चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर
...धारेवरचा उभा चढ चढताना घामानं अक्षरशः निथळत होतो. पाठपिशवीचं वजन प्रत्येकी द..हा.. द..हा.. मण नक्की असणार, यावर एकमत झालेलं. झाडो-यातून वाट प्रथमंच मोकळ्यावर आली, म्हणजे चला - अजून एक ब्रेक घ्यायला निमित्तच! मागं वळून पाहिलं, तर थक्कंच झालो. करकरीत उठवलेली सुळक्यांची जोडगोळी, अनंत सोंडा-धारांसोबत कोकणात कोसळणारे कातळकडे, ओढ्या-नाल्यांच्या घळी, पल्याड मोठ्या भाविकतेनं जपलेल्या ‘देवराई’ तले जुने जाणते वृक्ष अन् गुरफटलेल्या वेली असं सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून (नेहेमीप्रमाणेच) वेड लावणारं दृश्य पाहत असतांनाच; अचानक एक ‘शिक्रा’ पक्षी शिकारीच्या शोधात लपेटदार उसळी मारून, कातळभिंतीच्या अश्या एका टोकावर पोहोचतो, की त्या पक्ष्याचा मनस्वी हेवांच वाटावा...
... कोण्या गिरीजनांचा आवाज पाच तासांच्या चालीनंतर प्रथमंच कानी पडला.
- ‘‘काय पाव्हणं, कोण गाव?’’, कोयत्याची मूठ घट्ट करत बसलेले लाकूडतोडे दादा.
- ‘‘आम्ही चौघं पुण्याचे’’
- “पर, म्या म्हनतो, निगालात कुणीकडं?”
- “चाललोय जुन्नरहून भीमाशंकरला”
- “आरं, पण हिकडनं कुठनं रानातनं?”
- “आम्ही निघालोय डोंगरवाटांनी. जुन्नरवरून चावंड किल्ला बघून कुकडेश्वराचं दर्शन घेतलं. मग ढाकोबा-दुर्गच्या परवानगीनं, आहुपे घाटानं इथं कोकणात उतरलोय.. आता गोरखगड-सिद्धगडांना भेटून, सिद्धगड घाटानं भीमाशंकर गाठायचंय”
- ‘‘आरारा...एवढी शिकलेली मानसं तुम्ही. या बंबाळ्या रानातनं ४-५ दिवस तंगडतोड करण्यापेक्षा, जुन्नरहून भीमाशंकरास्नि थेट एस्. टी. बसनी जायचं की २ तासांत!’’ - सारेच लाकुडतोडे खदाखदा हसत सुटले.
कर्म आमचं, अजून काय म्हणावं.. रानोमाळ भिरीभिरी भटकायचं हे व्रतंच आशुतोष कुलकर्णी, अमित चिल्का, अभिजीत देसले आणि मी हौसेनं स्विकारलेलं. पल्ला लांबचा होता - ५ दिवसांचा, ६० - ७० किमीचा, खडतर, भन्नाट अन् कसदार सह्यभटकंतीचा!!!
कुकडनेराचा काळाकभिन्न पहारेकरी - दुर्ग चावंड
सुरुवात केली जुन्नरपासून! गावात यजमान शिवनेरीनं मायेनं विचारपूस केली. राजांच्या जन्मस्थळाला दूरूनंच मुजरा करून, आम्ही आंजनावळे गाडी पकडली. वळणांवळणांचा रस्ता शिवनेरीला वळसा घालून, आपटाळे मागे टाकत पूर फाट्याला घेऊन गेला. पाठपिशव्या खाली उतरवल्या, तर समोर दुर्ग चावंड उर्फ प्रसन्नगड उर्फ जूड उन्हात तळपत उभा.
चोहोबाजूंनी ३०-४० मी उभे तुटलेले कातळकडे, हीच गडाची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा. पण मग आता वाट कशी असायची? पायथ्याशी एका मामांनी वाट दाखवली. पर्जन्यांत मनमुराद घुमणा-या वर्षाधारांनी अन् ओहोळांनी गडाचा कडा एक्या ठिकाणी चिरून काढलेला. वाट अर्थातच तिथूनच.
जवळंच कुकडेश्वरापाशी कुकडी नदीचा उगम आहे. उत्तरेला जरी कुकडीला माणिकडोह जलाशयानं अडवलं असलं, तरी उगमापासची ही अल्लड, अवखळ कुकडी शंभू डोंगर नि चावंडच्या पायथ्यांपासून खळाळत निघते. शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याकरता याच परिसरातल्या जीवधन किल्ल्यावर प्रयत्न केले होते. त्यामुळे माणिकडोह जलाशयाला 'शहाजीसागर' असे नामकरण करण्यात आले आहे. तर या खो-याला 'कुकडनेर' असं म्हणतात.
कुकडी नदीवरचा पूल ओलांडून आम्ही चावंडवाडी गाठली. वळणांवळणांची वाट कातळकड्यांपाशी पोहोचली. घळीत कातळकोरीव गुढघ्याएवढ्या उंच पाय-या. १८१८ च्या आक्रमणात इंग्रजांनी या वाटेची चांगलीच 'वाट' लावली. स्वराज्याचं बलस्थान असलेल्या दुर्गांना निकामी करण्यासाठी ही युक्ती होती. पुढं गावकरी तुटक्या तोफेच्या अन् दोराच्या साह्यानं गडावर चढत. सध्या आधारासाठी तुटकं रेलिंग आहे. पायथ्यापासून आत्तापर्यंत गडाचं प्रवेशद्वार दृष्टीक्षेपात पडलं नव्हतं. द्वार हा गडाचा सर्वात कमजोर भाग असतो. त्यामुळे तो कातळाआड दडवलेला. अन त्यामुळेच तोफांच्या मा-यापासून तो बचावलेला. द्वारावरील गणेशपट्टीनं अन भणाणणा-या वा-यानं गडावर स्वागत केलं.
गडावर मोठा गवताळ माथा अन् काटे-कुटे माजलेले. वाट काढत चावंडाबाई देवीचं राऊळ गाठलं. भाविकांना देवीची बहुदा नवरात्रालाच आठवण येत असावी, इतकी दुर्लक्षित जागा. १०६५ मी. उंचीच्या माथ्यावरून चौफेर दृष्य सामोरं आलं. पश्चिमेकडील सातवाहन कालीन नाणेघाटाकडून जुन्नरकडे वाहणा-या व्यापारी मार्गाच्या संरक्षणाकरता कुकडनेरात कुकडी खो-यात चावंड वसला आहे. उत्तरेला हडसर, निमगिरी, हटकेश्वर, हरिश्चंद्रगड दर्शन देतात. शिवनेरी, हडसर डोंगरांच्या दाटीत लपतात. नैॠत्येला ढाकोबानं आपली मान इतर डोंगरांपेक्षा उंचावली होती.
गवताळ उतारावरून पठारावरील विपुल प्रमाणात असलेली टाकी, काही ठिकाणी प्राकार-तट पाहत एकास एक बिलगलेल्या पाण्याच्या ७ टाक्यांजवळ पोहोचलो. खरंतर दुर्गस्थापत्याचा विचार केला, तर अशी टाकी पाण्याची सोय करण्यासोबतंच, दुर्गबांधणीतील कच्च्या मालाच्या - काळ्या दगडाच्या - खाणीच. त्यामुळे अशी टाकी तटबंदीच्या जवळ असायची. चावंडची टाकी खोदताना सौंदर्यदृष्टीनं खोदकाम केलं आहे. जवळची एक कमान वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडाचा निरोप घेतला. पूर फाट्यावर परतलो. चावंडच्या चढाईमुळे, पुढे सलग ५ दिवस प्रदीर्घ चढाई-उतराई करायला आमच्या तुकडीचा सराव झाला.
डोंगरझाडीत दडलेलं कातळकोरीव वैभव - कुकडेश्वर
पूर फाट्यापासून अर्ध्या तासावर एक देखणं आकर्षण दाट झाडीत दडलं होतं - श्री कुकडेश्वराचं नवव्या शतकातील शिलाहारवंशीय झंझराजानं उभारलेलं शिवालय! शंकर-पार्वती, गणपती, देवी, कुबेर, यक्ष, श्रीफल, कीर्तिमुखे, वराह, वेलबुट्टी, शिवतांडव शिल्प, नागाशिळा, नृत्यसुंदरी - असं ठायी-ठायी कोरीव काम केलेलं हे देखणं मंदिर आहे. मंदिराजवळची वृद्ध अस्थिपंजर स्त्रियांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिर बरंच ढासळलं होतं. संपूर्ण मंदिरावर पत्र्याचं छत घालून, त्यावर दगड रचून ठेवले होते. (मंदिराच्या जीर्णोदधाराचं काम २००९ मध्ये चालू होतं.) शिल्पांवर ‘आपल्या बाळास पोलिओ डोस अवश्य द्या’, असे संदेश ऑईलपेंटनं लिहिलेले बघून आम्ही वैतागलोच. गाभा-यात कुकडेश्वराच्या पायी पडलो, अन् ‘शंभो शंकरा’ गीतानं कुकडेश्वरास आळवलं.
बाहेर पिंपळाच्या वृक्षाखाली तुकारामांच्या प्रसन्न मूर्तीजवळ, कुकडीचं ‘ताजं’ पाणी कुंडात पडत होतं. मंदिरामागल्या धर्मशाळेत आमचा मुक्काम होता. अमितनं पावभाजीची पाकसिद्धी जमवली होती. वाह, अजून काय पाहिजे! आकाशात असंख्य तारकासमुहांनी फेर धरलेला. अवचितच उल्का निसटत होत्या अन् क्षणभरच तेजाळून लुप्त होत होत्या. पांघरूणाच्या ऊबेमुळे एकदम झ्याक ताणून दिली...
ढाकोबा शिखराचा अद्वितीय कोकणकडा
दिवस दुसरा. कुकडेश्वराचं दर्शन घेऊन निघायची तयारी केली. शंभू डोंगराला पाठीमागे सोडून, मंदिरामागच्या ठळक वाटेनं अर्ध्या-पाऊण तासात खिंड अन् पुढं आंबोली गाव गाठलं. कुकडी खो-यातून आता आम्ही मीना खो-यात उतरलो होतो. आंबोली तसं ब-यापैकी गाव. शेती अन् दूधदूभतं हे मुख्य उद्योग. जुन्नरहून एस्टीनं इथं थेट येऊन डोंगरयात्रा सुरू करता येते.
गावातून ढाकोबा शिखराचा कातळमाथा आणि त्याच्या पोटातल्या तीन गुहा लक्षवेधक होत्या. ढाकोबाच्या पोटातल्या या ३ गुहांपासून वाट वर माथ्यावर जाते. पावसाळ्यात हल्ली इकडं बरेच पर्यटक येतात. गावातून रस्ता सरळ आंबोली/ दा-या घाटाकडे निघतो. हा रस्ता पक्का करून जुन्नर-मुंबई अंतर कमी करण्याचे प्रयत्न चालू होते. तशा कोनशिलाही दिसतात. व्यापारवृद्धीबरोबरच माळशेज घाटावरचा ताण कमी होईल. अर्थात भौगोलिकदृष्ट्या हा घाट रस्त्याजोगा वाटत नाही, कारण खाली कोकण ८०० मी. खोलवर आहे. घाटवाट खूप तीव्र उताराची आहे, अन् रस्ता उतरवायला ठळक सोंडही नाही.
आंबोली गावच्या एका मामांनी डावीकडील ढाकोबाच्या वाटेला लावून दिलं. शेतांतून - शिवारांतून गवताच्या ऊंड्या बाजूला ठेवत, आंबोली/ दा-या घाटाकडे जाणारी वाट सोडून, आता ढाकोबाची चढण चढू लागलो. तासाभरात वरच्या गुहांपाशी अन् १५ मिनिटांत वर पठारावर पोहोचलो. समोर ढाकोबा अन् डावीकडे दुर्ग दिसत होते. वाटेबद्दल खात्री वाटेना, पण सुदैवानं लाकूडतोड्या बाया भेटल्या.
त्यांच्या सांगण्यावरून डावीकडील दांडावरून ढाकोबाकडे निघालो. सदाहरित जंगलाच्या टप्प्यांवर दुतर्फा नेच्याची दाटी होती. वाटेवर ओलावा अन् हवेत सुखद गारवा होता. काही क्षण थांबून त्या आसमंताचा मनमुरादपणे ‘अनुभव’ घेतला. सह्यधारेवर फारच थोड्या जागी उरलेल्या अश्या सदाहरित ‘ठेव्या’चं जतन आवश्यक आहे. इथून पुढं ढाकोबाकडे वाट अशी नाहीच. कातळकड्याखाली तिरप्या कातळावर घसारा अन् बुटकी झुडपं माजलेली.
माथा गाठला, अन् क्षणभर नजरच फिरली. कारण नजर एकदम कोसळली थेट ११०० मी खोलवर कोकणात. याचा कातळकडा जसा प्रेक्षणीय, तसंच ढाकोबावरून सहयाद्रीचं होणारं विराट दर्शनही! १२६४मी. उंचीचा ढाकोबाचा माथा म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य रांगेतलं मुख्य शिखर आहे. 'आरोहक' संस्थेच्या गिर्यारोहकांनी ढाकोबाची ११०० मी. उंची थेट कोकणातून कातळभिंत चढून गाठली आहे. पश्चिमेला कोकण, पूर्वेचं मीना खोरं, उत्तरेला कळसूबाई रांगेपासून रतनगड, हरिश्चंद्रगड, नाणेघाट, नानाचा अंगठा, जीवधन, वानरलिंगी, आजोबा. ईशान्येस चावंड, दक्षिणेस कोकणात बुटके गोरखगड-मच्छिंद्र, आग्नेयेस दुर्ग असा विपुल प्रदेश नजरेत केवळ मावतच नाही.
ठिकाण मोक्याचं असलं, तरी इथं दुर्ग बांधला नाहीये. कारण शिखरमाथा अगदीच अपुर, उतरत्या कातळाचा आहे. पाण्याचा अभाव आहे. जवळून जाणारे डोणी द्वार अन् दा-या घाट हे तसे कमी महत्वाचे घाट. आपण मात्र सह्याद्रीतलं आगळं शिखर म्हणून अवश्य भेट द्यायची.
आल्या वाटेनं खाली पठारावर आलो. मीना खो-यातील इंगरूळ जवळील भिवाडे गावच्या लाकुडतोड्यांनी ढाकोबा मंदिराची वाट दाखवली. ढाकोबा शिखराच्या आग्नेय पायथ्याला कोरीव महिरप केलेल्या चौसोपी राऊळात वसलाय ढाकोबा देव! चौसोपी, कौलारू मंदिर अन् आत शेंदूर चर्चित गुळगुळीत देव. देव्हा-याला लाकडी कोरीव काम केलेली महिरप होती. नवसासाठी वाहिलेल्या असंख्य घंटा होत्या. भोळ्या भक्तिभावानं नवस करणार्या गिरीजनांच्या व्यथा दूर करणारी अशी अनेक जागृत देवस्थाने सह्याद्रीच्या दुर्गम भागात आपल्याला बघायला मिळतात. मंदिराजवळ खूप भुंगे घोंगावत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पॅकलंच व त्यावर लिंबू सरबत रिचवलं. मंदिराजवळ चांगलं पाणी मिळालं नाही.
'दुर्ग' - गर्द झाडो-यातला दुर्गम कातळदुर्ग, अन् दुर्गादेवीची देवराई
आता आम्हाला ‘दुर्ग’ नावाच्या किल्ल्यावर पोहोचायचं होतं. ढाकोबा - दुर्ग परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे, हा सह्याद्रीचा अंतर्भाग आहे. त्यामुळे वाटा सहजपणे सापडत नाहीत. डोंगरावर माणसंही तुरळकच सापडणार. ढाकोबा मंदिरापासून दुर्गची वाट कशी असावी हे ध्यानी येईना. ढाकोबा मंदिरापासून दुर्गला जाण्यासाठी उत्तरेच्या चढावरून जाणारी पावठी केवळ ढाकोबाच्या कृपेनेच सापडली. मंदिरामागून उत्तरेकडून चढावरून ही वाट पुढं मोकळवनात घेऊन गेली.
ढाकोबा आता आमच्या वायव्येस होता. ढाकोबाच्या या पठारावरूनच मीना नदी उगम पावते, असे मानतात. भात सांडणा-यांच्या सांगण्यावरून उतारावरून पुढं ओढ्यापाशी गेलो.
नितळ स्फटिक जल! खरंच पाण्याला ‘‘जीवन’’ का म्हणायचं, हे एखाद्या ट्रेकमध्येच कळायचं. पोट भरेस्तोवर पाणी पिऊन घेतलं. इथून दुर्गवाडीची वाट असंख्य डोंगरा-दांडांवरून उड्या मारत, शेवटी उभा चढ चढत पठारावर पोहोचली. दुर्गच्या या पठारावर पोहोचायला ढाकोबा मंदिरापासून २ तास लागले होते.
डावीकडची दुर्गवाडी सोडून आम्ही दुर्गला उजवीकडून वळसा घालत दुर्गमाऊलीचे राऊळ गाठलं. दुर्गमाथा इथून हाकेच्या अंतरावर आहे.
दुर्ग म्हणजे काळ्या कातळांचा नुसता समूह. दुर्गला ‘दुर्ग’ म्हणण्यासारखं इथं काहीच नाही. तटबंदी, पाण्याची खोदीव टाकी, जुन्या वास्तूंचे अवशेष, मेटं, मंदिरं, तोफा, बुरूज, कोरीव गुहा, शिलालेख...असं गडाचं गडपण सांगणारं इथं काहीच नाही. पण दुर्ग म्हणजे 'दुर्गम: इति दुर्ग:' ही व्याख्या नक्कीच लागू आहे. कोणत्याही वाटेनं इथं पोहोचायला डोंगरद-यांतून प्रदीर्घ चाल, अन् पूर्ण दिवस लागतोच. दुर्गच्या कातळमाथ्यावरून चहुंबाजूस डोंगरद-या-झाडांची विलक्षण रचना दिसते. माथ्यावर कातळावर पाणी वाहून जाण्याकरता पन्हळीसारख्या खुणा, आसरा निर्माण करण्यासाठी खांब उभे करण्यासाठी खड्ड्यांच्या खुणा आहेत. अर्थात या मानवनिर्मित की नैसर्गिक हे ठरवणं कठीणच! पण हा दुर्ग समोरच्या खुंटीदार या अवघड घाटाचा रक्षक. घाट तसा दुय्यम, त्यामुळे गडही दुर्लक्षिलेला.
नियोजित कार्यक्रमानुसार मुक्कामासाठी आणखी तासभर अंतरावर असलेल्या हातवीज गावी पोहोचायला हवं होतं. घनदाट पण शांत देवराईमधल्या दुर्गा देवीच्या मंदिरातल्या शांततेनं अन् पावित्र्यानं आम्हाला तिथेच खिळवून ठेवलं. मंदिराचा पुढचा भाग नेच्यानं शाकारलेला. ढाकोबासारखंच हे दुर्गादेवीचं अनगड स्थान आहे. मूर्ती वगैरे नाहीच, तर शेंदूर फासलेलं हे देवीचं स्थान. राहताना त्या स्थानाचं पावित्र्य, स्वच्छता ढळणार नाही, याचं भान ठेवलं. निवांत गप्पा रंगल्या. झपाट्यानं अंधार अन् गारवा दाटत गेला.
गेल्या दोन दिवसातली दमदार चाल, मैलोनमैल चालायला सरावलेले पाय अन् वजनास सरावलेले खांदे, सह्याद्रीच्या अंतर्भागात दडलेली दुर्गम गिरीस्थळे, ताकदीनं रानवाटा तुडवायला मित्रांची साथ, गरमागरम रुचकर जेवण, ढाकोबा-दुर्गामाईची माया, दात थडथडवणारी थंडी.... एकंदर काय, ट्रेकची ‘मस्ती’ अंगात चांगलीच भिनू लागली होती.. लयं खास!!!!!!
(पूर्वार्ध)
ऋणनिर्देश: काही प्रकाशचित्रांचे श्रेय श्री. अमित चिल्का यांना आहे.
वाचा उत्तरार्ध इथे: http://www.maayboli.com/node/41982
--- Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
भन्नाट आहात तुम्ही लोक्स.
भन्नाट आहात तुम्ही लोक्स.
जबरी
जबरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच भारी आहात तुम्ही सर्व
खरंच भारी आहात तुम्ही सर्व ........ दंडवतच बाबांनो.....
तो नकाशा दिलाय त्यामुळे काही बाही कल्पना येतीये .........
अजून प्र चि हव्या होत्या....
सुरेख लिहिलंय!
सुरेख लिहिलंय!
मस्तच. असा ४-५ दिवसांचा रट्टा
मस्तच. असा ४-५ दिवसांचा रट्टा मारणारा ट्रेक करायला आवडेल.
भन्नाट भटकंती !
भन्नाट भटकंती !
खूपच छान ! नेहमीप्रमाणे पुढील
खूपच छान ! नेहमीप्रमाणे पुढील भाग वाचण्यास उत्सुक !
लईच भारी
लईच भारी
भन्नाट भटकंती...
भन्नाट भटकंती... सह्याद्रीच्या या अंतर्भागाचे दर्शन कधी झाले नव्हते.
सालं हे खरं ट्रेकींग!.. २०११
सालं हे खरं ट्रेकींग!.. २०११ च्या सह्यांकनाचा मार्ग थोड्याफार फरकाने हाच होता. त्याबद्दल आनंदयात्रीने सविस्तर लिहिलेच आहे. पण सगळं स्वतः करुन ४-५ दिवस अशी भटकंती करणाराच खरा गिर्यारोहक! .. बाकी सगळे दुर्गपर्यटक!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशी भटकंती करणारे हल्ली दुर्मिळ झाले आहेत. या धाग्यामुळे इथल्या वाचकांच्या पायांना उकळ्या फुटूदेत हीच ढाकोबाचरणी प्रार्थना! खूप धन्यवाद.
हेम + १ साईप्रकाशाने नकाशा
हेम + १
साईप्रकाशाने नकाशा वगैरे जे आखलेय तेच एकदम आवडलेय..
यो, अरे पाळंदेकाकांचा चेला
यो, अरे पाळंदेकाकांचा चेला आहे तो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच !
छानच !
खरंच भारी आहात तुम्ही सर्व
खरंच भारी आहात तुम्ही सर्व ........ दंडवतच बाबांनो....>>>>>>+++++++++++१११११११११११
@vinayakparanjpe, @झकासराव, @
@vinayakparanjpe,
@झकासराव,
@शैलजा,
@दिनेशदा,
@गिरीजा,
@Srd,
@सृष्टी,
भटकंतीतले साधे-सोप्पे अनुभव तुम्हाला भावले, हे वाचून आनंद झाला.. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप खूप धन्यवाद!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@पुरंदरे शशांक: प्रचि कमी
@पुरंदरे शशांक:
दुर्दैवानं एवढेच प्र चि आहेत माझ्याकडे...
प्रचि कमी आहेत, हे एकदम मान्य, क्षमस्व
@Yo.Rocks: उत्तरार्धाच्या
@Yo.Rocks:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्तरार्धाच्या लेखाच्या ‘मिसळी’ला उकळी येऊ लागलीये.. लवकरंच serve करतो...
@आऊटडोअर्स: @इंद्रधनुष्य: @हे
@आऊटडोअर्स:
@इंद्रधनुष्य:
@हेम:
तुम्ही मनातलं बोललात.. कार काढायची, छोटे २-३ ट्रेक काढले, की ढाकोबा, दुर्ग, गोरख, सिद्ध असा ‘count’ रपारप वाढतोच..
पण, उमगलंय की सह्याद्रीचा अंतर्भाग, गिरीजन, आपली कुवत याची खरी ओळख, खरी सणसणीत अनुभूती आहे, ते ४-५ दिवस सलग ट्रेक करतानाच!!!
मान्य की, रोजच्या व्यस्त कामांमुळे, जबाबदा-यांमुळे मोठ्या ट्रेकसाठी वेळ काढणं जिकीरीचं असतं..
पण, निदान मुख्य सह्याद्री रांगेतले किल्ले अन् घाटवाटा हे मात्र compulsory एकत्र ३-४ दिवस वेळ काढूनंच बघायचे, असा प्रयत्न करायचा...
धन्यवाद!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर लिहिलय. अजून येउद्या.
सुंदर लिहिलय. अजून येउद्या.
व्वा लय भारी.. अशी भन्नाट
व्वा लय भारी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशी भन्नाट भटकंती करायला आवडेल.
हेम +१०! मानलं तुम्हाला आणि
हेम +१०!
मानलं तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसतं वाचूनच कस्स्स्स्स्लं
नुसतं वाचूनच कस्स्स्स्स्लं नॉस्टॅल्जिक व्हायला झालं राव मला...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
यातला दुर्ग ढाकोबा आम्ही सह्यांकन २०११ च्या वेळी केला होताच... तो नाणेघाटाच्या पठाराचा फोटो आपला सेम टू सेम आलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@आनंदयात्री: तुमचे
@आनंदयात्री: तुमचे सह्यांकनाचे अनुभव ही फारंच जबरदस्त!!!!
ढाकोबावरून दिसणारं दृश्य खरंच वेड लावणारं..
खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून...
@kaushiknagarkar @रोहित ..एक
@kaushiknagarkar![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@रोहित ..एक मावळा
@वैद्यबुवा
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप खूप धन्यवाद!