स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

Submitted by कुमार१ on 25 June, 2023 - 20:29

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :

धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.

up-arrow-.pngसर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.

• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.

अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्रजनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
down aarow.pngधोका कमी करणारे घटक

• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,

गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
ca breast aware pic.png
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/

3. Lancet. 2002;360(9328):187-195.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर या धाग्यावर मांडतोय त्याबद्दल क्षमस्व.

कर्करोगाच्या रूग्णाच्या जवळच्या नातेवाईकांसाठी एकमेकांशी बोलण्यासाठी सपोर्ट ग्रुप सारखा धागा आहे का हे बघत होतो. पण कर्करोगाशी सामना या ग्रुप मधे सापडला नाही.

जे रूग्ण केमोथेरपीमुळे खूप चिडचिड करतात, त्या वेदना त्यांना असह्य होतात अशांच्या जवळच्या नातेवाईकांना काय करावे हे समजत नाही. डॉक्टर्स बिझी असतात. व्हॉट्स अ‍ॅप वरची कमेण्ट आठवडा आठवडा पाहिली जात नाही. शिकाऊ डॉक्टर्सकडून मग डॉक्टर फ्री झाले कि त्यांना विचारण्यात येईल हे छापील उत्तर येते.

तुम्ही जर असा धागा सुरू केला तर त्यावर लोक व्यक्त होतील.

र आ
सूचना चांगली आहे. त्यावर जरा विचार करतो. अन्य कोणाच्या सूचना असतील तर जरूर लिहा. असा धागा काढायचा झाल्यास, फक्त कर्करोगाचा की सर्व दीर्घकालीन आजारांसाठी मिळून एकत्र, यावर विचारविनिमय व्हावा.

मुख्य म्हणजे, जे रुग्ण अथवा कुटुंबीय अशा दुर्धर आजाराचा सामना करीत आहेत त्यांचे या संदर्भातील मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

माझे सी ए १५ टेस्ट जास्त आल्याने डॉ ने अर्जंट पेट स्कॅन सांगितला होता तो करुन दाखवून आले. आधिचा व हा ह्यात काहीच फरक नाही स्टेबल डिसीज असे आले. म्हणून तीच ट्रीटमेंट पुढे दोन महिने चालु आहे. मग क्रिएटिनाइन व सीबीसी करुन भेटायचे. वजन कमी आहे म्हणून प्रोटीन पावडर रेनल सेफ दिली आहे. ती घेते.प्लस थ्रेप्टिन प्रोटीन बिस्किट्स. बाकी जास्त अन्न खायचे प्रयत्न चालू आहेत. सुका मेवा. बदाम अंजीर खात आहे. चार बाटल्या पाणी दिवसातुन. खरेच स्वच्छ गार पाणी हा किती छान प्रकार आहे. यु अप्रिशिअ‍ॅ ट इट अ‍ॅज लाइफ'स गिफ्ट. बाकी जमेल तस घरी बनवून खाते. कधी कधी हिप बोन्स मध्ये मेट्स असल्याने सायटिका छाप त्रास होतो. तो मात्र सहन करायला फार अवघड जातो. अगदीच अवघड झाले तर गाबा घेते. इन्फ्रा लाइट ने शेक घेते. डे बाय डे चालु आहे. शक्ती कधी असते कधी कमी पडते पण बेसिक डिसीज इज बिहेविन्ग इट सेल्फ.

टू डी एको टेस्स्ट एक पेंडिन्ग आहे. ती केली पाहिजे.

Thank you

औषधे खूप महाग म्हणून पैसे वाचवायला आटो ऐवजी लोकल ट्रेन ने यावे असा धाडसि विचार डोक्यात होता. पण जेव्हा तुम्ही पेट स्कॅन ला जाता तेव्हा तुम्हाला रेडिओअ‍ॅक्टिव्ह इंजेक्षन देउन एका आराम दाय क जागेत बसवतात व एक तास आराम करायला देतात. ह्या वेळात एक बाटली औ शधी पाणी पिउन संपवा यचे असते. मग तिथेच एक रेडिओ अ‍ॅक्टिव्ह टॉयलेट आहे. तिथे जाउन मग स्कॅनच्या तिथे जायचे अशी प्रोसिजर आहे.

आमच्या इथले रेडिओ अ‍ॅक्टिव्ह टॉयल्ट जरासे उंचावर आहे. दाराला एक हँड ल आहे बाकी आधाराला बार नाही. ते चढून जायला मला त्रास झाला. कोणी तरी एक हाताला आधार द्यायला हवे किंवा अजून एक बार हँडल हवे असे वाटले. हा अनुभव आल्याने रेल्वे ने जायचे वेडे धाडस
करायचे नाही असा साक्षात्कार झाला. जिथे हेल्दी लोक्स सुद्धा धडपडतात व इंजरी होउ शकते तेव्हा अपघातही होउ शकतो.

स्वतःवर अवाजवी आत्मविश्वास दाखवुन पेशंट ने अशी वेडी साहसे करु नयेत. जिथे असिस्टन्स हवा आहे तिथे मागावा. मी अमॅझॉन वर एक चालायची काठी मागवुन ठेवलेली आहे नेक्स्ट टाइम काठी घेउन जाईन. काठी नं घोंग डं घेउ द्या किरं मला बी पेट् स्कॅन ला येउद्या की रं करत जाईन. इथे केंद्रा त आत फार मरणाची संधी असल्या सारखे गार एसी करुन ठेवतात व तुमची अशक्त शरीर असल्या ने जात्याचीच उब कमी असते तेव्हा पेशंटला स्वेटर कान टोपी घेउन जावे अटेंडंट कडे ठेवावे . केंद्रातले लोक ब्लँकेट पण देतात. गरज असेल तिथे व्हीलचेअर असिस्टंस स्ट्रेचर सुविधा पण असते. यु जस्ट हॅव टु गेट इट डन. कारण ऑनको त्या शिवाय निर्णय घेउ शकत नाही.

कमाल म्हणजे माझा ऑनको जो प्रचंड उच्चशिक्षित व अनुभवी मोठा आहे तो पण आता मला म्याडम म्हणू लागला आहे . एम ओ सी स्टाफ एकदम भारी आहे. तुमचे नशीब किती चांगले हे लोक तुम्हाला असिस्ट करायला आहेत.

**काठी नं घोंग डं घेउ द्या किरं मला बी पेट् स्कॅन ला येउद्या की रं करत जाईन. **
>>>
वा ! हे झक्कास Happy
अशीच जिद्द हवी . . . आगे बढो !!

Hi I have a playlist which I play while returning from collecting reports and onco visit.

अमा, दंडवत __/\__
खूप पॉझिटिव्ह आहात, तुमचा त्रास लवकर लवकर कमी होवो आणि मनासारखं घर तुम्हाला मिळो (बेगम धागा) यासाठी शुभेच्छा.

काठी नं घोंग डं घेउ द्या किरं मला बी पेट् स्कॅन ला येउद्या की रं करत जाईन... हे जाम आवडलं!!!

इथे केंद्रा त आत फार मरणाची संधी असल्या सारखे गार एसी करुन ठेवतात....
ते मशीन्ससाठी असेल.

**काठी नं घोंग डं घेउ द्या किरं मला बी पेट् स्कॅन ला येउद्या की रं करत जाईन. **
>>>
वा ! हे झक्कास Happy
अशीच जिद्द हवी . . . आगे बढो !!>>> +१
अमा! तुम्ही मुळातच खुप पॉझिटिव्हलीच बघता सगळ्याकडे त्यामुळे नक्की यातुन लवकर बाहेर याल.

स्तनांचा कर्करोग : भारतीय सामाजिक वास्तव

स्तनांचा कर्करोग झालेल्या भारतीय महिलांचा प्रवास इतका बिकट का आहे?
https://www.aksharnama.com/client/article_detail/7296

. . . स्तनाच्या कर्करोगामध्ये, स्त्रियांनी स्वत:च तपासणी केल्यास लवकर निदान करणं शक्य आहे, परंतु बहुतांश ग्रामीण भारतातील महिलांना ही तपासणी कशी करायची हेच माहीत नसतं. २०१८मध्ये महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातील १००० ग्रामीण भागातील महिलांमध्ये केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, एक तृतीयांश महिलांना स्तनाच्या कर्करोगाबाबत काहीच माहीत नाही, तर ग्रामीण आणि निम-शहरी भागातील ९० टक्क्यांहून अधिक महिलांना स्तनाची स्व-तपासणी कशी करावी, हे माहीत नव्हतं. . .

एक तृतीयांश महिलांना स्तनाच्या कर्करोगाबाबत काहीच माहीत नाही, तर ग्रामीण आणि निम-शहरी भागातील ९० टक्क्यांहून अधिक महिलांना स्तनाची स्व-तपासणी कशी करावी, हे माहीत नव्हतं. . .>> मला ही माहिती देण्या साठी युट्युब चॅनेल उघडायचे होते. उघडू का? माझ्याकडे माहिती आहे. खूप वाचून काढले आहे.

अशक्त पणा मुळे काही उचलता येत नाही. लगेच धडधडायला लागते. ती परिस्थिती सुधारायला लेकीने वेट्स आणलेले आहेत काल ते उघडले तर त्यात मिलिंद सोमणाचा फोटो निघाला . त्याची लेव्हल काय मी कुठे!!! पण काल पासुन घरगुती वेट ट्रेनिन्ग चालू केले आहे.
नाहीतर मला लॅपटोप उचला यला पण जड जातो. मोठे क्विल्ट उचलताच दम लागतो.

बाकी ट्रीटमेंट चालू आहे. एक आ ठवडा ब्रेक घेउन मग फॉलो अप साठी अपॉइन्ट मेंट घेइन. क्रिएट सध्या १.४ आहे. हिमोग्लोबिन कमीच आहे पण इंजेक्षन घेतले आहे. आयर्न चे.

*क्रिएट सध्या १.४ आहे >>> एकंदरीत ठीक म्हणायचे.
झेपेल एवढा हलका व्यायाम करत रहा
शुभेच्छा !

या कर्करोगासह अन्य काही कर्करोगांवर वापरल्या जाणाऱ्या काही महाग औषधांवरील सीमा शुल्क (दहा टक्के) भारतात माफ केलेले आहे.
आता प्रत्यक्षात औषधे किती स्वस्त होतात ते पाहायचे.

https://indianexpress.com/article/explained/explained-health/government-...

These drugs are verrery expensive already. 1 lakh or so for 1.6 ml!!!

Hi good news. My body weight is up at 50.7!!! I hope I am not a burden on my daughter while house shifting. I should be able to guide the shifting fellows and offload our saman there. Set up at least the kitchen. Itni shakti hame Dena data.

Pages