स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
त्याबद्दल इथे लिहिण्याची उर्मी निर्माण झाली खरी, पण मग वाटलं की त्यावरून 'विशिष्ट' शिक्कामोर्तब तर होणार नाही!
तर, एक डिस्क्लेमर - वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू ,( ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा एकदाच अनुभव घेतला होता. उंबरठा बद्दल लिहिताना. त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अनुक्रमे सक्रिय व अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. वाचलेल्या गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर 'पाहिल्या'. अर्थातच दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता)जेवण(मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला), विशेषतः ते राजकीय कैदी असूनही तशा निर्धारित दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला. माध्यम शक्तिशाली असल्याने की आणखी कशामुळे याचा अंदाज आला नाहीये अजून. म्हणजे, देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, तरीही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय आवडली. म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे. (अवांतर - स्वदेस मध्ये शाखा बद्दल असंच वाटलेलं) फक्त मराठी उच्चारांवर अधिक काम करायला हवं होतं.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही.
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |
प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट
Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत किती किस पाडताय
भरत किती किस पाडताय
तसाही पडल्यात जमा आहे. येईल OTT वर. मग बघा निवांत.
माझे दोन आणे... हुडाने चांगले काम केले आहे. सिनेमा propaganda वाटत नाही. पण भगतसिंग आणि नेताजींचे चुकीचे संदर्भ. These are red flags for me.
'हत्या' झाली तरी अलटीमेटली
'हत्या' झाली तरी अलटीमेटली निधन म्हणत असावे.म्हणजे आपल्या महालक्ष्मी कॅलेंडर वर 'धारदार शस्त्राने निधन झालेल्यांचे श्राद्ध' असं मार्किंग असतं त्यावरून.
खुद्द गांधीजींच्या खुन्याच्या भावाने 'गांधीहत्या आणि मी' असं पुस्तक लिहिलं आहे, त्याने 'गांधीवध आणि मी' लिहिलं नाहीये.'वध' नंतर अनुयायी मंडळींकडून पसरला असेल.हत्या/खूनच आहे आणि तो निंदनीय आहे हे साळसूदपणे कव्हर अप करत नाहीये हे इथे नोंदवून ठेवते.
मंदार, धाग्यावरचे प्रतिसाद
मंदार, धाग्यावरचे प्रतिसाद चित्रपटापुरते मर्यादित असते, तर मी इथे लिहिलंच नसतं.
कीस काढायची सुरुवात मी केली नाही.
हो भरत, सावरकरांना गांधी
हो भरत, सावरकरांना गांधी हत्येसंदर्भात अटक झालेली दाखवली आहे. त्या आधी त्यांचा व यमुनाबाईंचा संवादही दाखवला आहे ज्यात ते दोघं गांधी हत्येबद्दल हळहळही व्यक्त करत असतात. नथुरामने हे करायला नको होते हे परत परत बोलत असतात.
पूर्ण सिनेमात गांधी - सावरकर हे एकमेकांची प्रखर राष्ट्राभक्ती acknowledge करताना दाखवले आहेत... जरी दोघांची मते विरुद्ध होती तरी. दोघे समकालीन असल्याने तसे एकमेकांना काही म्हणण्याचे स्वातंत्र्यही दिसून येते संवादात आणि त्यात आपल्याला काही खटकट नाही.
मला मॅडम कामा व मदनलाल धिंग्राही आवडला. अंकिता लोखंडे व इतरांची कामेही छान झाली आहेत. फक्त ३ तासांचा असूनही खूप फास्ट वाटला. मॅडम कामांचा रोल रणदीप हुडाच्या बहिणीने डॉ अंजली हुडाने केला आहे असे वाचले.
खु्दीराम बोस, अनंत कान्हेरे ह्यांच्यावेळी खूप वाईट वाटले. किती लहान होते ते! असंख्य जणांची बलिदाने आहेत, हाल अपेष्टा आहेत स्वातंत्र्य मिळवण्याच्या मागे. काहीं acknowledge झाले, काही उपेक्षित राहिले असतील, काहिंच्या नशिबात टीका आली असेल.
सगळ्यांचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आपण खूप खुजे आहोत कुणाला नावे ठेवायला किंवा डावं उजवं करायला.
सुंदर परिक्षण!
सुंदर परिक्षण!
वावे, प्रतिसाद आवडला.
चित्रपट ओटीटीवर आल्यावर बघायला तरी धीर होईल की नाही कुणास ठावूक. माझी जन्मठेप मी पहिल्यांदा सातवीत असताना वाचले. खूप रडले होते. नंतरही अनेक दिवस मन अस्वस्थ होते. ते वय आणि तो काळ असा होता की सगळ्यांचीच बलीदाने व्यर्थ गेली की काय असे वाटत राही. त्यानंतर अनेकदा माझी जन्मठेप वाचले गेले, दरवेळी वाचताना जीव कळवळतो.
आज चित्रपट पाहून आले.
आज चित्रपट पाहून आले.
वावे,तुम्ही परीक्षण अतिशय चांगले केले आहे.
काही हव्याशा गोष्टी म्हणजे शिक्षेत असता पत्नीची भेट होताना तिला केलेला उपदेश(काळे पाणी पुस्तकात आहे) की संसार तर काय कावळा चिमणी करतात वगैरे हवा होता.र . हु साखळदंड हलवीत येतो हे ठीक आहे.पण ज्यांना सावरकर कोण होते हे माहीत नाही त्यांच्यासाठी तरी हवे होते.
कमला हे 6 हजार ओळींचे काव्य लिहायला काही नाही तरी मुखोदगत/ स्मरणशक्तीत होते याचा उल्लेख हवा होता.
खटकलेल्या गोष्टी..
1.वृद्ध सावरकर सभेत बोलताना आवाज तरुण येतो.
2.मराठी सदोष उच्चारण.हुडाऐवजी दुसऱ्याने डबिंग करायला हवे होते.
3.बरेचसे संवाद इंग्रजीत आहेत(सब टायटल्स आहेत) ते सर्वसाधारण प्रेक्षकांकरिता हिंदी/मराठी मध्ये हवे होते.
4.लियाकत अली 5 दिवस भारतात होते.पण सावरकरांना कैदेत ठेवले गेले आणि नंतर विसरल्यामुळे 100 दिवसांनी सोडले वगैरे शेवटची 5-६ मिनिटांची सबटायटल्स न दाखवता commentry havi hoti.
ब्रिटिशांनी सोडाच पण आपल्या माणसांनी केलेली त्यांची उपेक्षा सहन होत नाही.
रच्याकने, सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगातील भिंतींवर जे लिखाण केले ते मणिशंकर अय्यर यांच्या कारकिर्दीत सफेदी करून पुसण्यात आल्याचे वाचले होते.
मला वाटते की 'सवरकर
मला वाटते की 'सवरकर सिनेमाच्या निमित्ताने' असा वेगळा धागा करून तिथे बाकी चर्चा करावी.
>> नुकतंच माझ्या चॅनेल वर माई
>> नुकतंच माझ्या चॅनेल वर माई सावरकरांच्या आठवणी पुस्तक केलेलं. त्या जर वाचल्या असतील, तर तो हशा इतका खटकणार नाही कदाचित. >> म्हणजे थेटरात आलेले लोक समग्र सावरकरच नाही तर माई सावरकरांच्या आठवणी पुस्तक वाचुन आलेले होते आणि म्हणून ते हसले असं म्हणायचं आहे?
स्वाती 2, मलाही मध्ये हा
स्वाती 2, मलाही मध्ये हा चित्रपट पाहवेना.
अश्विनी ११,सावली,माझेमन
अश्विनी ११,सावली,अश्विनी के, माझेमन,स्वरूप, देवकी, स्वाती२ आणि इथे व्यक्त झालेल्या इतरही मंडळींना धन्यवाद.
सावली, सविस्तर प्रतिसाद आवडला.
माझेमन, यासंदर्भातील फोटो व माहितीसाठी आभार.
अमितव, अहो,खरंतर माझा प्रतिसाद टाळ्यांच्या बद्दल जो आक्षेप आहे, त्या दृष्टीने दिला होता.. पण हशा शब्द लिहून झाल्यावर जेव्हा लक्षात आले, तोवर संपादनाची वेळ टळलेली..तुम्ही नमूद केलेल्या वाक्यापुढील उदाहरणार्थ सहचारिणी वगैरे वाचलंत का..
तरीही ही लेख वाचून मोकळा अभिप्राय /शंका व्यक्त केलीत, ते बरंच झालं.
थिएटर मधे लोकांनी काय व किती, तेही दुसर्या कोणत्याही दृष्टिकोनातून वाचलेलं ह्याची कल्पना नाही व तशी अपेक्षाही नव्हती. किंबहुना त्या वाक्याला टाळ्या वाजवल्या ही मला सहज सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया वाटली होती.
इथल्या मंडळींना खटकलेला प्रकार मला का तितका खटकला नाही, हे लक्षात आणून देण्यासाठी हा प्रयत्न केला होता. इथल्या बहुविध वाचन असणाऱ्या लोकांनी आधी नाही, तरी यानंतर तरी या संदर्भात थोडं वाचलं, की कदाचित वेगळा दृष्टिकोन मिळेलसं वाटलं, बाकी एका अर्थाने कस्तुरबांनाही गांधीजींबद्दल (पती या दृष्टीने) सावरकर किंवा आणखी समकालीन कुणी तसंच म्हणू शकलं असतं. (वरती म्हटल्याप्रमाणे - थोरामोठ्यांच्या सहचारिणी या नात्याने)
जर तिथले लोक काही गृहपाठ करून आलेले नसतीलच असं गृहीत धरलं, तर मग एक ज्येष्ठ व्यक्ती दुसर्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पत्नीला सहजपणे असं म्हणून गेली, जे सर्वसामान्य जोडीदारांच्या बाबतीतही कधी गंमतीनं म्हटलं जाऊ शकतं. (हे. मा. वै. म.) यात दरवेळेस कुणाला महान वा लहान ठरवण्याचा प्रयत्न असेलच असे नाही.
अशा 'खटक्यांसहदेखील' हा चित्रपट प्रभावशाली वाटला, याची विविध कारणं मंडळींनी प्रतिसादांत छान दिलेली आहेत.
मीही पाहिला सिनेमा. अतिशय
मीही पाहिला सिनेमा. अतिशय परिणामकारक आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या कार्याचा, विचारांचा पट मांडण्यात हुडा नक्कीच यशस्वी झाला आहे. मी गेले होते तेव्हाही हॉल फुल होता.
वरील परिक्षण छान लिहिले आहे. इतरांचे प्रतिसादही आवडले.
खूप छान परीक्षण
खूप छान परीक्षण
ते रॅप बहुधा पोवाडा करताना
ते रॅप बहुधा पोवाडा करताना भलतंच काहीतरी झाले असावे.
चित्रपट ओटीटीवर आल्यावर
चित्रपट ओटीटीवर आल्यावर बघायला तरी धीर होईल की नाही कुणास ठावूक. माझी जन्मठेप मी पहिल्यांदा सातवीत असताना वाचले. खूप रडले हो - स्वाती2, याला अगदी relate झाले. इथे स्प्रिंग ब्रेक असल्याने आम्ही बाहेर होतो अणि चित्रपट पाहू शकलो नाही. पण ott वर विकत घेता आला तर घेईन.
प्रतिसाद खूप वाचनीय आहेत.
प्राचीन परवानगी वगैरे माझ्या
प्राचीन परवानगी वगैरे माझ्या मनात आलं पण ती चाल आणि आवाज न घेता, कवितारुपी आलं असतं तरी चाललं असतं, तसही नाहीये का, मी पिक्चर बघितलेला नाहीये म्हणून फक्त प्रश्न विचारतेय.
मला एकंदरीत बघवणार नाही अंदमान छळ, त्यांनी आणि इतरांनी कसा सहन केला असेल, अशक्य होतं ते सर्व.
'ने मजसी ने' आहे अन्जू.
'ने मजसी ने' आहे अन्जू. त्याचं चित्रीकरण चांगलं आहे. 'गाणं' म्हणून नाहीये. रणदीप हुडाच्याच आवाजात आहे. मराठी उच्चारांवर मात्र काम करायला हवं होतं. जयोस्तुते नाहीये.
अच्छा, थँक्स वावे.
अच्छा, थँक्स वावे.
मंगेशकरांची परवानगी घेवून
मंगेशकरांची परवानगी घेवून वापरणंही काळ लक्षात घेता ती चाल योग्य ठरली नसती. कारण चाल खूप नंतर लावली गेली. Focus is purely on that period. Cinematic liberty घेतलेली जाणवली नाही कुठेही. Make up, costumes, sets... सगळं काळानुरूप. रणदीप हुडाने खूप लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या आहेत.
चित्रपट आवडला नाही. शेवटचं
चित्रपट आवडला नाही. शेवटचं रॅप भयानक होत सर्वात.
सगळं लिहायला वेगळा धागा काढावा लागेल बहुतेक.
मी ott वर यायची वाट पाहायला हवी होती.
सावरकरांचे लिखाण वाचून ते hero वाटतात (चरित्र मुख्यात: आणि काही इतर लेख). पण चित्रपटात मला ते तसे वाटले नाहीत.
गांधीच्या तोंडच "उपवासाने रामराज्य मिळाले" वगैरे काही ही वाटले. गांधीजी खरंच अस म्हणाले होते का?
किती हास्यास्पद वाक्य आहे - ते अस म्हणाले असतील अस वाटत नाही.
टिळक, बोस, भगतसिंग सगळे सावरकरांमुळे मोठे झाल्याच दाखवण्याचा अट्टाहास का? ते खर आहे का?
धिंग्रांच्या भाषणाचा मुख्य भाग घेतला असता तर धिंग्रा काय आग होते ते कळलं असतं.. जे घेतलं नाहीये.
सावरकरानी दलितांकरता उभारलेले मंदीर, विधवा हळदीकुंकू अशी अनेक सोशल रिफॉर्मेशन्स आहेत.
मला वाटतंy सगळं घेणं शक्य नसणार.
त्यां ची काँग्रेस बद्दल ची मत दाखवली तशी rss बद्दल ची मत काय हो t33ई? ते का कवर केलं नाही?
त्यांचं33 हिंदुत्वाचा33 व्याख्या आज आपल्याला झेपेल का?
@नानबा >>> तुमच्या मतांविषयी
@नानबा >>> तुमच्या मतांविषयी पूर्ण आदर बाळगुन काही मुद्दे लिहीण्याचं धारिष्ट्य करते आहे.
मला चित्रपट पाहून असं वाटलं नाही की टिळक सावरकरांमुळे मोठे झाले. उलट ते गुरूस्थानी, काहीसे फादर फिगर वाटले. भगत सिंग यांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाचा परस्पर इंग्लिश अनुवाद केला हे खरं आहे, पण भेट दाखवली आहे ते सपशेल चूक. सुभाषबाबू व सावरकरांची भेट झाली व त्यावेळी त्यांचे रासबिहारी बोस यांच्यासंबंधात बोलणे झाले हेही बरोबर आहे. फार पुर्वी लोकसत्तेत या भेटीचा फोटोही आलेला होता. पण ती २०च्या दशकात झाली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर नक्कीच नाही. वीकेंडला जमले तर माझ्याकडची पुस्तकं धुंडाळून याबद्दल माहिती मिळते का बघते.
१८५७चे स्वातंत्र्यसमर हे
१८५७चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक १९०७ मध्ये आले तेव्हा भगत सिंग जेमतेम एक वर्षाचे होते. त्यानंतर दोनच वर्षात त्याचे इंग्रजी भाषांतरही आले. शिवाय, एखाद्या पुस्तकाचे 'अ' भाषेतून 'ब' भाषेत भाषांतर करायला 'अ' आणी 'ब' दोन्ही भाषा याव्या लागतात, भागत सिंग यांना मराठी येत होते ? तूर्तास इतकेच..
वीकेंडला जमले तर माझ्याकडची
वीकेंडला जमले तर माझ्याकडची पुस्तकं धुंडाळून याबद्दल माहिती मिळते का बघते. >> thank you!
सावरकर जाज्वल्य देशभक्ती, प्रखर बुद्धिमत्ता, रॅशनल विचार, त्यांनी सोसलेल्या अपेष्टा - ह्या सगळ्यामुळे मोठे आहेतच. त्याला बाकी ची ठिगळं लावण्याची गरज नाही अस वाटत.
अनेक वर्ष त्यांच्यावर जसा अन्याय झाला, तशाच प्रकारचा अन्याय आता गांधीजींवर करू पहात आहेत लोक अस वाटत.
त्यांच्या विचारधारा वेगळ्या असतील, पण दोघांच्याही मनात आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून बेस्ट करण्याची इच्छा होती, देशप्रेम होते हे कबूल केले तरी पुरेसे आहे.
त्यांची प्रत्येक मत पटायलाच हवीत अस नाही.. पण त्यांना खलनायक ठरवण्याची गरज नाही, असे मला वाटते.
हे अनेकांना हल्ली पटत नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे असे लिहून फक्त वाइटपणाच येतो.
पण दोघांचेही काही साहित्य वाचले आहे आणि त्यांchyaa योगदानाबद्दल आदर आहे!
पण सशस्त्र क्रांतीचा मार्ग सर्वसामान्यांना जमला नसता त्यामुळे त्याला सविनय कायदेभंग ने एक आऊटलेत मिळाले, त्यामुळे प्रत्येक माणसाला आपण ह्यात सहभागी हो ऊ शकू असे वाटले, होता आले हे त्या चळवळीचे मोठेठे यश होते असे वाटते.
गांधीना आंतरराष्ट्रिय recognition आणि त्यामुळे yeoo शकणारा दबाव हे ही खूप महत्त्वाचे मुद्दे वाटतात.
गांधीजींना मारले नसतं तर
त्यांच्या पत्नीने पोटाला बॉम्ब लावून केलेला प्रवास दाखवायला हवा होता.
Divide ani rule सांगताना ख्रिस्ताचा फोटो दाखवणे खटकले.
तो बिचारा तेव्हाही कृसिफाय झालेला. (Not talking abt church, but about Yeshua)
आणि तेव्हापासून ते अजूनही तीच निती चालू आहे आणि बहुतांश जणांची टोकेरी मते बघता, ती चांगलीच effective आहे असे दिसतेय
(सर्वाँना लागू.. एका स्पेसिफिक पक्षाला उद्देशून नव्हे.
जागतिक स्तरावर पण विविध गोष्टीना घेऊन द्वेष फार टोकेरी होतोय का असे वाटते)
नानबा पोस्ट आवडली. सिनेमा
नानबा पोस्ट आवडली. सिनेमा अजुन बघितलेला नाही.
नानबा छान पोस्ट आणि +786
नानबा छान पोस्ट आणि +786
गांधी, सावरकर, आंबेडकर हे सारेच महापुरुष, त्यांचे नाव आणि त्यांचे सिलेक्टिव विचार हे गेली कित्येक वर्षे राजकारणासाठी वापरले गेले आहेत. त्यामुळे एकाचवेळी या सर्वाचा मनापासून आदर करणे हे सर्वानाच जमत नाही.
नानबा, या धाग्यात कोणी टोकेरी
नानबा, या धाग्यात कोणी टोकेरी लिहिले आहे असे दिसले नाही. इथे तीच होळी नको. (म्हणजे तुला उद्देशुन नाही पण होळी नाही झाली तर बरं).
नानबा, प्रतिसाद आवडले!
नानबा, प्रतिसाद आवडले!
सेल्युलर जेलमधले प्रसंग व
सेल्युलर जेलमधले प्रसंग व सावरकर - पिळवटून टाकणारे आहे. >>> +१ काही ठिकाणी डोळे बन्द करुन घेतले.
एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला 'जज' करण्याचा आपल्याला अधिकार अजिबात नाही. माणसं होती, गुणदोष होते, त्यांच्याही काही चुका झाल्या असतील, काही अंदाज, काही निर्णय चुकले असतील.
आज आपली मानसिकता दुदैवाने कुठली तरी एक बाजू घेण्याची होऊन गेली आहे. >>> +१
स्वा. सावरकरांचे ' माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले होते. ... इतर कैद्यांपासून त्यांना वेगळे ठेवत. त्यांच्या कोठडीच्या अगदी बाजूलाच जिथे कैद्यांना फाशी देत ती खोली होती. खटका ओढण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडून त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हावे म्हणून ब्रिटिशांनी मुद्दामहून त्यांना तिथे ठेवले होते. अशी माहिती गाईडने दिली होती. >>> हो मलाही आठवल ते... शिवाय कोलू, जेवणातल्या आळ्या.. भयन्कर होत ते सगळ..
Submitted by नानबा on 1 April, 2024 - 14:12 >> प्रतिसाद पटला.
काल हा चित्रपट San Jose येथील
काल हा चित्रपट San Jose येथील चित्रपट गृहात बघितला. हा इकडचा दुसरा आठवडा.
चित्रपट गृहात ७-८ वर्षांच्या मुलांपासून- तरुण मंडळी ते प्रौढ मंडळी या सगळ्या वयोगटांचा समावेश होता.
इतर वेळेप्रमाणे चित्रपट संपल्यावर श्रेय नामावली सुरू होताच मंडळी निघून न जाता मागेच रेंगाळत राहिली, ज्यात अर्थात आम्हीही होतो. शेवटी भारत माता की जय आणि वंदे मातरम् ची घोषणा केली, लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला, उगाच एक ग्रुप फोटो घेतला … खर तर कोणी कुणाच्या ओळखीचं ही नव्हतं..
पण कुठेतरी सगळ्यांना एका अदृश्य धाग्याने बांधल्यासरखे वाटतं होते.
शेवटाकडून सुरुवात झालीय खरी ..
चित्रपट सुरू झाल्यापासून काहीच मिनिटांत मी त्या काळात transport झाले. पुढे जे काही घडत होते त्याचा एक भागच आपण ही होतोय अस काहीसं वाटलं.
चित्रपट चालू असताना, डोक्यात कुठेतरी इतिहासाच्या पुस्तकात, इतर पुस्तकात, वर्तमानपत्रात वाचलेल्या ; आजवर बघितलेल्या चित्रपटातील ती नावे, ती माणसे, त्या घटना ह्यांचे संदर्भ आठवले जात होते. कुठेतरी सगळे डॉट्स कनेक्ट करत होत.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रखर विचार, गाढा अभ्यास, प्रबळ इच्छाशक्ती, अपरिमित कष्ट करायची तयारी, पराकोटीची सहनशक्ती, समर्पण भावना, मुत्सद्देगिरी, धडाडी, सगळं काही त्या एका व्यक्तिमत्त्वात. पु लं ची सावरकरां विषयीच्या भाषणाची क्लिप ऐकली त्यात जे सावरकर उभे राहिले तेच रणदीप हुडा ने चित्रपटात दाखवले आहेत असे जाणवले.
चित्रपट अतिशय वेगाने पुढे जातो असे काहीसे वाटते कारण बराच कालावधी, घटना, व्यक्ती त्यात सामावून घेतल्या आहेत.
चित्रपटा विषयी सांगायचे तर ताकदवान स्क्रिप्ट, सगळ्यांचे नैसर्गिक अभिनय, उत्तम दिग्दर्शन, आणि बाकी तांत्रिक बाबीही आवडल्या.
ते माफीनामा लिहायला घेतात किंवा काळया पाण्याची शिक्षा भोगून आलेले कैदी म्हणून भत्ता माजायचा विचार करत असतात ते प्रसंग बघताना शिवाजी महाराजांच्या तहाची किंवा आग्र्याहून सुटकेची आठवण झाली ( कुठे तडजोड करावी ह्याच नेत्याला उत्तम ज्ञान असावं लागत). .
सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्यात बसणारे असंख्य हिंदू-इतर लोकं भारतात आहेतच परंतु ठळकपणे डोळ्यासमोर आलेली दोन नावे म्हणजे अब्दुल कलाम आझाद आणि टाटा..ती कल्पना शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेशी मिळती जुळती वाटते.
किंचित खटकलेल सांगायचंच झाला तर,
गांधीजी थोडे dramatic दाखवलेत अस वाटल ( किंचित दांभिकतेची झालर किंवा किनार असलेले) .. त्यांना subtle दाखवायला हवे होते…
शेवटचा रॅप बहुदा पोवाडा चुकलाय की काय असा काहीसं वाटतं.. पोवाडा छान गेला असता अस वाटून गेलं.
ह्या चित्रपटा दरम्यान अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे
पाश्चात्य जग नेहेमीच narrative वरती आपली पकड मजबूत ठेवत आले आहे , कुठलीही गोष्ट ते जगाला सांगणार तशीच ती मान्य असणार ह्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्याचा वापर करून काय चर्चेत ठेवायचे, आपली इमेज स्वच्छ ठेवायची हे अगदी आतापर्यंतही तसेच चालू आहे..
त्यामुळेच जालियनवाला बाग हत्याकांड, बेंगाल famine घडवून आणणाऱ्या घटनांची चर्चा होत नाही.. किंबहुना त्याची बहुतांशी लोकांना कल्पनाही नसू शकते.
जाता जाता अजून एक नमूद करावेसे वाटते..
आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले.. नव्हे जे कित्येक लोकांनी वेगवेगळ्या आहुती देऊन मिळविले आहे.. त्यांच्या समोर आपण
इतके शुल्लक आहोत की गांधी, सावरकर, बोस किंवा कोणाही स्वातंत्र्य सेनानीं विषयी काहीही बोलण्याचा त्यांना दूषणे देण्याचा आपल्याला अधिकारच नाही किंवा आपली तेवढी पात्रता नाही.
काहींची मते पटतील अथवा नाही पण त्यांच्या हेतुंवर शंका उपस्थित करणे, आपल्याला पटणाऱ्या नेत्याच महत्व किंवा मोठेपणा सांगायला दुसऱ्याला खोटे पडणे, कमी दाखवणे किंवा त्यांचं चारित्र्य हनन करणे हे निश्चितच निषेधार्ह आहे..
कधीतरी लोकं त्याच्या पलीकडेही जाऊ शकतील ही आशा!
नानबा प्रतिसाद आवडले.
नानबा प्रतिसाद आवडले.
छन्दिफन्दि ..... किती समर्पक लिहिलं आहेस.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रखर विचार, गाढा अभ्यास, प्रबळ इच्छाशक्ती, अपरिमित कष्ट करायची तयारी, पराकोटीची सहनशक्ती, समर्पण भावना, मुत्सद्देगिरी, धडाडी, सगळं काही त्या एका व्यक्तिमत्त्वात. >>> खरंच.
Pages