स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

Submitted by कुमार१ on 25 June, 2023 - 20:29

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :

धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.

up-arrow-.pngसर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.

• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.

अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्रजनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
down aarow.pngधोका कमी करणारे घटक

• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,

गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
ca breast aware pic.png
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/

3. Lancet. 2002;360(9328):187-195.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कर्करोगाचे विविध चाचण्यानुसार अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये स्त्री हार्मोन्सना संवेदनशील असणारे आणि एक विशिष्ट प्रकारचा जनुकीय बिघाड नसणारे कर्करोग हे रुग्णाच्या दृष्टीने चांगले ठरतात. त्या रुग्णांचे भवितव्य सर्वसाधारणपणे चांगले असते.

त्याचबरोबर लवकरात लवकर (जमल्यास शून्य अवस्थेत) निदान आणि योग्य ते उपचार या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच.

जागतिक कर्करोग अहवाल 2023 : ठळक नोंदी

  1. 1990 ते 2019 या दीर्घ कालावधीत वय ५० च्या आत होणाऱ्या कर्करोगांमध्ये 79 टक्के वाढ झालेली दिसते
  2. यापैकी बरेचसे कर्करोग पचनसंस्थेशी संबंधित असून त्यांचा व्यक्तीच्या लठ्ठपणाशी देखील संबंध आहे.
  3. अशा लवकर झालेल्या कर्करोगांपैकी स्तन, श्वसननलिका, फुफ्फुस, जठर आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगांच्या बाबतीत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
  4. विसाव्या शतकाच्या मध्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांना लहानपणापासूनच निकृष्ट व अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि अतिरिक्त वजनवाढ यांचा सामना करावा लागलेला आहे.
  5. आहारासंदर्भात लाल मांसाचा अतिरेक, फळांचा अभाव व सोडियमचा अतिरेक हे घातक.
  6. तंबाखू आणि मद्यपानांच्या व्यसनांमधील वाढ हे देखील धोका वाढवणारे महत्त्वाचे घटक.

https://bmjoncology.bmj.com/content/2/1/e000049

एका वैद्यकीय परिषदेतून नुकतीच समजलेली काही महत्त्वाची माहिती :
* 40 च्या आत होणाऱ्या स्तन कर्करोगाला यंग एज ब्रेस्ट कॅन्सर (YABC) असे अधिकृत नाव दिलेले आहे. याचे प्रमाण सर्वसाधारण खूप कमी असले तरी भारतात मात्र ते अलीकडे वाढतय ही चिंतेची बाब आहे. त्याची खालील कारणे संभवतात :

  • भारतीय लोकसंख्येतील तरुणांचे तुलनात्मक अधिक प्रमाण
  • शहरी स्त्रियांची उशिरा लग्न करण्याची प्रवृत्ती
  • पाश्चात्य जीवनशैलीकडे वाढता ओढा आणि
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाळणी चाचणी करण्याबाबत कमालीची उदासीनता

* या प्रकारच्या रोगाचे निदान तसे उशिरानेच होते. अशा सुमारे 80% घटनांमध्ये स्तनामध्ये बऱ्याच मोठ्या आकाराची गाठ किंवा गाठी होतात. हा रोग मुळातच अधिक प्रसारक व घातक (aggressive) असतो.

* या वयातील कर्करोगाचा सामना करताना गरोदरपणाचाही विचार करावा लागतो. काही प्रकारचे उपचार गरोदर झाल्यास रोखून ठेवावे लागतात.
* तसेच लैंगिक आयुष्यावरील परिणाम हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

https://openknowledge.fao.org/server/api/core/bitstreams/bf75d4cd-54ed-4...

रेफ पेज १५४. लिहतानाची भाषा जरी लिमिटेड एव्हिडन्स / एक्झाकट मेकॅनिझम / पॉसिबल कॉज अशी असली तरी , फॅट हा फॅक्टर बराच महत्वाचा वाटतो.

4.9.2 breast cancer
Breast cancer is the leading cause of death from cancer in females worldwide, esti-
mated to be responsible for almost 460 000 deaths in 2008. An estimated 1.38 million
women across the world were diagnosed with breast cancer in 2008, accounting for
23 percent of all cancers diagnosed in women. Determinants of breast cancer include
age; body fatness; reproductive factors and lactation, as well as age at menarche
and menopause; childbearing; exogenous and endogenous hormone concentrations
and metabolism; history of benign breast disease; exposure to radiation; alcohol
consumption; and family history of breast cancer (Key, Verkasalo and Banks, 2001;
Brekelmans, 2003; WCRF and AICR, 2008a).
The major hypotheses for why consumption of dairy products may increase
risk of breast cancer include the following: 1) high dietary total and saturated fat
intake;40 2) milk products may contain pesticides that may be carcinogenic; and
3) milk may contain growth factors, including IGF-1, which may promote breast
cancer cell growth (Moorman and Terry, 2004). However, some components in
dairy products, such as calcium, vitamin D, rumenic acid, butyric acid, branched
chain fatty acids and whey protein may protect against breast cancer (Moorman and
Terry, 2004; Parodi, 2005).

टेबल ४.५ पान न १५७ मध्ये माहिती दिली आहे. सॅच्युरेटेड फॅट्स चा संबंध कॅन्सर बरोबर अल्झायमर शी पण आहे.

वरील विषय वादग्रस्त आणि काहीसा घोळदार देखील झालेला दिसतो. इथे https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10120447/ अशा 18 संशोधनांचे महाविश्लेषण आहे.
त्याचे थोडक्यात निष्कर्ष :

  1. सर्वसाधारणपणे दुधाचे पदार्थ आणि या कर्करोगाच्या धोका यांचे नाते व्यस्त (inverse) आहे.
  2. परंतु अशा विविध पदार्थांमधल्या निरनिराळ्या घटकांचा परिणाम नीटसा समजलेला नाही
  3. तसेच किती प्रमाणात कोणता घटक सेवन केल्याने हा धोका वाढतो हे अजून स्पष्ट झालेले नाही(unknown).

.my haemoglobin is at 7.4 today. Should I get iron transfusion?

Iron infusion (information from Cleveland Clinic)

What iron level requires an iron infusion?
It depends on the reason you’re taking it. Different conditions require different iron levels. A healthcare provider may give you an IV iron infusion sooner for one condition than another.

पुरुषांचा स्तन कर्करोग दुर्मिळ असला तरी काही वंशांमध्ये त्याचे प्रमाण दुर्लक्षिता येण्याजोगे नाही. १७ ते २३ ऑक्टोबर हा आठवडा अमेरिकेत पुरुष स्तन कर्करोग जागरूकता आठवडा म्हणून पाळला जातो.

या निमित्ताने अमेरिकेतील एका वलयांकित व्यक्तीचा स्वानुभव आणि जागरूकतेचे कार्य :
https://www.healthline.com/health-news/beyonce-dad-mathew-knowles-breast...

अरे वा !
त्यांचे आणि तुम्हा कुटुंबीयांचेही अभिनंदन !..... +१.

non-invasive stage 0 breast cancer (called ductal carcinoma in situ [DCIS]) हा खरेच कर्करोग आहे का? Pre cancer सेल म्हणतात पण कर्करोगासाठी जी उपचार पद्धती आहे तिच करायला सांगतात. ते कितपत बरोबर आहे? या प्रकारावर overtreatment केली जाते असेही वाचण्यात आले आहे.

* [DCIS] >>
होय, हा मुळात कर्करोगआहे. (‘कर्करोगपूर्व’ नव्हे).
त्याची ही व्याख्या पहा :
World Health Organization defines the term DCIS as "a neoplastic proliferation of epithelial cells confined to the mammary ductal-lobular system.

यामध्ये त्या पेशींमध्ये गुणात्मक बदल ( atypia ) झालेले असतातच आणि या कर्करोगाची invasive होण्याकडे नैसर्गिक प्रवृत्ती असते; मात्र तसा तो होतोच असे नव्हे.

अशा रुग्णांच्या जनुकीय आणि अन्य काही चाचण्या करून उपचारांचे योग्य ते निर्णय घेतले जातात. उपचारांवरील अधिक भाष्य संबंधित विशेषतज्ञांनीच केलेले बरे.

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK567766/

दीर्घ काळ संपूर्ण रात्रभर कृत्रिम प्रकाशात वावरणे आणि स्तन-कर्करोगाचा वाढता धोका या विषयावर सुमारे वीस वर्षांपासून संशोधन चालू आहे. या दोन गोष्टींमध्ये बऱ्यापैकी संबंध (positive association) असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासात आढळले आहे. विशेषतः मासिक पाळी चालू असणारा वयोगट आणि इस्ट्रोजेनवर अवलंबून असलेल्या कर्करोगाच्या बाबतीत हा संबंध अधिक जवळचा (stronger risk) आहे.

रात्रीच्या प्रकाश प्रदूषणामुळे शरीरातील मेलाटोनीन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सच्या चयापचयावर विपरीत परिणाम होतात आणि शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते.

https://ij-healthgeographics.biomedcentral.com/articles/10.1186/s12942-0...

Pages