स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

Submitted by कुमार१ on 25 June, 2023 - 20:29

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :

धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.

up-arrow-.pngसर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.

• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.

अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्रजनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
down aarow.pngधोका कमी करणारे घटक

• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,

गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
ca breast aware pic.png
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/

3. Lancet. 2002;360(9328):187-195.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप दिवसांपासुन हा प्रश्न मनात आहे.
पेशी वात्रट पना करत आहेत.
त्या मनाला येईल तशा वागत आहेत हे त्याचं वेळेस समजावे असे तंत्र विकसित होत आहे का?
प्रत्यक्ष कॅन्सर ला सुरुवात आणि तो detect होण्याची स्थिती ह्या मध्ये खूप वर्षाचा काळ जातो.
आणि त्या मुळे उपचार करण्यास पण अडथळे निर्माण होतात.
अगदी एक पेशी नी जरी वात्रटपणा केला तर तो detect होवू शकतो का?
अगदी स्तन च कॅन्सर पण जो पर्यंत गाठ निर्माण होत नाही तो पर्यंत संशय पण येत नाही.
पण कॅन्सर ची सुरुवात होवून गाठ निर्माण होण्यास पण खूप वर्ष जात असावीत.
हे खरे आहे का?

पेशी नी जरी वात्रटपणा केला तर तो detect होवू शकतो का? >>>
चांगला प्रश्न आहे.

सुरुवातीस पूर्णपणे निरोगी पेशी काही प्रमाणात बिघडू लागतात. त्यानंतर या पेशींचे कर्करोग पेशीमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते.
थोडक्यात, ही जी बिघाडाची स्थिती आहे त्याला शून्य स्थितीतील कर्करोग असे म्हणता येईल.

स्तनांच्या बाबतीत डिजिटल मॅमोग्राफी या चाळणी चाचणीने ही अवस्था लक्षात येते.

कॅन्सर बरा झाला असे डॉक्टर सांगतात त्याचा अर्थ काय?
मलेरिया बरा झाला, टीबी बरा झाला, appendix बरा झाला इत्यादी .
ह्याचा अर्थ हे रोग पूर्णतः शरीरातून बरे झाले ले असतात.
पण कॅन्सर बरा झाला,तुम्ही कॅन्सर मुक्त झालात ह्याचा अर्थ वैधकीय भाषेत काय आहे?
पेशी अनियंत्रित होतात म्हणजे कॅन्सर.
मग उपाय काय असतात.
१) अनियंत्रित पेशी नष्ट करणे.
२) की नियंत्रण का सुटले त्या वर उपचार करणे.
१ नंबर प्रमाणे उपचार करण्याचा हेतू असेल तर धोका कायम आहे असा त्याचा अर्थ आहे.
ह्या वर थोडे मत व्यक्त करावे

कर्करोग बरा होणे याची व्याख्या वाटते तितकी सोपी नाही.

सोप्या शब्दात : रुग्णाची सर्व लक्षणे व त्रास नाहीसे होणे.
( प्रत्येक कर्करोग मॉलेक्युलर पातळीवर नष्ट होईलच असे नाही)

आंतरराष्ट्रीय औपचारिक व्याख्या अशी गुंतागुंतीची आहे :
A cancer patient can be defined as “cured” only when his or her life expectancy is the same as that of a sex- and age-matched general population.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4324351/

हेमंत
या लेखाची चौकट आपण ठरवून घेतलेली आहे : कारणमीमांसा
उपचार यासंबंधी इथे कोणतीही उपचर्चा नको. धन्यवाद !

नेहमीप्रमाणे एक चांगला लेख.
तुमचे सगळेच लेख माहीतीपूर्ण असतात. भाषा संयमित असते. प्लीज लिखाण चालू ठेवा, ही नम्र विनंती. >>>>>> +१.

कुमारासरांचे विविध लेख माहितीपूर्ण असूनही क्लिष्ट नसतात.एक प्रकारची सकारात्मकता लेख आणि सरांच्या प्रतिसादांतून जाणवते.

>>>>>Correlation does not imply causation.
प्रचंड मस्त मुद्दा उबो. धन्यवाद.

लेख चांगला व माहितीपूर्ण आहे. प्रतिसादही माहितीपूर्ण. मला चिन्मयीचाच प्रश्न पडला होता. उत्तर मिळाले. इथले नकारात्मक प्रतिसाद आवडले नाहीत. विश्वासार्ह माहितीचे रिसोर्सेस प्रत्येकाला उपलब्ध असतीलच असं नाही, त्यामुळे सोप्या, शास्त्रशुद्ध पद्धतीने मराठी भाषेत लिहिलेलं असं लेखन सर्वांपर्यंत पोचायला हवं. स्त्रिया स्वतःची काळजी घेण्याबाबत अत्यंत उदासीन असतात पण हे वाचून जर कुणी सुरुवात करत असेल किंवा कुणाला त्याचं महत्त्व पटत असेल तर मी तरी असे लेखन आवश्यकच म्हणेन. असो.

मी आयुष्यातला पहिला मॅमोग्राम नुकताच केला. फार काही त्रासदायक नाही. ह्याला रेग्युलर ब्लड वर्क सारखं समजायचं. आमच्याकडे Women's Imaging Center आहेत खास ह्यासाठी, जिथं appointment घ्यायची सुद्धा गरज नाही. एकदम सुटसुटीत. ते तुमच्या ObGyn ला रिपोर्ट पाठवून पुढच्या वर्षीची वेळ देऊन टाकतात. इथे चाळीस पूर्ण झाल्यानंतर दर वर्षी करायला सांगतात, आनुवंशिकता असेल तर तीस नंतर दरवर्षी. माझी आजी आणि आजीची बहिण वेगवेगळ्या कर्करोगाने गेल्या आहेत. आजी तर तिशीतच पुरेसे निदान व्हायच्या आतच तान्हे मुलं टाकून गेली. पुढेमागे जेनेटिक testing करून घ्यायचा माझा विचार आहे.

* एक प्रकारची सकारात्मकता >>> होय, नेहमीच हा प्रयत्न असतो. धन्स .
..

* मी आयुष्यातला पहिला मॅमोग्राम नुकताच केला. फार काही त्रासदायक नाही. >>
छान !
असा कृतीशील प्रतिसाद इच्छुकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतो.

>>>>फार काही त्रासदायक नाही.
अवांतर -
डीपेन्डस ग. काही नर्सेस भयानक चेमटवुन टाकतात Sad प्रचंड दुखतं. त्यात जर ब्रेस्ट पिरीअडसमुळे, सोअर असेल तर अक्षरक्षः यु स्क्रीम!!
फार त्रास न होण्याचा व भयंकर त्रास होण्याचा दोन्ही अनुभव आहे.

अवांतर समाप्त. इत्यलम.

नेहमप्रमाणे माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. डॉ कुमार, नकारात्मक प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा. प्रत्युत्तर देण्याची देखील आवश्यकता नाही.

गुगल वर सगळी माहिती असते पण scattered असते. अनेक लिंक्स उघडव्या लागतात. (शिवाय जाहिरातींचे अडथळे पार करावे लागतात.) इथे आवश्यक ती माहिती एकाच लेखात मिळते आहे. शिवाय सगळ्या शंकांचं निरसन प्रत्यक्ष डॉक्टर लगेचच करताहेत. गुगल लिंक्स वाचताना एखादा प्रश्न पडला तर कोण शंका निरसन करणार आहे?
डॉक्टर तुम्ही लिहीत रहा. तुमचे फक्त आरोग्यविषयक नाही तर इतरही विविध विषयांवरचे लेख interesting असतात.

मी देखील गेल्या वर्षभरात mammography केली. फार काही त्रासदायक नव्हती. आणि मनात निर्माण झालेल्या शंकेपुढे तो त्रास कळलाच नाही. शंका दुर होण्यासाठी त्याची आवश्यकता होती.
Finding was harmonal changes and high dense breast tissue. त्यामुळे परत परत mammography करावी लागणार आहे.

मीरा धन्यवाद.
mammography केली. फार काही त्रासदायक नव्हती. आणि मनात निर्माण झालेल्या शंकेपुढे तो त्रास कळलाच नाही.
>>>
अशी आरोग्यजागृती पाहून मनापासून आनंद झालाय. सर्व इच्छुकाना यातून प्रेरणा मिळो.
...
स्वतःच्या मॅमोग्राफी तपासणीचा अनुभव इथे लिहिणाऱ्या सर्वांना धन्यवाद !

चर्चेदरम्यान एक-दोन मतभेद झाले म्हणून लेखन थांबवण्याचा कोणताही विचार नाही>> अतिशय प्रगल्भ विचार doc
तुमचे लेख नेहमीच खूप आवडतात

खूप उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख.
बऱ्याच गोष्टी माहीती म्हणून विस्कळीत स्वरूपात वाचलेल्या असल्या की त्याचा विसर पडतो. पण कोणी असं विषयवार, मुद्देसूद सांगितलं की ते लक्षात राहतं. तसं झालं..

अनुभवी व्यक्तींचे प्रतिसादही बोलके आणि माहितीचं गांभीर्य पटवून देणारे आहेत.
धन्यवाद!

>>>>शहरी भागात दर १ लाखांमागे २० जणांना हा कर्करोग,
ग्रामीण : १ लाखांमागे फक्त ६ जणांना>>>> चांगली माहिती.
>>अनुभवी व्यक्तींचे प्रतिसादही बोलके आणि माहितीचं गांभीर्य पटवून देणारे आहेत>>> +९९

लेख आणि प्रतिसाद वाचले. नेहमीप्रमाणेच उप्योगी माहिती चांगल्या पद्धतीने मांडली आहे.
ग्रामीण भागात कर्करोगाचं प्रमाण कमी असण्याचं एक कारण तिथे आरोग्यविषयक जाणिवा कमी असणं, तपासण्या न होणं हेही असू शकेल ना?

>>>>>ग्रामीण भागात कर्करोगाचं प्रमाण कमी असण्याचं एक कारण तिथे आरोग्यविषयक जाणिवा कमी असणं, तपासण्या न होणं हेही असू शकेल ना?
काउंटर इन्ट्युइटिव्ह आहे पण योग्य मुद्दा आहे खरा.

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्रायंबद्दल आभार !
..

प्रमाण कमी असण्याचं एक कारण तिथे आरोग्यविषयक जाणिवा कमी असणं, तपासण्या न होणं हेही असू शकेल ना? >>>

चांगला प्रश्न. वरवर पाहता जरी तसे वाटले तरी संशोधन काही वेगळे सांगते. ग्रामीण स्त्रियांच्या बाबतीत आरोग्य सुविधा आणि जागरूकता कमी असल्यामुळे तिथल्या स्त्रियांच्या कर्करोगाचे निदान उशिराच्या अवस्थेत होते हा महत्त्वाचा मुद्दा.

परंतु याहून महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रतिसादात घेतो...

भारतातील शहरी आणि ग्रामीण भागात होणाऱ्या कर्करोगाच्या प्रमाणातील (incidence) फरक असण्यामागे खालील कारणे आहेत :
१. आयुष्याची पहिली २० वर्षे ग्रामीण भागात गेली असल्यास त्याचा उत्तम फायदा मिळतो. तिथल्या शारीरिक श्रमांच्या जीवनशैलीमुळे मुलीचे प्रथम पाळी येण्याचे वय लांबते.

२. मोठ्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण बरेच कमी आहे ( ग्रामीण 8.6% विरुद्ध शहरी 29% )

३. पहिल्या गरोदरपणांतील वय, एकूण अपत्य संख्या ( सरासरी ग्रामीण ३ विरुद्ध शहरी २) आणि भरपूर स्तन्यपान ही देखील महत्त्वाची कारणे आहेत.

https://www.researchgate.net/publication/269466576_Rural_urban_differenc...

नाही, भरत. हा मुद्दा ट्रिकी आहे.
बहुतेक शोधनिबंध असे म्हणतात,

“तपासण्या कमी होत असल्यामुळे रोग उशिराच्या स्टेजला लक्षात येतोय”.

“तिथे तपासण्या कमी होतात म्हणून इन्सिडन्स कमी आहे” (किंवा 'ते' 'एक' कारण आहे") असे विधान कुठे मिळत नाही.

इन्सिडन्स कमी असण्याची कारणे मी वरती दिली आहेत तीच दिलीत.

म्हणून,
वरती हेमंत यांनी वापरलेली म्हण मार्मिक आणि बरोबर आहे.

>>>>>>>कोंबड झाकले म्हणून सूर्य उदय होण्याचा राहत नाही.
कॅन्सर नी मृत्यू अशी नोंद तर होणारच ना?

हेमंत तुमचा मुद्दा लॉजिकल आहे परंतु, जर हयगयीमुळे, सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे, जर कॅन्सर डिटेक्टच झाला नाही व स्त्री दगावली तर तो डेटा पॉइन्टचह नाही मिळणार ना. आणि आपल्याला वाटेल की ग्रामीण भागात कॅन्सरचे प्रमण तुलनात्मक दृष्ट्या, अल्प आहे.

डॉक्टर फार छान लिहिता तुम्ही. इतका मोठा व्यापक विषयी किती सोपा सहज सुलभ करून समजावून सांगितला आहे. मला फार आवडले.

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्रायांबद्दल आभार !
...
सामो,
नुसता तर्क नाही तो.
एक उदा. घेऊ.
समजा,
२०२१ मध्ये एका बुद्रुकात १० जणीना रोग ‘आहे’.
पण तपासणी फक्त ५ नीच केली. म्हणून नोंद = ५ रोगी

आता .. २०२२ मध्ये बाकीच्या ५ चा रोग थेट स्टेज-२ ला पोचतो. >>> वरुन दिसतो.
मग त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले जाते व निदान होतेच.

म्हणजेच, एकूण १० रोगी हा आकडा ओळखला जातोच; फक्त ५ आधी समजले + ५ उशीराने.
..
मी चुकत असल्यास कोणीही सांगा.

रोहिणी,
खूप दिवसांनी दिसलात तुम्ही !
तुम्हाला चर्चेत काही भर घालायची असली तर जरूर घाला.
स्वागत !

Dr जरा वेगळा आणि असामान्य प्रश्न विचारता आहे.
पुरुषांना पण अविकसित स्तन असतात.
मग पुरुषानं पण स्तन कॅन्सर झाल्याचे उदाहरण आहे का?

पुरुषाना पण स्तन कॅन्सर झाल्याचे उदाहरण आहे का?
>>>
पुन्हा एक चांगला प्रश्न.

होय, पुरुषांच्या स्तन कर्करोगाची वैशिष्ट्ये अशी :
१. समाजातील एकूण स्तन कर्करोगापैकी १ टक्क्यापेक्षा कमी रुग्ण हे पुरुष असतात.

२. 2012 ते 16 च्या दरम्यान दर एक लाख पुरुषांमागे १.२ जणांना कर्करोग झाला ( पाश्चात्त्य विदा )

३. 51 टक्के रुग्णात रोग पसरलेल्या स्थितीत आढळला (मुळात याची जागृतीच कमी असते)

४. पुरुषांमध्ये या रोगाचे धोका वाढवणारे बरेचसे घटक- विशेषता जनुकीय, कौटुंबिक- स्त्रियांप्रमाणेच आहेत.
परंतु,
धूम्रपान, मद्यपान आणि बैठ्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये या रोगाचा धोका वाढत नाही, हे रोचक !
https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

पुरुषांच्या बाबतीत संपूर्ण देशाचा भारतीय विदा सहज मिळत नाही.

एखाद्या विशिष्ट संस्थेत झालेल्या संशोधनाचे निबंध उपलब्ध आहेत ( 24 वर्षात 32 रुग्ण वगैरे)

सारांश : तो दुर्मिळ आहे

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4809860/#:~:text=Breast%20c....
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/23238143/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/19584580/

Pages