स्लॅमबूक

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पूर्वप्रकाशित: http://nandinidesai.blogspot.in/2013/05/blog-post.html

रत्नागिरीला मागच्या वेळेला गेले होते तेव्हा माझं पुस्तकांचं कपाट आवरत असताना अचानक माझी बारावीची स्लॅमबुक मला मिळाली. गेले दहा बारा वर्षं ही स्लॅमबुक इथेच असूनपण मला कशी काय दिसली नव्हती कुणास ठाऊक.. कपाट आवरायचं सोडून मी ती स्लॅमबुक वाचण्यातच गर्क झाले. किती आठवणी, किती मित्र-मैत्रीणी... ही स्लॅमबूक वाचल्यावर अगदी शोधशोधून दहावीची आणि नंतर ग्रॅज्युएशनची (ही अगदी इस्टमन कलर शोभेल इतक्या कलरफुल रंगांनी भरलेली) स्लॅमबूक शोधून काढली आणि वाचतच बसले. ग्रॅज्युएशननंतर स्लॅमबूक्स लिहिण्याचा उत्साह संपला कारण तेव्हा ऑर्कुट नामक व्हर्च्युअल स्लॅमबूक अस्तित्त्वात आलं होतं. हल्लीची शाळा कॉलेजची मुलं अशी स्लॅमबूक लिहितात तरी की नाही, कुणास ठाऊक!!

खरंतर या स्लॅमबुक घेतल्या होत्या त्या मित्रमैत्रीणींच्या आठवणी जपण्यासाठी.. प्रत्यक्षात स्लॅमबुक वाचायला घेतली आणि डोक्यामधे आठवायला लागलं भलतंच काहीतरी.... हे स्लॅमबूक म्हणजे स्वीट, लव्हेबल( की लव्हली???) अँड आफेक्शनेट मेमरीज बूक. त्यावेळेला असं जेन्युईनली वाटायचं की आठवणी अशा वहीमधे नोंदून ठेवता येतील. पण मैत्रमैत्रीणींच्या आठवणी त्या स्लॅमबूकच्या कागदामधे मावणं अशक्यच हे तेव्हा कधी लक्षातच आलं नाही हे आता इतक्या वर्षानंतर जाणवतंय..

आपण दहावीची परीक्षा देऊन किती वर्षं होऊन गेली ते सहज मोजून पाह्यलं तर माझाच विश्वास बसेना, इतकी वर्षं... तपापेक्षा जास्त काळ उलटून गेला... कशी काय गेली इतकी वर्षं? काल परवा तर आपण युनिफॉर्म घालून दप्तरामधे डबा-चष्मा-पाण्याची बाटली घालून शाळेला जात होतो. वाढत्या वयासारखा चष्म्याचा नंबर पण वाढत गेला आणि कायमचाच नाकावर येऊन बसला. दहावीमधे लांबसडक असणारे केस जाऊन तिथे बॉबकट कधी आला आणि तेव्हा "हवा आली तर उडून जाशील" अशा शरीराची मी सध्या कॅलरीकाट्याकडे बघून जेवतेय.... बदल तर खूप झाले पण इतक्या वर्षांनी हातामधे धरलेल्या त्या तीन स्लॅमबुक्सनी मला परत एकदा शिर्के शाळेच्या त्या दहावी 'अ'च्या वर्गातून गोजोच्या त्या बारावी सायन्सच्या वर्गातून मग महर्षी कर्वेच्या वर्गांमधे घुमवून आणलं. ही सगळी स्लॅमबुक्स माझ्यासाठी तरी आठवणींचं एक दालन उघडणारीच. पण त्या आठवणी मात्र माझ्या मनातल्या, त्या स्लॅमबुकवर फक्त अक्षरांची मांडामांड तेवढीच.

बोर्ड परीक्षेचं वर्ष "म्ह्त्त्वाचं वर्ष" असलं तरी परीक्षेच्या जस्ट आधी वर्गभरामधे या स्लॅमबुक्सची देवाण घेवाण सतत चालू असायची. मग त्यामधे नाव, गाव, आवडता हीरो, आवडता सिनेमा, तुझ्याबद्दल काय वाटतं, बेस्ट मेमरी इत्यादि इत्यादि सर्व मजकूर लिहावा लागायचा. आमच्यासारखे चित्रकलेमधले ढ लोकं आर्चिस अथवा तत्सम दुकानांमधून ही स्लॅमबुक विकत घ्यायचे. अधिक आर्टिस्टिक लोकं एखादी साधी डायरी घेऊन त्यावर चित्रं काढून, रंगवून मग अगदी स्टाईलमधे "स्लॅमबुक" अशा एकदम विविध "फॉन्टमधे" लिहून स्वतःची स्लॅमबुक बनवायचे.

आर्चिसमधे जाऊन अशा स्लॅमबूक विकत घेणं हा पण सोहळाच असायचा. आमच्या गावामधे तेव्हा "आर्चिस्" नुकतंच चालू झालं होतं. त्यामुळे वाढदिवसांसाठी वगैरे ग्रीटिंग घ्यायचे तर तिथूनच घ्यायचं हे नवीन फॅड आलं होतं. इतर स्टेशनरीच्या दुकानात दहा-पाच रूपयाला मिळणार्‍या साध्या ग्रीटिंगपेक्षा अगदी शंभर दीडशे रूपयांपर्यंत असलेली रंगीबेरंगी, चित्रविचित्र आणि अगदी खुसखुशीत, इमोशनल, सेन्टीमेन्टल, रोमँटिक अशी वेगवेगळ्या पद्धतीची मेसेजेस लिहिलेली ग्रीटींग्ज आम्ही पहिल्यांदा आर्चिसमधेच पाहिली. शिवाय इथे विकणारे लोक अगदी हसतमुखाने वगैरे वस्तू विकणार ( हे नव्याचे नऊ दिवस इतकंच चाललं, नंतर इथल्या सेल्सगर्लनापण गावच्या मातीचा गुण लागला आणि अगदी 'परवडत असेल तरच वस्तू बघा' असा आंबट चेहरा करता यायला लागला- ते असोच) . पण तेव्हा आम्हाला छान सजवून ठेवलेली ग्रीटिन्ग्ज, गिफ्ट आर्टिकल्स, दुकानामधे कायम वाजत असणारी रोम्यांटिक गाणी आणि विकत घेतल्यावर रंगीबीरंगी कागदामधे करून दिलेलं गिफ्ट रॅपिंग यामुळे हे अगदी "पॉश" वाटायचं. आमच्या बारावीच्या वेळेला ते अब्बास असलेलं "छुईमुईसी तुम लगती हो" गाणं अतिफेमस झालं होतं आणि त्याचसोबत ते टिल्लं टेडीबेअरदेखील. वर्गात प्रत्येकाकडे तरी ते आर्चिसमधून घेतलेलं टेडीबेअर होतंच तेव्हा. (यावरून मी किती साली बारावी झाले त्याचं गणित आरामात काढता येईल ना?)

प्रीलीम्स झाल्या की क्लासेस अथवा अभ्यासामधून जरा ब्रेक म्हणून आम्ही या दुकानात जायचं... छान वेगवेगळ्या रंगातली स्लॅमबुक चाळून बघायची.. पण जे आवडलं ते घेतलं इतकं साधंसोपं नसायचं कारण दोनच दिवसापूर्वी वर्गातल्याच कुणीतरी "सेम अश्शीच" स्लॅमबूक घेतलेली असायची... त्यामुळे जरा वेगळं डीझाईन दाखवा, वेगळा रंग दाखवा असं करत तासा-दीडतासाने स्लॅमबूक (आणि इतर बर्‍याच वस्तू-- ज्यांची कदाचित गरज पण नसायची) घेऊन परत यायचं. ही भावी आयुष्यातल्या "शॉपिंग" नामक प्रकरणाची प्रीलिम म्हणायला हरकत नाही. मी काऊंटरवरच बहुतेक कुणीतरीए रीजेक्ट करून ठेवलेली एक छान लाल गुलाबाच्या कळ्यांचं चित्र असलेली स्लॅमबूक ताबडतोब विकत घेतली होती. आणि इतर मैत्रीणींची खरेदी होईपर्यंत दुकानाचं निरीक्षण करत बसले होते. आजही फारसा फरक पडलेला नाही यामधे. कुठल्याही दहा ते पंधरा मिनिटांत वस्तू घेऊन दुकानाबाहेर पडलंच पाहिजे असा नियम मी तेव्हापासूनच आचरणात आणते बहुतेक.

एकदाची ती रंगीबेरंगी स्लॅमबूक घरी आली की मग उत्साहाला भरतंच भरतं.. त्यावर आधी आपलं नाव्-गाव आणि इथे लिहा तुमच्याबद्दल् वगैरे टाईप्स पहिल्यांदा आपणच लिहून काढायचं, एक प्रकारे हे त्या स्लॅमबूकचं होमपेजचकी. मग कुणी राष्ट्रभाषेचा (म्हणजे शुद्ध हिंदी नव्हे, बॉलीवूडी हिंदी ही आपली वरिजिनल राष्ट्रभाषा!!) आधार घेत प्रस्तावना लिहायचं, अगदीच कवी मनाची लोकं छान छान कविता लिहून काढत, कुणी शेरोशायरी वापरत, आर्टिस्टिक लोकं चित्र काढून, कुणी व्यंगचित्रं काढून, वगैरे होमपेज सजवायचे. बर्‍याच स्लॅमबूकमधे फोटो चिकटवायला जागा दिलेली असायची तिथे आम्ही फेवरेट हीरोचे वगैरे फोटो चिकटवायचो. सगळ्या स्लॅमबूकमधे चिकटवायला एवढे सारे पासपोर्ट साईझ फोटो कोण काढून आणणार? त्यात परत काही उत्साही लोकांकडे पूर्ण पानभर आवडत्या हिरोहिरॉइनची स्टिकर्स लावायची फॅशनपण एकदम जोरात होती. माझ्या एका मैत्रीणीने इतर मैत्रीणींच्या स्लॅमबूकभर "मेला" पिक्चरचे स्टिकर लावले होते. माझ्या स्लॅमबुकमधे त्या मैत्रीणीकडून "कमरिया लचकेरे" गाण्यातल्या एका फ्रेमचा फोटो चिकटवलेला आहे. हे आज आमिर खानला समजलं (आणि हा मेला पिक्चर नक्की कुठला हे त्याला आठवलंच) तर त्याला गहिवरून येईल. (मेला पिक्चर कधी आला यावरून आम्ही बारावीला कुठल्यावर्षी होतो याचे गणित काढू नये, मेला त्यानंतर दोन तीन वर्षांनी आला. त्याचे फोटो पाच सहा वर्षं आधीपासून येत होते बाजारात!!!)

ही अशी सजावट- रंगावट झाली की एक छोटासा यक्षप्रश्न समोर उभा ठाकलेला.

पहिल्यांदा या स्लॅमबुकमधे लिहायचा मान कुणाचा?

कारण, हा पहिला लिहायचा मान फक्त "स्पेशल" बेस्ट फ्रेंडचाच. पण हिला लिहायला सांगितलं की तिला राग येणार आणी तिला लिहायला सांगितलं की ही नोट्स देताना हजार कारणं देणार!! अजून कुणी "त्याला" लिहायला सांगायचं का? पण घरच्यांनी कुणी वाचलं तर काय घ्या.. अशा द्विधा मनःस्थितीत.

त्यातून मी काढलला सोपा सुटसुटीत मार्ग म्हणजे सरळ पहिल्यांदा पप्पांकडून लिहून घ्यायचं. एक तर पप्पा आपले "फ्रेण्ड" आहेत असं त्यांनाच कठीण प्रसंगी ऐकवता येतं- आपको इस स्लॅमबुक के हर पेजकी कसम!!! दुसरं म्हणजे जरी "हर एक फ्रेंड जरूरी होता है" तरी पप्पांसारखा बँकभक्कम फ्रेंड औरभी जरूरी होता हय! माझ्या तीनही स्लॅमबूकमधे माझ्या वडलांचीच फर्स्ट एंट्री आहे. आणि म्हणूनच त्यांच्या क्रेडिट्-डेबिट कार्डावर माझा वहीवाटीचा हक्क आहे.

या स्लॅमबूकमधे ठराविक कॉलम्स असायचेच, त्यातलं पहिलं म्हणजे नाव्-गाव्-पत्ता-फोन नंबर आमच्यावेळेला ईमेल आणि मोबाईल नंबर नव्हते हो!! आणि घरचा नंबर कुणाच्या स्लॅमबुकमधे लिहायचा आणि कुणाच्या नाही याचे स्ट्रीक्ट नियम होते. मग फेवरेट कलर-फूड्-फिल्म-हीरो-हीरॉइन्स असा एक मामला असायचा. अगदी क्वचित त्यामधे फेवरेट बूक अथवा ऑथर असायचं (हे आत्ता वाचताना आठवलं पण तेव्हा कधीच जाणवलं नाही), मग मधेच माय बेस्ट फ्रेंड, माय रीसेन्ट क्रश असलं काहीतरी मजेदार पण असायचं. तिथे लिहिलेले रीस्पॉन्सेस वाचणे हे सर्वात धमाल काम. मग अवर बेस्ट मेमरी (याला चारपाच ओळी) आणि युअर कमेंट्स ऑण मी (याला परत चारपाच ओळी) शेवटी, "से समथिंग अबाऊट मी" याला पानामधे उरली असेल तेवढी जागा. ही जागाभरून कुणी लिहायचं नाही ते सोडाच.

मग वर्गामधे सगळ्यांकडे ही स्लॅमबूक फिरायला लागायची. वर्गामधे कधीतरी तासाला बसून, कट्ट्यावर बसून एकमेकांना "तू लिही रे" "प्लीज तू लिहून घे तिच्याकडून" अशा विनवण्या चालू व्हायच्या...

बेस्ट फ्रेंड्स, मग क्लासमधे एकत्र असणारे, मग वर्गात नुसतेच ओळखीचे असलेले, असं करत करत स्लॅमबुकची पानं कधी भरायची ते समजायचं सुद्धा नाही.

त्यामधे सर्वात जास्त गंमत असायची ती आपला क्रश असलेल्या व्यक्तीकडून स्लॅमबूकमधे लिहून घेताना. अगदी त्याला न समजेल अशा बेतामधे "रीक्वेस्ट" करून स्लॅमबूक लिहायला द्यायची, त्याचा हातातून अगदी सरळ चेहरा करून थँक्स म्हणत ती स्लॅमबूक घेतली आणि त्याची पाठ फिरली की लगेच अत्यानंदाने उड्या मारायच्या. या स्लॅमबुकचा छुपा उद्देश हा "आपल्या क्रशला अधिकाधिक रीत्या जाणून घेणे" असादेखील असायचाच.

मी तर माझ्या स्लॅमबूकमधे अशा "क्रशित" म्हणजे माझा ज्यांच्यावर क्रश होता अशा मुलांनी लिहिल्यावर त्या पानांवर मस्त गुलाबी रंगाचे हार्टवाले स्टिकर चिकटवले होते. अजूनही ते क्रश आठवले की हसू येतं. त्यावेळेला क्रश जडायला आणि मोडायला अगदी क्षुल्लक कारणदेखील पुरायचं. माझा एक अतिसीरीयस क्रश मोडायला माझीच ही स्लॅमबुक पण कारणीभूत होती. अतिसीरीयस म्हणजे किती तर धूममधे तो उदय चोप्राचा एक सीन आहे की नाही, तसं हा दिसला की माझ्या डोळ्यासमोर आमच्या भावी आयुष्याचे सीन्स दिसायचे. पण स्लॅमबुकमधे त्याच्याकडून लिहून घेतलं मग "दिलके टुकडे हजार हुवे" कारण, पठ्ठ्याने स्वतःचं नाव इंग्लिशमधे लिहिलं होतं पण अगदी चुकीच्या स्पेलिंगसकट!! इसके बाद आगे बात बढही नही सकती थी बॉस. आजही त्याचं ते पान वाचलं की लगेच ते चुकीचं स्पेलिंग डोळ्यांना टोचत राहतं आणि त्यावेळेला आपल्याला किती राग आला होता त्या व्यक्तीचा ते आठवतं... तुम ऐसा करही कैसे सकते हो मेरे साथ इत्यादि इत्यादि इत्यादि.

एका माणसाने माझी स्लॅमबुक माझ्या हातात परत देत "पण मी तुम्हांला(प्लीज नोट द आदरार्थी बहुवचन) ओळखत नाही, तर तुमच्या वहीमधे कसं लिहिणार?" असं स्पष्ट सांगत परत दिली होती. आणी आता तोच मुलगा सातजन्माचा साथीदार!! पण हल्ली ते आदरार्थी बहुवचन काही ऐकायला मिळत नाही मला.

स्लॅमबूकमधले कॉलम्स बाय डीफॉल्ट इंग्रजीत असले तरी तेवढं इंग्रजी लिहिणं हे प्रत्येकाला जमायचंच असं नाही. कारण इंग्रजीमधे आम्हाला लेटर रायटिंग, कॉपी रायटिंग, समरी वगैरे असले लिखाणकाम असलं तरी स्लॅमबूक रायटिंग नव्हतं त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात काय आहे ते स्पष्टपण लिहिण्यासाठी आवश्यक असणारं स्किल कधी शिकवलं नव्हतं. नाव गाव पत्ता एवढं इंग्लिशमधून लिहून व्हायचं पण आम्ही बहुतेक जण "बेस्ट मेमरी" वगैरे मोठे प्रश्न आले की मराठीत लिहायला सुरूवात करायचो. मराठीमधे लिहिताना पण बहुतेकांची उत्तरं अगदी छापील स्वरूपाचीच, "तू एकदम छान मुलगी आहे, आयुष्यात फार यशस्वी होशील इत्यादि इत्यादि इत्यादि.."

या स्लॅमबुक वाचत असताना खरंतर त्

या प्रत्येक मित्र-मैत्रीणीसोबत घालवलेल्या आठवणी मनात नाचत होत्या, पण या सर्व आठवणी कुठेच त्या स्लॅमबुकच्या पानांमधे नव्हत्या. होत्या त्या फक्त स्मृतींमधेच. सध्याच्या फेसबूक आणि जीटॉकच्या काळामधे हे बहुतेक शाळूसोबती "फ्रेंड्स लिस्ट"मधे आहेतच त्यामुळे आमच्या आधीच्या पिढ्यांनी बर्‍याचदा वापरून वापरून क्लिशे झालेलं ते "मित्र हरवले" वगैरे आमच्या पिढीला कधी वाटतच नाही, उलट साखरपुडा, लग्न, पुत्र-कन्याजन्म, बारसं, इतकंच काय पण कोण सुट्टीला कुठे गेलं आणि आज कुणाकडे काय खास पदार्थ बनलाय ते देखील या सोशल मीडीयामधून समजतं. एका अर्थाने बघायला गेलं तर आम्ही कुणीच अगदी मित्र-नातेवाईक वगैरे कितीही भौगोलिक अंतरावर लांब असलो तरी या सोशल मीडीयामधून जवळपासच असतो. म्हणून परदेशांत एकटं असू दे, नाहीतर भारताच्याच एखाद्या खेड्यामधे असूदे, मित्रमैत्रीणी सतत आजूबाजूला असतात. त्यांचा आधार, मैत्री आणि सल्ले कायम सोबत असतात.

अशा काळामधे या स्लॅमबुक्स केवळ एक जुन्यापुराण्या वह्याच राहिल्यात. पण याच जुन्यापुराण्या वह्यांनी त्या तरूणाईचा एक निरागस आणि भाबडा असा कुठलातरी एक अनामिक क्षण कैद करून ठेवलाय.. या वह्या वाचताना तोच क्षण सतत जाणवत राहतो.... आसपास वावरत राहतो.

विषय: 
प्रकार: 

>>आणि म्हणूनच त्यांच्या क्रेडिट्-डेबिट कार्डावर माझा वहीवाटीचा हक्क आहे.>>:D
नंदुबेन, हुष्शार आहेस हो!
साताजन्माचा साथीदारपण Happy

मस्त लिहिलयस नंदिनी!! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ते छुईमुईसी तुम'मधला टेडी बेयर आम्ही एम एस्सीला असतांना होतं! शेवटच्या दिवशी स्लॅमबुक आख्ख्या वर्गातुनच काय लायब्ररी, अ‍ॅडमिनमधुन पण फिरवली गेली. त्यात कुणी कविता, कुणी शेरोशायरी असं सगळं लिहिलं होतं.
most embarrassing moment मधे तर हहपुवा लिखाण होतं. आयुष्यातली महत्वाकांक्षा मधे माझं टिपिकल वाक्य होतं- to have a separate identity
सिगरेट पिणार्या मुलांच्या स्लॅमबुकमधे आम्ही बिनधास्त - love is like a cigarette, it starts with a smoke and ends into ash असं लिहायचो.

<<माझा ज्यांच्यावर क्रश होता अशा मुलांनी लिहिल्यावर त्या पानांवर मस्त गुलाबी रंगाचे हार्टवाले स्टिकर चिकटवले होते. अजूनही ते क्रश आठवले की हसू येतं<< अग्दी अगदी... मी पण! Blush

मस्त लिहिलयस नंदिनी!! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. Happy

हल्लीची शाळा कॉलेजची मुलं अशी स्लॅमबूक लिहितात तरी की नाही, कुणास ठाऊक!! >>> लिहीतात तर. माझी लेक सातवीत आहे आणि सध्या हे प्रकरण चांगलेच फॉर्मात आहे Happy

एक रहें ईर, एक रहें बीर, एक रहें फत्ते
एक रहें हम...
ईर कहे स्लॅमबुक मा फोटू लगाय
बीर कहे स्लॅमबुक मा फोटू लगाय
फत्ते कहे स्लॅमबुक मा फोटू लगाय
हम कहा.. चलो हमाऊ स्लॅमबुक मा फोटू लगाय...
ईर लगाय तीन फोटू, बीर लगाय तीन फोटू, फत्ते लगाय तीन फोटू, हमार...
गोंद गिर गए...

हेच्च झालं,
सगळे आणाताहेत तर आपणाही स्लॅमबुक आणून फोटो लाऊया असा विचार करून एक मस्त (इतरांपेक्षा कम्प्लीटली वेगळं) स्लॅमबुक शोधून आणलं...
अन पहिला फोटो (अर्थात स्वतःचाच) लावताना शेजारच्याचा धक्का लागून डिंक सांडून स्लॅमबुकचा ठोकळा बनला.

त्यानंतर स्लॅमबुक वगैरे सब झूठ, जे कॉन्टॅक्टम्धे अन आठवणीत रहातील तेच्च मित्र असा विचार करून मै जिंदगी का साथ निभाता चला गया...

एक रहें ईर, एक रहें बीर, एक रहें फत्ते
एक रहें हम...

मस्तच लिहिलंयस!

>>>> एका माणसाने माझी स्लॅमबुक माझ्या हातात परत देत "पण मी तुम्हांला(प्लीज नोट द आदरार्थी बहुवचन) ओळखत नाही, तर तुमच्या वहीमधे कसं लिहिणार?" असं स्पष्ट सांगत परत दिली होती. आणी आता तोच मुलगा सातजन्माचा साथीदार!! पण हल्ली ते आदरार्थी बहुवचन काही ऐकायला मिळत नाही मला. >>>> ओळखत नसताना स्लॅमबुक दिलीस? धन्य! 'क्रशित' कॅटेगरीतला होता का?

छान लिहिल आहेस. >>>> एका माणसाने माझी स्लॅमबुक माझ्या हातात परत देत "पण मी तुम्हांला(प्लीज नोट द आदरार्थी बहुवचन) ओळखत नाही, तर तुमच्या वहीमधे कसं लिहिणार?" असं स्पष्ट सांगत परत दिली होती. आणी आता तोच मुलगा सातजन्माचा साथीदार!! पण हल्ली ते आदरार्थी बहुवचन काही ऐकायला मिळत नाही मला. >>>> हि मज्जा कहि और आहे.

मामी. मैत्रीणीच्या "बॉयफ्रेंडचा" मित्र इतकी जवळची ओळख होती बघा, तरी म्हणे मी ओळखत नाही तुम्हाला. आणि अज्याबात क्रशित कॅटेगरीमधला नव्हता, चष्मेवाली, मला अहोजाहो करणारे अभ्यासू पोरं त्या कॅटेगरीमधे थोडीच असतात? Wink

>>एका माणसाने माझी स्लॅमबुक माझ्या हातात परत देत "पण मी तुम्हांला(प्लीज नोट द आदरार्थी बहुवचन) ओळखत नाही, तर तुमच्या वहीमधे कसं लिहिणार?" असं स्पष्ट सांगत परत दिली होती. आणी आता तोच मुलगा सातजन्माचा साथीदार!! पण हल्ली ते आदरार्थी बहुवचन काही ऐकायला मिळत नाही मला. >>
हे भारीच! Happy

हो, आम्हीही केला आहे हा प्रकार.
'I like...', 'I hate..' असे सुरू होणारे येडपट प्रश्न असायचे त्यात. 'I follow' चं उत्तर 'every beautiful girl' असं एका मित्राने लिहिलेलं अजून आठवतंय. Proud
आवडतं गाणं म्हणून 'careless whispers' लिहायची फॅशन होती तेव्हा, का कोण जाणे. Proud

'I follow' चं उत्तर 'every beautiful girl' असं एका मित्राने लिहिलेलं अजून आठवतंय. >> Lol

अँक्या, मै जिंदगीका गम निभाता चला गया.... Happy

अतिशय सुरेख लिहिलंयस.
माझ्याकडे पण असं एक स्लॅमबूक होतं. आणि डिट्टो तुझ्यासारखंच मीही तो खरेदी सोहळा उरकला होता. फक्त तेव्हा आमच्या कोल्हापूरात आर्चिज नव्हते. आमच्या इथे प्रशांत नावाचं दुकान आहे मोठं (आयमिन तेव्हा होतं) तिथून घेतलं होतं. त्यात मग कुणा कुणा कडून लिहून घेतलं होतं ते नाही आठवत. पण कॉलेजात गेल्यावरही ते बूक होतं माझ्याकडे, त्यात माझ्या एका मित्राच्या मित्राने ही असंच काहीतरी लिहिलं होतं. की याद करनेके लिये किसिको पहले भूलना पडता है.. समथिंग. अशा अर्थाचं. इतकंच आठवतंय. बाकी काही आठवत नाही. तो आणि मी अजूनही टच मध्ये आहोत.. Happy ते बूक मात्र हरवलं कुठेतरी.. आणि हे जाणवल्यावर किंचित टोचलं, तुझ्याबद्दल थोडी असूया वाटली.. की तु कित्ती लक्की तुला ते जुनं बुक सापडलं. Happy

आता प्लिज जपून ठेव.. खरंच अनमोल ठेवा आहे तो. Happy

कुठल्याही दहा ते पंधरा मिनिटांत वस्तू घेऊन दुकानाबाहेर पडलंच पाहिजे असा नियम मी तेव्हापासूनच आचरणात आणते बहुतेक.
>>>
नशिबवान आहे तुमचा नवरा. Happy

वाचतोय..

गद्य अतीशय मस्त लिहिता तुम्ही मी वाचतो अधून मधून तुमचा ब्लॉग
तुमच्याकडे एक स्टाईल आहे जी मला बहुतेक समजलीये ....पण त्यापेक्षा तुम्ही लिहिता ती ओळ न् ओळ मनापासून (दिलखुलास म्हणायला हवं नै !!...) म्हणून ते जास्त भावतं बहुतेक

अश्याच लिहीत रहा...........

शुभेच्छा !!!!!!

जाताजाता: तुमच्या ह्या लेखांचे एखादे पुस्तक आजवर निघाले नसेल तर सीरीयसली विचार करा व पुस्तक प्रकाशित कराच !!!....(जमल्यास मी पैसे खर्चून किमान एक प्रत विकत घेईन असे आश्वासन आताच देवून ठेवतो आहे Happy )

अजून एक : मी आयुष्यात कधीही स्लॅम बुक घेतले नाही मला त्याचा महिमा कधी समजलाच नाही आपला लेख वाचूनही मला मी ते घ्यायला हवे होते असे अजिबातच वाटले नाही पण तुमच्या मनोविश्वातील ही स्लॅम बुक मुळे झालेली अलाढाल मनाला हळवा आनंद देवून गेली त्याबद्दल धन्यवाद Happy

मस्त लिहिलं आहेस नंदिनी.
<<< अशा "क्रशित" म्हणजे माझा ज्यांच्यावर क्रश होता अशा मुलांनी लिहिल्यावर त्या पानांवर मस्त गुलाबी रंगाचे हार्टवाले स्टिकर चिकटवले होते. >>> काय डझनभर क्रश होते की काय ? Lol

एक रहें ईर, एक रहें बीर, एक रहें फत्ते
एक रहें हम...
ईर कहे स्लॅमबुक मा फोटू लगाय
बीर कहे स्लॅमबुक मा फोटू लगाय
फत्ते कहे स्लॅमबुक मा फोटू लगाय
हम कहा.. चलो हमाऊ स्लॅमबुक मा फोटू लगाय...
ईर लगाय तीन फोटू, बीर लगाय तीन फोटू, फत्ते लगाय तीन फोटू, हमार...
गोंद गिर गए...<<<<

वाह अँकी मस्त कविता अगदी टची !!!... कुणाचीये

स्लॅमबुक हे शीर्षक वाचल्यावरच एक स्मितहास्य आणि सोबत सगळ्या आठवणी. Happy

मी बनवलं नव्हतच.
पण कालीजात काही मित्रानी (मॅकेनिकल मध्ये पोरी शोधुन मिळायच्या नाहीत तेव्हा तरी) केलं होतं हे प्रकरण.
काय बाय लिहुन दिलेलं.
आठवतही नाही.

नंतर एका मैत्रीणीच्या स्लॅमबुक मध्येही बरच काहि लिहिल होतं.
मस्त सजावट वै केली होती.......... ते अजुनही घरी बघायला मिळतं अजुनही. Happy

माझ्या शालेय दिवसात एक अटोग्राफ बूक सुद्धा फॅशनमधे होते. आपल्या साध्या वहीच्या साधारण १/४ आकाराचे. फिकट निळी, गुलाबी, पिवळी अशी पाने असायची. त्यामधे मैत्रीणींना naughty (चावट??? ;)) messages लिहायची रीत होती Proud

अनू Happy

स्लॅमबूकं मीही अनेक भरली आणी भरूनही घेतली....
पण तीच स्लॅमबूकं माझ्या आयुष्याची सॅद स्टोरी बनल्याची जाणिव होतेअसल्यासारखं वाटत पुन्हा वाचताना Sad
कित्येक साथी सुटल्या... कारण अनेक.. परतायचे मार्ग बंद...
माझ्यासाठी स्लॅमबूक ही एक दु:खी कल्पना आहे Sad

नंदिनी, तू लेख मस्त लिहिलायेस.. ... पण सगळे बंद केले कप्पे उघडलेस या लेखातून हे मात्र नक्की.

(या आधी एकदा ब्लॉगवर हाच लेख वाचायचा प्रय्त्न केलेला पण हटकून मध्येच सोडून दिलेला.. काल वाचला )

आम्ही 'कन्फेशन बुक' म्हणायचो. खूप मस्त सजावट, चित्रकला, शायरी- काय्काय असायचं! आणि वर म्हणलंय तशी, एक ऑटोग्राफ बुकही असायची. मज्जा होती.

नंदिनी,स्मरणरंजनात नेणारे लेखन. आवडले.

माझ्या वेळी ( अबब अशी वेळ आली का Happy ) डायरी ही एक महत्वाची सखी, कविता-ओळींच्या महिरपीची, मनोगताची, केलेले अन बिघडलेले प्लॅन्स साठवणारी पेटीच ती , त्यातच चिकटवलेली कात्रणे, छायाचित्रे,वाचलेल्या पुस्तकांवरची शिष्ट मते,वयाच्या आवेशातली विधाने,अगदी शाईच्या ठशातही दडलेल्या स्मृती.आत्मसंवादच सगळा,पण हव्याशा सुहृदांसाठी दारे किलकिली केलेली त्या डायर्‍यांची अन एक दुसरी पायवाट चक्क पोस्ट्पेटीतून पाठवलेल्या आलेल्या पत्रांची..त्यांचीही गोडी अवीट होती.

Pages