विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

Submitted by बस्के on 11 September, 2012 - 06:49

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय.. 
ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला..

मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे मायबोलीवर, फेसबुकवर. गप बसून वाचलं असतंस तर मार्क झुकरबर्ग शिक्षा करणार होता का? का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? इतकं कसं या गोष्टींमध्ये वाहवून जायचे. इतकं कसं टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन? कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या दिसतोय ना? अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर होण्याइतपत मन घुटमळतंय इथेतिथे! घुसमट. घुसमट नुसती! का कशाला कोण जाणे. हा जो उगीच ताण जाणावतो कधी कधी, तो काय आहे? कशाचा आहे.. काही लोकं नक्कीच सुख बोचते वगैरे टर्म्स वापरू शकतात. Happy पण खरंच मला माहितीच्या विस्फोटाचा ताण खूप जाणवतो.

आमच्या पिढीने(80s) प्रचंड प्रमाणात काळाचा वेग अनुभवला. आमचं लहानपण बरंचसं सिधेसाधे गेले. शाळा,अभ्यास, खेळ, दंगा मस्ती.. अधून मधून घरच्या आईसक्रिमपार्ट्या, कधीतरी सिनेमा. भाषा कळत नसताना बघितलेल्या स्मॉल वंडर, डिफरंट स्ट्रोक्स सारख्या सिरीयल्स. दूरदर्शन फक्त होते तेही दिवस आठवतायत मला. इतकंच काय, खूप पूर्वी एक जैन टीव्ही म्हणून चॅनल असायचा केबलवर. तोही आठवतोय मला.. काहीही गोष्टी. इतक्या साध्या व सुंदर होत्या ना. आणि तितक्याच खूप क्षुल्लक. इतक्या क्षुल्लक की आणखी ४-५ वर्षात कदाचित मी पार विसरून जाईन त्यांना - जर त्या आठवणी जागत्या ठेवल्या नाहीत तर. कारण. काळ. मागच्या पिढीत काळ ज्या वेगाने धावला त्यापेक्षा प्रचंड फास्ट काळ धावतोय आता. वर्ष दोन वर्षात सगळ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी गोष्टींचे नवीन मॉडेल्स/अपग्रेड होऊन आपल्याकडची गोष्ट मागे पडते. ५ वर्षापूर्वी आम्ही डिजिटल कॅमेरा घेतला. खूप सर्च करून, डिल्स मिळवून. १५०डॉ ला ८मेगापिक्सलचा ६एक्स ऑप्टीकलझूमचा कॅनन. पुढील २ वर्षात कॅमेरा म्हणजे खेळणं होणं बाकी होतं. लॅपटॉप बद्दल बोलायलाच नको.

किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? गुगल पूर्वीचे दिवस काय होते ते आठवले तर our version of Arabian nights असावे इतकी सुरस वाटेल. एखादी गोष्ट माहीत नसेल तर चक्क आपण त्या तश्या अज्ञानात झोपायचो? झोप लागायची आणि? हो हो ! कितीतरी शांत लागायची.
मग आता काय अडलंय .. नाही कळलं अर्धाच घसा का दुखतोय. नाही कळले थायरॉईड, फॉर दॅट मॅटर जगातल्या प्रत्येक कंडीशनचे सिम्प्टम्स आणि मी नाही स्वत:ला त्यात बसवून पाहीले. नाही कळते पोटातल्या बाळाचे प्रत्येक दिवसाचे माईलस्टोन्स. नाही मी शोधली घरातील यच्चयावत प्लंबिंग/कुकींग/फायनान्स-बजेटींग आणि व्हॉट नॉट अडचणींवरची उत्तरं.. नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं ..   नाही आत्ताच्या आत्ता कळलं आत्ता झालेला भूकंप किती रिश्च्टर स्केलचा होता. काय बिघडतं? नाही.. खरंच माणसाने क्युरिअस असावे किंवा ज्ञान मिळवावे वगैरे सगळं ठिक आहे. पण खरंच किती गोष्टी आपण वाचतो/वाचायला जातो ज्याची खरंच गरज असते. की आपण डोक्यात अनावश्यक कचरा निर्माण करतोय. कारण ती प्रत्येक गोष्ट कधीनाकधीतरी डोकं वर काढून आपलं (आपल्या डोक्यातले) अस्तित्व दाखवून देतेच. ताण ! ताण येतो मला माझ्या मनातल्या विचारांचा. माहितीच्या स्फोटाचा ताण येतो. आई बाबा पिढीचे बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातले बर्‍याच टेक्निकल गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्यास स्किपच होतात. आपलं नाही ना तसं. मुद्दमहून शिक्षण घेतलंय या सगळ्याचं..कळतंच बरचसं. नाही कळलं तर कळून घेण्याची धडपड सुरू. कधी कधी वाटतं कम्प्लेसंट असावं ब्वॉ माणसाने. निदान आपल्याला आपल्या जिज्ञासेचा त्रास होतोय हे जाणवलं तरी कम्प्लेसंट व्हायला शिकावे. पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय नि ज्ञान काय. किती हवंय, झेपतंय हे पाहूनच झोळीत घ्यावं.

अमेझॉन किंडलवर खूप मस्त पुस्तकं फ्री किंवा अगदी मामुली किंमतीत मिळतात. आयट्युन यु मध्ये अनेक उत्तम युनिव्हर्सिटीजमधले कोर्सेस फुकटात मिळतात. सुरवातीला मी एक पुस्तक/कोर्स घ्यायचे, वाचून काढायचे. आता तसं नाही. किंडलवर अधून मधून चेक करत राहीले की पुस्तकं फ्री मिळतात अगदी १५डॉ. ची सुद्धा! त्यामुळे सतत डील्स पाहणे सुरू. अरे खरंच हवी आहेत का पण. Happy
पुस्तकं जाऊद्या! ती निदान प्रत्यक्ष दिसतात तरी! या आठवणींचे काय करायचे? कधी कधी त्या उगीचच दातात अडकलेल्या कणासारख्या डोक्यात फिट्ट बसलेल्या असतात. त्यांचे काय काम ? त्या आठवून दोन क्षण आनंदात जाऊन तुम्ही परत जोमाने कामाला लागता का? नाही! बर्‍याचदा त्या आठवणी आपल्या खिन्न्च करून टाकतात. ते जुने दिवस आठवतात. मन पण असं येडचॅप असते, त्याच्यासाठी जुने  सगळे सोनेच! मग कसं त्या मेमरीज वाईप आउट करणार. राहूदे मग.. कपड्यांच्या कप्प्यासारखे  मन आवरायला काढता आले पाहीजे. आज फक्त शाळेचा कप्पा आवरायचा मनातला. जे जे काही आठवतंय त्यातले उपयोगाचे ठेवायचे. ही मात्र अवघड स्टेप. मन हे जात्याच होर्डर प्रवृत्तीचे. सगळं ठेवू पाहणार. नो वेज! हे नाही केले तर मग कपाट ओसंडून वाहणार. आत्ता रिसेंट साईझ ८ असताना साईझ ४ ची जीन्स समोर येणार. मग मी कशी साईझ ४ची जीन्स वापरू शकत होते म्हणून सॅड व्हायचे.. हेच सगळं मनातील आठवणींबरोबर. डिमेन्शिया झालेला ब्रेन जसा कुठल्या तरी भलत्याच काळात रमतो, तीच गत. मनाने गपचुप वर्तमानकाळात राहणे का बरं इतकं अवघड? आहे म्हणा अवघड. जिवंत असण्याचे प्रतीक म्हणजे श्वासोच्छ्वास. आपण बाळ असताना श्वास नीट पोटापासून घेत असतो. आता तसा श्वास घ्यायला योगा/ध्यान करावे लागते! :।  कधी वरच्यावर श्वास घेणे सुरू झाले? मला वाटते जेव्हा मागे तो अदृश्य वाघ मागे लावून घेतला आपण तेव्हाच. डॉ. बंगाच्या पुस्तकातील क्षणस्थ होणे म्हणजे .. डोक्यावरून पाणी. मला तरी वाटतेय की ते शक्यच होत नाही. निदान पूर्वीच्या काळात शक्य असावे. या आताच्या गुगलच्या जमान्यात ? nope, nada!!   Happy

मी काही माहीती तंत्रद्न्द्यानाच्या/गुगलच्या विरोधात नाहीये. मी माणसाच्या जिद्न्यासेमुळे त्या  असमाधानीपणाकडे झुकणार्‍या मनस्थितीबद्दल बोलत आहे. कधी कधी मला वाटतं, मला जास्तच उगीच प्रश्न पडत आहेत. (हीच बरं ती जास्तीची , खरं म्हणजे नकोच असलेली जिद्न्यासा!) आता काय करायचे? सगळ्या मटेरिअलिस्टीक जगाची हाव सोडून, मिनिमलिस्ट लाईफस्टाईल जरी तुम्ही एक्झिबिट केलीत तरी त्यानंतर तुम्हाला निर्गुणत्वाचा, मी म्हणजे काय, माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय इत्यादी विचारांची हाव पडली तर काय?! ती हाव तर फारच वाईट हो. प्रश्नांच्या गराड्यात पडू, त्या मार्‍यात थपडा खाऊ पण उत्तरं मिळत नाहीतच वरून स्पिरिचुअल असमाधान. थोडक्यात अवघड आहे! कदाचित अती तिथे माती हेच खरं. असतील अशा असामी ज्यांना मटेरिअलिस्टीक व स्पिरिचुअल जग याचा पर्फेक्ट तोल साधता आला असेल. तीच खरी सुखी लोकं! माझ्यासारख्यांनी काय करायचे? जाऊदे अवघड आहे हा शोध!  गुगलच करावे. मिळेल उत्तर! Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे प्रश्न पडायलाच हवेत. ऐसा मेरेको लगताय.
मायबोली सोडली तर तसे मला स्क्रीनव्यसन कमी आहे तरी तोही वेळ कमी करणे यावर खरंच काम करणार आहे. Happy

छान लिहिले आहेस तू.

प्रथम इलेट्रॉन्किस गॅझेट आपल्यासाठी होते... आता आपण त्याचासाठी आहे असं वाटतं... मी गेले दोन आठवडे Android Phones for Dummies वाचतोय... माझा Android Phone कसा हाताळयचा म्हणून...

ओ म्याडम, काहून असले औघड-औघड प्रश्न इचारता? Proud

पैकी काही गोष्टींबद्दल उपाययोजना केल्या आहेत. उदा. माझ्या फोनवरून फक्त बोलणं आणि समस इतकच करता येतं. त्यामुळे बाहेर असलो तर आपोआप इंटरनेटपासून सुटका मिळते. नवीन फोन का घ्यावा याबाबत अजून मला समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. दर मिनिटाला कनेक्टेड राहण्याची गरज मला तरी वाटत नाही.
टैमपासचे जे पर्याय आहेत त्यात वाचनाचा क्रमांक बराच वर आहे, टिव्ही नाही त्यामुळे मालिकांपासून सुटका. वाचतानाही पन्नासाव्या पानापर्यंत पुस्तकात राम-सीता-अंगद-जांबुवंत दिसले नाहीत तर निर्लज्जपणे सोडून देतो, मग भले तो लेखक कितीही प्रतिभावंत का असेना.

बाकीचे प्रश्न लय औघडेत आणि त्यांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतात. ज्यानं-त्यानं-जिनं-तिनं आपापली शोधायची. Happy

बस्कु! प्रत्येक शब्दाला अगदी अगदी म्हणायला झालय!! मेरे मुंहकी बात छीन ली वगेरे वगेरे.
पण चिल! जरा थांब, मोठ्ठा श्वास घे. कॉफीचा घोट घे. जमल्यास नॅप काढ. मग विचार केलास तरी चालेल Happy

शब्दा-शब्दाला अनुमोदन !

म्हणून मध्ये मायबोलीवर येण्याचे कमी केले. काही फरक पडला नाही. इंटरनेट शनिवार-रविवार ऑलमोस्ट बंद ठेवून (राउटरच बंद करून) पाहिले. काही फरक पडला नाही. आता कंट्रोल करता येणे थोडे थोडे जमू लागले आहे. (असं वाटतंय). पण ते खरं नसावं किंवा तात्पुरतं असावं . आत्ताही. द इडियट खरोखर हातात आहे आणि मॅच सुरू व्हायला तब्बल १२ मिनिटे आहेत त्यावेळात सहज म्हणून मायबोलीवर चक्कर मारावी वाटलीच ! (पुस्तक बाजूलाच राहिले)

इंटरनेटवर माहिती पेक्षा अडगळ जास्त आहे. फक्त लोकं तिला समृद्ध म्हणत आहेत.

बस्के, Happy

असे प्रश्न पडले की प्रयत्नपुर्वक स्क्रीन टैम कमी करणे, अत्यावश्यक इतकीच कामं करणे थोडक्यात एकूणच स्लो डाउन करणे होते. पुन्हा काही दिवसांनी आहेच Sad

राज, गेल्या वर्षी पर्यंत माझ्याकडे पण स्मार्ट फोन नव्हता. नवे व्हर्जन आल्यावर जुने व्हर्जन त्यांनी आग्रहपुर्वक (RIA फुकट) पाठवले. सध्या फेबु नाही पण जीमेल सतत चेक केलं जातं Sad

मस्त लिहिलयस. सकाळचा चहा पिताना ऑनलाइन जायचं नाही असं ठरवूनही तसं वागायला अजून जमलेलं नाही. मी फक्त एका व्यसनाकडून दुसरीकडे टोलवली जाते बहुधा. आधी ऑर्कुट मग फेसबुक आणि मग मायबोली....कठीण आहे.

मी पण सिरियसली स्मार्ट फोन पासून डाउअग्रेड करायच्या विचारात आहे.

स्पिरिचुअल असमाधान>> हाहा..सही शब्द आहे. असं होऊ शकतं. Happy पण मी प्रयत्न करुन बघणार आहे..

तांत्रिक गोष्टींचं व्यसन आणि त्यांची अपरिहार्य गरज ही सगळी लक्षणं आहेत. रोगाचं मूळ कारण नाही.

आपल्या व्यक्तीमत्वाला आधार, चालना, प्रेरणा, आव्हान, आनंद, दु:ख आणि पर्यायाने आकार देतील अश्या चालत्या बोलत्या माणसांची वानवा. अशी माणसांची कमतरता आपण तांत्रिक गोष्टींनी भरू पाहतो आणि प्रत्येकवेळी नाऊमेद होत राहतो.
कारण तांत्रिक गोष्टींशी व्यवहार हा फक्त एकतर्फी आहे. तुम्ही जसे आहात तश्याच अजूनाजून गोष्टी तुम्ही नेटवर बघत राहणार. त्याने काहीही 'चेंज' घडून येत नाही. आणि बदला ईतका आनंद दुसरी कुठलीच गोष्टं देऊ शकत नाही.

सॉल्टलेक सिटीत राहणारा टाईम्स स्केअरचा झगमगाट बघून प्रचंड खूष होईल तर न्यूयॉर्कमध्ये राहणारा बॅंकर सॉल्ट लेक सिटीमधले माऊटन्स बघून. 'बदल' जरूरी आहे.

अमेरिकेत असाल तर ह्यावर चांगलं ऊत्तर आहे 'पब्लिक लायब्ररी'. झाडून सगळ्या ईवेंट्समध्ये काहीही अपेक्षा न ठेवता भाग घेणं. सगळी भिती, शंका बाजूला ठेऊन कुठल्याही स्वभावाच्या, परिस्थितीतल्या हुद्यावरच्या माणसांना अ‍ॅप्रोच होणं. काही 'घेण्यात' जी मजा आहे त्यातल्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद आणि मजा 'देण्यात' आहे.
फेसबूक, स्मार्टफोन ह्या गोष्टी काही आपण 'ठरवून' किंवा त्यासाठी वेगळा वेळ काढून वापरत नाही, आता मला करायला काही नाही म्हणून आपण त्या वापरतो. जसे जंक खाऊन ऊदरभरण करतो तसे आणि अश्याच गोष्टी अ‍ॅडिक्टिव असतात. जंक खाल्ल्याने अपाय होतोच पण चांगल्या खाण्यासाठी भूक रहात नाही तसेच ह्या गोष्टीं वापरून आपण फुटकळ गप्पा, गॉसिप करीत आपल्या मनाचे कप्पे भरून घेतो आणि चांगल्या माहितीसाठीची जागा वापरून टाकतो.

'सोशल नेटवर्क' सिनेमा मध्ये शॉन पार्करच्या पहिल्या सीनमध्ये केवळ पंधरा दिवस फेसबूक वापरलेली स्टॅनफर्ड मधली मुलगी त्याला सांगते...'मी तुला सूचना देते आहे की ते खूप अ‍ॅडिक्टिव आहे'

आपण वाहवत जातोय हा सिग्नल आपल्याला कळायला हवा!

आणखी एक महत्वाचं... वर्तमानात जगा. आपण जिथे आहोत, जसे आहोत त्यावरच भर द्या.
गॉसिप टाळा, माणसांशी समोरासमोर फक्त त्यांच्या आणि तुमच्याविषयी आणि तुमच्या दोघांच्या संबंधित गोष्टींविषयी भरभरून बोला. तुम्ही कितीही म्हणालात गॉसिप हा टाईमपास आहे त्याने रिफ्रेश होतं पण ते खरं नाही.
मनाचे कप्पे गॉसिपविषयक माहितीने भरून राहण्याचा वाईट परिणाम जास्त आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त 'स्व' पासून दूर जाता. जेवढे दूर जाल तेवढी प्रत्येक गोष्टीतली निराशा वाढत जाईल.
मन असे धाऊ लागले की म्हणावे
'माझिया मना....जरा थांबना... पाऊली तुझ्या माझिया खुणा...तुझे धावणे अन मला वेदना..माझिया मना'

बस्के, एकदम मस्त. शब्दाशब्दाला अनुमोदन. म्हणून मीही माझा फोन अत्यंत बेसिक ठेवला आहे. काही अडलं नाहीये अजून तरी. इंटरनेटचं व्यसन कमी करायला पाहिजे हे कळतंय पण अजून वळत नाहीये Sad

चांगल लिहिलय. गॅजेट्स इ बद्दल. ते मनाचे उगाच घुसवले आहे. आवरण्यापेक्षा मन मोठे करायचे.
चमनजी, स्व पासुन दूर गेलेले बरे असते नाहीतर सारखे मी यंव आणि मी त्यव होते. वाटते त्यापेक्शा मेन्दूची कपॅसिटी जास्त असते.

बस्के, छान लिहीलं आहेस क्रीन संबंधी व्यसनांबद्दल .. Happy

चमन, तू लिहीलेलं थिअरीत पटत असलं तरी प्रत्यक्षात आणायला संतपद यायला लागेल ..

बस्के, लेख आवडला.

मला वाटते की आपल्याला लवकरात लवकर आनंद, करमणूक कश्यातून मिळते, ते आपण करायला जातो. लो रेझिस्टन्स पाथ. कायम. पुस्तक वाचण्यातून कोणाला मिळत असेल तर ते वाचत असतील नक्कीच. आपली क्षितिजे रुंदावावीत, नवे शिकावे वगैरे भलतीच ध्येये ठेवून वाचायला गेलो तर मन इकडे तिकडे धावेल हे नक्की. पूर्वी कदाचित एव्हढे पर्याय नव्हते. आता आहेत.

चमनने लिहिलेल्या पर्यायात, इतर लोकांशी (खर्‍या जगात) संवाद वाढवणे हा महत्त्वाचा वाटला. पण तेदेखील प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून आहे. शिवाय आभासी जगात आपली आवडेल अशी, हवी ती ओळख दाखवता येते. नको तेव्हा लॉगॉफ होता येते. तसे खर्‍या जगात करता येत नाही. शेवटी आपल्याला कश्यातून आनंद मिळतो ते महत्त्वाचे.

>> चमनने लिहिलेल्या पर्यायात, इतर लोकांशी (खर्‍या जगात) संवाद वाढवणे हा महत्त्वाचा वाटला. पण तेदेखील प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून आहे. शिवाय आभासी जगात आपली आवडेल अशी, हवी ती ओळख दाखवता येते. नको तेव्हा लॉगॉफ होता येते. तसे खर्‍या जगात करता येत नाही. शेवटी आपल्याला कश्यातून आनंद मिळतो ते महत्त्वाचे.

मृदूला, हे पटलं .. Happy

तसंच मनाला खरोखरंच समाधान मिळेल असा संवाद प्रत्यक्षात नेहेमीच साधता येईल हे शक्य नाही .. Happy

धन्यवाद सर्वांना. Happy
फक्त फेसबुकसारख्या साइट्स व त्याचे व्यसन इतकंच नव्हतं लिहायचे मला.तो इंटरनेटच्या समृद्ध अडगळीतला एक भाग झाला. मला मोस्टली इंटरनेटवर काहीही शोधलं तरी उत्तरं मिळतात या प्रकाराबद्दल लिहायचे होते. मी ८वीत असल्यापासून इंटरनेटचा प्रचंड वापर केला आहे. अमाप. सॅचुरेशन झालेय आता. व इतके वर्षं मनातही जी अडगळ साठून राहते (आनंदयात्री, म्हणून पसारा शब्द.) तीला कसे चॅनल करायचे किंवा नको असलेली काढुन मन शांत करायचे. अश्विनीमामींनी लिहीलेला डिटोक्स बद्दलचा लेख आठवतोय मला.

नताशा, हो काल खूपच विचार आले डोक्यात. तब्बल तीन वर्षांनी काहीतरी लिहीले. Happy
राज, मीही सॅमसंग गॅलक्सी कोपर्यात ठेऊन जुना मोटो रेझर वापरत आहे आता. त्यामुळे बाहेर असले तर मी खरंच माणसात असते. Happy

चमन, पोस्ट आवडली. तू जे लास्ट पॅरामध्ये लिहीले आहेस तसाच विचार मी शेवटी करत होते. वर्तमानकाळात जगणे. इत्यादी. मला नेहेमी नाही जमत..

मृदुला, पर्फेक्ट मुद्दा मांडला आहेस. माझ्याबाबतीत स्प्लिट पर्सनालिटी वाटावी इतकी प्रत्यक्ष व व्हर्चुअल जगातील मी वेगळी आहे. बाबांच्यामते मी व्हर्चुअल जगात जास्त खुलते. Proud

सशल, हेही पटलं. मला अशा रँडम फिलॉसॉफिकल गप्पा प्रचंड आवडतात. प्रत्यक्ष कुणाशी मारू नाही शकत फारश्या, एखाद दुसरी मैत्रिण सोडल्यास.

परत सर्वांना थँक्स.

सशल, मृदुला
आपण शाळेत असतांना आपला एक ग्रूप असतो, कॉलेजात असतो, कामाच्या ठिकाणीही असतो.
जवळच्या सगळ्याच नातेवाईकांशी आपले जमते असे नाही आणि अतिशय दूरचा पण तरीही अतिप्रिय असाही नातेवाईक नक्की असतो. राहण्याच्या जागी आपले एका शेजार्‍याशी पटते आणि दुसर्‍याशी नाही.

थोडक्यात आपण जिथे कंफर्टेबल असतो तसा ग्रूप, तश्या लोकांबरोबर आपण नकळत जॉईन होऊन जातो. जिथे आपल्याला असमाधानी आणि अनकंफर्टेबल वाटते तिथून आपोआप काढत पाय घेतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते. हे बरेच वेळा आपोआप घडून येते.
तुम्ही म्हणताय तो संवाद साधण्यासाठी अगदीच ऑफिशिअल ओळख होणे, मैत्रीचे फॉर्मल संबंध प्रस्थापित होणे ह्याची गरज नाही.

मी (आमच्या ऑफिसमधल्या ग्रूपबरोबर) काही स्पॅनिश/गुजराती/ईस्ट युरोपियन पालकांना (ज्यांना मोडकी-तोडकी ईंग्रजीही येत नाही) रोजचे व्यवहार ऊदा बँक, शॉपिंग, डॉक्टर विजिट्स मॅनेज करण्यासाठी ईंग्रजी शिकवायला आठवड्यातून दोन्-दोन तास देतो. ह्या दरम्यान मला बरेच छान अनुभव येतात. मलाही बरेच शिकायला मिळते. आनंदही वाटतो (त्यालाच समाधान की काय म्हणता येईल)
तसे शिकायला येणार्‍यांकडूनच नाही पण शिकवायला येणार्‍या लोकांकडूनही बरीच माहिती, ज्ञान मिळाले. आनंदही मिळतोच मिळतो. ईमेल्स एक्स्चेंज होतात. अजून काही प्रोग्राम्सची माहिती मिळते. आवडलं तर मी जरूर जातो. अनुभव घेऊन बघतो. नाही तर सोडून देतो.
वर सांगितलेल्या लिटरसी प्रोग्राममधून मला आर्चरी शिकवणारा एक मित्र भेटला. तो त्याला वेळ असेल तेव्हा न विसरता बोलवतो. त्याचे महागामोलाचे बो-अ‍ॅरो विश्वासाने वापरू देतो. माझा त्याच्याशी संबंध तेवढ्यापुरता त्यात लॉग ईन्-लॉग ऑफ करण्यासारखे काही नाही.
माबोवर मित्र भेटले, संवाद वाढला नव्या गोष्टी कळाल्या..गटग झाले...चर्चा झाल्या. सेम ईंट्रेस्ट, एनर्जी लेवल, विचार असणारी लोकं भेटली त्यांच्याशी अजून संवाद वाढला. जिथे पटले नाही तिथे सोडून दिले. हे मला पटत नाही हे कळायलाही ती लोकं भेटावीच लागली ना.

फोनचा आणि फेसबूकचा ह्यात काय दोष आहे. अतिस्मार्ट फोन वापरून तुम्ही तुमची बँकेची , स्टॉक मार्केटची माहिती, चांगली गाणी , नोटस, पाठवायचे ईमेल्स ड्राफ्ट करणं, सगळं फावल्या वेळात करू शकता आणि वाचलेला वेळ लोकांबरोबर घालवू शकतात.
फेसबूक वापरून तुम्ही तुमच्या सगळीकडे विखूरलेल्या वर्गमित्रांशी बोलून अमेरिका गटग किंवा पुणे गटग ठरवू शकता. आवडीच्या म्युझिक ग्रूपला फॉलो करू शकतात. तुम्हाला ईंट्रेस्ट असणार्‍या एखाद्या अ‍ॅक्टिविटीजचे/ ग्रूपच्या विकेंड विजिटसचे , शेड्यूल मेंटेन करून तिथे जाऊ शकता. हजारो ऊपयोगी गोष्टी करता येतात की.

प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण ते फेसबूक, स्मार्टफोन फुटकळ गोष्टींसाठी वापरतो, वेळ घालवतो आणि मग ह्यातून काही निष्पन्न झाले नाही म्हणून वैतागतो.

बस्के जुन्या धरून राहिलेल्या आठवणींसाठी 'हॅरी पॉटर' मध्ये ते वांड वापरून नेमकी मेमरी बाहेर काढतात की नाही तसं करायचं. डझनावारी टेबल टेनिसचे चेंडू घेऊन ये. एकेक नकोशी/ किंवा हवीशी असली तरी जगण्यासाठी अडथळा बनू पाहणारी आठवण मोठ्याने म्हणत मार्करने त्या चेंडूवर लिहून काढ आणि ती बाहेर आलेकी दाण्णं पायाखाली चेचून टाकायची. पुन्हा ती आठवण आलीकी तिला चेचून टाकून बाहेर फेकल्याचेही आठवणार Proud

अवतार >> तुम्ही म्हणता तो 'अहं' आहे 'स्व' नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या.

चांगलं लिहिलसय बस्के!
माबो सोडता मी फारशी सोशियल नेटवर्किंग साईटसवर वावरत नाही फारशी.. जीमेल वर चॅट वगैरे पण नाही करत बसत फारशी.. फोन साधाच आहे अजूनतरी (फक्त कॉल मेसेजेस करणे, येणे बास!)
आयपॅड सुरुवातीला महिनाभर उत्साहात वापरला - इस्पेशियली बस प्रवासात ..
पण मग लक्षात आलं की लेक वॉशिंग्टन मधूनचा तो बस प्रवास माझ्याकरता एक स्पिरिच्युअल एक्स्पिरियन्स आहे - जो मी मिस करतेय.. मग ते ही बंद झालं .. एखादं पुस्तक वाचत असेन आणि ते रंगात आलं तर घेऊन जाते आता मधे मधे..

नेट बरोबर फोनचही तेच होतं असं मला वाटतं.. मी मधे मधे फोन बंद ठेवते.. बरोबर घेऊन फिरत नाही, स्वतःबरोबर असेन तेव्हा आलेले कॉलही घ्यायचे नाहीत असं करू शकते.. (लोकांना तो चक्रमपणा वाटतो, पण माझ्याकरता फोन आहे, फोन करता मी नाही - हे मला पक्कं माहितेय)

आणि तरीही मधेच कधीतरी ह्या गोष्टींच्या आहारी जायला होतं... मग चिडचिड होते.. लक्षात आलं की मग बर्‍याच काळ करता बंद होतं हे सगळं.. मधेच कधीतरी पुन्हा आहारी..

इन फॅक्ट सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बॅन करायला पाहिजे दर आठवड्यातल्या एखाद्या दिवशी..
आणि माबोही जरा कमी केली पाहिजे!

Pages