प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
त्याबद्दल इथे लिहिण्याची उर्मी निर्माण झाली खरी, पण मग वाटलं की त्यावरून 'विशिष्ट' शिक्कामोर्तब तर होणार नाही!
तर, एक डिस्क्लेमर - वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू ,( ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा एकदाच अनुभव घेतला होता. उंबरठा बद्दल लिहिताना. त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अनुक्रमे सक्रिय व अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. वाचलेल्या गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर 'पाहिल्या'. अर्थातच दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता)जेवण(मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला), विशेषतः ते राजकीय कैदी असूनही तशा निर्धारित दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला. माध्यम शक्तिशाली असल्याने की आणखी कशामुळे याचा अंदाज आला नाहीये अजून. म्हणजे, देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, तरीही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय आवडली. म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे. (अवांतर - स्वदेस मध्ये शाखा बद्दल असंच वाटलेलं) फक्त मराठी उच्चारांवर अधिक काम करायला हवं होतं.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही.
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला बाकी ची ठिगळं लावण्याची गरज नाही अस वाटत. >>> +१ सारं काही पिक्चर परफेक्ट असावं आणि ते तसं असलं तरचं एखाद्याला देव्हाऱ्यात स्थान मिळू शकते ही जी काही असुरक्षिततेची/अगतिकतेची भावना आहे ना त्यानेच सर्व घात केला आहे.

@नानबा >>> सावरकर व सुभाषबाबूंच्या भेटीसंबंधी मी लिहिलेला काळ चुकीचा होता. ही भेट खरोखरच १९४० ला (म्हणजे दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर) झाली. विक्रम संपतच्या पुस्तकातील फोटोचा स्क्रिनशॉट देते आहे. हाच फोटो पूर्वी लोकसत्तेत पाहिला होता. ही केवळ एकच भेट नव्हती तर सावरकर व बोस यांचा आधी व नंतर संपर्क होता. रासबिहारी बोस यांच्याशी खूप आधीपासून संपर्क होता. या दोन्ही गोष्टींविषयी थोडी सवड मिळाल्यावर लिहीन.

य. दि. फडके लिखित 'शोध सावरकरांचा' या पुस्तकात ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या पुस्तकाचा भगत सिंग यांनी अनुवाद केल्याचे निर्विवाद लिहिले आहे. तसेच याचा पहिला इंग्रजी अनुवाद भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर झाल्याचे याच पुस्तकात लिहिले आहे. विक्रम संपतच्या ग्रंथात भगत सिंग यांनी पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचा अनुवाद केल्याचे लिहिले आहे. तसेच भगत सिंग यांनी हा अनुवाद पंजाबी व उर्दू मध्ये केल्याचे लिहिले आहे. दोन्ही लेखकांनी यासाठी काय संदर्भ वापरले आहेत हे ही तपशीलवार दिले आहे. केवळ हेच नाही तर भगत सिंग यांच्या 'जेल डायरी' मध्ये सावरकरलिखित 'हिंदू पदपातशाही' यातील एक उतारे/विचार लिहिले आहेत. किमान 6 उतारे लिहिले आहेत असे म्हटले जाते. परंतु माझ्याकडील पुस्तकात केवळ एकच विचार लिहिला आहे.

भगत सिंग यांनी सावरकरांचे पुस्तक छापले असेल तर सावरकरांनीही भगत सिंग यांना फाशी दिल्याबद्दल रत्नागिरीतील घरावर काळा झेंडा फडकावला होता. हे सर्व नेते एकमेकांशी देशभक्तीच्या नात्याने जोडले गेले होते. एकमेकांचे नाव किंवा काही विचार घेतले म्हणजे कुणी मोठा किंवा लहान ठरत नाही.

IMG_7277.jpeg

मामी, धन्यवाद!

Mazeman, तुम्ही दिलेल्या माहिती साठी मनापासून धन्यवाद!

रणदीप हुडा ची माझा कट्टा वरील मुलाखत ऐकली, सिनेमाचे reviews ऐकले, वाचले, बघितले; आणि मुख्य म्हणजे महेश मंजरेकरची क्लिप बघितली ( जी माझ्या यू ट्यूब वर पॉप झालेली ) मला त्याआधी हा असा सिनेमा येतोय किंवा तो म मा करतोय काही कल्पना नव्हती.
त्यात तो जेव्हा दिग्दर्शन करता होता आणि
रणदीप हुडा अभिनय, तर तेव्हा रणदीप सावरकरांची पुस्तकं वाचू लागला. मग पटकथेत बदल करायला लागला.. तो इतके बदल सांगायला लागला की वैतागून त्याने ममा ने सिनेमाच सोडला..
त्याच वेळी त्याने हुडा वेड्यासारखा वागत होता, ३० किलो वजन काय कमी केल, वगैरे वगैर मांजरेकर स्टाईल मध्ये
तेव्हाच वाटलं होत की सिनेमा चांगला झाला असेल..
कोणी एका ध्यासातून , झोकून देऊन (passionately) एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याला जास्तीत जास्त न्याय दिला जातो आणि ती कलाकृती चांगली बनते, असा एक माझा समज..

ममा ने सोडला तेच बर नाहीतर.. भाई सारखी ह्याचीही वाट लावली असती..

माझेमन, तुम्ही जो सुंदर फोटो टाकला आहे, तो आमच्या एका नातेवाईकांकडे भिंतीवर लावलेला होता. त्याखाली खूप छान काव्य लिहीलेले होते. वारंवार पाहिल्यामुळे माझे ते पाठ झाले. आजही मला ते आठवते आहे. कुणी लिहीले ते अर्थातच माहित नाही.
काय हेतुने कसे नी केव्हा भेटुनीया गेले, युग पुरुषोत्तम काय म्हणाले नाही कुणा कळले.
आणि अचानक प्रसिद्ध झाली वार्ता एक दिनी, विमुक्त केले अंदमान श्री. सुभाषबाबूंनी.
जिथे कष्टले सावरकर त्या पूज्य स्थानाला, मानवंदना देऊन भारतभूध्वज फडकवला.

जरी सावरकर आणि नेताजी भेट झाली असली तरी त्यांची विचारसरणी खुपच भिन्न होती त्यामुळे नेताजींवर सावरकरांचा प्रभाव असेल असे वाटत नाही.
आणि अचानक प्रसिद्ध झाली वार्ता एक दिनी, विमुक्त केले अंदमान श्री. सुभाषबाबूंनी.
जिथे कष्टले सावरकर त्या पूज्य स्थानाला, मानवंदना देऊन भारतभूध्वज फडकवला.>>> हे पण फक्त काव्यच आहे. वास्तवात अंदमान जपान्यानी ताब्यात घेतले आणि तेथील जनतेवर अत्याचार केले. सुभाषबाबुंपासुन हे सर्व लपवुन ठेवले होते. अंदमानावर खरा कंट्रोल जपान्यांचाच होता. जपान हरले हे भारतासाठी चांगले झाले. नाहीतर भारत आगीतुन फुफाट्यात गेला असता.

या सर्व चर्चेत, काही वर्षांपूर्वी मा. सुधीर फडके यांनी तन मन धन वेचून निर्मीत केलेला वीर सावरकर हा मराठी चित्रपट कुणालाच आठवत नाहीये!

अवांतर आहे, पण सुभाषबाबुंनी जपान सोबत घेऊन भारताला स्वतंत्र केले असते म्हणणारे, जपानी लोकांनी केलेले अत्याचार कसे काय विसरतात?? मंदार म्हणतात त्याप्रमाणे आगीतून फुफाट्यात नक्की पडलो असतो

<< एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण... >>

------ छान लेख आणि चित्रपट समिक्षा. माझी जन्मठेप, काळेपाणी, १८५७ चे स्वात्यंत्र्य समर हे साहित्य मी वाचले होते. चित्रगुप्त नावाने प्रसिद्ध झालेले " Life of Barrister Sawarkar, Biography of Sawarkar.... " हे साहित्य सहज उपलब्द आहे.

सहा सोनेरी पाने हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. यात सद्गुणविकृती बद्दल उहापोह झालेला आहे. उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज किंवा चिमाजीअप्पा हे कसे /कुठे /किती चुकले हे सांगितले आहे. शत्रू स्त्रियांबद्दलचे विचार अजिबातच पटत नाही.

चित्रपट प्रचारी आहे म्हणून बघण्याचा अविचार नाही.

सेल्युलर जेल- १९०९ ते १९३८ पर्यंत, ५५०पेक्षा जास्त लोकांनी काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानांत भोगली आहे. बहुतेक लोक बंगाली होते, १७० पेक्षा जास्त कैद्यांना देहान्ताची शिक्षा झाली होती. तिथे असणार्‍या प्रत्येक राजकैद्याचे जिवन हाल अपेष्टेतच गेले आहे. कोलू ओढणे, जेवणांत काही असणे किंवा अवजड साखळदंड... याला अपवाद नव्हता.

या शेकडो राजकैद्यांपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या ३-५ जणांनीच दयेचे अर्ज खरडले.
पैकी सावरकरांचा पहिला दयेचा अर्ज तिथे गेल्यावर अवघ्या दोन महिन्यांत आला. शेवटच्या सहा /सातव्या अर्जावर ब्रिटीश सरकारने त्यांना जाचक अटी घालून मुक्त केले. त्यांची मुक्तता झाली म्हणून त्यांच्या हाल अपेष्टांबद्दल ते आपल्याला काही सांगू शकले.

तिथे शिक्षा भोगणार्‍या शेकडो कैद्यांना दयेचा अर्ज करण्याची स्ट्रॅटेजी सुचली नसेल ?
ब्रिटीशांकडे दयेची भिक मागण्यापेक्षा, शिक्षा भोगणे त्यांनी पसंद केले - यात अनेक क्रांतीकारकांनी मरणही ( फाशी किंवा यातनांमुळे) स्विकारले. ते परत आले नाही म्हणून त्यांच्या हाल अपेष्टांच्या चित्रपट रुपी स्टोर्‍या आपल्याला माहित नाही किंवा त्यांची साधी नावेही माहित नसतात. Sad

मंदार म्हणतात त्याप्रमाणे आगीतून फुफाट्यात नक्की पडलो असतो
>>>
हे शक्य आहे. जपान्यांनी जास्त अत्याचार केलेही असते. पण हा आत्ता निवांत स्वातंत्र्य एन्जॉय करत केलेला आफ्टर थॉट आहे. (@मंदार @भ्रमर , ही तुमच्यावर वैयक्तिक टीका नाही. कृपया गैरसमज नको.)
मुळात जो माणूस दुसऱ्या देशात जाऊन सैन्य उभारू शकतो, तो त्याच्या मातृभूमीत हिरो ठरला असताना, इतरांच्या अत्याचाराला विरोध करू शकला नसता हे गृहितकही कितपत सत्य आहे? अर्थात या जर तरच्या शक्यता आहेत.

त्यावेळी सुभाषबाबूंनी 'शत्रूचा शत्रू तो मित्र' या न्यायाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेला आऊट ऑफ द बॉक्स प्रयत्न, त्यासाठी घेतलेले अपार कष्ट व दाखवलेले धाडस यासाठी त्यांची तारीफ केली जाते. प्रयत्नांना किती यश मिळाले यासाठी नाही. रूढार्थाने सुभाषबाबूंना यश मिळाले नसेलही. पण भारतीय आता शस्त्रात्रसज्ज आहेत आणि ती शस्त्रास्त्रे ब्रिटिशांवर रोखली जाऊ शकतात, नव्हे त्याचे उदाहरण आझाद हिंद सेनेने घालून दिले आहे, या जाणिवेने भारताचे स्वातंत्र्य थोडे अधिक जवळ आले नसेल का?

इतिहास नेहमी जेते लिहितात. त्यामुळे त्यांनी केलेले अत्याचार झाकले जातात आणि हरलेल्यांचे अत्याचार गिरवून सांगितले जातात. उदा. रशियन्सनी जिनेव्हा कन्व्हेन्शन धुडकावून बऱ्याच युद्धकैद्यांची कत्तल केली. ऐन दुष्काळात, भूकबळी जात असताना बंगाल व नजीकच्या प्रांतातून सैन्याच्या राखीव साठ्यासाठी कलकत्ता बंदरातून जहाजे भरभरून अन्न-धान्य इंग्लंडला पाठवण्यात आले, याबद्दल फारसे बोलले जात नाही.

माझ्झ्या माहितीनुसार अंदमान मधल्या बऱ्याच सिव्हिल आणि राजकैद्यासाठी कैद्यांसाठी सावरकर वेगवेगळ्या प्रकारची पत्रे ब्रिटिशांना लिहायचे (दयेचे अर्ज पण); असे वाचल्याचे आठवते. Lawyer असल्यामुळे असेल कदाचित.

आपला स्वातंत्र्यसंग्रामामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचे योगदान आहे आणि त्यांचे प्रयत्न वेगवेगळे असले तरी अंतिम साध्य एकच होते याच रिस्पेक्ट ठेवला तरी खूप आहे.

ब्रिटीशांकडे दयेची भिक मागण्यापेक्षा, शिक्षा भोगणे त्यांनी पसंद केले - यात अनेक क्रांतीकारकांनी मरणही ( फाशी किंवा यातनांमुळे) स्विकारले. ते परत आले नाही म्हणून त्यांच्या हाल अपेष्टांच्या चित्रपट रुपी स्टोर्‍या आपल्याला माहित नाही किंवा त्यांची साधी नावेही माहित नसतात.
आपल्याला क्रांतिकारकांची नावे माहित नाहीत कारण स्वतंत्र भारतात त्याला हिंसावादी तत्व म्हणून दुय्यम लेखण्यात आले आहे.

Sardar Udham सारखे movies आता येतायेत कारण २०-२५ वर्षांपूर्वी अश्या movies ला भविष्य navat (सरदार उद्यम च्या मेकर ने बोललेलं वाक्य आहे). आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके पुण्याबाहेर फार लोकांना माहित असतील असे मला वाटत नाही.

माझे मन, तुमचा प्रतिसाद इंटरेस्टिंग आहे.
सगळीकडे इतका भूलभुलैया आहे की खर काय आणि खोटं काय कळेनास होतंय.

एकदा हे चेक करून कुणी सांगेल का?
https://youtu.be/ehOZXYTdWyQ?si=8yOwhLR_ulqpYAmq

सावरकरांनी माफी मागितली ह्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही. Bachenge तो औंर भी लडेंगे असा विचार असू शकतो.
अगदी तसा विचार नसेल तरी तशा यातना आपण सहन करू शकू का ह्याचा विचार केल्यास त्यात चुकीचं काही वाटत नाही.

चित्रपटातलं आत्ता कळलं काँग्रेस chyaa कुठल्या नेत्याला काल्यापाण्याची शिक्षा का झाली नाही हा डायलॉग पण खूप खटकला.
त्यांनी बॉम्ब, बंदूका हा मार्ग स्विकारला नव्हता.
सिव्हिल disobedience ला kaalya paanyacheee शिक्षा कशी देणार?
म्हणूनच सर्व सामान्यांच्या आवाक्यात laa मार्ग होता ना!

माझ्या 2 आजोबांना तुरुंगवास झालेला होता.
आजोबांना तिथून मूळव्याधीचा त्रास सुरू झाला जो आयुष्यभर टिकला.

एकदा आजोबा भाषणं देऊन घरी येऊन आजीला जेवायला वाढ म्हणाले. ती म्हणाली, काय वाढू सांगा. घरात फक्त तुम्ही आणि मी आहे, बाकी काहीही नाही.
शेजाऱ्यांनी ऐकलं आणि पिठलं भाकरी का भात आणून दिली.

जेव्हा तुम्ही एका गटाचे कष्ट undermine करणारी वाक्य पेरता तेव्हा सगळ्यांचाच अपमान होतो.
घराघरांतून माणसं ह्या लढ्याला जोडली गेली होती. तेव्हा जरतारी विचार नको का करायला?

सावरकरांनी माफी मागितली ह्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही.
मलाही. त्यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा भारतावर इंग्रजांची पकड इतकी घट्ट होती की आपण जिवंत परत येणार नाही हे त्यांचे अनुमान खरेच होते. तुरुंगात सडत रहाण्यापेक्षा बाहेर येऊन जमेल तितके करावे असे त्यांना वाटले असेल तर ते चूक नाही. बाहेर आल्यावर त्यांनी चार चौघांसारखा संसार करून बक्कळ पैसा मिळवला असता तर तेही चूक नव्हते. पण त्यांचे राजकारण ब्रिटिशांच्या फोडा व राज्य करा या धोरणालाच धार्जिणे होते. गांधी सिनेमात सावरकरांना कमी लेखले जात नाही, पण सावरकरांवरच्या दोन्ही सिनेमात हा प्रयत्न का केला जातो ? टीझर गांधी पुण्यतिथी दिनीच का रिलीज केला जातो ? टीझर ची सुरुवातच अहिंसेच्या टिंगलीने का होते ? गांधी हत्येच्या किंवा 'ये गांधी इतना बडा कब हो गया' वर कोथरूड सिटी प्राईड ला टाळ्या का पडतात ? याचा अंतर्मुख होऊन विचार व्हावा.

नानबा, तुमच्या सगळ्याच पोस्ट आवडल्या. त्या काळाचा चष्मा उतरवुन आजच्या काळाने, एकाच कोनातुन इतिहासाची खिडकी बघितली की असे घोळ होणारच. इतिहासाला आजच्या काळाच्या कसोटीवर तोलणे ही चूक करू नये.

बाकी फोडा आणि राज्य करा हे अस्सल भारतीय धोरण नाही का? भारतीय कशाला गेल्या चाळीस वर्षांत जिथे जिथे गेलोय तिकडे काही तरी करुन फोडा आणि राज्य करा हेच दिसलं आहे. ते मानवाचे बेसिक इन्स्टिग्ट आहे. ते कोणी केलं नसेल तर तो एकांडा अपवाद. त्याचे यच्चयावत अनुयायी तेच करणार आहेत. त्यामुळे फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचे तत्त्वज्ञान होते हे इतिहासात वाचायला खयाल अच्छा असलं तरी तितकंच. ते आपल्या नसानसांत भरलेलं आहे.

Sardar Udham सारखे movies आता येतायेत कारण २०-२५ वर्षांपूर्वी अश्या movies ला भविष्य navat >> म्हणजे नक्कि काय ?

त्या काळाचा चष्मा उतरवुन आजच्या काळाने, एकाच कोनातुन इतिहासाची खिडकी बघितली की असे घोळ होणारच. इतिहासाला आजच्या काळाच्या कसोटीवर तोलणे ही चूक करू नये. >> perfect!

जेव्हा लोक नेहरुन्च हे धोरण, ते धोरण असं म्हणतात, तेव्हा अनेकदा म्हणावसं वाटतं की तुमचं मुल जन्माला येतं तेव्हा तुम्ही त्याच्याशी जसे वागता, १ वर्षाच्या नुकत्याच बोलायला चालाय ला लागलेल्या मुलाशी जसं तुमचं वर्तन असतं आणि तारुण्यातल्या मुलाशी जसं वर्तन असतं त्यात फरक नसतो का?

जेव्हा तुम्ही शुन्यातून सुरुवात करताहात त्याची तुलना तारुण्यावस्थेशी करुन कशी चालेल?
तेव्हाची गन्गाजळी, तेव्हाची जगाच्या स्प्रेडवर असलेली आप ली ताकद, तेव्हाची देशापुढची आव्हानं हे सगळंच वेगळं नव्हतं का?
मग आत्ताच्या फुटपट्या तेव्हा लावून कसं चालेल?
रांगायला, चालायला शिकल्याशिवाय पळता येणं शक्य आहे का?

मुळात प्रत्येक गोष्टीत येवढा विखार कशासाठी?

अ जून एक वाटतं.. सगळं चांगलंच आणि सगळं वाईटच असं ठरवण्याचा अट्टाहास का असतो लोकांमध्ये?
गान्धीजींची ही धोरणं पटतात, ही पटत नाहीत. मोदींनी ह्या गोष्टी चांगल्या केल्या, पण हे मात्र बरोबर नाहिये, अशा स्वरुपाचा विचार आपण (समाज म्हणून) का करु शकत नाही?
तो करु नये अशी वरच्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे - त्यावरच त्यान्ची खुर्ची टिकलेली असते.
पण हा विचार सर्वसामान्य का करत नाहीत?

आपल्या पक्षाने वाट्टेल ते केले तरी ते बरोबरच.. असा अट्टाहास का?
एका तत्वाकरता आपण त्यान्च्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांनी त्याला पूर्ण हरताळ फासावा, तर आपण त्याचं समर्थन कसं करु शकतो? आपल्याला राग येणं/ व्यथित होणं कसं होत नाही!

ह्या धाग्यावर हे कदाचित अवांतर आहे. पण चित्रपटात पण हेच दिसतं ना!

बायद वे, गांधीजी राम राज्य उपास करुन मिळालं म्हणतात चित्रपटात हे कुठे म्हणालेले ह्याचा रेफरन्स आहे का कुणाकडे?

नानबा पोस्ट्स आवडल्या.

गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाबद्दल बोलायचे तर ते 'अहिंसा आणि असहकार' असे होते. ब्रिटिशांची भारत ही कॉलनी होती, उत्पन्नाचे साधन होते. त्या व्यवस्थेला धक्का द्यायचा तर आर्थिक बाजू डळमळीत करणे आवश्यक होते. सर्वसामान्यांना जमेल असा असहकाराचा, परदेशी मालावर बहिष्काराचा मार्ग त्यांनी निवडला. बॉस्टन टी पार्टी काय किंवा नमक का कानून, असहकाराचे तत्व वापरले गेले. 'एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे' असे म्हणत अहिंसेच्या तत्वाची टिंगल केली जाते मात्र हे तत्व दुबळ्यांचे कधीच नव्हते.
एकाने सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्विकारला तर दुसर्‍याने असहकाराचा! मातृभूच्या मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या नेत्यांचे मार्ग वेगवेगळे होते, त्यांचे आपसात मतभेद होते मात्र माझ्यासाठी ते सर्व सारखेच वंदनीय आहेत.

>>तिथे शिक्षा भोगणार्‍या शेकडो कैद्यांना दयेचा अर्ज करण्याची स्ट्रॅटेजी सुचली नसेल ?<<
तुम्हि खरंच "माझी जन्मठेप" पुस्तक वाचलंय? वाचलं असतंत तर हा प्रश्न तुम्हाला पडला नसता. हल्ली स्वा. सावरकरांची पुस्तकं न वाचताच त्यावर टिप्पणी करायची फॅशन आलेली आहे. असाच एक ब्लॉगर दावा करतोय कि स्वा. सावरकरांनी "माझी जन्मठेप" या पुस्तकात म्हणे माफिचा उल्लेखंच केलेला नाहि. आता या मश्रुम सारख्या उगवलेल्या टिकाकारांपुढे काय बोलणार; पुस्तकात एक अक्ख प्रकरण राजक्षमा संबंधीत आहे. बहुतेक राजक्षमा हा जड शब्द डोक्यावरुन गेला असावा. असो..

>>पण त्यांचे राजकारण ब्रिटिशांच्या फोडा व राज्य करा या धोरणालाच धार्जिणे होते.<<
हे कसं ते जरा उलगडुन सांगा. स्वा. सावरकरांनी तरुणांना ब्रिटिश सैन्यात भरती व्हा, अधिकारी व्हा असं आवाहन करण्यामागे दूरदृष्टि होती. ती उमजायला त्याकाळातलं जिओपोलिटिकल वास्तव्य माहित असणं जरुरी आहे...

आता थोडं चित्रपटाबाबत..

हुडाने खूप मेहनत घेतली आहे, स्वतःचा पैसा खर्च केलेला आहे हे सगळं मान्य, पण माझ्या मते चित्रपट अजुन चांगला बनवता आला असता. कदाचित माझ्याच अपेक्षा जास्त होत्या. चित्रपट दिग्दर्शन हे एक वेगळं रसायन आहे, हुडा नवखा असल्याने त्याचा परिणाम चित्रपटावर झालेला आहे. असं असुनहि स्वा. सावरकरांचा बायोपिक असल्याने चित्रपट ३ तास खिळवुन ठेवतो. वर बरेच जणांनी लिहिलंय कि प्रापगंडा आहे, निवडणुकांचे वारे वहात असल्याने हिंदुत्वाचं कार्ड ढकललं जातंय वगैरे; पण मला तरी तसं जाणवलं नाहि. बायोपिक असल्याने स्वा. सावरकरांची मतं, धोरणं हायलाइट करणं साहजिक आहे. जी आज कर्मधर्मसंयोगाने भाजपाने त्यांची तळी उचलल्याने प्रचारी वाटु शकतात. निवडणुका काय, आज आहेत, उद्या नाहित पण सावरकरांचे विचार कालाबाधित आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व त्याकाळांत वादग्रस्त होतं, दुर्दैवाने आजहि आहे. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या चित्रपटात उलगडुन दाखवलेली आहे, जी आजहि उपेक्षित आहे..

मार्सेच्या किनार्‍यावरील उडीचा सीन अधिक परिणामकारक करता आला असता. अनंत कान्हेरेनी फासावर चढताना दिलेली "वंदे मातरम" घोषणा सर्कन अंगावर काटा उमटवते. चित्रपटाच्या शेवटि स्वा. सावरकरांच्या तोंडि एक वाक्य आहे (नॉट वर्बटिम), त्यांना लियाकत खानच्या आगमना निमित्त कोठडित ठेवलेल्या वेळेचं - "जैसेकि मै उसके सीटमे बम्ब लगानेवाला था." अर्थात ते सार्कॅस्टिक आहे, आणि सिनेमॅटिक लिबर्टि असु शकतं पण त्यावरुन एखाद्याने वाद उकरुन काढला तर मलातरी आश्चर्य वाटणार नाहि... Wink

वर एक शंका उपस्थित झाली आहे कि काँग्रेसच्या नेत्यांना काळ्यापाण्याची शिक्षा का झाली नाहि. यावर हे उदाहरण चपखल बसणारं आहे - महाराष्ट्रात महाराजांनी बांधलेल्या, जोपासलेल्या किल्ल्यांची वाताहात का लागली? याउलट राजस्थानातले किल्ले, गढ्या शाबुत कसे आहेत. याचं कारण, महाराष्ट्र सतत परकियांशी लढला, मोगल, ब्रिटिशांचे तोफगोळे महाराष्ट्रातील किल्ल्यांनी छातीवर घेतले, ज्याचा परिणाम आजहि दिसतोय. राजस्थानातील संस्थानिकांनी मात्र परकियांची गुलामी पत्करुन लढाया टाळल्या, आणि कातडि बचावली. महाराष्ट्रातले किल्ले मराठ्यांच्या शौर्याची आणि साहसाची निशाणी बाळगुन आहेत..

नो गट्स, नो ग्लोरी...

<< जेव्हा तुम्ही एका गटाचे कष्ट undermine करणारी वाक्य पेरता तेव्हा सगळ्यांचाच अपमान होतो.
घराघरांतून माणसं ह्या लढ्याला जोडली गेली होती. तेव्हा जरतारी विचार नको का करायला? >>
------ नानबा, हा विचार आवडला.

काँग्रेसच्या नेत्यांना काळ्यापाण्याची शिक्षा का झाली नाहि >> संघाच्या नेत्या/ कार्यकर्त्यासाठी देखिल ह्या प्रश्नाचे उत्तर नो गट्स, नो ग्लोरी... असेच देता येईल ना?

Pages