जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.
या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?
या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.
(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).
धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.
हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.
2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.
या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :
धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)
<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)
धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.
ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.
सर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)
मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.
• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.
• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड
साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.
• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे
• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे
• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर
• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर
• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे
हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.
वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.
कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.
२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.
हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.
२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.
मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास
स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.
यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.
स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.
• शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.
याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.
शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.
२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.
मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.
अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.
कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.
केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)
शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्र व जनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.
वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
धोका कमी करणारे घटक
• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.
• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे
• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).
• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली
• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..
बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :
ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.
प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.
गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….
वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597
तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.
तमाम स्त्री वाचकांनो,
गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !
बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...
2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/
3. Lancet. 2002;360(9328):187-195.
कदाचित या कारणामुळे खेड्यात
कदाचित या कारणामुळे खेड्यात स्त्रियांच्या स्तन कर्क रोगाचे प्रमाण खूपच कमी असावे. >> ह्याला काही विदा पुरावा आहे का? सात वर्शाच्या मुलांना दूध अंगावर पाजणे हेल्दी नाही . मुलासाठी सुद्धा. पुढची वाक्ये डिलीट केली तरी चालेल.
माझी बहिण ब्रेस्ट कॅन्सरने दोन वर्षांपुर्वी गेली.>> श्रद्धांजली काही केस डिटेल्स असले तर जरूर शेअर करा.
पुरावा आहे तर ! हा घ्या इथे
पुरावा आहे तर ! हा घ्या इथे :
Collaborative Group on Hormonal Factors in Breast Cancer.
Breast cancer and breastfeeding: collaborative reanalysis of
individual data from 47 epidemiological studies in 30 countries,
including 50302 women with breast cancer and 96973 women
without the disease. Lancet. 2002;360(9328):187-195.
स्तन्यपानाने हा धोका कमी होतो या संदर्भात 30 देशांमध्ये मिळून 47 संशोधने झालीत.
सारांश निष्कर्ष :
दर बारा महिन्यांच्या स्तन्यपानामागे रोगाचा धोका 4 टक्क्यांनी कमी होतो. हा प्रतिबंधात्मक फायदा जास्ती करून ट्रिपल निगेटिव्ह कर्करोगाला लागू आहे
अर्थात, स्तन्यपान बाळाच्या दीड वर्षाच्या वयानंतर पुढे थांबवावे.
( सात वर्षे वगैरे अतिशयोक्ती म्हणून सोडून देऊ).
शहरी हवामान, जास्त बाहेरच्या
शहरी हवामान, जास्त बाहेरच्या खाण्याचे किंवा इन्स्टंट मिक्स चे प्रमाण, प्लॅस्टिक चा खाद्यपदार्थ घ्यायला वापर(प्लास्टिक कप मध्ये चहा/बाहेरच्या अन्नाचे कंटेनर्स) हेही कारण असेल.शिवाय ऑक्सीटोसीन इंजेक्शन घेतलेल्या गाईंचे दूध.
सात वर्शाच्या मुलांना दूध
.
( सात वर्षे वगैरे अतिशयोक्ती
.
अतिशयोक्ती >>> या म्हणण्याचा
उपचर्चा संपादित.
पण हे आरोग्य शिफारसीना धरून
.
धोकादायक ऐवजी आरोग्यावर
धोकादायक ऐवजी आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारे हे योग्य भाषांतर ठरावे. १.५ वर्षाच्या मुलाला साधारण समज आलेली असते. मेंदू चे कार्य (पक्षी आजुबाजुला काय आहे ते जाणून घेण्याचे कुतुहल) जोमात सुरू असते. ते नीट करता यावे म्हणून वाढीचा वेग आणि पर्यायाने चयापचय क्रियेचा वेग पहिल्या वर्ष पुर्ण करेपर्यंत जितका असतो त्याच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात मंदावतो. स्तनपान हे आतापर्यंत च्या अनुभवातुन सुखद संवेदना जागृत करणारी क्रिया आहे हे लक्षात आल्यामुळे मुलं स्तनपानाचा हट्ट धरु शकते. अशा परिस्थितीत जेवणाऐवजी किमान काही वेळा उष्मांकांची गरज स्तनपानातुन भागवल्या ने बालकांमध्ये प्रामुख्याने लोहाची कमतरता होऊ शकते. काही बाळे बाटलीच्या दुधाचा हट्ट करतात कारण ते सोपे (चावायचे कष्ट नाहीत) , चव आवडणारे आणि पटकन प्यायले जाणारे असते. त्यांच्यातही लोहाची कमतरता होऊ शकते. हा बालकांसाठी दुष्परिणाम.
मातेच्या शरिरातील प्रामुख्याने कॅल्शियम (त्याचबरोबर इतर अनेक जीवनसत्त्वे आणि क्षार ही) दुध निर्मितीत वापरले जाते. त्यामुळे स्तनपान हे मर्यादेपेक्षा जास्त काळासाठी केल्यास मातेच्या शरीरात कॅल्शियम ची कमतरता होऊ शकते. ह्या शिवाय स्तनपान सुरू असेल तोवर हाॅर्मोन चे संतुलन पुर्ववत होणे लांबु शकते. हा मातेच्या शरिरावर होणारा दुष्परिणाम.
+1
उपचर्चा संपादित.
कॅल्शिअम ची कमतरता व डि
कॅल्शिअम ची कमतरता व डि व्हिटामिन ची कमतरता हे दोन ब्रेस्ट केन्सरचे मेजर इंडिकेटर आहेत. हे जर डिटेक्ट झाले तर पुढे जाउन बी सी होउ शकतो. मी २०१६ मध्ये होल बोडी चेकप केला होता. त्यात वीक बोन्स ( केल्शिअम ची कमतरता ) व डी व्हिटामिन डे फिशिअन्सी हे डिटेक्ट झालेले. पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. पूर्ण देश काही ना काही डेफिशिअन्सी घेउनच जगत असतो त्यात काय एवढे. असा विचार होता. आपण किती कॅजुअल असतो. ट्युम र हाताला लागायच्या आधी पासुनही तो वाढतच असतो आत दोन तीन वर्शे.
आता आईच्या दृष्टिकोनातून.
आता आईच्या दृष्टिकोनातून.
प्रदीर्घकाळ स्तन्यपान चालू ठेवल्यास बिजाडांमधून AMH या हार्मोनची निर्मिती वाढते. याची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास दीर्घकालीन आयुष्यावर काही परिणाम दिसू शकतात, जसे की ऋतुसमाप्तीचे वय लांबणे.
या लेखात आपण कर्करोगासाठी पोषक असलेले घटक पाहिले आहेत. त्यामध्ये पन्नाशीनंतरची ऋतूसमाप्ती ही देखील आहे. त्या दृष्टीने मातेकडूनही ही प्रक्रिया वर उल्लेखलेल्या वेळात थांबल्यास चांगले, जेणेकरून तिचे नियमित ऋतुचक्र आणि संबंधित आरोग्य चांगले राहते.
तीन- चार- पाच या वयात त्याने
.
शहरात जन्मलेल्या व शहरातच
प्रकाटा
मुख्य प्रश्न हा यात आरोग्याला
मुख्य प्रश्न हा यात आरोग्याला हानीकारक किती?
>>>
याचे शास्त्रीय उत्तर मी वरील दोन प्रतिसादांमधून दिलेले आहे. तसेच अन्य वाचकांनीही त्यात भर घातली आहे. हे शंकानिरसन झाले असेल असे समजतो.
प्रस्तुत लेखाच्या संदर्भात आपल्याला आईचे आरोग्य आणि तिला कर्करोग होण्याचा धोका यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून वर मी एका वेगळ्या हार्मोनची माहिती दिली आहे.
याचे शास्त्रीय उत्तर मी वरील
.
कुमार सर हे सारे इथे
कुमार सर हे सारे इथे अवांतरात्मक नाहीये का? बिहेव्हिअरल इश्युज & सो ऑन & सो फोर्थ. तुम्ही सिलेक्टिव्हली स्नॅप करता का - की या धाग्यावर अमका अमका मुद्दा नाही?
कारण ब्रेसिअर्स फार घट्ट असल्याने मसल्स अॅन्ट्रॉपी होते हे मी सांगताच पुढील क्षणी तुम्ही हा धाग्याचा विषय नाही म्हणुन चाप लावलात आणि सोशल बिहेव्हिअर वगैरे बायफर्केशन तुम्हाला चालत?
की तुम्ही आय डीज पाहून स्नॅप करता? मी कधी अवांतर केलेले आहे , इन फॅक्ट कोणत्याही धाग्यावर असे माझ्या तरी स्मरणात नाही. असो.
धाग्याच्या 3 अवांतर
धाग्याच्या 3 अवांतर प्रतिसादांबद्दल माझ्याकडून माफी.
खरंच उपयोगी माहिती वाले धागे जितक्या कमी विषयांतरात शिरतील तितकं नंतर पटापट वाचून शोधायला उपयोगी पडतं.
(तिन्ही ची प्रतिसाद मुदत गेलीय, त्यामुळे वराती मागून घोडं )
हा धाग्याचा विषय नाही म्हणुन
हा धाग्याचा विषय नाही म्हणुन चाप लावलात >>>> गैरसमज होतोय.
माझा प्रतिसाद बघा. तुमच्या स्नायूंच्या मुद्द्याला मी समर्थनच दिले आहे . फक्त त्याचा कर्करोगाशी संबंध नाही एवढेच मी म्हटले :
"अति घट्ट ब्रा घातल्याने त्वचा आणि स्नायूंचे काही प्रश्न कालांतराने निर्माण होऊ शकतील;
Submitted by कुमार१ on 26 June, 2023 - 17:35"
..
स्तन्यपानाचा कर्करोगाशी थेट संबंध असल्यामुळे इथे यावर चर्चा झाली. अर्थात त्यातल्या काही मुद्द्यांची उपचर्चा जरा जास्तच झाली हे बरोबर. माझ्याकडून मी शास्त्रीय मुद्द्यांची उत्तरे देऊन ती थांबवलेली आहे.
(आता यापुढे 'स्तन्यपान किती काळ चालू ठेवायचे वगैरे प्रश्नांची उत्तरे मी देणार नाही).
धन्यवाद !
मी पण प्रतिसाद एडिट केले आहेत
मी पण प्रतिसाद एडिट केले आहेत. अवांतरा बद्दल क्षमस्व.
वरील दहा-बारा प्रतिसादांना
वरील दहा-बारा प्रतिसादांना संपादन मुदत अजून आहे. सर्वांच्या मते जर त्यातील अवांतर भाग काढून टाकायचा असेल तर जरूर काढावा.
प्रत्येकाने स्वतःच्या प्रतिसादापुरता आपल्या मतानुसार निर्णय घ्यावा.
रच्याकने,
https://www.maayboli.com/node/78569?page=2 इथली चर्चा पाहा
" उपचर्चा नको" असे म्हटले तर अन्य कोणाला पटत नाही.
धागाकर्त्याच्या दृष्टीने ही तारेवरची कसरत ठरते आहे.
एक प्रश्न:
एक प्रश्न:
मॅमोग्राफी करावीच हे माहीत आहे.पण एक दोन वेळा अन्युअल चेकप ला गेले होते तेव्हा तिथल्या डॉ म्हणाल्या की ब्रेस्ट सोनोग्राफी करा, त्यात काही आक्षेपार्ह आढळलं तरच पुढे जाऊन मॅमो करा (म्हणजे कोव्हीड रॅपिड अँटीजेन आणि rtpcr सारखं.)
कारण त्यांच्या मते बरेचदा दाट टिश्यू असल्यास मॅमो पण पूर्ण कंकल्यूजिव्ह नसेल 45 वय आधी.आणि मग उगीच मॅमो च्या वेदना आणि रेडिएशन.
या समजुतीत गैरसमज असल्यास अवश्य स्पष्ट करा.
डॉ, प्रथम दर्जाचा रुग्ण
डॉ, प्रथम दर्जाचा रुग्ण म्हणजे काय ?
कुमार सर धन्यवाद आणि सॉरी
कुमार सर धन्यवाद आणि सॉरी अबाऊट माय टँट्रम!!! आपले लेख फार उपयुक्त असतात. प्लीज लिहीत रहा. अशीच माहीतीची देवाण्घेवाण होवो.
Lab people will advice on
Lab people will advice on sono mammo only
अनु,
अनु,
sono/ mammo ही प्रतिमातंत्रे असून माझा त्यांचा अभ्यास नाही त्यामुळे निव्वळ गुगलून मी उत्तर देत नाही. लेखामध्ये मी एक मुद्दा सुरुवातीस मुद्दाम स्पष्ट केला आहे :
"या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?" .. .. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी. ..
..
विविध प्रतिमा तंत्रे आणि उपचार हे मुद्दे चर्चेत उपस्थित होऊ शकतात त्याची मला चांगलीच कल्पना होती म्हणून मी हे मुद्दाम लिहिले.
रोगाची कारणमीमांसा हा माझ्या अखत्यारीतला विषय आहे. त्यावर आपण हवे तेवढे बोलू
कॅन्सरमध्ये आनुवंशिकतेचा
कॅन्सरमध्ये आनुवंशिकतेचा मुद्दा आहे. पण त्याच प्रकारचा कॅन्सर पुढच्या पिढीला होऊ शकतो की वेगळ्या प्रकारचा? ब्रेस्ट कॅन्सरच्या दोन पेशंट बघितल्यात मी. एक अगदी तिशीच्या आतली आणि दुसरी ६० च्या पुढची. एकीच्या कुटुंबात आतड्याच्या कॅन्सरची हिस्ट्री होती आणि दुसरीच्या कुटुंबात आधी कुणाला कॅन्सर झाला नाही.
स्वा सु
स्वा सु
, प्रथम दर्जाचा "रुग्ण" ??
तुम्हाला नातेवाईक म्हणायचे असावे !
प्रथम दर्जाचे नातेवाईक :
समजा मीना ही स्त्री आहे.
तर तिचे आई व वडील, सख्खे बहीण व भाऊ आणि तिची मुले हे झाले प्रथम दर्जाचे.
( इथे कुटुंबीय म्हणणे अधिक योग्य राहील)
चिन्मयी,
चिन्मयी,
चांगला प्रश्न. आनुवंशिकतेनुसार फक्त तोच कर्करोग संक्रमित होतो असे नाही.
या संदर्भात काही कर्करोगांचा गट एकत्रित असतो. उदाहरणार्थ,
समजा मीनाला स्तनाचा कर्करोग आहे.
तर भविष्यात तिच्या मुलीला,
स्तनांचा, बीजांडांचा किंवा स्वादुपिंडाचाही कर्करोग होऊ शकतो.
लेखात हे दिलय बघा :
सर्वाधिक धोकादायक :
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
हो डॉ, नातेवाईक म्हणायचे होते
हो डॉ, नातेवाईक म्हणायचे होते.
धन्यवाद...
आजार, विकार, वैद्यकीय गुंतागुंत यासारख्या धडकी भरवणाऱ्या विषयावरचे असले तरी तुमचे लेखन नेहमीच सकारात्मक आणि दिलासादायक असते. धन्यवाद!
दोन्ही प्रतिमा तंत्रे असली
दोन्ही प्रतिमा तंत्रे असली तरी मॅमो बऱ्याच जणांना भीतीदायक वाटते, ब्रेस्ट थेट विनझिप च्या चिमट्या सारखे दाबले जातात.म्हणजे मॅमो जरा जास्त इन्व्हेजिव्ह आहे.
(पण तुमच्या मुद्द्याबद्दल ओके.)
Pages