स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
त्याबद्दल इथे लिहिण्याची उर्मी निर्माण झाली खरी, पण मग वाटलं की त्यावरून 'विशिष्ट' शिक्कामोर्तब तर होणार नाही!
तर, एक डिस्क्लेमर - वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू ,( ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा एकदाच अनुभव घेतला होता. उंबरठा बद्दल लिहिताना. त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अनुक्रमे सक्रिय व अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. वाचलेल्या गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर 'पाहिल्या'. अर्थातच दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता)जेवण(मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला), विशेषतः ते राजकीय कैदी असूनही तशा निर्धारित दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला. माध्यम शक्तिशाली असल्याने की आणखी कशामुळे याचा अंदाज आला नाहीये अजून. म्हणजे, देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, तरीही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय आवडली. म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे. (अवांतर - स्वदेस मध्ये शाखा बद्दल असंच वाटलेलं) फक्त मराठी उच्चारांवर अधिक काम करायला हवं होतं.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही.
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |
प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट
Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राचीन, वाचताना तुमच्या
प्राचीन, वाचताना तुमच्या प्रत्येक वाक्याला अगदी अगदी होत होतं.
रणदीप हुडानी ज्या conviction नी सिनेमा बनवला आहे त्याला तोड नाही. अमराठी असल्यामुळे सावरकरांचं साहित्य क्षेत्रातलं उच्चतम योगदान त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. ते त्याने कुठलाही आव न आणता परीघाबाहेर ठेवलं. Nation First आणि हिंदुत्व ( आणि त्याची व्याख्या ) याबद्दलचा सावरकरांचा आग्रह सुरवातीपासून शेवटापर्यंत कसा ठाम होता हे फारच परिणामकारक रितीने दाखवले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या आपल्या पिढीला आजचं आपलं जिणं हे किती जणांच्या बलिदानावर आणि सावरकर बंधूंसारख्या कित्येक जणांच्या जिवंतपणी भोगाव्या लागलेल्या मरणयातनांच्या बळावर उभं आहे, याची जाणीव हा चित्रपट करुन देतो.
चित्रपट पाहिला.हुडा अक्षरशः
चित्रपट पाहिला.हुडा अक्षरशः भूमिकेत घुसला आहे.माझ्या मनावर आता सावरकर म्हणून त्याच्याच प्रतिमेचा स्टॅम्प राहील.
शक्यतो गोष्टींना,हिरोच्या लुक्स आणि बाह्य फीचर्स ना ग्लॅमर न देता तश्याच्या तश्या दाखवल्याने त्याची भीषणता जास्त पोहचते.खूप मोठा कालावधी कव्हर केला आहे, पण कंटाळवाणा नाही.कालापानी भाग खूप अंगावर आला.बारी माहीत होता, तो दुसरा मुस्लिम अधिकारी कोण ते गुगल करून बघायला हवे.
इंग्रज देशातून अनेक वर्षं लुटून आणि जाताना सुद्धा जास्तीत जास्त वाट लावून गेले.असा धोरणीपणा जमायला हवा.
छान लेख प्राचीन.
छान लेख प्राचीन.
छान परिक्षण! धन्यवाद!
छान परिक्षण! धन्यवाद!
तुमचं लिखाण एकांगी नसेल ह्या खात्रीने वाचायला घेतलं. आवडलं.
संतुलित परीक्षण!
संतुलित परीक्षण!
खूप छान लिहिले आहे. एका अतिशय
खूप छान लिहिले आहे. एका अतिशय उत्कृष्ट कलाकृतीची तितक्याच उत्कटतेने घेतलेली दखल असे म्हणता येईल.
पूर्णपणे निष्पक्ष आणि कोणताही पूर्वग्रह नसलेले परीक्षण.
रणदीप हुड्डा कलाकार म्हणून फार उच्च दर्जाचा आहे. आता दिग्दर्शक म्हणूनही दमदार performance दिला आहे
छान परिक्षण..!
छान परिक्षण..!
सातवीत असताना स्वा. सावरकरांचे ' माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले होते. पहाटे कैद्यांना अळू कापायला पाठवत. अळू कापताना त्यात साप, किडे ही कापले जात. ते वाचून भयंकर वाटलं होतं.
सहा वर्षापूर्वी अंदमानला फिरायला गेलो होतो. त्यावेळी पोर्ट ब्लेअरला असलेले सेल्युलर जेल पाहण्याचा योग आला होता. स्वा. सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले होते ती कोठडी अगदी शेवटी होती. त्यांचा फोटो, त्यांना कोठडीत असताना दिलेलं ताट, वाडगा तसेच बेडया घातलेला एक जुना फोटो कोठडीच्या भिंतीवर आहे.
इतर कैद्यांपासून त्यांना वेगळे ठेवत. त्यांच्या कोठडीच्या अगदी बाजूलाच जिथे कैद्यांना फाशी देत ती खोली होती. खटका ओढण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडून त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हावे म्हणून ब्रिटिशांनी मुद्दामहून त्यांना तिथे ठेवले होते. अशी माहिती गाईडने दिली होती.
सेल्युलर जेलमध्ये रात्री एक लेझर शो तिथे आयोजित केलेला असतो. देशासाठी ज्यांनी ज्यांनी तिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्याची कहाणी ऐकवली जाते. रात्रीच्या वेळी तो शो पाहताना तो काळ अगदी जिवंत झाल्यासारखा वाटतो.
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
छान
छान लेख आणि परीक्षणं
सध्या थिएटरला बघायचा योग नाही... पण ओटीटीवर आल्या आल्या बघितला जाईल.
@ रुपाली.. त्या लेझर शो चा अनुभव आपणही घ्यायला हवे असे वाटले वाचून.. स्वातंत्र्याची किंमत अजून चांगली समजेल.
छान लिहिलंय. हुडाचे मनापासुन
छान लिहिलंय. हुडाचे मनापासुन कौतुक व धन्यवाद. माझ्या २ अमराठी मैत्रीणी आल्या होत्या त्या अंदमानचे प्रसंग पाहुन अवाक् झाल्या. त्यांना वाटले रडारडीचा सिनेमा असेल. पण असा गंभीर, ज्वलंत असेल व अंदमानचे इतके भयंकर असेल हे त्यांना वाटले नव्हते. तरीही वरचे रुपालीने लिहिलेले वगैरे दाखवले नाहीये ते बरे झाले. वाचायला पण फारच भयानक आहे. असे किळसवाणे प्रसंग स्पष्ट न दाखवताही अंदमानच्या शिक्षेतला भीषणपणा कळतो सिनेमात, यातच हुडाची हुषारी कळते.
छान परीक्षण प्राचीन.
छान परीक्षण प्राचीन.
चित्रपट बघितला नाहीये अजून. अंदमानचा काळ बघवला जाईल की नाही शंका वाटते.
प्राचीन, तटस्थ परीक्षण आवडले
प्राचीन, तटस्थ परीक्षण आवडले.
सुधीर फडके नाचा बघितला होता. अंजू म्हणतेय तसंच अंदमानचे सीन्स पाहिले जातील की नाही तर ओटीटीवर पहावा असं वाटतंय इतक्या मेहनतीने बनवला आहे तर सिनेमागहात पहायला पाहिजे असंही वाटतंय ...
छान परीक्षण्/माहिती.
छान परीक्षण्/माहिती.
पिक्चर पाहिलेला नाही. पण ट्रेलर मधे हुडा जबरी दिसतो सावरकर म्हणून. सावरकरांबद्दल एक व्हिज्युअल इमेज आहे ती त्याने परफेक्ट उभी केली आहे असे वाटले.
ट्रेलर मधे ते जहाजात बसतानाचा संवाद लिहीणार्याने त्यांच्याच काव्यातील वाक्ये चपखल वापरली आहेत
"ये सागर तो भारतमाताके चरण धोता है. पूरी दुनिया घुमाके मुझे वापस तुम्हारे पास लेके आयेगा"
(सागरा प्राण तळमळला मधे...)
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू
तै जननीहृद् विरहशंकितही झाले, परि तुवां वचन तिज दिधले,
मार्गस्थ स्वये मीच पृष्ठीवाहीन, त्वरितया परत आणीन
न्यूजर्सीत गेल्या आठवड्यात
न्यूजर्सीत गेल्या आठवड्यात थिएटरला आला होता पण विकेंडला अगदी एकच शो, त्यामुळे जमलं नाही तेव्हा आता ओटीटीवर येण्याची वाट बघावी लागेल पण बघणार आहेच.
आज बघितला हा चित्रपट.
आज बघितला हा चित्रपट.
रणदीप हुडाचा अभिनय उत्तम झाला आहे. सगळ्याच कलाकारांनी चांगलीच कामं केली आहेत. सावरकरांची प्रखर देशभक्ती, स्वातंत्र्यासाठीची तळमळ, त्यासाठी वाट्टेल ते हाल सोसण्याची ताकद हे सगळंच अतिशय प्रभावी पद्धतीने चित्रपटातून आपल्यापर्यंत पोचतं. लोकमान्य टिळक, मदनलाल धिंग्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जिना या सगळ्यांची व्यक्तिमत्त्वं डोळ्यासमोर चांगली उभी राहिली असं वाटलं.
आता जे आवडलं नाही त्याबद्दल.
गांधीजी, सावरकर, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर इत्यादी नेते असोत किंवा क्रांतिकारक किंवा असंख्य इतर देशभक्त, ज्यांची आपल्याला नावंही माहिती नसतील, या सगळ्यांची देशभक्ती ही अस्सल, खणखणीत होती. त्या बाबतीत आपल्या दृष्टीने ही सगळीच हिमालयाची शिखरं आहेत. पण त्या पलीकडे ही सगळी 'माणसं' होती. त्यांच्यात गुणावगुण होते, कमतरता होत्या, एकमेकांशी काही बाबतीत मतभेद होते.
या चित्रपटात गांधीजी (आणि नेहरू ) यांच्या वाट्याला काहीसे 'सिलेक्टिव्ह' संवाद दिले आहेत असं माझं तरी मत झालं. 'गांधी इतना बडा कब से हो गया?' अशा अर्थाचं वाक्य सावरकर प्रत्यक्षात बोलले असोत किंवा नसोत, पण त्या वाक्याला थिएटरमध्ये हशा येणं हे मला खटकलं. गांधीजी सावरकरांना रत्नागिरीत भेटले तेव्हा ते सावरकरांच्या पत्नीला 'तुम्ही यांच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढलंत, मी एक तासभरही काढू शकत नाही' ( त्यांच्या प्रखर विचारांमुळे) असं म्हणताना दाखवले आहेत. अशा अर्थाचं वाक्य गांधीजी खरोखरच बोलले असतील किंवा नसतील, पण या वाक्याला थिएटरमध्ये टाळ्या पडल्या. ' माझा विरोध गांधींना नाही, अहिंसेला आहे' या सावरकरांच्या वाक्याला टाळ्या पडल्या नाहीत.
आपल्यातले मतभेद प्रगल्भतेने घेण्याइतकी ही माणसं नक्कीच मोठी होती. आपण प्रेक्षक म्हणून तेवढे मोठे नाही. कुणाचीही एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला 'जज' करण्याचा आपल्याला अधिकार अजिबात नाही. माणसं होती, गुणदोष होते, त्यांच्याही काही चुका झाल्या असतील, काही अंदाज, काही निर्णय चुकले असतील.
आज आपली मानसिकता दुदैवाने कुठली तरी एक बाजू घेण्याची होऊन गेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाचीही रेष लहान दाखवण्याची गरज नाही. ते थोडंसं या चित्रपटात झालं आहे. ते, प्रेक्षकांच्या मानसिकतेचं भान ठेवून जाणीवपूर्वक टाळायला हवं होतं असं माझं मत झालं.
अजून एक- शेवटी जे 'रॅप' प्रकारचं गाणं आहे ते मला तरी रुचलं नाही. त्याऐवजी 'जयोस्तु ते ' घेतलं असतं तर जास्त apt वाटलं असतं. 'ने मजसी ने' योग्य प्रकारे घेतलं आहे. उच्चार मात्र जरा अजून चांगले हवे होते.
आवडली प्रतिक्रिया, वावे!
आवडली प्रतिक्रिया, वावे!
आधी मला प्रपोगंडा पिक्चर आहे असे वाटत होते पण गेल्या काही दिवसांतील माहिती व या धाग्यातील रिव्यू आणि प्रतिक्रिया ई वरून आता बघायचा आहे.
अगदी वावे.लोक त्या वाक्याला
अगदी वावे.लोक त्या वाक्याला हसले हे मलाही आवडलं नाही.बायकोला म्हटलेलं वाक्य कदाचित खरं असेलही, त्या सिनियॉरिटी ने हक्काने म्हणण्याइतकी मैत्री असेलही.
सावरकर महान म्हणजे लगेच गांधी बॅशिंग केलंच पाहिजे, सगळं अगदी बायनरी 0-1 असलंच पाहिजे असा कटाक्ष बनतो आहे हे वाईट.गांधी तत्त्व आज पूर्ण जगात अभ्यासली जातात, ती इतक्या सोप्या पद्धतीने डिसकार्ड करता येणार नाहीत.
वावे चांगले मुद्दे मांडलेस.
वावे चांगले मुद्दे मांडलेस.
ने मजसी ने आणि जयोस्तुते ही पूर्ण गाणी घेतली नाहीत का, ही फार महत्वाची वाटतात मला. सावरकर म्हटलं की आधी या दोन कविता (गाणी) आठवतात.
धन्यवाद फारएण्ड, अनु, अन्जू.
धन्यवाद फारएण्ड, अनु, अन्जू.
फारएण्ड, प्रपोगंडा पिक्चर नाही म्हणणार मी तरी. चांगला बनवला आहे. काही गोष्टी टाळल्या असत्या तर मात्र बरं झालं असतं.
मी 'माझी जन्मठेप' वाचलेलं नाही, पण बहुतेक त्यातलाच एक उतारा आमच्या मराठीच्या पुस्तकात होता. दोघे सावरकर बंधू जेव्हा अंदमानातून भारतात (मेनलँडवर) आले, तेव्हा लांबवरून भारताचा किनारा दिसताच स्वा. सावरकर बाबारावांना म्हणतात, ' बाबा, ते पहा भारत. ते पहा त्याचे नीलसिंधुजलधौतचरणतल'. हे वाक्य अगदी लक्षात राहिलं आहे. शेवटच्या शब्दातल्या सौंदर्यामुळेही असेल. पण ती भावनाही किती उत्कट असेल! या चित्रपटात असा एखादा प्रसंग घ्यायला हवा होता. पण अर्थात एवढ्या मोठ्या माणसाच्या बाबतीत कितीही प्रसंग घेतले तरी काही ना काही राहून जाणारच.
शुगोल, मी_अनु, अजब,
शुगोल, मी_अनु, अजब, छन्दिफन्दि, भ्रमर, मनिम्याऊ, रूपाली, ऋन्मे §ष, सुनिधी, अन्जू, मंजूताई, फारएण्ड, सायो आणि वावे >> सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
फारएण्ड, विशेषतः तुमच्या प्रतिसादामुळे जरा आश्चर्य व आनंद दोन्ही झाला. (दर्दी लेखक आणि वाचक असा मनात दबदबा असल्याने :स्मित )
अनु आणि वावे, तुमच्या अभिप्रायाबद्दल आदरच आहे.
ते रॅप मलाही विचित्र किंवा अस्थानी वाटलं.
अन्जू, ने मजसी किंवा जयो§स्तुते बद्दल मम. असा विचार केला की मंगेशकर कुटुंबाकडून अनुमती वगैरे लागत असेल का, ती तशी मिळाली नसेल का? अर्थात् सगळे उगीच तर्कच. मग वाटलं कि पुरुषाच्या आवाजात ते नाहीये म्हणून घेतलं नसेल का.. इ.
दैवयोगानं पूर्वी थोडं स्वा. सावरकर व तत्कालीन भारतीय राष्ट्रीय चळवळ यासंदर्भात (माझ्या अभ्यासाच्या ओघात आवश्यकता भासल्याने) वाचन झालं होतं. त्यातील सगळे संदर्भ अगदी तोंडपाठ वगैरे नसले तरी नुकतंच माझ्या चॅनेल वर माई सावरकरांच्या आठवणी पुस्तक केलेलं. त्या जर वाचल्या असतील, तर तो हशा इतका खटकणार नाही कदाचित. म्हणजे खरं तर आणखीही काही महान व्यक्तींच्या वैवाहिक सहचर वा सहचारिणींचे व्यक्तिगत अनुभव वाचताना असंच काहीसं मनात येतं. सूर्याची सावली प्रमाणे. त्यातून स्वा. सावरकरांच्या अतिशय तेजस्वी व (परिस्थितीचा अपरिहार्य परिणाम म्हणून असेल) मनस्वी स्वभावाचा सर्वात जवळचा सहवास माईंनी अनुभवलेला होता.
हे माझं वैयक्तिक मत आहे.
काल बघितला . सिटी प्राइड,
काल बघितला . सिटी प्राइड, सातारा रोड ला मराठी प्रीमियर होता . रणदीप हुडा आला होता . चित्रपट खरोखरच खूप मेहनतीने केला आहे . पूर्ण चित्रपटात आपण रणदीप ऐवजी सावरकरच बघत आहोत असे वाटले.
मागच्या आठवड्यात सिनेमा
मागच्या आठवड्यात सिनेमा पाहिला.
रणदीप हुडाने फार मेहेनत घेतली आहे. शरिरयष्टी, सिनेमातले बारकावे, संवाद सगळ्याच बाबतीत उत्कृष्ठ वाटतो, अगदी खऱ्याच्या जवळ जाणारा वाटतो.
कलात्मक दृष्ट्या देखील अतिशय सुरेख आहे.
<<<सावरकरांबद्दल एक व्हिज्युअल इमेज आहे ती त्याने परफेक्ट उभी केली आहे असे वाटले.>>> खरोखरच.
शिवाय त्या काळातली घरं , आजूबाजूच्या सिनरी, कपडेपट कुठे काही खटकलं नाही. नित्कृष्ठ अन्न आणि हवामान यामुळे सावरकरांचे खराब झालेले दात, नंतर कवळीचा वापर यासगळ्या बारीक गोष्टी देखील दाखवल्या आहेत. अनेको वर्षानंतर स्वतःला आरशाच्या तुकड्यात न्याहाळताना चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगतात.
अंदमानातील छळ पाहून फारच त्रास होतो. सगळी मिळून सुमारे २८वर्ष तुरुंगात ( काही रत्नागिरीत हाऊस अरेस्ट टाईप) आणि तरीही इतकं उत्तुंग कार्य आहे हे जाणवतं.
माफिनाम्याबद्दल आता हजारो चर्चा घडतात पण तुरुंगात सडत राहून स्वातंत्र्यलढ्यात भाग कसा घेणार या अगतिक भावनेने माफीनामा लिहिलेले इथे जाणवून दिलं आहे.
राजकीय कैदी म्हणून किमान पेपर , लेखणी पुस्तकं हवी यासाठी देखील त्यांना झगडावं लागलं.
पुस्तकं वाचताना हे २८वर्ष नीटसं लक्षात येत नाही पण इथे मुद्दामून तशा नोंदी आहेत. ( किंवा माझं तितकं वाचन नसेल)
त्यांच्या बरोबर घरातल्यांचेही खूप हाल झाले.
सगळ्यात जास्त वाईट म्हणजे स्वतंत्र भारतात सुध्दा त्यांना कैद झाली. त्याशिवाय पाकिस्तानी पंप्र भारतात येणार म्हणून सुद्धा जेल मध्ये आणि नंतर ते विसरून त्यांना तब्बल १०० दिवस तुरुंगात ठेवलं.
इंग्रजांना त्यांची भीती होती आणि त्यांचे हाल केले ते ही एकवेळ ठीक पण स्वतंत्र भारतात तरी त्यांचे आणि कुटुंबाचे हाल व्हायला नको होते.
दृश्य माध्यमात हे सगळं एकत्र बघताना या सगळ्याच गोष्टी अंगावर येतात..
मी ठाण्यात पाहिला . तिथे सिनेमा सुरू झाल्यापासून पिन ड्रॉप शांतता होती. मध्यंतरानंतर देखील पुन्हा अगदी शांतता. कोणत्याही संवादाला कोणी हसलेले जाणवले नाही.
समोरच्या लाईन मध्ये काही टीनएजर होते ते देखील बहुतेक वेळ शांतपणे सिनेमा बघत होते. आणि मध्ये मध्ये एखाद सिन चांगला वाटला की मोबाईल रेकॉर्ड करत होते. ( त्यांना थांबवण्यासाठी देखील आवाज करावासा वाटला नाही )
नेहरूंचे पात्र दिसायला वेगळे असल्याने लगेच हे नेहरू असे लक्षात यायला किंचित वेळ लागला. गांधीजी , जिना यांच्या मधला जिना पार्टिशन नको म्हणतात, किंवा तुर्की खिलाफत का काही याबद्दल ची चर्चा हे संवाद चांगले वाटले. हा भाग फारसा चर्चिला जात नाही.
हिंदुत्वाची व्याख्या सांगितली आहे ती फार छान वाटली.
ही व्याख्या सगळ्यांनीच डोक्यात आणि मनात नोंदवायला हवी आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने आणि तो हिंदी असल्याने भारतभर सगळ्याच लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती होतील ही खूप आनंदाची बाब आहे.
शेवटचे रॅप साँग आवडले नाही.
त्याऐवजी जयोस्तुते चे नवीन रिमिक्स आवडले असते.
सर्वांची मतं पटली आवडली
सर्वांची मतं पटली आवडली.प्राचीन, अतिशय प्रांजळ परीक्षणाचे श्रेय द्यावेसे वाटते.
आयुष्याची अनेक उमेदीची वर्षं तुरुंगात, तेही शारीरिक, मानसिक छळात काढणं, तेही दोन्ही भावांनी, ही खूप मोठी कष्टाची गोष्ट असेल.घरातील स्त्रियांचं आयुष्य किती खडतर गेलं असेल याची कल्पनाही करणं कठीण.
मला सुरुवातीचा सावरकर पिता प्लेग प्रसंग पण खूप पिळवटणारा वाटला.प्लेग वर लस निघाली असती तर किती बरं झालं असतं.त्या काळी प्लेग झाला म्हणजे आता थेट मृत्यू अशी परिस्थिती होती.
रॅप मला विशेष झेपले नाही.पण एक पोवाडा या स्टाइल ने परत ऐकले तर कदाचित आवडेलही.या वेळी मिरवणुकांत प्रसिद्ध होईल कदाचित नाचायला.एरवी 'मय तुजसे मिलने आ जाऊ क्या तेरी शादीमे हालगी बजावू क्या' ने आमचा छळवाद होतो(घराला लागूनच इव्हेंट हॉल चे स्टेज आणि स्पीकर भिंती आहेत)
परीक्षण व सगळे प्रतिसाद वाचले
परीक्षण व सगळे प्रतिसाद वाचले. सावलीचा प्रतिसाद शब्द शब्द माझ्याच मनातले उतरवलेले वाटले.
सेल्युलर जेलमधले प्रसंग व सावरकर - पिळवटून टाकणारे आहे.
Political prisoner असून त्यांच्याच वाट्याला का असे? असे ही वाटून गेले. इंग्रज त्यांना खूप जास्त भीत होते का?
माफी व हिंदुत्वाची व्याख्या - कुठलाही चष्मा न लावता अगदीच पटण्याजोगे.
सिनेमा propaganda वाटला नाही. तसा हेतूही नसावा. पण सावरकरांची बाजू स्पष्टपणे समोर आल्याने कदाचित त्यांच्याविरुद्ध केल्या गेलेल्या आरोपांना उत्तर मिळू शकते.
बघायचा होता पण शनिवारी रात्री
बघायचा होता पण शनिवारी रात्री चेक केले तर सिटीप्राईड सिंहगड रोड आणि कोथरूडचे सगळे शो जवळपास फुल्ल होते म्हणजे सलग चार वगैरे तिकिटे मिळत नव्हती!
सिनेमाने 15 कोटी कलेक्शन केले
सिनेमाने 15 कोटी कलेक्शन केले आहे.20 कोटी मेकिंग खर्च.बहुधा किमान वसूल तरी होईल, अगदी सुपरहिट झाला नाही तरी.23 कोटी झाले तर हिट मानला जाईल.
शो फुल दिसतायत हे बघून बरं वाटतं.
इथे बंगळुरातही शनिवार-रविवारी
इथे बंगळुरातही शनिवार-रविवारी तरी जवळजवळ फुल होते बऱ्याच ठिकाणी शोज.
त्या बाबतीत आपल्या दृष्टीने
त्या बाबतीत आपल्या दृष्टीने ही सगळीच हिमालयाची शिखरं आहेत. पण त्या पलीकडे ही सगळी 'माणसं' होती. त्यांच्यात गुणावगुण होते, कमतरता होत्या, एकमेकांशी काही बाबतीत मतभेद होते.
अजून एक- शेवटी जे 'रॅप' प्रकारचं गाणं आहे ते मला तरी रुचलं नाही. त्याऐवजी 'जयोस्तु ते ' घेतलं असतं तर जास्त apt वाटलं असतं
@वावे>>>> १००% पटलं. आपल्याकडे कुठल्याही मोठ्या व्यक्तिमत्वाबाबत एकतर खूप उदोउदो किंवा प्रचंड टीका अशी टोकाची भुमिका घेतली जाते. त्यांच्या गुणावगुणांचे वस्तूनिष्ठ परीक्षण त्यांचे चाहते व विरोधक दोघांनाही झेपत नाही.
बाय द वे, सावरकरांच्या संकल्पनेतून साकार झालेले पतित पावन मंदीर.
आणि या कामासाठी मोलाचे आर्थिक सहाय्य करणारे श्री. भागोजीशेठ कीर यांचे फोटो
मंदीरात श्री विष्णूलक्ष्मीच्या मुर्ती आहेत पण आत फोटो काढण्यास मनाई आहे.
मंदीराशेजारी वस्तू संग्रहालय आहे. मी गेले त्या दिवशी बंद होते. रत्नागिरीच्या तुरुंगातील सावरकरांची कोठडी व तिच्या शेजारील हॉलही आता सावरकर कक्ष म्हणून संवर्धन केलेला आहे. यांत सावरकरांशी व क्रांतिकारी चळवळींशी संबंधित माहिती प्रदर्शित केली आहे. त्यात सावरकरांच्या २ हस्तलिखीत वह्या आहेत. योग्य ओळखपत्र दाखवून (आणि तुरुंगाचे नियम पाळून) हे पाहता येते.
गांधीजी , जिना यांच्या मधला जिना पार्टिशन नको म्हणतात, किंवा तुर्की खिलाफत का काहीयाबद्दल ची चर्चा हे संवाद चांगले वाटले. हा भाग फारसा चर्चिला जात नाही.>>>
@सावली, अगदी खरे. जिन्ना हे व्यक्तिमत्व खरंतर आधुनिक विचारसरणीचे होते. त्यांच्या राजकिय महत्वाकांक्षेने त्यांच्या विचारसरणीचा बळी घेतला असे मला वाटते. अमरेंद्र बाहुबली यांच्या ‘पाकिस्तान’ लेखमालेत माझी कमेंट आहे जिनांविषयी
सावरकर गांधीहत्येच्या खटल्यात
सावरकर गांधीहत्येच्या खटल्यात एक आरोपी होते हे चित्रपटात दाखवले आहे का?
हो, गांधींच्या निधनाबद्दल
हो, गांधींच्या निधनाबद्दल चर्चा करत असताना त्यांना अटक केलेली दाखवली आहे.
निधन?
निधन?
Pages