स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

Submitted by कुमार१ on 25 June, 2023 - 20:29

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :

धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.

up-arrow-.pngसर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.

• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.

अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्रजनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
down aarow.pngधोका कमी करणारे घटक

• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,

गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
ca breast aware pic.png
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/

3. Lancet. 2002;360(9328):187-195.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धूम्रपान, मद्यपान आणि बैठ्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये या रोगाचा धोका वाढत नाही, हे

पण ह्याच गोष्टी स्त्री मध्ये रिस्क फॅक्टर आहेत.
खरेच रोचक आहे

कुमार तुमचे लेख नेहमिच आवडलेत.हाही उत्तम लेख आहे, किचकट विषयाच सुलभिकरण करुन सान्गितल्याने सामान्या वाचकाला सुद्धा नीट कळतो.
कुठलिही हिस्त्री असो वा नसो ४० नतर दर पाच वर्शानी मॅमोग्रॅम करुन घ्यावा असा सल्ला मी नक्किच देईन, इथे तो इन्शुरन्स मधे कव्हर असतो, फिजियशन रेकमेन्ड करतात आठवण करुन देतात त्यामुळे जरा सोप आहे.इतर ठिकाणी स्त्रियानी पुढाकार घेवुन करुन घ्यावा.

फॅमिली डॉक्टर असतील तर अनेक प्रश्न सहज सोपे होतात.
अनेक टेस्ट ह्या डॉक्टर ची चिठ्ठी असेल तर च केल्या जातात.
किंवा नक्की काय टेस्ट करायचे आहे हे डॉक्टर च decide करतात.

ब्रेस्ट कॅन्सर विषयी सहज वाचले.
जगात ह्याचे प्रमाण विषम आहे.
प्रगत देशात जास्त आणि अप्रगत देशात कमी आहे.
जगतील दर जगाच्या लोसंख्येच्या प्रतेक लाख लोकसंख्या मागे काढला जातो आणि तो जागतिक कॅन्सर रोगी च दर ठरवला जातो.
हे सूत्र च फसवे वाटत आहे.
मुंबई,पुणे,नाशिक ,नागपूर मुळे महाराष्ट्र चा प्रतेक व्यक्ती इन्कम वाढतो पण ते साफ चुकीचे असते.
तसा हा जागतिक ब्रेस्ट कॅन्सर rate प्रती लाख आहे.
फसवा.
गाव पातळी पासून जागतिक सर्व देशांचे कॅन्सर रुग्ण शोधले ते directly proportional to Village population.
अशा पद्धती नी जे आकडे येतील तेच सत्य आकडे असतील आणि .
तेच आकडे खरी कारणे उघड करतील
आणि उपाय पण त्या वर च अवलंबून आहेत

White hat नि लगेच जो आरोप केला.
त्या पद्धतीचा आरोप होवू नये म्हणून .
चुकीचा तर चुकीचा जागतिक लोकसंख्या पकडुन न च दर काढला जातो

प्राजक्ता,
इथे तो इन्शुरन्स मधे कव्हर असतो, फिजियशन रेकमेन्ड करतात आठवण करुन देतात >>> चांगली माहिती.
..
हेमंत ,

भारताच्या बाबतीत शहरी आणि ग्रामीण दर वेगळे काढलेले आहेत ते आपण वरील चर्चेत पाहिले.

जागतिक दराच्या बाबतीत जरा शांतपणे वाचन करावे लागेल.

अगदी १००० वस्ती असणाऱ्या गावापासून स्तन कॅन्सर चे दर काढले पाहिजेत
जन गणना करताना हे सहज शक्य आहे.

खेडे गावातल्या किंवा अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा महिला वेळेवर डायग्नोस करायला जात नाहीत. अगदी असह्य होई परेन्त सहन करत राहतात त्यामुळे आहेत त्या पेक्षा फार कमी केसेस रजिस्टर होतात व त्या वर पुढे इलाज होतो . पण तो परेन्त केस हाताबाहेरच गेलेली असते मोस्टली. इतरही सामाजिक बाबी आहेत. उपचार खर्चिक असतात व सारखे सारखे तिकडे जा हे ते टेस्ट करा मग डॉ. ला दाखवा मग उपचार असे करावे लागते. ते एक चक्र मागे लागते. ते फॉलो करायची मनःशक्ती व आर्थिक शक्ती जोडून कमी लोकांकडे असते. त्यात सुनेला झाला तर तिला तसेच खितप त टाकून दिले पण जाउ शकते. कोण तिच्या वर खर्च करेल. ही मानसिकता असते. माहेरी आर्थिक बळ असेलच असे नाही.

२०२१ मध्ये मला अशीच एक केस कळलेली. माझा कलीग जो कोकणा तला आहे व तिशीचा आहे त्याची बहीण कॅन्सरग्रसत होती व दोन मुली पदरात. ती आजा राने सरळ वारलीच. तिच्या ट्रिटमेंट साठी किती व काय प्रयत्न झाले हे काही डिटेल वारी कळले नाही. व विचारणे मला प्रशस्त वाटले नाही. मोटिव्हेशन कमी पडते.

खरेतर आता अशी परिस्थिती आहे की तुमचे प्यायचे पाणी, हवा शेतजमी नीत इतकी केमिकल्स आहेत की त्यातुन कोन कधी बाधित होईल सांगता येत नाही. पंजाबात हरित क्रांती झाली पण इन जनरल काही दशकांमध्ये कॅन्स रचे प्रमा ण पण वाढले. ह्याचा विदा माझ्याकडॅ नाही.

त्यात आपले बार्शी आहे बघा.

धन्यवाद डॉक्टर ही माहिती दिल्या बद्धल.
खूप किचकट काम आहे ते.
पण लोकसंख्येच्या अगदी प्राथमिक स्तरावर म्हणजे खेडे गाव.
ह्या वर जो पर्यंत फोकस केला जाणार नाही तो पर्यंत खरी कारणे माहीत पडणार नाहीत.

खेड्यात दुर्लक्ष , किंवा आर्थिक स्थिती खराब त्या मुळे उपचार नाहीत.
हा एक लहान फॅक्टर आहे.
तो विचारात घेवून च जागतिक आकडे पण आहेत.
हे का पचवता येत नाही.
सत्य नाकारून कसे चालेल

५ वर्षांनी करावा की दर वर्षी करावा?
एका ओळखीच्यांनी सांगीतले की त्या दर वर्षी मॅमो करत पण एक वर्षं चुकले आणि तो बराच पसरलेला. - खखोदेजा
त्या आता पूर्ण बर्‍या आहेत.

सामो
याचे सरसकटीकरण नाही करता येत. सर्वप्रथम धोका गुणांकन करतात. त्यानंतर विविध वयोगटांनुसार वार्षिक/ द्वैवार्षिक वगैरे योजना ठरवल्या जातात. प्रत्येकाने आपल्या तज्ञाशी बोलून ठरवायचे असते. निरनिराळ्या वैद्यकीय संघटनांची मते थोडीफार भिन्न असू शकतात.

म्हणून या मुद्द्यावर इथेच थांबू.

>>>>>याचे सरसकटीकरण नाही करता येत. सर्वप्रथम धोका गुणांकन करतात. त्यानंतर विविध वयोगटांनुसार वार्षिक/ द्वैवार्षिक वगैरे योजना ठरवल्या जातात.
ओह ओके.

>>>>म्हणून या मुद्द्यावर इथेच थांबू.
ओके.

ग्रामीण भागात स्तन कॅन्सर चे प्रमाण शहरी भागा पेक्षा कमी आहे.

डाटा.

तर्क .
सुविधा ची कमी,स्तन कॅन्सर बद्धल अज्ञान,गरिबी.
त्या मुळे केस detect च hot नाहीत.
म्हणून प्रमाण आकड्यात कमी दिसते.

हा युक्तिवाद खूप मोठे नुकसान करतो.

ते एक कारण असू शकते.
पण
ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्रिया मध्ये असणारा स्ट्रेस त्याची तुलना.
ग्रामीण आणि शहरी महिलांचा आहार.
त्याची तुलना.
ग्रामीण आणि शहरी स्त्री ला मिळत असलेली रात्री ची झोप त्याची तुलना.
ग्रामीण आणि शहरी स्त्री ला सहन करावे लागत असलेले प्रदूषण त्याची तुलना.
ग्रामीण आणि शहरी स्त्रियांची शारीरिक हालचाल ,व्यायाम त्याची तुलना.
ह्या अतिशय महत्वाचे घटकाकडे त्या मुळे दुर्लक्ष होते.
त्या वर चर्चा टळली जाते

मला काही मुद्दे मांडायचे आहेत. कदाचित थोडे अवांतर होईल. पण काही जणांच्या शंकांचे समाधान होईल असे वाटते.
ह्या चर्चेचा केंद्रबिंदू भटकावा असा माझा मुळीच उद्देश नाही ह.
१. कॅन्सर चे रिस्क फॅक्टर असा घटक किंवा स्थिती जी आपल्या निरोगी पेशींना mutate करते.
हे mutatation घडून कॅन्सर ची छोटी/ मोठी गाठ बने पर्यंत कमी किंवा जास्त कालावधी लागू शकतो. हा काळ त्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती किती सुदृढ आहे आणि कॅन्सर पेशी चे mutation किती वेगात घडतं आहे ह्यावर अवलंबून असते. इथे सुध्दा रिस्क फॅक्टर स्वतःचा प्रभाव दाखवू शकतात.
कॅन्सर पेशीचे प्रोग्रामिंग बिघडले असते अशी पेशी शोधून तिला लगेच नष्ट करायचे काम रोग प्रतिकार शक्ती करीत असते.
पण जसा जसा अधिक वेळ जातो तसतसा कॅन्सर रोग प्रतिकार शक्तीला बगल देऊन tumor मध्ये रुपांतरीत होऊ शकतो.
इथे ह्या ठिकाणी सुध्दा रिस्क factors आपला परिणाम दाखवत असतात.
More the exposure more risk of cancer development असे अनेक mutation induce करणारे factors आहेत.
२. हे रिस्क factors कोण ठरवते व कसे?

शास्त्रशुद्ध पुराव्यां नुसारच ( evidance based) हे फॅक्टर ठरवले जातात.
केवळ कॅन्सर च नव्हे तर सर्व आरोग्य विषयी सांख्यिकी साठी असे संशोधन सगळ्या जगात कायम सुरू असते.
हे संशोधन सांख्यिकी ( statistics) आणि शक्या शक्यता ( probability) पडताळणी करणारे असते.
त्यामुळेच तुम्हाला डॉक्टर कुमार यांच्या लेखात गुणोत्तर, टक्केवारी अश्या प्रकारची विधाने दिसतील.
ह्यात एखादा विशिष्ट मानवी समुदाय निवडला जातो. त्यात १० माणसे ते कदाचित १ लाख माणसे पण असू शकतात, आणि मागील १० वर्षे /२० वर्षे/१०० वर्षे असा कालावधी असतो.
विशिष्ट दिनचर्या, विशिष्ट रोजगार, विशिष्ट औषधे/ रसायने/ सवयी किंवा विशिष्ट आहार ह्याची रोग, रोगी, त्याचे आरोग्य आणि रोगाची लक्षणे व इतर असंख्य बाबी वर होणारे परिणाम असा अभ्यास केला जातो.
ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. मी अभ्यासाचे एक साधे उदाहरण वर दिले आहे.
असे संशोधन महागडे किचकट आणि सॉफ्टवेअर, वेळ आणि बुद्धी invest करून केले जाते.
साहजिकच ज्या अभ्यासाला निधी मिळेल तो अभ्यास होतो.
त्यामुळे सुध्दा कदाचित भारता सारख्या मोठ्या पण विकसनशील देशात निधी अभावी पुरेसा statistic data मिळत नसावा.
मी ह्या शेवटच्या वाक्यात कोणालाही दोष देत नसून एक शक्यता सांगत आहे.
कोणाला असे अभ्यास मुळापासून वाचायचे असतील तर cochranelibrary.com
ह्या लय भारी साईट वर जाऊन बघावे.

डॉक्टर, तुम्ही मला पुन्हा लिहिते केले धन्यवाद.

छान विवेचन रो.
त्यामुळे सुध्दा कदाचित भारता सारख्या मोठ्या पण विकसनशील देशात निधी अभावी पुरेसा statistic data मिळत नसावा.

>>> खरय.

डॉ रोहिणी, अतिशय माहितीपूर्ण पोस्ट.

<<<<त्यामुळे सुध्दा कदाचित भारता सारख्या मोठ्या पण विकसनशील देशात निधी अभावी पुरेसा statistic data मिळत नसावा.>>>>

विकसित देशांमध्ये निधी मुबलक असल्याने सरकार असे सर्व्हे करुन घेते. विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये जिथे निधीच्या कमतरतेमुळे देशव्यापी सर्वेक्षण शक्य नाही त्या देशांसाठी WHO हे सर्वेक्षण करुन घेते.

पाश्चात्य आणि WHO सर्वेक्षण हे सगळ्यात जास्त विश्वासार्ह असल्याने तेथील निष्कर्ष जास्त प्रमाणात कोट केले जातात.

पर्णिका, असे संशोधन फक्त सरकार पेक्षा pharmaceutical/ nutrition products company जास्त करवून घेतात. त्यांच्या कडे पैसा ही असतो आणि असे संशोधन त्यांना पुढे त्यांच्या मार्केटिंग साठी उपयोगी पडते. ( आठवा complan ची जाहिरात) ते त्यांच्या आर्थिक हिताचे असते.
सगळीच पाश्चात्य संशोधने बरोबर असतात असेही नाही म्हणता येणार. वर मी दिलेली लिंक ज्या संस्थेची आहे ती अत्यंत विश्वासर्ह आहे.
आणि भारतात पण कुठे कुठे असे संशोधन सुरू आहेच.
पण आपल्या देशात इतके वेगवेगळे समुदाय आहेत की एक छोट्या सँपल वर मिळालेला निष्कर्ष सरसकट अख्ख्या देशाला नाही लावता येत.
व्यापक संशोधन गरजेचे आहे...
जनगणनेच्या वेळी कॅन्सर साठीचा डाटा तर मिळेल.
पण पुढे तो process करून निष्कर्ष काढला जायला हवा.
इतर बऱ्याच गोष्टी साठी सरकार जनगणनेचा वापरून बरीच सांख्यिकी प्रसिद्ध करीत असतेच. ( स्त्री पुरुष गुणोत्तर, आयुर्मान, per capita income, शिक्षण वगैरे)
पण अमुक एक ठाम विधान करण्यास sofisticated ( म्हणजेच महागड्या) सॉफ्टवेअर शिवाय पर्याय नाही.

हो सगळे पाश्चात्य सर्वेक्षण नाहीच मुख्यतः USDA द्वारा करण्यात येणारे NHANES आणि त्याचे युरोपियन काउंटर पार्टस विश्वासार्ह असतात असे म्हणायचे होते.

भारतातील गोळा केलेल्या बेटांची गुणवत्ता हे पण एक मोठं आव्हान आहे. परिस्थिती तसेच सर्वेक्षणाचा हलगर्जीपणा दोन्ही घटक कारणीभूत आहेत. हळूहळू बदल होताहेत त्यांना गती मिळो ही सदिच्छा.

मला वाटतं.
" शक्यता असते " असा वाक्य प्रयोग जिथे केलेला असतो त्याचा अर्थ तो रोग रिस्क फॅक्टर असून पण होईलच ह्याची खात्री नसते. एकदा आजार
सरासरी समान रिस्क फॅक्टर असणाऱ्या १०० पैकी २, लोकांना होतो पण ती २ लोक कोण हे नाही सांगता येत.
पोटॅशियम cynide पोटात गेले की माणूस १०० % मरणार.
तिथे मरण्याची शक्यता असते असा वाक्य प्रचार वापरला जात नाहीं

सुध्दा रिस्क फॅक्टर स्वतःचा प्रभाव दाखवू शकतात.
कॅन्सर पेशीचे प्रोग्रामिंग बिघडले असते अशी पेशी शोधून तिला लगेच नष्ट करायचे काम रोग प्रतिकार शक्ती करीत असते.
पण जसा जसा अधिक वेळ जातो तसतसा कॅन्सर रोग प्रतिकार शक्तीला बगल देऊन tumor मध्ये रुपांतरीत होऊ शकतो.
इथे ह्या ठिकाणी सुध्दा रिस्क factors आपला परिणाम दाखवत असतात.
More the exposure more risk of cancer development असे अनेक mutation induce करणारे factors आहेत.

हा paragraph खुप महत्वाचा आहे.अनेक लोकांची अशी मत असतात बघा आम्ही तंबाखू खातो,दारू पितो आमचे वय ८० झाले आम्हला कॅन्सर नाही झाला.
म्हणजे सरकार,डॉक्टर जे इशारे देत आहे ते चुकीचे
आहेत.
रोज शरीरातील एक तरी पेशी चुकीचे वर्तन नक्कीच करत असावी प्रत्येकाच्या शरीरात.
पण शरीरातील प्रतिकार शक्ती किंवा बाकी ज्या यंत्रणा आहेत त्या ती पेशी शोधून लगेच नष्ट करत असाव्यात.
जे रोज घडतं असावे.
रिस्क फॅक्टर असणाऱ्या लोकांच्या शरीरात जास्त प्रमाणात घडत असावे.
पण पेशी चुकीचे वर्तन मात्र प्रतेक व्यक्तीच्या शरीरात रोज करत असतात असे माझे मत आहे .
त्या मुळे रिस्क फॅक्टर नसला तरी कॅन्सर काही लोकांना होतोच.
आणि रिस्क फॅक्टर असून पण संरक्षण व्यवस्था उत्तम असल्या मुळे कॅन्सर काही लोकांना होत नसावा
आपल्या हातात असलेले रिस्क फॅक्टर आपण टाळू शकतो.
संरक्षण व्यवस्था म्हणजे शरीराची पोलिस व्यवस्था च आहे.
त्या साठी पोलिस बलवान हवेत.
म्हणून व्यायाम,चांगला आहार,चांगले हवामान. हे सर्व हवं.
वाईट सवयी नको.
पण पोलिस बलवान आहे पण त्याला गुन्हा घडतं असून पण कारवाई करण्याचे आदेश च दिले जात नाहीत.
तर गुन्हा सर्रास घडणार च .
किंवा पोलिस बलवान पण लाचखोर, आळशी आहे ( बघू नंतर असा विचार करणारा आहे)
तर गुन्हा सर्रास घडणार च .

हेच होते चांगल्या सवयी,चांगला आहार ,उत्तम व्यायाम करून पण कॅन्सर होणाऱ्या लोकात.
हे लिहणे खूप गरजेचे आहे म्हणून लिहीत आहे.
लोकांच्या मनात हीच शंका असते.
काही वाईट सवय नाही ,तरी कॅन्सर कसा झाला

समारोप
साधकबाधक चर्चा, पूरक माहिती, स्त्रियांचे स्वानुभवकथन आणि किरकोळ मतभेद या सर्वांनी युक्त अशी ही दीर्घ चर्चा उत्तम झाली.
धन्यवाद !

यावरून वाचकांच्या लक्षात येईल, की या रोगाची कारणमीमांसा हा एक पैलू सुद्धा किती मोठा आहे. हा आजार प्रामुख्याने स्त्रियांचाच असला तरीही अत्यल्प प्रमाणात पुरुषांचाही आहे.

सर्व सभासदांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

एका स्तनातला कॅन्सर लवकर लक्षात आला आणि सर्जरीने काढून टाकला. काही वर्षांनी दुसऱ्या स्तनात कॅन्सर झाला तर त्याला रिलॅप्स म्हणतात का?

दुसऱ्या स्तनात कॅन्सर झाला तर त्याला रिलॅप्स म्हणतात का?
>>>
Relapse म्हणजे पूर्वीच्या रोगाचा पुनरुद्भव. ही शक्यता कुठल्याही कर्करोगाबाबत असतेच.
परंतु स्तन- कर्करोगाच्या संदर्भात दोन वेगळ्या संज्ञा वापरल्या जातात :
१. फक्त एकाच स्तनातील रोगानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत दुसऱ्या स्तनातही कर्करोग आढळला तर त्याला synchronous असे म्हणतात.

२. परंतु, जर दुसऱ्या स्तनात हा रोग सहा महिन्यानंतर आढळला तर त्याला metachronus असे म्हणतात.

परवाच माझी डॅाक्टर बोलली कि आता ब्रेस्ट, पॅंक्रियाटीक आणि कोलन कॅन्सरचे पेशंट खूप वाढलेत. ४५+ असेल तर मॅमोग्राम बरोबर कोलनास्कोपी सुद्धा करावी लागेल. त्याची खरेच गरज आहे का?

Pages