प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
त्याबद्दल इथे लिहिण्याची उर्मी निर्माण झाली खरी, पण मग वाटलं की त्यावरून 'विशिष्ट' शिक्कामोर्तब तर होणार नाही!
तर, एक डिस्क्लेमर - वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू ,( ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा एकदाच अनुभव घेतला होता. उंबरठा बद्दल लिहिताना. त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अनुक्रमे सक्रिय व अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. वाचलेल्या गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर 'पाहिल्या'. अर्थातच दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता)जेवण(मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला), विशेषतः ते राजकीय कैदी असूनही तशा निर्धारित दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला. माध्यम शक्तिशाली असल्याने की आणखी कशामुळे याचा अंदाज आला नाहीये अजून. म्हणजे, देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, तरीही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय आवडली. म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे. (अवांतर - स्वदेस मध्ये शाखा बद्दल असंच वाटलेलं) फक्त मराठी उच्चारांवर अधिक काम करायला हवं होतं.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही.
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे सुरुवातीला पटकन डोळ्यात आले त्यांना शिक्षा झाल्या, किंवा अमुक एक कडक अधिकारी शासनात असताना जास्त बारकाईने शिक्षा झाल्या, नंतर अधिकारी बदलल्याने / जगात आरडाओरडा झाल्याने तितक्या अमानुष शिक्षा करता आल्या नाहीत असंही असेल.

स्वातंत्र्य संग्रामातल्या प्रत्येकाच्या योगदाना बद्दल आदर आहेच. ज्या मार्गाची (हिंसा/ अहिंसावादी) तुम्ही भलामण करत आहे, जो मार्ग इतरांनी स्विकारावा असे वाटते तो तुम्ही स्वत: आधी स्विकारायला हवा. गांधीजीं आयुष्यभर अहिंसेच्या खडतर मार्गावर चालले, त्यांनी इतरांनाही तशी शिकवण दिली. गांधीजी त्यांच्या अहिंसावादी तत्वाशी १०० % प्रामाणिक होते आणि म्हणून महात्मा आहेत.

मारिता मारिता मरेतो झुंजेल म्हणणारे सावरकर यांनी हिंसा/सशस्त्र लढ्याचे नेहेमीच समर्थन केले. हिंसा करावी पण इतरांनी, प्रत्यक्ष हिंसेच्या कृत्यापासून स्वत: ला कायम वेगळे ठेवले. "मै गांधी से नही, अहिंसासे नफरत करता हू " हे कशासाठी?

वर अनंत कान्हेरे यांच्या बद्दल हळहळ व्यक्त झालेली दिसली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी जॅकसनची हत्या केली. फासावर गेले त्यावेळी त्यांचे वय केवळ १८ वर्षे होते , किती चटका लावून जाते त्यांचे एव्हढ्या कोवळ्या वयांत फासावर जाणे? अनंत कान्हेरे यांनी कृत्याबद्दल माफी मागितली नाही, पश्चात्तापही व्यक्त केला नाही. देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशा त्यागाचा आदर आहे.

मदनलाल धिंग्रा हे कर्झन वायलीच्या हत्या प्रकरणांत फासावर गेले. त्यांचे शेवटचे पत्रक प्रसिद्ध आहे, गुगल केल्यावर मिळते, माफी मागितली नाही. त्यांच्या त्यागाचा आदर आहे.

महात्मा गांधी हत्या कटामधे सावरकर आरोपीच्या पिंजर्‍यात होते, सबळ पुराव्या अभावी सुटले. सावरकर सदनांत त्यांनी गोडसे/ आपटे यांच्याशी अनेकदा भेटी घेतल्या आहेत. अनेकदा भेटले होते म्हणजे हत्येचा कट रचला असे होत नाही. "गांधी यांची शंभरी भरली" हत्या होण्याच्या काही दिवस आधी/ शेवटच्या भेटीमधे " यशस्वी होऊन या ", अशा वक्तव्यांच्या नोंदी आहेत.

गांधी हत्या झाल्याचे कळल्यावर, सावरकरांना वाईट वाटले असे चित्रपटांत दाखविले असा उल्लेख वर आलेला आहे तो खोटेपणा आहे.

त्या वेळेचे देशाचे गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल यांचे सावरकर/ महासभे बद्दलचे मत चित्रपटांत दाखविले आहे का?

१९११ च्या अगोदरचे सावरकर, त्यांचे दोन महाकाव्ये मला एकेकाळी आवडायचे. पण गांधी हत्येमधे सक्रिय सहभाग - आरोपींसोबतचा त्यांचा फोटो पाहिल्यावर तर हळहळायला होते. शत्रू स्त्रियांबद्दलचे सोनेरी विचार बघितल्यावर मोठी निराशा झाली. असले विचार कुठल्याच काळांत समर्थनीय नाही.

Sardar Udham सारखे movies आता येतायेत कारण २०-२५ वर्षांपूर्वी अश्या movies ला भविष्य navat >> म्हणजे नक्कि काय ?

तेंव्हा अश्या प्रकारच्या movies चालतील असे वाटत नसेल किंवा स्पॉन्सर्स मिळाले नसतील.
female protagonist movies ला सध्या चांगले दिवस आहेत तसेच काहीसे......

वर एक शंका उपस्थित झाली आहे कि काँग्रेसच्या नेत्यांना काळ्यापाण्याची शिक्षा का झाली नाहि. यावर हे उदाहरण चपखल बसणारं आहे - महाराष्ट्रात महाराजांनी बांधलेल्या, जोपासलेल्या किल्ल्यांची वाताहात का लागली? याउलट राजस्थानातले किल्ले, गढ्या शाबुत कसे आहेत. याचं कारण, महाराष्ट्र सतत परकियांशी लढला, मोगल, ब्रिटिशांचे तोफगोळे महाराष्ट्रातील किल्ल्यांनी छातीवर घेतले, ज्याचा परिणाम आजहि दिसतोय. राजस्थानातील संस्थानिकांनी मात्र परकियांची गुलामी पत्करुन लढाया टाळल्या, आणि कातडि बचावली. महाराष्ट्रातले किल्ले मराठ्यांच्या शौर्याची आणि साहसाची निशाणी बाळगुन आहेत..>>>
इमोशनल संवादफेकीत हे विश्लेषण(अनालॉजि ) चपखल बसेल, आणि टाळ्या ही मिळवेल. पण तथ्या पासून फारच दूर आहे... महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची दुरावस्था का झाली आणि राजस्थानात ती का नाही झाली यावर तुम्हाला आजून अभ्यास करायची गरज आहे असं वाटत.

नो गट्स, नो ग्लोरी... >>> +१

माझ्या अंदाजाने काळ्या पाण्याची सजा फक्त हिंसक अपराधात सहभागी असणार्यांनाच होई. आणि काँग्रेस ने अहिंसा, असहकाराच्या आणि सविनय कायदेभंगाच्या सर्वसमावेशक मार्गानी लढा पुढे न्यायचा अस ठरवलं होत. अगदी या क्षणी ही जगातील कोणतेही सरकाराविरुद्ध जर त्या देशातील यच्चयावत जनतेने असहकाराची आणि सविनय कायदेभंगाची भूमिका अविचलपणे घेतली तर ते सरकार गलितगात्र झाल्याशिवाय राहणार नाही.
माझ्या मते हे मार्ग एक अभिनव टेम्प्लेटस होते ज्यात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कस्टमायझेशन करून सहभाग घेऊ शकत होतात आणि त्यामुळेच काँग्रेसच्या आंदोलनात सामान्य लोकांचा सहभाग लक्षणीय रित्या डोळ्यांत भरावा इतका वाढला. जर तुम्ही आयडिओलॉजी च्या दृष्टी ने विचार कराल तर अस आढळून येईल की एखाद्या आयडिओलॉजीची पीछेहाट ही त्या आयडिओलॉजीच्या समर्थकांना स्वतःच्या वैयक्तिक पराभवाइतकीच/ नुकसानाइतकीच खुपते. हा माणसाच्या मानसिकतेचा स्थायीभाव आहे, मग तो भले कितीही महान का असू देत. माझ्या मते हेच मूळ कारण गांधी हत्येच्या मागे होते.

माझ्या अंदाजाने काळ्या पाण्याची सजा फक्त हिंसक अपराधात सहभागी असणार्यांनाच होई. आणि काँग्रेस ने अहिंसा, असहकाराच्या आणि सविनय कायदेभंगाच्या सर्वसमावेशक मार्गानी लढा पुढे न्यायचा अस ठरवलं होत. अगदी या क्षणी ही जगातील कोणतेही सरकाराविरुद्ध जर त्या देशातील यच्चयावत जनतेने असहकाराची आणि सविनय कायदेभंगाची भूमिका अविचलपणे घेतली तर ते सरकार गलितगात्र झाल्याशिवाय राहणार नाही.
>>>
+१
सिव्हिल ऑफेंस आणि क्रिमिनल ऑफेंस अशी विभागणी करता येईल

जेव्हा तुम्ही एका गटाचे कष्ट undermine करणारी वाक्य पेरता तेव्हा सगळ्यांचाच अपमान होतो.
>>>>
हे पटते. कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेली माणसे माझ्यासाठी आदर्श आहेत. चित्रपटातल्या असल्या संवादाचे समर्थन अजिबात करत नाहीत. चित्रपटाची कमर्शिअल गणिते यांच्यासंबंधी रघु आचार्य यांनी या/'चिकवा' धाग्यावर चांगला पॉईंट मांडला आहे.

आता हेच वाक्य जहाल क्रांतिकाराना मानणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून पाहू.
अशा क्रांतिकारकांकडे निदान दुर्लक्ष केले गेले. पण सावरकरांना चक्क हिणवले जाते. नको तिथे पडलेल्या टाळीतून किंवा असल्या संवादातून याबद्दलची चीड अशी बाहेर निघते. राग विशिष्ट व्यक्ती/गोष्टीबाबत नसतो, लोकांच्या श्रद्धास्थानाला वर्षानुवर्षे पायदळी तुडवण्याचा असतो.
प्लीज नोट: हे त्या वागण्याचे समर्थन नाहीये. मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
सावरकर (किंवा इतर कोणताही नेता) देशभक्त होते पण त्यांचे एक्स, वाय, झेड पॉईंट्स आम्हाला मान्य नाहीत, हा समजूतदारपणा समाजात का नाही हा खरा प्रश्न आहे.

सावरकरांना चक्क हिणवले जाते >>> माझ्यासहित इथले अनेक जण असतील की ज्यांना अगदी लहान वयापासुन सावरकरांबद्दल आदरच होता. त्यांची सगळिच पुस्तके वाचण्यास उपलब्ध होती, त्यांच्यावर शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या पुस्तकात धडा होता, 'माझी जन्मठेप' मधील एखादे प्रकरण ८वी/ ९ वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात होते, त्यांची कवितादेखील असावी. तेव्हा त्यांच्या माफिनाम्यबद्दल कुठेही वाच्यता नव्हती. तेव्हाच्या सरकारने कधीच धडे वगळणे वगैरे प्रकार केले नव्हते. . पण.. २०१४ नंन्तर गांधी-नेहरु- काँग्रेसला तुच्छ दाखवण्यासाठी जेव्हा सावरकरांची प्रतिमा खांद्यावर घेऊन (कारण संघाचे कोणिही स्वातंत्र्यलड्यात नव्हते) त्यांना गांधी-नेहरूंच्या तुलनेत महान असे प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली गेली, तेव्हा त्यांच्या माफिनाम्याची बाब पुढे आली. आणि त्याबाबतच प्रश्न विचारले जाऊ लागले.

२०१४ नंन्तर गांधी-नेहरु- काँग्रेसला तुच्छ दाखवण्यासाठी जेव्हा सावरकरांची प्रतिमा खांद्यावर घेऊन (कारण संघाचे कोणिही स्वातंत्र्यलड्यात नव्हते) त्यांना गांधी-नेहरूंच्या तुलनेत महान असे प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली गेली, तेव्हा त्यांच्या माफिनाम्याची बाब पुढे आली.

>>> राम नाईक वाजपेयी सरकारमध्ये असताना त्यांनी सेल्युलर जेलमध्ये लावलेली सावरकरांच्या नावाची पाटी यूपीए १ चे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी हटवली. मुंबईत मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारून याचा निषेध करण्यात आला होता. अटल बिहारी सरकारने सावरकरांची प्रतिमा संसदेत लावली तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षाने वॉक आउट केला.
व्हेअरऍज सावरकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमास इंदिरा गांधी येऊ शकल्या नव्हत्या तेव्हा त्यांनी सावरकरांचा सन्मान करणारे पत्र लिहून येण्याबद्दल असमर्थता दर्शवली होती.
या धाग्यावर राजकीय धुळवड होऊ नये ही इच्छा आहे . त्यामुळे इथे थांबते.

लहान वयापासुन सावरकरांबद्दल आदरच होता. त्यांची सगळिच पुस्तके वाचण्यास उपलब्ध होती, त्यांच्यावर शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या पुस्तकात धडा होता, 'माझी जन्मठेप' मधील एखादे प्रकरण ८वी/ ९ वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात होते, त्यांची कवितादेखील असावी

>> correct.

या धाग्यावर राजकीय धुळवड होऊ नये ही इच्छा आहे . त्यामुळे इथे थांबते.
Submitted by MazeMan on 5 April, 2024 - 14:43
>>>
ऑलरेडी झाली आहे, धाग्याने केव्हाच राजकीय रंग पकडला आहे

कारण संघाचे कोणिही स्वातंत्र्यलड्यात नव्हते >> या ही पेक्षा अधिक, संघाला काँग्रेसला स्वतंत्रलढ्यामधील सहभागाचे जे राजकीय लिव्हरेज मिळत होते ते हटवून, स्वतंत्र लढ्यापासून आजतागायत काँग्रेस च्या ध्येय धोरणांमुळेच देश फक्त कसा खड्ड्यात गेला आहे हे पेर्सेप्शन (राजकीय फायद्यासाठी) तयार करायचे होते. त्यातूनच मग जहालवाद्यांसोबतच्या वैचारिक मतभेदाला, देशातील जहालवाद्यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेतुन निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे/असुयेमुळे केलेला विरोध असा मुलामा चढवणे असुदे अथवा फाळणीतील छुप्या अजेंड्याच्या तर्कांचे पेव फोडणे असो. असे जे जे आणि जसे जेंव्हा जमतील तेंव्हा तसे उद्योग करण्यात आले. आणि हे सर्व देशाच्या भल्यासाठी केले गेले का? तर ते तसे ही नव्हते, फक्त स्वतःच्या राजकीय आणि आयडियालॉजिकल आकांशा साध्य करण्यासाठी हर प्रयत्न केला गेला आणि केला जातोय.

Capture0301.JPG

प्राचीन, वाचताना तुमच्या प्रत्येक वाक्याला अगदी अगदी होत होतं.
रणदीप हुडानी ज्या conviction नी सिनेमा बनवला आहे त्याला तोड नाही >> +१०० % सहमत !!!
अ प्र ति म !!!

नो गट्स, नो ग्लोरी >> पुन्हा तेच.

मी क्रांतीकारकांना चूक म्हणत नाहीये - त्यातल्या प्रत्येकाबद्दल आदर च आहे, पण आपला पिण्ड, आपली चूक बरोबर ची कल्पना घेऊन आपल्या सत-असत बुद्धी प्रमाणे वागणं - ह्याल तुम्ही नो गटस म्हणत असाल तर कमाल आहे!

आणि तुम्ही ज्यांना नो ग्लोरी म्हणाताय, त्यांना आख्ख जग वन्दनीय मानतय!
त्यांचं चूक की बरोबर ह्याबद्दल आपल्या प्रत्येकालाच मतं असूच शकतात, पण त्यांना ग्लोरी नाही म्हणणं लॉजिकल वाटत नाहीये.

बायदवे, तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध गटस दाखवणार का रंग दे बसंती मध्ये दाखवल्याप्रमाणे? का तिथे सांविधानिक मार्गाचा वा पर करणं योग्य मानणार?

>>नो गट्स, नो ग्लोरी >> पुन्हा तेच.<<
कुठल्या कांटेक्स्ट्मधे ते लिहिलंय हे तुम्हाला समजलेलं दिसत नाहि किंवा त्याचा विपर्यास करताय..

अहिंसा, किबहुना सशस्त्र क्रांती सगळ्याच बाबतीत लागु होते असं नाहि. ज्या गोष्टी अहिंसक मार्गाने साध्य होउ शकत नाहि तिथे हिंसा आवश्यक होते. "अहिंसा परमो धर्म" हे बोलायला आणि वाचायला बरं वाटतं पण ते युनिवर्सली लागु होत नाहि. तसं झालं असतं तर ज्या देशांनी बौद्ध धर्म स्विकारला त्यांनी दुसर्‍या देशांवर युद्धं लादली नसती, आणि त्या देशांनी प्रतिकार केला नसता. तेंव्हा "धर्म हिंसा तथिव च" हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे...

बायदवे, तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध गटस दाखवणार का रंग दे बसंती मध्ये दाखवल्याप्रमाणे? का तिथे सांविधानिक मार्गाचा वा पर करणं योग्य मानणार? >>>> आता ब्रिटिश सरकार आहे का? आता आपणच निवडून दिलेलं सरकार आहे ना?

बाकी चालू दे.

आता इतके फाटे फुटलेच आहेत तर हेही लिहायला कुणाची हरकत नसावी.

हे 'गोपाळ गोडसें'च्या पुस्तकाबद्दल आहे..
*****
"..न्यायालयाने सावरकरांना निर्दोष म्हणून सोडून दिले ही गोष्टही आपण जमेच्या बाजूने गृहित धरू. प्रश्न न्यायालयीन निर्णयाचा नाही. न्यायालयाची कक्षा 'फाऊंड नॉट गिल्टी' इतकीच आहे. स्व्तांत्र्यवीरांबद्दल गोडसेंचं म्हणणं नक्की काय आहे? त्यांचा या कटाशी संबंध होता की नाही? गोपाळ गोडसे अधुनम्धून अशी शब्दरचना करतात की ज्यामुळे कोर्टात सिद्ध झाले नसले तरी सावरकरांचा संबंध खुनाच्या कटाशी होता, असा भास चालू राहावा! चौकशी चालू असताना पोलिसांच्या छळवादासमोर आपण टिकलो नाही असं हे म्हणतात, आणि त्याच वेळेला 'सावरकरांना गोवण्याचं काम माझ्याकडून झालं नाही, याचं मला समाधान आहे', असंही लिहितात..

"...पुढे पृष्ठ १८५ वर गोडसे पुन्हा म्हणतात- 'सावरकारांची व माझी भेट झाली होती किंवा नाही, ही गोष्ट आज काळाच्या उदरात लुप्त झाली आहे!' सावरकरांचा नथुरामकडे बघण्याचा दृष्टीकोन काय होता? गांधीची हत्या करा हे त्यांनी कदाचित सांगितलं नसेलही, किंवा कट शिजला हेही त्यांना माहिती नसेल असं गृहित घरू, पण ही हत्या घडली, हे नैतिक्दृष्ट्या सावरकर रास्त मानीत होते की गर्ह्य? त्यांच्या दृष्टीने नथुराम खूनी होता, की हुतात्मा? याचं उत्तर ते function at() { [native code] }इशय सफाईने देतात. पृष्ठ १४३ वर सावरकरांच्या तोंडी एक वाक्य घालून ते गोडसेंना हुतात्मा मानीत असं सुचवलं आहे. पृष्ठ १४४ वर गांधी हे मुस्लिम राष्ट्राचे सेनानी, कॉम्ग्रेस सरकार हे मुस्लिम राष्ट्राचे प्रतिनिधी आणि सावरकर हे हिंदू राष्ट्राचे सेनानी असं सुचवून हिंदू राष्ट्राच्या संरक्षणार्थ बलिदान देणारा नथूराम हा सैनिक व सावरकर यांचा संबंध सुचित केला आहे. स्वातंत्रवीर हे या कटाचे सहभागी होते, पण कौशल्याने कट रचल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता येण्याजोगा पुरावाच सरकार देऊ शकले नाही, म्हणून सावरकर निर्दोष सुटले, असं गोडसे यांना म्हणायचं आहे काय?.."
*****
- 'गांधीहत्या आणि मी', शिवरात्र, नरहर कुरूंदकर
*****

हे सारं वाचून अनेकांना आनंद, रोमांच किंवा गुदगुल्या होतील अशी सध्याची परिस्थिती आहे, हे माहिती असूनही वरती हे सारं लिहून काढलं. या चर्चेत हा दस्तावेज आला पाहिजे या हेतूने. अजून बरंच आहे, वरचा लेख मुळातूनच वाचावा असा आहे.
*****
तारखाते, पोस्टखाते बंद पाडणे, रेल्वे बंद पाडणे, खजिने लुटणे, बाँबस्फोट घडवणे इ.पेक्षा सविनय कायदेभंग, असहकार, अहिंसा ही तत्त्वे आणि कृती त्यावेळच्या त्यामानाने कमी सिव्हिलाईज्ड आणि जवळजवळ आडमुठे असूनही भारतीय समाजाने कशी पटकन स्विकारली, आणि याचे नक्की फायदे काय होत गेले, हेही कुरूंदकरांनी स्वतंत्र लेख लिहून स्पष्ट केलं आहे. (ते बहुधा 'जागर' मध्ये आहे, शोधून टाकेन इथं). कुरूंदकर न आवडणारे त्याकाळी होते तसे आताही आहेतच, तर त्यांच्यासाठी इतरही अनेक विद्वानांनी एक्झॅक्टली याच विषयावर असंच लिहिलं आहे, ते शोधू सावकाश. सापडेलच अर्थात.
*

आता आपणच निवडून दिलेलं सरकार आहे ना? >> होय. मी त्या मार्गाची भलामण केली नाहीये. आपण जे बोलतो, ते फॉलो करण खरंच शक्य आहे का ह्यावर विचार करावा म्हणून ते वाक्य आहे.

कुठल्या कांटेक्स्ट्मधे ते लिहिलंय हे तुम्हाला समजलेलं दिसत नाहि किंवा त्याचा विपर्यास करताय.. >> नाही राज. विपर्यास करण्याचा स्वभाव नाही.
पण काळं पाणी शिक्षा नसेल तर गलोरी नाही, हे झेपेना ..
मला त री बाकी सर्व प्रकारच्या शिक्षा झालेल्यांची उपेक्षा झाल्यासारखं वाटल.

आमच्या लहानपणी आमच्या घरात स्वराज्याच्या ओव्या असायच्या त्यात मवाळ ते जहाल अशा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा उल्लेख आणि आदर व्यक्त होई.
शिवाजी महाराजांच्या लढाईची गाणी परवाच्या नंतर म्हटली जायची.

आता महाराज मुगलांविरुद्ध अहिंसे ने टिकले नसते, हे सरळसरळ कळतेच कुठल्याही नॉर्मल माणसाला.
पिंडे पिंडे मतीर्भिन: हे पण.
जर जालियनवाला सारखं हत्याकांड बघितलं तर इंग्रज सरकारच्या "न्यायी" पणाबद्दल खात्री पटून क्रांतीकारी मार्गाचा वापर करणच योग्य असं एखाद्याला वाटलं तर ते ही त्याच्या दृष्टीने बरोबरच.

ह्या सगळ्याच लोकांनी घराची होळी केलेली.
म्हणूनच कुठल्याही एका बाजूला कमी लेखण्याची अहमहमिका सुरू झाली की त्याच्या बाजूने बोलणं भाग पडतं.

हे सगळं लिहिताना अनेक गोष्टींवर नव्यान विचार करता आला..
आपली भूमिका काय आहे आणि अशी का हे पडताळता आल.

आता सगळं लिहून झालं आहे , ह्यापुढे लिहीत राहिले तर वितंडवाद होईल (आधीच झाला नसेल तर :D).
त्यामुळे बंद करते.

छान परिक्षण / लेख.
असे सिनेमा जास्तीत जास्त सुपरहिट व्हायला हवेत.

वीर सावरकर चित्रपटात सगळ्यात सुंदर दृश्य काळया पाणीच्या यातनांची नाही. ताजे अन्न बघून सावरकर भावुक होतात, कितीतरी वर्षानंतर पहिल्यांदा हातात लेखणी घेतात, शिपाई ओरडतो, “साला गंगाजल से नहलायेंगें?”, तहानलेले सावरकर नळातून टपकणाऱ्या पाण्याकडे जातायत आणि शिपाई ओरडतो, “ मू* पिलाएंगे मू*, सावरकर १४ वर्षानंतर जेल मधून पहिल्यांदा बाहेर येत असतात तेंव्हा गर्दीचा आवाज, ढोल ताशांच्या गजरात सावरकर जिंदाबादचा जयघोष, असं वाटतं की हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत परंतु गेट उघडतं आणि समोर एकच व्यक्ती, त्यांचे मोठे बंधू त्यांना न्यायला आलेले असतात. ही दृश्यं काळजाचा ठाव घेतात.

पानीपतात सदाशिवराव भाऊ एकटेच होते,१८५७ साली इंग्रजांशी लढताना तात्या टोपे एकटेच, आणि स्वातंत्र्यासाठी १४ वर्षे तुरुंगवास भोगून बाहेर येणारे सावरकर एकटेच.

हा हिन्दू समाज, जी व्यक्ती यांच्यासाठी जीवाशी खेळते त्याला एकटं सोडून देतो.

एक व्यक्ति मदिरा, नग्न दृष्य, प्रचंड हिंसा दाखवून हिट होतो. एका व्यक्ति घर विकून देशभक्तिचा चित्रपट बनवतो आणि फ्लॉप होतो.

२०४७ साली नवा देश जन्माला येतोय. इस्लामिक स्टेट ऑफ इंडिया.

सुंदर, संतुलित चित्रपट परीक्षण! चित्रपट बघितलेला नाही, पण हे परीक्षण वाचून बरीचशी कल्पना आली.

उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज किंवा चिमाजीअप्पा हे कसे /कुठे /किती चुकले हे सांगितले आहे. शत्रू स्त्रियांबद्दलचे विचार अजिबातच पटत नाही.>>>>>
+ १११११

सावरकरांबद्दल आम्ही लहानपणापासून अधिकृत पातळीवरचे उल्लेख ग्रेसफुली केलेलेच वाचले आहेत. शाळेत धडे होते. सागरा प्राण तळमळला कविता होती (अगदी तो अगस्ती ऋषींबद्दल सागराला जे सांगितले त्याचा संदर्भ काय आहे ते शिकवण्यापर्यंत). त्यांचे जाहीर उल्लेख हे "स्वातंत्र्यवीर" असेच बहुतांश होते, नाहीतर किमान आदरार्थी तरी होत असत. त्यामुळे काँग्रेसने उपेक्षा केली असे मला वाटत नाही. १९३०-४० च्या काळात हिंदू महासभा काँग्रेसबरोबर नव्हती - विरोधात होती. त्यामुळे नंतरच्या राजकीय घडामोडींत त्यांचा सहभाग घेतला न जाणे हे ही साहजिक होते. त्यात गांधीहत्येच्या खटल्यात सावरकरांवर असलेला संशय पूर्ण फिटला नव्हता. (आणि तो सिद्ध झाला असता, तरी सध्या उघड गोडसेचे समर्थन करणार्‍यांनी तेव्हा त्याचेही समर्थन केले नसतेच असे नाही).

त्यात सावरकरांची एकूण प्रतिमा ही इतरांबरोबर सहज काम करणे, त्याकरता लागणार्‍या तडजोडी करणे अशी नव्हती. राजकारणात "माय वे ऑर हायवे" असे चालत नाही. असंख्य वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांबरोबर तडजोडी कराव्या लागतात. काँग्रेस मधे असेच विविध लोक भरलेले होते पण एका कॉमन ग्राउण्डवर एकत्र आलेले होते.

स्वातंत्र्याचे श्रेय "फक्त" अहिंसात्मक लढ्याला दिले गेले आहे असेही मला कोठे कोणी ठसवल्याचे आठवत नाही. एखाद्या फिल्मी गाण्यात कोणी तशी लिबर्टी घेणे वेगळे. शालेय इतिहासांत क्रांतिकारकांवरही धडे असत. पण गांधींचा कॅनव्हास प्रचंड मोठा होता. तितकी मोठी व्याप्ती हिंसक आंदोलनांची झाली नाही. लोकांना आणखी प्रचंड मोठे संघटन करून देशव्यापी हिंसक आंदोलन उभारायला गांधीजी रोखू शकले नसते. पण त्याला लोकांचा इतका देशव्यापी सपोर्ट मिळाला नाही. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याच्याकरता प्रयत्न करत असलेल्या लोकांना आणि स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या लोकांना साहजिकच श्रेय मिळाले. प्रत्यक्षात ब्रिटिशांनी देश सोडण्याचा ट्रिगर हा हे आंदोलन असो वा नसो. हे लोक त्याकरता झटत होते हे महत्त्वाचे.

३०-४० च्या दशकांमधें सावरकरांनी थेट ब्रिटिशविरोधात काय केले हे मला फारसे लक्षात नाही. सुभाषबाबू व त्यांच्या संबंधांच्या बाबतीत सावरकरभक्त जे लिहीतात - तसे काही असणे अशक्य नाही. पण त्याला इतर कोणाकडून फारसा दुजोरा मिळालेला वाचला नाही. त्यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस लोकांना ब्रिटिश इण्डियन फौजेत सामील व्हा सांगितले त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. त्यात प्रत्यक्ष मैदानावर बंदुकांची दिशा फिरवणे वगैरेची बरीच चेष्टा झालेली आहे. पण उद्देश प्रत्यक्ष मैदानावर तसे करणे हा नसून लष्करी प्रक्षिक्षण व अनुभव असलेले लोक तयार करणे हा असावा.

एक विलक्षण प्रतिभावान व राष्ट्रपेमी माणूस स्वातंत्र्यासाठी कारवाया करतो. मग शिक्षा झाल्यावर तेथेच खितपत पडण्यापेक्षा सनदशीर मार्गाने सुटका करून घेतो. नंतर पुन्हा तशीच शिक्षा होऊ नये म्हणून इतर "लो प्रोफाईल" सामाजिक कामे ई करतो. यात मला काहीही चुकीचे वाटत नाही. सावरकरांबद्दलचा आदर त्याने कमी होत नाही.

पण गांधी व नेहरूंनी किंवा काँग्रेसने त्यांची काही उपेक्षा केली व आवर्जून डावलले, नाहीतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले असते व कदाचित आधीच स्वातंत्र्य मिळवून दिले असते अशा क्लेम्स मधे काहीही लॉजिक नाही.

बाय द वे, काँग्रेसने ८०/९०ज पर्यंत जनरली उदार भूमिका घेतली होती हे खरे आहे. पण माफीवीर वगैरे जे निघाले ते काँग्रेसने काढले नाही. ते काढले ब्रिगेड्यानी. मध्यंतरी दादोजी, रामदास स्वामी, टिळक, सावरकर पासून ते अगदी सचिन तेंडुलकर पर्यंत नावाजलेल्या ब्राह्मण व्यक्तींना ब्रिगेड्यांनी टार्गेट केले होते (पुलं ही टार्गेट होते सुरूवातीला पण ते देशपांडे वेगळे हे निष्पन्न झाले तेव्हा ते थांबले). तेव्हा हे माफीवीर, उडीबाबा वगैरे यायला लागले. आता त्यांचे बहुतांश नेतेच भाजपमधे जाऊन बसले व यातली हवा निघून गेली.

नंतर काँग्रेसने ते सावरकरांबद्दल वापरायला सुरूवात केली.

एखादे नॅरेटिव्ह उलटवण्याइतके स्मार्ट काँग्रेसवाले नाहीत. नाहीतर सध्याची अवस्था आली नसती. त्यांनी माफीचा उल्लेख काढला तो नेमका अगदी चुकीच्या वेळेस. भारत जोडो यात्रेच्या वेळेस. असल्या नॅरेटिव्ह गेम्स खेळणे हे सध्याच्या तरी नेत्यांच्या डीएनए मधे नाही. त्यांची बलस्थाने वेगळी आहेत पण ती आता तेच लोक विसरले आहेत.

Just a while ago, on Tuesday, Netaji's grandnephew Chandra Kumar Bose asked Hooda to refrain from naming Netaji to Savarkar.

He said, "@RandeepHooda- appreciate your making a film on 'Savarkar', but its important to project the true personality! Please refrain from linking 'Netaji Subhas Chandra Bose's' name with Savarkar. Netaji was an inclusive secular leader & patriot of patriots."

Pages