जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.
या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?
या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.
(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).
धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.
हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.
2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.
या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :
धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)
<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)
धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.
ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.
सर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)
मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.
• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.
• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड
साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.
• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे
• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे
• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर
• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर
• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे
हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.
वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.
कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.
२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.
हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.
२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.
मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास
स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.
यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.
स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.
• शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.
याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.
शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.
२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.
मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.
अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.
कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.
केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)
शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्र व जनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.
वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
धोका कमी करणारे घटक
• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.
• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे
• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).
• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली
• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..
बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :
ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.
प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.
गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….
वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597
तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.
तमाम स्त्री वाचकांनो,
गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !
बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...
2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/
3. Lancet. 2002;360(9328):187-195.
अजून एक वैशिष्ट्यपूर्ण
अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा.
वरील उदाहरणात जर मीनाच्या नवऱ्याला प्रोस्टेटचा कर्करोग असेल आणि मीना पूर्ण निरोगी असेल,
तरीही
या दोघांपासून झालेल्या मुलीला स्तनांचा कर्करोग होऊ शकतो.
Mammo is a bit uncomfortable
.
हा लेख प्रमाणाबाहेर लांबू नये
हा लेख प्रमाणाबाहेर लांबू नये म्हणून मी काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण तिथे वाढवले नाही.
एक प्रश्न वाचकांकडून अपेक्षित होता पण तो अजून न आल्याने आता मीच इथे लिहितो :
पुरेसे स्तन्यपान केल्यास या कर्करोगाचा धोका का कमी होतो ? ( mechanism ?)
सविस्तर उत्तर खाली देतो.. ..
1.स्तन्यपानाच्या कालावधीत
1.स्तन्यपानाच्या कालावधीत स्तनांच्या दूधपेशींचा विकास होत राहतो (differntiation). पेशी जितक्या विकसित होतात तेवढा कर्करोगाचा धोका बराच कमी होतो.
2. बाळंतपणापूर्वी स्तनांमध्ये डीएनएला इजा झालेल्या जुन्यापुराण्या बऱ्याच पेशी साठलेल्या असतात. दूध पाजण्याच्या क्रियेबरोबर या नकोशा पेशी आपसूक शरीराबाहेर टाकल्या जातात. ( त्या बाळाच्या पोटात गेल्याने बाळाला काही फरक पडत नाही ! जठराची आम्लता त्यांचा नायनाट करून टाकते).
3. या दरम्यान मासिक पाळी बराच काळ सलग बंद राहते >>> इस्ट्रोजेनचा सातत्यपूर्ण प्रभाव कमी होतो.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
..
चार गुगल सर्च एकत्र जमवून लिहिलेला आहे. >>>
बिलकुल सहमत नाही. माझ्या लेखनाचा मुख्य संदर्भ हा आहे :
https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...
तो आपण पाहू शकता. तो पूर्णपणे वैद्यकीय संदर्भ आहे; सामान्य गुगल नाही.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीची ती अधिकृत पुस्तिका आहे. ती व्यवस्थित अभ्यासून त्यातले काही संदर्भ मी मूळ पाहून हे लेखन केले आहे. असे असून सुद्धा तुम्ही जो आक्षेप घेतला आहे त्याचे आश्चर्य वाटले.
व्हाट्सएप अंकल असली बिरूदे चिकटवण्याची गरज नाही.
यातले बहुतेक 'रिस्क factor'
यातले बहुतेक 'रिस्क factor' हे महिलांच्या हातात नाहीत किंवा practically कंट्रोल करणे शक्य नाही
>>>
धोका वाढवणारे जे घटक असतात ते दोन प्रकारचे असतात :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे. (modifiable)
त्यामुळे क्रमांक 2 च्या अनुषंगाने जे घटक आहेत त्यावर एखाद्याला विचार करता येतो हे तुम्हाला कळायला हरकत नव्हती. त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे.
मला लेख पटलाय.बरीच माहिती मी
मला लेख पटलाय.बरीच माहिती मी गुगल करून आतापर्यंत मिळवली नव्हती ती मिळालीय. गुगल केल्यावर मोजकेच मुद्दे मिळाले होते. पण एकंदर इफ एल्स चे किचकटत्व पाहता सेल्फ एक्झामिन आणि स्वतःच्या इन्स्टिनक्ट वर लक्ष ठेवणे असे दोनच परिणामकारक पर्याय दिसतायत.
जाड/ओबेस महिलांना धोका जास्त असं सगळीकडे वाचत आलेय.
BMI ही पद्धत च साफ चुकीची आहे
BMI ही पद्धत च साफ चुकीची आहे असे सिद्ध होत आहे.
झीरो फिगर ही सुंदर दिसण्याचे मनाकांकन नाही.
निस्तेज चेहरा आणि फक्त हाड.
त्या पेक्षा जाड स्त्रिया च सुंदर दिसतात.आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण वेगळेच तेज असते.
लेखात एकूण जे घटक दिले आहेत
लेखात एकूण जे घटक दिले आहेत त्याच्या दीडपट घटक अधिकृत पुस्तकात आहेत. ते मी शक्य तितके कमी केले आहेत. प्रत्येक घटकावर माझे स्पष्टीकरण द्यायचे असते तर लेख अवाढव्य झाला असता, जे मला कधीही आवडत नाही आणि वाचकांना सुद्धा.
आता मुद्दे एका खाली एक लिहिले की त्याला कॉपी-पेस्ट म्हणायचे ? असेच्या असे मराठी लेखन कोणी केले असल्याचे जरूर दाखवून द्यावे..
काही मुद्दे प्रतिसादातल्या चर्चेसाठी राखून ठेवले तर त्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही.
योग्य ते अमेरिकी व भारतीय वैज्ञानिक संदर्भ मुळातून इंग्लिशमध्ये वाचून सर्व लेखन मी माझ्या भाषेत केलेले आहे. कोणत्याही माहितीपर वैज्ञानिक लेखनाचा लेखक हा संकलकच असणार हे उघड आहे. संशोधक लोक “नवे लेखन” थेट वैद्यकीय नियतकालिकांमध्ये लिहितात. ते संख्येने कमी असतात.
या उलट वृत्तमाध्यमांमधून लिहीणारे आणि संशोधक नसलेले लेखक वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत वाचकांपर्यन्त पोचवतात.
..
मध्यंतरी मी दूरदर्शनवर अच्युत गोडबोले यांची मुलाखत पाहिली.. त्यांनाही मुलाखतीत,
“आता विकिपीडिया असल्यावर तुमच्या लेखनाचा काय उपयोग ?हा प्रश्न विचारला होता”.
त्यांनी उत्तर दिले की
“वाचकांची प्रचंड मागणी आहे म्हणून मी लिहीत राहतो; विकिपीडिया हा सर्वांना बघण्यासाठीच उपलब्ध आहे. तो कुठल्याही लेखकाने बघण्यात गैर नाही. मात्र लेखन हे आपल्या स्वतःच्या भाषेत करावे”
..
या लेखासाठी मी विकिपीडिया ढुंकून सुद्धा पाहिलेला नाही किंवा सर्वसामान्य लोक बघतात ते अमुक तमुक डॉट कॉम असले संदर्भही पाहिलेले नाहीत.
तुमचे सगळेच लेख माहीतीपूर्ण
तुमचे सगळेच लेख माहीतीपूर्ण असतात. भाषा संयमित असते. प्लीज लिखाण चालू ठेवा, ही नम्र विनंती.
मला या लेखात व्हिक्टिम
मला या लेखात व्हिक्टिम ब्लेमिंग किंवा फिअर माँगरिंग दिसलं नाही.
पण कुमार१ यांनी शास्त्रीय माहिती देणार्या लेखांमध्ये संदर्भसूची द्यावी असं मात्र आवर्जून सुचवेन. श्रेयोल्लेखाचा शिष्टाचारही पाळला जाईल आणि कोणाला अधिक माहिती मिळवावीशी वाटली तर त्यासाठी दिशा मिळेल.
केस रंगवण्यासाठी वापरत
केस रंगवण्यासाठी वापरत असलेल्या केमिकल युक्त रंगा मुळे स्तनाचा किंवा गर्भाशय च कॅन्सर होवू शकतो.
हे एका वाक्यात च सांगणे योग्य आहे.
ते dr नी सांगितले आहे.
Details मध्ये सांगायचे झाले तर 100 पान पण पुरणार नाहीत इतके ये किचकट आहे..
आणि ते समजणे अजून कठीण आहे.
त्या मुळे जास्त खोलात जावू नये.
आणि उगाच काही तरी कॉमेंट करू नये
१. अनया
१. अनया
होय चालू ठेवीन.
..
२. स्वाती
संदर्भसूची द्यावी हे बरोबरच. यावेळेसही मुख्य संदर्भ खाली लिहावा असे माझ्या मनात होते परंतु अनवधानाने राहून गेले.
Covid-19 लेखमालेच्या उत्तरार्धात तर मी कित्येकदा प्रत्येक प्रतिसादातच वैद्यकीय जर्नलचा संदर्भ दिलेला आहे
धन्यवाद.
धन्यवाद.
धन्यवाद.
हेमंत
हेमंत
तुमचा मुद्दा बरोबर आहे. सामान्य वाचकांसाठी असणाऱ्या या व्यासपीठावर थोडक्यात मुद्देसूद लिहिलेले चांगले.
त्याचे पालन मी आजपर्यंत केलेले आहे
छान लेख आणि प्रतिसाद..
छान लेख आणि प्रतिसाद..
शेअर करावी अशी माहिती..
वाचतोय...
प्रतिसादातील प्रश्नोत्तरे आणि अधिक माहिती मूळ लेखाखालीही FAQ प्रमाणे घेता येईल. जर अवांतर प्रतिसादात ते हरवत असेल तर..
मला या लेखात व्हिक्टिम
मला या लेखात व्हिक्टिम ब्लेमिंग किंवा फिअर माँगरिंग दिसलं नाही. >>> +१ मलाही खटकण्यासारखे काही दिसले नाही. कोठेही स्त्रियांच्या लाइफस्टाइलबद्दल जजमेण्टल कॉमेण्ट्स नाहीत. एक डॉक्टर म्हणून कोणते लोक हाय रिस्क धरावेत त्याचे फॅक्टर्स म्हणून ते लिहीलेले आहेत.
तुमचे सगळेच लेख माहीतीपूर्ण असतात. भाषा संयमित असते. प्लीज लिखाण चालू ठेवा, ही नम्र विनंती. >> +१
लेख वाचला नाही. धागा
लेख वाचला नाही. धागा भरतटल्याचं प्रघांच्या धाग्यावर कळलं म्हणून आले. शेवटचं पान वाचलं.
तुमचे सगळेच लेख माहीतीपूर्ण असतात. भाषा संयमित असते. प्लीज लिखाण चालू ठेवा, ही नम्र विनंती. >> +१
डॉक्टर साहेबांचे लेख
डॉक्टर साहेबांचे लेख माहितीपूर्ण असतात आणि सामान्य माणसास ती माहिती समजावून सांगण्याची त्यांची हातोटी छान आहे.
धागा भरकटण्याचा धोका आहे खरा परंतु पूर्वी एक गोष्ट वाचल्याचे आठवते.
एका बाईनी एक श्वान पाळला होता. तो अचानक बाईंच्या स्तनांकडे बघून भुंकायला लागला. त्या बाई जेव्हा कोचावर किंवा खुर्चीवर बसत तेव्हा तो नाक स्तनांच्या जवळ आणून भुंकत असे. काही कालांतराने बाईंना त्या श्वानच्या ह्या विचित्र वागण्यामुळे शंका आली आणि त्यांनी तपासणी केली तर त्यांना प्रारंभिक टप्यामधला स्तनांचा कर्करोग झाल्याचे उघडकीस आले. त्या पुढे योग्य उपचार घेऊन बऱ्या झाल्या.
प्रतिकूल व अनुकूल असे
प्रतिकूल व अनुकूल असे प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !
लेख संपादित करून त्याच्या तळात संदर्भ यादी दिली आहे. अजून डझनभर संदर्भ आहेत. त्या संदर्भात प्रश्न आला तर थेट त्या वाचकाला ते संदर्भ प्रतिसादात देईन.
लेख आवडला नाही असे म्हणण्याचा वाचकाचा अधिकार आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद दिलेले आहेत. व्यक्तिगत पातळीवर कुठल्याही प्रकारची बिरुदे चिकटवणे हे मात्र पटले नाही. म्हणून काही अवांतर लिहावे लागले.
ही संपूर्ण माहिती गूगल वर
ही संपूर्ण माहिती गूगल वर उपलब्ध असताना आणि मला स्वतःला अनेक कारणाने वाचणे अनिवार्य असतानाही मी कधी शोधून वाचली नाही कारण आळस.
त्यामुळे या लेखाबद्दल धन्यवाद. मी एकटीने न वाचता आणखी 4 लोकांशी पण शेअर केला.
कुमार सर, प्लिज लिहीत राहा. तुमचे लेख महत्वाचे असतात.
गुगल आणि अन्य संस्थळावर
गुगल आणि अन्य संस्थळावर माहितीचा भडिमार असला तरी तांत्रिक किचकट संज्ञा आणि यंत्रवत मांडणीमुळे त्यातला आशय सामान्य वाचकांपर्यंत पोचतोच असे नाही. डॉ कुमार यांचे लेख मला नेहमीच माणसाने माणसासाठी लिहिल्यासारखे वाटतात. कारण वैद्यकीय संशोधन सारख्या जटिल विषयावर ते नेहमीच सामान्य वाचकाला समजेल असे विश्लेषण करतात. आणि त्यावरील शंकांना देखील आवर्जून उत्तरे देतात. आणि त्या उत्तरांचा टोन नक्कीच निरसन होण्यास मदत व्हावी असा असतो.
लिहीत राहा डॉक्टर, या आजारांबद्दल खूप भीती वाटते पण आपल्या डॉक्टरला नेहमीच एवढी सखोल माहिती द्यायला वेळ असेल असे नाही त्यामुळे अशा लेखांच्या माध्यमातून आपण जी जाणीव जागृती करत आहात ती नक्कीच खूप महत्त्वाची आहे.
अमा, आपल्या धैर्याला आणि सकारात्मक उर्जेला सलाम. तुम्ही हा लढा लढत असताना इतर ठिकाणीही सक्रिय राहून आवर्जून लिहीत आहात त्याचे कौतुक वाटते. लवकर लवकर पूर्ण बऱ्या व्हा. खूप शुभेच्छा!
मला या लेखात व्हिक्टिम
मला या लेखात व्हिक्टिम ब्लेमिंग किंवा फिअर माँगरिंग दिसलं नाही. >>> सहमत.
चांगला माहितीपूर्ण लेख.
चांगला माहितीपूर्ण लेख.
चर्चेदरम्यान एक-दोन मतभेद
चर्चेदरम्यान एक-दोन मतभेद झाले म्हणून लेखन थांबवण्याचा कोणताही विचार नाही. तरीसुद्धा "लिहीत राहा" असे प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना धन्यवाद !
….
कष्ट घेऊन लेख लिहिल्याबद्दल तुमचे आभार. >>>
हा मुद्दा प्रतिसादकाकडून आला असल्यामुळे थोडे लिहितो.....
पुढे चालू ..
एक ते पंधरा जून दरम्यान मी
एक ते पंधरा जून दरम्यान मी रोज पहाटे उठून अर्धा तास या विषयावर अधिकृत संदर्भातून वाचन केले.
या वाचनादरम्यान दोन-तीन मुद्दे मलाही नव्याने समजले जे माझ्या शिक्षणाच्या काळात या धोक्यांच्या यादीमध्ये नव्हते.
उंची पाच फूट तीन इंचापेक्षा जास्त असणे हा मुद्दा माझ्यासाठीही आश्चर्यकारक होता. म्हणून मी तो थोड्या विस्ताराने लेखात मांडलेला आहे. आता याचा अर्थ मुद्दामून विस्कटून सांगतो :
समजा मीनाची उंची पाच फूट सहा इंच आहे. तिच्या आईला व मावशीला स्तन-कर्करोग होऊन गेलेला होता.
जर अशी परिस्थिती असेल तर..
मीनाने हे ध्यानात ठेवले पाहिजे की आपण स्तन आणि अन्य दोन प्रकारचे कर्करोग होण्याच्या धोक्याच्या गटात आहोत. अशा परिस्थितीत आपण इतर स्त्रियांपेक्षा अधिक जागरुक असले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने चाळणी चाचणी जरूर करून घेतल्या पाहिजेत ( त्रास होत नसला तरीही)
आणि
शक्य असल्यास आपल्या जीवनशैलीत धोका वाढवणारे जे घटक आहेत ते काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास ते हिताचे राहील. (आयुष्यभर बऱ्याच काळाची रात्रपाळीची नोकरी, व्यसने , इ. )
समजा मीनाची उंची चार फूट दहा
समजा मीनाची उंची चार फूट दहा इंच आहे. तिच्या आईला व मावशीला स्तन-कर्करोग होऊन गेलेला होता.
जर अशी परिस्थिती असेल तर..
अश्या परिस्थितीत पण मीना high risk गटातच येईल. उंचीचा काही संबंध नाही इथे.
Correlation does not imply causation.
Correlation does not imply
Correlation does not imply causation. >>> +१
उंचीचा मुद्दा साधारण धोका याच गटात आहे.
जर धोका मापनाचे गुण काढायचे झाल्यास त्याला बळकटी मिळते इतकेच म्हणायचे आहे.
या क्षेत्रातही मशीन लर्निंग येऊ घातलेले आहे.
त्या तंत्रज्ञानात शरीरधर्मासंबंधी आणि जीवन शैलीसंबंधी विविध गुण देऊन एकत्रित विचार करून धोका काढला जातो.
बळकटी?
बळकटी?
तुमचा मुद्दा मलाही मान्य आहे.
तुमचा मुद्दा मलाही मान्य आहे. निव्वळ एखाद्या शरीरधर्मातील साधारण घटकामुळे कर्करोग होतो असे अजिबात नाही.
परंतु शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्र. व जनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. याच अनुषंगाने वंश आणि वर्ण यांचा देखील अभ्यास केला जातो.
कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात. प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी. चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला घटक जर निवडून घेतला तर त्यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते.
Pages