Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेल्यावर आपण भूत बनतो आणि आपल्या घरीच राहायला लागतं त्यामुळे मी मरायच्या आधी काही कोणाला देणार नाही. तुम्ही पण देऊ नका नाहीतर मुलं नातवंडं कधी काय घेतील याची वाट बघत बसायला लागेल. नाहीतर ज्यांना सामान दिलंय त्यांच्या घरी जायला लागेल. तुम्ही एखाद्याला आरसा दिला असेल तर तुम्ही त्याच्या घरी जाल आरशात बघायला त्याच वेळी चुकून आरसा घेणारी व्यक्ती पण आरशात बघत असेल तर तुम्ही त्याला दिसाल मग इथे मायबोलीवर अमानवीय धाग्यात एक नवीन किस्सा ऍड होईल. भुतांचे किस्से असेच तयार होतात.

फोटो digitalized करणे -

अनेक अँप्स आहेत. फोटोचे फोटो, स्कँनर असे अनेक ऑप्शन आहेत.

लेख छान. वास्त्वव वादी, पटण्या सारखा.

ही सकल्प्ना माहीत होती, पण नाव माहीत नव्हते.

नेहमीप्रमाणेच रोचक लेख अनिंद्य!

ज्यूडीथ कार या प्रसिद्ध बालसाहित्यकारांची आठवण आली.
त्यांनी मुलांसाठी लिहिलेली Mog ही पाळीव मांजराची कथामालिका फार लोकप्रिय आहे. ह्या गोष्टीमधले Mog हे मांजर त्याच्या उपद्व्यापांमुळे छोट्या दोस्तांचे खूप लाडके आहे. ह्या मालिकेतील Good Bye Mog ह्या कथेत ह्या मांजराचा मृत्यू दाखवला तेव्हा समीक्षकांनी बालसाहित्यात एखाद्या आवडत्या पात्राचा असा मृत्यू दाखवणे बालमानसशास्त्राच्या दृष्टीने कसे अयोग्य आहे यावर खूप मोठा उहापोह केला होता.

या अनुषंगाने मुलाखतीला उत्तर देताना ज्यूडीथ कार यांनी फार छान विवेचन दिले होते. मृत्यू ही अपरिहार्य गोष्ट आहे. प्रियजनांचा मृत्यू ही कितीही अप्रिय आणि कटू बाब असली तरी काही वेळेस लहान वयातही (विशेषतः पाळीव प्राण्यांच्या बाबतीत) मुलांना ह्या दुःखदायक प्रसंगाला सामोरे जावे लागते.

ह्या गोष्टीत MOG च्या तोंडी शेवटी एक वाक्य आहे जे कार यांनी स्वतःसाठीही लागू होते असे म्हटले होते..

"Remember, Remember me, but go on with your life."

हा लेख वाचल्यावर वाटले की ज्यूडिथ कार कदाचित आपला साहित्यिक कारकिर्दीचा पसारा आवरत तर नसाव्यात ?

"Remember, Remember me, but go on with your life."

प्राईसलेस, बहुमूल्य विचार !!

... साहित्यिक कारकिर्दीचा पसारा आवरत तर नसाव्यात ?...

शक्य आहे Happy

‘पसारा’ वाटण्याइतपत स्वत:ची साहित्य संपदा असणे हे किती भाग्याचे आहे असा विचार मनात आला.

"Remember, Remember me, but go on with your life."
प्राईसलेस, बहुमूल्य विचार !!
>>> +१०८

Remember, Remember me, but go on with your life...
एकदम निःशब्द!!
I hope, हे वाक्य माझ्या मृत्यूसमयी माझ्या लक्षात राहील आणि मी ते म्हणू शकेन !

मागे चर्चा झाली असेल तर माहिती नाही.
पण प्रत्येकाने आपले सर्व investments घरातल्या किमान ३ लोकांना सांगून ठेवावेत, ह्यात तुमचा जोडीदार अनिवार्य. कागदपत्र जागेवर ठेवा, व्यवस्थित लावून ठेवा. Digilocker वापरा.
बँकेत आणि प्रत्येक ठिकाणी nominee details व्यवस्थित भरा. नाव आडनाव वगैरे नीट अगदी.
किमान phone आणि email चा password share करून ठेवा.

हे सगळं नसेल तर आपल्या नंतर आपल्या प्रिय जनांना extra त्रास सहन करावा लागतो, मनस्थिती नसताना. कुणीही समजून घेत नाही. ना बँक ना insurance वाले. सगळे द्रविडी प्राणायाम करावे लागतात.. कागदी घोड्यांचे.

आपला विश्वासू एक buddy असावा, ज्याला सगळं माहिती असावं आणि कठीण काळात त्याने / तिने आपल्या कुटुंबाची मदत करावी एवढं नक्कीच कमावू शकतो आपण. बाकी व्यक्ती गेल्यानंतर इतर गोष्टींना फारसे महत्व उरत नाही.
आमच्याकडे गेलेल्या व्यक्तीची एकही वस्तू घरात ठेवली नाही. मला पटो वा ना पटो कुणी नाही विचारलं.

माझे अनुभव मिश्र आहेत.
एका बँक वाल्याच वाक्य आठवलं. तो म्हणाला 'मॅडम हजारो लोकं मरतात आम्ही काय सगळ्यांचे auto emi थांबवणार का? प्रत्येकाला आम्ही entertain नाही करु शकत.'
हे वाक्य जशास तसं लिहीत आहे. Car loan च्या संदर्भात आहे

ओह किल्ली.
अगदी त्यांच्यासाठी रुटीन प्रोसेस असली तरी वाक्य खूप वाईट आहे.
सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना किमान मॅनर्स माहीत असणे गरजेचे आहे.

हो आता ऐकून ऐकून सरावलेय, दगड झालेय. पण सुरुवातीला जड गेलं.
ऑफिस च्या लोकांनी खूप साथ दिली त्रास न देता, दोघांच्याही. त्याची आभारी आहे

‘पसारा’ वाटण्याइतपत स्वत:ची साहित्य संपदा असणे हे किती भाग्याचे आहे असा विचार मनात आला. )))

' When Hitler stole pink rabbit ' हे त्यांचे semiautobiographical पुस्तक फार गाजले.

ज्यूडिथ कार यांचा जन्म एका उच्चभ्रू, कलासक्त अशा जर्मन ज्यू कुटुंबात झाला. मात्र हिटलरच्या ज्यू विरोधक संहारामुळे कार परिवाराला जर्मनीतील घरदार व्यवसाय सोडून निर्वासित व्हावे लागले. ज्यूडिथ व तिचा भाऊ कुटुंब स्थिरस्थावर होईपर्यंत चार वेगवेगळ्या देशातल्या ११ शाळांमध्ये गेले व चार वेगवेगळ्या भाषांत शिकले. त्यांचे बालपण व तारुण्यातील सुरवातीचे दिवस फारच संघर्षमय होते. ज्यूडिथ कार व्यवसायाने चित्रकार होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरवात उशिरा झाली. वयाच्या 95 व्या वर्षापर्यंत त्या उत्तमरित्या सक्रिय व लिहित्या होत्या.

पसाऱ्याच्या बाबतीत बोलायचे तर त्यांच्या नव्वदीत घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांचे घर दाखवले होते, ज्यात त्या गेली ५० वर्षे राहत होत्या. त्यांनी सांगितले की त्या घरातल्या बऱ्याचशा वस्तू , विशेषतः त्यांचे चित्रकलेचे टेबल, खोली, किचन मधल्या वस्तू सुरवातीपासून गेली ५० वर्षे त्याच आहेत.

इथे दर 4 वर्षांनी फर्निचर ची फॅशन बदलली की जुने बदलावेसे वाटते..५० वर्षे एवढा ताबा कसा ठेवला असेल त्यांनी !

प्रत्येकाने आपले सर्व investments घरातल्या किमान ३ लोकांना सांगून ठेवावेत, ह्यात तुमचा जोडीदार अनिवार्य. कागदपत्र जागेवर ठेवा, व्यवस्थित लावून ठेवा. Digilocker वापरा.

किल्ली अगदी योग्य मुद्दा. ..

हे वय कितीही असले प्रत्येक सज्ञान व्यक्तीला लागू पडते.

Remember, Remember me, but go on with your life...<<< निसर्ग नियमाने सर्वांचं आयुष्य पुढे जातच राहतं.. सांगावं लागतं नाही...

निसर्ग नियमाने सर्वांचं आयुष्य पुढे जातच राहतं.. सांगावं लागतं नाही...)))) बरोबर आहे sparkle

एखाद्याच्या असण्याची सवय असते तशीच कठीण असले , वेळ लागला तरी नसण्याचीही सवय होते. कालाय तस्मई नमः...
पण 'माझ्यानंतर यांचे काय' किंवा 'यांच्यानंतर आपले काय' हा गुंता हयात असताना लवकर सुटत नाही. आपण आणि प्रियजन दोघांसाठीही स्वतःहून निरिच्छ होणे कठीण असते...

किल्ली, तुम्ही लिहिलंय, त्याबद्दल मागे एक धागा होता. बहुधा पूनम / पौर्णिमा यांचा.
शोधला - https://www.maayboli.com/node/51584

घरातलं माणूस गेल्यानंतर केले जाणारे विधी , प्रथा, समजुती हा आणखी एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे. तुम्ही खरंच धिराच्या आहात. इथे लिहिता येण्याइतकं तुम्हांला सावरलेलं पाहून खरंच बरं वाटलं.

----
Remember, Remember me, but go on with your life.

एकदा असाच काहीतरी मूड लागला. तेव्हा निरोपाच्या साताठ हिंदी चित्रपटगीतांची एक प्लेलिस्ट बनवली आणि सलग तीनचार दिवस ऐकली. त्यावर लिहायलाही घेतलं होतं. मग सोडून दिलं.

@ किल्ली,

... प्रिय जनांना extra त्रास सहन करावा लागतो, मनस्थिती नसताना. कुणीही समजून घेत नाही. ....

Exactly !

कितीही आयुष्य पुढे जात राहतं वगैरे म्हटले तरी जवळच्या माणसाचा विरह आणि त्याच्यामागे राहणारा पसारा आवरणे दोन्ही एकत्र फार कष्टप्रद आणि थकवणारे असते. मागे राहणाऱ्यांसाठी ही प्रोसेस सोपी करणे हाच Döstädning चा गाभा आहे. तुम्ही स्वानुभवातून मांडलेले मुद्दे हेच अधोरेखित करताहेत की 'व्याप सुटसुटीत ठेवा'. त्याचा लाभ सर्वांनाच आहे.

आपला विश्वासू एक buddy असावा... + इन्फिनिटी !!

जवळच्या काही लोकांसाठी आपणच असा 'बडी' होण्याचा प्रयत्न करतो. घरचे लोक, जोडीदार त्यांच्या दुःखात असतांना शक्य ते सर्व करणारा मित्र सर्वांनाच मिळावा.

तुमच्या धीरोदात्त स्वभावाचे खूप कौतुक वाटले, अनेक शुभेच्छा.

.... आपण आणि प्रियजन दोघांसाठीही स्वतःहून निरिच्छ होणे कठीण असते...

निरिच्छ होण्याची आणि सगळ्यातून 'भावना काढून घेण्याची' गरज नाही असे वाटते. याबाबतीत लेखातला पाचवा मुद्दा फार महत्वाचा आहे. सरसकट सर्व सोडून जंगलात नाही निघायचे आपल्याला, फक्त स्वतःचे आणि मागे राहणाऱ्यांचे आयुष्य सोपे करायचे आहे Wink

जस्ट क्लीनिंग, नॉट व्हायपिंग ऑफ एव्हरी थिंग फ्रॉम लाईफ Happy

किल्ली, खरंच /\ . तुला नेहमी भरभरून प्रेम, सदिच्छा व लागेल ती मदत मिळत राहो.

Remember, Remember me, but go on with your life. >>>>
खरं आहे. अपरिग्रह नावाचा लेख लिहिला होता, काल त्यावरचे प्रतिसाद चाळले. हृदयात कसंतरीच झालं, लेख वाचूच शकले नाही. सारखं भावनांमधून 'स्नॅप आऊट-स्नॅप इन' होणं आता अनैसर्गिक वाटतय. त्यातून निघालं तर खोटारडं व त्यात रेंगाळलं तर निराश वाटतं.‌ तात्कालिक सुवर्णमध्य म्हणजे स्विकार नाही जमला तर झगडत रहायचं, स्विकारही आपला व झगडाही आपलाच असतो. जमला तर आनंदच आहे, नाही जमला तर स्वत्व जपल्याचं समाधान. स्वतः ला स्वतःच्याच वागण्याचं सुद्धा स्पष्टिकरण द्यायचं/मागायचं नाही. याने मन त्यातल्या त्यात निरागस व बुद्धी जरा बरी रहाते. तुम्ही स्वतःलाच गमावून स्वतःला मिळवू शकत नाहीत. वस्तूंचं काय, वस्तू रिप्लेसेबल आहेत, खरा कस- खरी परिक्षा 'अमूर्त' कल्लोळाची असते. हे माझं always evolving emotional death life cleaning...!

@ स्वान्तसुखाय

माझे कॉमेंट स्पोर्टींगली घेतल्याबद्दल थॅक्स ! Happy

तुम्ही लिहिलेली ज्यूडिथ कार यांची लाईफस्टोरी आवडली. ५० वर्षे सेम घर-गाडी-डेकोर हा फॉर्मुला प्रख्यात निवेशक वॉरेन बफे सुद्धा वापरतात असे वाचलेय. ह्यांना काय कमी आहे ? पण 'बाय चॉईस' कमी पसाऱ्याचे आयुष्य ते जगू पाहतात हे महत्वाचे.

तुमच्या "Remember, Remember me, but go on with your life." ह्या कोट नी माझा आजचा दिवस आनंदी केला त्याबद्दल तुमचे खूप आभार !

Döstädning ही कल्पना फार आवडली आहे. लेख आणि प्रतिसाद मननीय आहेत.
जगण्यातला आनंद हरवू न देता 'इदं न मम' ही जाणीव जागी ठेवणं ही तारेवरची कसरतच आहे.

मध्यंतरी मला खूपच त्रास होत होता व रात्र भर झोप येत नव्हती कसे ही झोपले तरी डोळे मिटतच नव्हते तेव्हा एकाठिकाणी अशीच पडून राहिले व एक अनुभूती झाली. म्हण जे लहान पण शिक्षण, आईवडिलांचा संभाळ , नोकर्‍या पुढे करि अर संसार मूल होणे व वाढवून हातावेगळे करणे हे सर्व घडून गेले आणि आता आपण एक रिकामे पाइप आहोत. सगळे क्षण भसा भसा वाहून गेले आहेत. तेव्हा फारच विचित्र वाटले. पण परवा विचार करत होते तेव्हा वाटले की हेच नैसर्गिक आहे. पाइप रिकामा आहे व वेळ त्याच्या स्पीडने निघून जात आहे. म्हणजे काही कार्मिक गाठी आत उरलेल्या नाहीत. ज्याला तो धडकेल. अडकेल. असे काही वजनदार, चिकटे राहिलेच नाही आहे. मन साफ सूफ करून त्यात फार थोड्या वस्तू नीट ठेवलेल्या आहेत. आई व डिलांबद्दल प्रेम, मुली बद्दल प्रेम, स्वाभिमानाने नोकरी करता आल्या बद्दलची कृतज्ञता, निसर्ग प्रेम
एवढेच आहे. त्यामुळे मला बकेट लिस्ट पण नाही.

प्रत्येक त्रासदायक बाब विचार करून सोडवली किंवा प्रोसेस केली त्याची फार मदत झाली. केली तर चांगली कर्मेच करते व वाइट चिंतीत नाही.
दिस रिअली हॅपन्ड.

… प्रत्येक त्रासदायक बाब विचार करून सोडवली किंवा प्रोसेस केली ….. Bravo !

अमा, दिल-दिमाग़ साफ़ हो और क्या होना जी !

आपल्या आयुष्याबद्दलच्या सर्व गाठी- गाठोडी सोडवणे आणि स्वच्छ- मुक्त होणे यासाठीचे तुमचे प्रयत्न प्रेरणादायी आहेत.

तुम्हाला निरामय आनंदी जीवनासाठी खूप शुभेच्छा.

स्वाती, thank you.

>>> आता आपण एक रिकामे पाइप आहोत. सगळे क्षण भसा भसा वाहून गेले आहेत.
What an interesting thought! This will stay with me.

Pages