिवशी खाण्यायोग्य चांगली असताना टाकली तर टाकताना गिल्ट असतो. तोच गिल्ट बुरशी आल्यावर टाकताना फारच कमी होतो. हे माहिती असलं आणि त्यातील फोलपणा समजत असला तरी दरवेळी पहिले पाढे पच्चावन्नच होते.
तरी दरवेळी जेवण करताना फ्रीज मध्ये ठेवायची वेळच येणार नाही अशाच हिशेबाने करतो.
तुम्ही घरकवडे आहात .., :हा हा
तुम्ही घरकवडे आहात .., :हा हा:
वाचतेय ...
अनिंद्य, खूप कौतुक!
Pages