स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

Submitted by कुमार१ on 25 June, 2023 - 20:29

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :

धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.

up-arrow-.pngसर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.

• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.

अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्रजनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
down aarow.pngधोका कमी करणारे घटक

• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,

गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
ca breast aware pic.png
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/

3. Lancet. 2002;360(9328):187-195.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदी मूडात असताना एखाद्या स्त्रीला अचानक तिच्या स्तनामध्ये गाठ झालेली पहिल्यांदाच जाणवणे… त्यातून मनात निर्माण झालेली भीती… घाईघाईने गुगलून वाचन करणे…. त्याने अजूनच घाबरायला होणे….. डॉक्टरांची पहिली भेट…..

.. त्यांनी सांगितलेले दोन्ही अंदाज आणि सुचवलेल्या तपासण्या……. विश्वास न बसल्याने दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेणे…. मग बायोप्सी…. परंतु रिपोर्ट येईपर्यंत झालेली मनाची प्रचंड घालमेल…… केमोथेरपीमुळे केस गेल्यानंतर मी कशी दिसेन याची चिंता….. घरातील लोकांशी निर्वाणीचे बोलणे….. घरातल्यांनी भावनिक आधार देणे
आणि….
.. अखेर बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर ती गाठ कर्करोगाची नाही हे स्पष्ट होणे…… त्यानंतर झालेला कौटुंबिक आनंद अवर्णनीय असतो !!

असा प्रसंग काही जणींच्या वाट्याला येऊ शकतो. वर मी जो वर्णन केला आहे तो होम या हिंदी चित्रपटातील आहे. मुळात ती जालमालिका होती. त्याचा आता सलग चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे.

वरील प्रसंगातील जोडप्याच्या भूमिका सुप्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांनी केल्यात. तो प्रसंग सुरेख वठला आहे.

कर्करोग उपचार घेताना बऱ्याच स्त्रियांचे भरपूर केस गळतात. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या माहेर महिला प्रतिष्ठानने केस दान स्विकारण्याची मोहीम हाती घेतली आहे.

किमान 12 इंच लांबीचे केस 7 मार्च पर्यंत सोमवार पेठेतील कुमार सदन इथल्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात द्यावेत असे आवाहन त्यांनी केलेले आहे

(बातमी : छापील मटा 5 मार्च 2024)

Sir,
Please provide Marathi words for below bones. And if possible some information on handling pain to these body parts. Even hot water bottle infra red light ice pack will Do. Currently Gabapentin is providing Some pain relief.

Right proximal humerus bone of the leg
Sternum
D3, D6-D10 L2 and L3 vertebrae.

Sacrum
Bilateral illiac bones

Bilateral acetabula
Bilateral Femur.
Thank you.

Sometimes I feel like i am walking on skeleton made of match sticks.

Right proximal humerus bone of the leg ??
* humerus हे दंडाचे हाड. (leg नाही).

Sternum = छातीचे मध्यवर्ती हाड (उरोस्थी)

D or T vertebrae.= पाठीचे मणके
L vertebrae. = कमरेचे मणके

Sacrum = कमरेखालचे तळातले हाड
Bilateral illiac bones = खुब्याच्या हाडाचा वरचा सर्वात मोठा भाग
Bilateral acetabula खुब्याच्या हाडाची खोबण
Femur. मांडीचे हाड

तुमचं दुखणे वाढलेले दिसतंय. उपचार व काळजी नियमित घेत रहा . शुभेच्छा आहेतच !

अमा, काल वाचलं पण काहीच लिहू शकले नाही. तुम्ही इतका संघर्ष केला आहे आयुष्यात, अजून हा इतका वेदनादायी आजार. एकाच माणसाची आयुष्याने वारंवार का परीक्षा घ्यावी हा प्रश्न सतावत राहतो. शब्द पोकळ आहेत.... पण तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटो या मनापासून शुभेच्छा.
/\
तुम्ही रोज लिहिले तरी मी तुम्हाला रोज शुभेच्छा देईन.

अमा, खुशाली कळवत रहा.
परवा तुम्ही एकदम इतक्या साऱ्या हाडांची मराठी नावे विचारल्यामुळे नजरेसमोर नको तो वैद्यकीय रिपोर्ट तरळून गेला.
सवडीने खुलासा करा.

पुन्हा एकवार सर्वांतर्फे शुभेच्छा !

धन्यवाद सर्वांना. मी फायट र वगैरे आजिबात नाही. मला फक्त आपल्या ला काय झाले आहे नक्की हे माहिती आहे. यु कांट रिअली स्माइल थ्रु दॅट पेन.

कुमार सरः वरील हाडे हे पेट स्कॅन १० नोव्हेंबर मध्येच डिटेक्ट झालेले आहे. त्या आधी पाल्बो सिक्लिब व रेमिशन असे स्टॅ ट्स होते. मग एकदम हे डोक्यावर आले व त्यासाठी रामिव्हेन प्रिस्क्राइब झाले. मी नोवें मध्ये ते घ्यायला सुरुवात होती तेव्हा साइड इफेक्ट जरा मॅनेजिएबल होते. डॉ ने फक्त उलट्या जुलाब होउ शकतात व त्यासाठी गो ळ्या लिहून दिलेल्या त्यामुळे मी एकदम खिशानी होती. उत्साहात माझे नोकरीचे काँट्रॅक्ट पण रिनु झाले. हे एक्सेप्ट्च करायला नको होते. हे आता कळते आहे. हा भयानक हाय प्रेशर जॉब आहे.

डिसेंबर अर्ध्यात सोसायटीची आय पी एल चालू होती. तेव्हा च कुत्रे आजारी पडले व तिला उचलून घेउन व्हे ट कडे नेले तेव्हापासून गाडी बिघडली. ती पण आजारी होती बेड रिडन व वरील हाडांनी जाम विरोधात्मक निदर्शने केली. पण हे का आहे हा डोक्यात प्रकाश पडत नवह्ता.
बी पी गोळी टेल मिस्टरान व रामिव्हेन एकत्र घेतले की क्रिएटिनाइन वाढ ते हे ही नंतर कळले तो परेन्त सी केडी सारखीच लक्षणे सुरू झालेली.
आतुन बाहेरून बॉडी डिहायड्रेट होते ते अनुभवले. स्किन भयंकर ड्राय व आतुन कोरडे झाल्याने भयानक असे बद्ध कोष्ट. हा माझा एक स्ट्रेस
रिस्पॉन्स पण आहे. कामचे सर्व टेन्शन तिथे अनुभवलेले अपमान हे ते ह्या सिंप्टम मधून व्यक्त होते. व्हेगस नर्व्ह बिचारी काय करेल.

रामिव्हेन मुळे भूक नाही. खाल्लेले पोटात ठरत नाही त्यामुळे शक्ती नाही. काम करायला अवघड जाते आहे हे सर्व एकत्र येउन जानेवारीत माझा मुली समोर इमोशनल मेल्ट डाउन झाला. त्यानंतर नोकरी सोडायचे ठरले. ह्याला फेब्रुवारीत मुहुर्त लागले कारण बॉस पर देशात. वजन ८ किलो ड्रोप झाले. साइज एक्ष एक्ष एल वरुन एक्स एल एल वर आला आहे. आज घडीस. अजुनही कमी असेल. सर्व कपडे गबाळे व मोठे दिसू लागले.
कंपरेझन ला माझा वर्क मोड मधला एखादा जुना फोटो टाकीन. धिस इज अलसो ह्युमिलिएटिन्ग.

फेब मध्ये सरांनी पाच मिनिटे दिली त्यांना काम झेपत नाही असे सांगितले पण ते म्हटले दोन दिवस का येइन पण चालू ठेव. फ्रुट ज्युसेस, पपई, केळी द्राक्षे खाउन काय पोट भरते. पण तितकेच जात होते. लपुन छपुन केलोग्स सिरीअल खात असे. चार पाच घास व अमुल ताक.

हा आठवड्यात कळस झाला. लेक वीकेंडला येते. ती सोमवारी परत जाते. तेव्हा मला खूप त्रास होत होता. दी ड दोन तास पडुन राहावे वाटत होते. पण तशीच ऑफिसात आले. भयानकच वीकनेच होता. पण तो दिवस पुर्ण केला. मग झोपले. मंगळवारी परिस्थिती बरी होती. तेव्हा रामिव्हेन घेताना त्यातील झिरझिरता कागद काढुन म्हटले बघु तरी. व साइ ड इफेक्ट बघुन माझी झोप उडाली. हो सारखी झोप येत असते. हा सिरीअस नेस ऑन्कोला माहीत असेल पण त्याने एक्स्प्लेन केला नाही म्हणून सात्विक संताप आला. ह्याचा पुर्ण अभ्यास करायचा ठरवला. नवराअ फार्मा मध्ये होता. त्याचे भूत अंगात आले.

बुध्वारी रजा घेतली. गुरुवारी राजिनामा दिला. हु श्श. आता फक्त आजारावर व रिक्व्हरी वर फोकस. आज शुकर्वार. व्हेगस नर्व्ह इज स्माइ लिन्ग विथ ऑल द बे ड रेस्ट.
पण वर लिहिलेली हाडे दुखतच राहतात. अमॅझोन वरुन हॉट वॉटर ने गरम करुन शेकायची ती ममव पिशवी, वॉकिन्ग स्टिक, इन्फ्रा रेड दिवा व
एक केरला आयुर्वेदा टाइप हर्ब्स घातलेली गरम करुन शेकायची पिशवी हे घेतले आहे. सर्व घरी मागवले ही पण लक्षरी. ३४ वर्शे काम करुन आता मी घरीच राहायला पाहिजे हे डोक्यात फिट झाले. प्लीज डॉण्ट फाइट युअर बॉडीज सिग्नल स, लिसन टु देम. ते म्हातार पणात पण नाचायचे वगैरे विचित्र आहे. व कीप स्ट्रेस अवे.

क्रिएटिनायन हाय होणे हे धोका दायक आहे. म्हणून नेफ्रॉलोजिस्ट ला भेटले. त्याने फक्त सेल्फ मॉनिटर कर व चार बाटल्या पाणी पी रोज असे सांगितले. एका आर एफ टी मध्ये ग जी एफ आर १९ ला गेले होते. त्यामुळे पॅनिक अ‍ॅटेक. आता ३८ आहे. बीपी व डायबेटिस च्या गोळ्या बदलुन दिल्या त्याने.

एप्रिल मध्ये पेट स्कॅन आहे. व टु डी एको आहे. कुमार सर टु डी एको बद्दल लिहा माहिती नक्की काय असते. वगै रे.

आहे ते रामिव्हे न फक्त संपवायचे ठरवले आहे. कॅन्सर पेशंट नको ती ट्रीट मेंट का म्हण ता त ते मला कळ ले ह्या रामिव्हेन मुळे. शिवालाच वीष पचवून जगता येते. आपण पामर पडलो. जय जय शिवशंकर

३४ वर्शे काम करुन आता मी घरीच राहायला पाहिजे हे डोक्यात फिट झाले. >>
हे बाकी योग्य केलेत. आपल्या तब्येतीपुढे अन्य काहीही महत्त्वाचे नाही.
असो. वृत्तांत समजला.
तुम्ही तुमचा आजार इथे पूर्वीच जाहीर केलेला आहे. त्या संदर्भात एक कुतूहल वाटते आणि अभ्यास म्हणून विचारतो.
या लेखामध्ये, त्या आजाराचे धोका वाढवणारे जे घटक दिलेले आहेत त्यातले तुम्हाला कुठले लागू होतात ?

सवडीने लिहा, काही घाई नाही. आधी औषधे व आराम हे महत्त्वाचे.

टु डी एको बद्दल
>>>
खरं तर हा माझा प्रांत नाही. तरी पण या निमित्ताने सवडीने त्यावर काही वाचेन आणि काही मुख्य मुद्दे लिहायचा प्रयत्न करतो.

No idea sir. Overweight. High bp diabetes. Stress late pregnancy at age 32 1 year of breast feeding. Don't smoke or drink. Except occasionally cocktail or one beer. That was 6 years back. Used hair die ammonia free. My office has a lot of stored chemicals so must have breathed a lot of them. Like tandoori food but like two pieces at a time. No wild behaviour. 2016 I had vitamin d deficiency. So took those big pills. My biggest indulgence is sabudana khichdi and aam ras.

अमा काळजी घ्या,पूर्ण बऱ्या होणार आहातच,त्यासाठी शुभेच्छा

कुमार सर तुम्ही इथे दिलेल्या माहितीमुळे, आणि घरी येणाऱ्या मटा मध्ये वाचून लेकीने केस डोनेट केले

IMG_20240308_170842177.jpgIMG_20240308_181337341.jpg

अमा, तुम्ही खूप धीराच्या आहात ! तुमची सकारात्मता तुम्हाला यातुन लवकर बाहेर पडायला मदत करेल. काळजी घ्या!

अमा, काम थांबवलेत हे उत्तम केलेत.
आराम करा आणि जमेल तसे इथे येत रहा. तुम्हाला रिकव्हरी साठी खूप शुभेच्छा!

अमा, खूप एनर्जी, धीर आणि बिग हग.मदतीची हाक अवश्य मारा. एखादा तुम्हाला अचाट अतर्क्य वाटलेला पिक्चर सांगा. त्याची सगळे मिळून चिरफाड करू.

अमा, काम थांबवलेत हे उत्तम केलेत.
आराम करा आणि जमेल तसे इथे येत रहा. तुम्हाला रिकव्हरी साठी खूप शुभेच्छा!
+१
'बर्न आऊट' रूटीन वाटलं एकदम.

Pages