विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

Submitted by बस्के on 11 September, 2012 - 06:49

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय.. 
ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला..

मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे मायबोलीवर, फेसबुकवर. गप बसून वाचलं असतंस तर मार्क झुकरबर्ग शिक्षा करणार होता का? का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? इतकं कसं या गोष्टींमध्ये वाहवून जायचे. इतकं कसं टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन? कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या दिसतोय ना? अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर होण्याइतपत मन घुटमळतंय इथेतिथे! घुसमट. घुसमट नुसती! का कशाला कोण जाणे. हा जो उगीच ताण जाणावतो कधी कधी, तो काय आहे? कशाचा आहे.. काही लोकं नक्कीच सुख बोचते वगैरे टर्म्स वापरू शकतात. Happy पण खरंच मला माहितीच्या विस्फोटाचा ताण खूप जाणवतो.

आमच्या पिढीने(80s) प्रचंड प्रमाणात काळाचा वेग अनुभवला. आमचं लहानपण बरंचसं सिधेसाधे गेले. शाळा,अभ्यास, खेळ, दंगा मस्ती.. अधून मधून घरच्या आईसक्रिमपार्ट्या, कधीतरी सिनेमा. भाषा कळत नसताना बघितलेल्या स्मॉल वंडर, डिफरंट स्ट्रोक्स सारख्या सिरीयल्स. दूरदर्शन फक्त होते तेही दिवस आठवतायत मला. इतकंच काय, खूप पूर्वी एक जैन टीव्ही म्हणून चॅनल असायचा केबलवर. तोही आठवतोय मला.. काहीही गोष्टी. इतक्या साध्या व सुंदर होत्या ना. आणि तितक्याच खूप क्षुल्लक. इतक्या क्षुल्लक की आणखी ४-५ वर्षात कदाचित मी पार विसरून जाईन त्यांना - जर त्या आठवणी जागत्या ठेवल्या नाहीत तर. कारण. काळ. मागच्या पिढीत काळ ज्या वेगाने धावला त्यापेक्षा प्रचंड फास्ट काळ धावतोय आता. वर्ष दोन वर्षात सगळ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी गोष्टींचे नवीन मॉडेल्स/अपग्रेड होऊन आपल्याकडची गोष्ट मागे पडते. ५ वर्षापूर्वी आम्ही डिजिटल कॅमेरा घेतला. खूप सर्च करून, डिल्स मिळवून. १५०डॉ ला ८मेगापिक्सलचा ६एक्स ऑप्टीकलझूमचा कॅनन. पुढील २ वर्षात कॅमेरा म्हणजे खेळणं होणं बाकी होतं. लॅपटॉप बद्दल बोलायलाच नको.

किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? गुगल पूर्वीचे दिवस काय होते ते आठवले तर our version of Arabian nights असावे इतकी सुरस वाटेल. एखादी गोष्ट माहीत नसेल तर चक्क आपण त्या तश्या अज्ञानात झोपायचो? झोप लागायची आणि? हो हो ! कितीतरी शांत लागायची.
मग आता काय अडलंय .. नाही कळलं अर्धाच घसा का दुखतोय. नाही कळले थायरॉईड, फॉर दॅट मॅटर जगातल्या प्रत्येक कंडीशनचे सिम्प्टम्स आणि मी नाही स्वत:ला त्यात बसवून पाहीले. नाही कळते पोटातल्या बाळाचे प्रत्येक दिवसाचे माईलस्टोन्स. नाही मी शोधली घरातील यच्चयावत प्लंबिंग/कुकींग/फायनान्स-बजेटींग आणि व्हॉट नॉट अडचणींवरची उत्तरं.. नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं ..   नाही आत्ताच्या आत्ता कळलं आत्ता झालेला भूकंप किती रिश्च्टर स्केलचा होता. काय बिघडतं? नाही.. खरंच माणसाने क्युरिअस असावे किंवा ज्ञान मिळवावे वगैरे सगळं ठिक आहे. पण खरंच किती गोष्टी आपण वाचतो/वाचायला जातो ज्याची खरंच गरज असते. की आपण डोक्यात अनावश्यक कचरा निर्माण करतोय. कारण ती प्रत्येक गोष्ट कधीनाकधीतरी डोकं वर काढून आपलं (आपल्या डोक्यातले) अस्तित्व दाखवून देतेच. ताण ! ताण येतो मला माझ्या मनातल्या विचारांचा. माहितीच्या स्फोटाचा ताण येतो. आई बाबा पिढीचे बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातले बर्‍याच टेक्निकल गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्यास स्किपच होतात. आपलं नाही ना तसं. मुद्दमहून शिक्षण घेतलंय या सगळ्याचं..कळतंच बरचसं. नाही कळलं तर कळून घेण्याची धडपड सुरू. कधी कधी वाटतं कम्प्लेसंट असावं ब्वॉ माणसाने. निदान आपल्याला आपल्या जिज्ञासेचा त्रास होतोय हे जाणवलं तरी कम्प्लेसंट व्हायला शिकावे. पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय नि ज्ञान काय. किती हवंय, झेपतंय हे पाहूनच झोळीत घ्यावं.

अमेझॉन किंडलवर खूप मस्त पुस्तकं फ्री किंवा अगदी मामुली किंमतीत मिळतात. आयट्युन यु मध्ये अनेक उत्तम युनिव्हर्सिटीजमधले कोर्सेस फुकटात मिळतात. सुरवातीला मी एक पुस्तक/कोर्स घ्यायचे, वाचून काढायचे. आता तसं नाही. किंडलवर अधून मधून चेक करत राहीले की पुस्तकं फ्री मिळतात अगदी १५डॉ. ची सुद्धा! त्यामुळे सतत डील्स पाहणे सुरू. अरे खरंच हवी आहेत का पण. Happy
पुस्तकं जाऊद्या! ती निदान प्रत्यक्ष दिसतात तरी! या आठवणींचे काय करायचे? कधी कधी त्या उगीचच दातात अडकलेल्या कणासारख्या डोक्यात फिट्ट बसलेल्या असतात. त्यांचे काय काम ? त्या आठवून दोन क्षण आनंदात जाऊन तुम्ही परत जोमाने कामाला लागता का? नाही! बर्‍याचदा त्या आठवणी आपल्या खिन्न्च करून टाकतात. ते जुने दिवस आठवतात. मन पण असं येडचॅप असते, त्याच्यासाठी जुने  सगळे सोनेच! मग कसं त्या मेमरीज वाईप आउट करणार. राहूदे मग.. कपड्यांच्या कप्प्यासारखे  मन आवरायला काढता आले पाहीजे. आज फक्त शाळेचा कप्पा आवरायचा मनातला. जे जे काही आठवतंय त्यातले उपयोगाचे ठेवायचे. ही मात्र अवघड स्टेप. मन हे जात्याच होर्डर प्रवृत्तीचे. सगळं ठेवू पाहणार. नो वेज! हे नाही केले तर मग कपाट ओसंडून वाहणार. आत्ता रिसेंट साईझ ८ असताना साईझ ४ ची जीन्स समोर येणार. मग मी कशी साईझ ४ची जीन्स वापरू शकत होते म्हणून सॅड व्हायचे.. हेच सगळं मनातील आठवणींबरोबर. डिमेन्शिया झालेला ब्रेन जसा कुठल्या तरी भलत्याच काळात रमतो, तीच गत. मनाने गपचुप वर्तमानकाळात राहणे का बरं इतकं अवघड? आहे म्हणा अवघड. जिवंत असण्याचे प्रतीक म्हणजे श्वासोच्छ्वास. आपण बाळ असताना श्वास नीट पोटापासून घेत असतो. आता तसा श्वास घ्यायला योगा/ध्यान करावे लागते! :।  कधी वरच्यावर श्वास घेणे सुरू झाले? मला वाटते जेव्हा मागे तो अदृश्य वाघ मागे लावून घेतला आपण तेव्हाच. डॉ. बंगाच्या पुस्तकातील क्षणस्थ होणे म्हणजे .. डोक्यावरून पाणी. मला तरी वाटतेय की ते शक्यच होत नाही. निदान पूर्वीच्या काळात शक्य असावे. या आताच्या गुगलच्या जमान्यात ? nope, nada!!   Happy

मी काही माहीती तंत्रद्न्द्यानाच्या/गुगलच्या विरोधात नाहीये. मी माणसाच्या जिद्न्यासेमुळे त्या  असमाधानीपणाकडे झुकणार्‍या मनस्थितीबद्दल बोलत आहे. कधी कधी मला वाटतं, मला जास्तच उगीच प्रश्न पडत आहेत. (हीच बरं ती जास्तीची , खरं म्हणजे नकोच असलेली जिद्न्यासा!) आता काय करायचे? सगळ्या मटेरिअलिस्टीक जगाची हाव सोडून, मिनिमलिस्ट लाईफस्टाईल जरी तुम्ही एक्झिबिट केलीत तरी त्यानंतर तुम्हाला निर्गुणत्वाचा, मी म्हणजे काय, माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय इत्यादी विचारांची हाव पडली तर काय?! ती हाव तर फारच वाईट हो. प्रश्नांच्या गराड्यात पडू, त्या मार्‍यात थपडा खाऊ पण उत्तरं मिळत नाहीतच वरून स्पिरिचुअल असमाधान. थोडक्यात अवघड आहे! कदाचित अती तिथे माती हेच खरं. असतील अशा असामी ज्यांना मटेरिअलिस्टीक व स्पिरिचुअल जग याचा पर्फेक्ट तोल साधता आला असेल. तीच खरी सुखी लोकं! माझ्यासारख्यांनी काय करायचे? जाऊदे अवघड आहे हा शोध!  गुगलच करावे. मिळेल उत्तर! Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस्के मस्त लिहिलयस ... आवडलं !

>>>मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे मायबोलीवर, फेसबुकवर. गप बसून वाचलं असतंस तर मार्क झुकरबर्ग शिक्षा करणार होता का? का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल?>>> अगदी अगदी.... मला रोज ४-५ वाजल्यानंतर असं होतं ... दुसर्या दिवशी ये रे माझ्या मागल्या Happy

मस्त लिहिलंय , खुपसे पटलं.
साधं मॉर्निंग वॉक ला जाताना पुर्वी हेड्फोन घेउन जायचे, हल्ली तेही बंद केलंय , कधीतरी सकाळच्या वेळ्चा निसर्गाचा आवाज ऐकावा असे वाटते. फील्स गुड.

बस्के खुप छान लिहिलयस. अगदी आतून.
ब-याचदा आपले, स्पष्ट असलेले विचार त्या मानाने छान मांडता येतात. पण जे विचार मुळातच मनात गोंधळ निर्माण करणारे असतात ते असे उतरणे खुप अवघड, असे स्पष्ट उतरणे खरच खुप अवघड. ते जमलय तुला. तुझी तगमग अगदी पोचतेय. लिहित रहा गं. ही आतूनची उर्मी, अस्वस्थता, तळमळ हीच खरे लिखाण घडवते. ही अस्वस्थता तुला लाभो Wink लिहित रहा गं Happy

सॅचुरेशन झालेय आता. व इतके वर्षं मनातही जी अडगळ साठून राहते (आनंदयात्री, म्हणून पसारा शब्द.)
बस्के, लेखामध्ये लिहिलेले सगळे विचार मला पटलेच. आणि तुम्हीही त्याच बाजूने लिहिले आहे, असे वाटले. त्यामुळे हे विचार, या आठवणी या 'पसारा' (अडगळ या अर्थी) कॅटॅगरीत मोडत नाही असे वाटते.
चुभूद्याघ्या. Happy

बस्के... लेख मस्तच आहे. शब्दा शब्दाला अनुमोदन.. पण...
<<कपड्यांच्या कप्प्यासारखे मन आवरायला काढता आले पाहीज<<>>

ह्या एका वाक्यासाठी सल्लाम!

बस्के छान लिहिल आहेस. Happy

चमन मास्तरांची पोस्टही मस्त आहे.
फोनच्या नेट वर जास्त वेळ जातोय हे लक्षात आल्यावर नेटच रिचार्ज मारणच बंद केलय.
आता कुणी म्हणेल मग कशाला अ‍ॅन्ड्रॉइड फोन घेतलास. ती एक हौस आहे होती. ती विदाउट नेटही पुर्ण होतीच आहे अस माझं उत्तर आहे.
अजुन जास्त अजुन जास्त च्या नादात आपण बेसिक विसरतोय अस वाटत खरं.
काही बदल हे आपल्या वयानुसार, आपल्यावर आलेल्या जबाबदारीमुळे झालेले असतात. आपल्याही नक़ळत.

मला वर्षभरापूर्वीच एक अक्कल आली.. माझे तेव्हा दोन्ही मोबाईल एकत्र चोरीला गेल्याने मी तात्पुरता दोन-सव्वादोन हजाराचा साधा मोबाईल घेतला होता.. आज वर्ष झाले, तोच वापरतोय.. अन्यथा ऑफिसमध्ये दिवसभर नेट, घरी आल्यावर लॅपटॉपवर परत तेच.. मोबाईल ईंटरनेट सुरू केले तर सकाळ संध्याकाळ ट्रेनच्या तासतासभराच्या प्रवासातही तेच सुरू होईल..

तसेच काही लिखाण करायचे असेल तर मुद्दामून नेटसेटर लॅपटॉपला जोडतच नाही.. अन्यथा चार तासांत चार ओळीही लिहोन व्हायच्या नाहीत..

मस्त लिहीले आहेस.
हे 'अती' होतंय हे लक्षात येणं हीच पहिली पायरी. आता इथे थांबायचं, की पुढे जायचं, का जायचं, कसं जायचं हा प्रश्न जो तो आपापलाच सोडवू शकेल.
तुला तुझं सोल्युशन मिळो Happy

हे शाब्बास बस्के, बहुतांश वाक्यांना "अगदी अगदी" होत होतं.
भारी उतरलीये तगमग.

माझ्याबाबत - चॅटिंग आधीपासूनच नाहीये, फेबु बंद केलंय, फोनला नेट कनेक्शन ठेवलं नाहीये. सतत कनेक्टेड रहायलाच हवं ह्या गोष्टीवरच मुळात माझा विश्वास नाही.
मायबोलीवर मात्र जमेल तेव्हा डोकावलं जातंच. मध्ये एक-दीड महिना पूर्ण ब्रेक घेतला तर भंजाळल्यसारखं झालं. त्यामुळे आता असा अघोरी प्रकार न करण्याचं ठरवलं आहे Proud
इथेही सगळं 'नवीन' वाचलंच पाहिजे असं काहीसं झालं होतं मध्येमध्ये. आता हे कटाक्षाने टाळते. उघडावंसं वाटलं तर उघडायचं, नाहीतर वळसा घालून पुढे जायचं Happy

<<इंटरनेटवर माहिती पेक्षा अडगळ जास्त आहे. फक्त लोकं तिला समृद्ध म्हणत आहेत. >> +१०००००

मस्त लिहिले आहे, सगळी चिडचिड आणि ताण अगदी पोचला!
चमनच्या अनेक मुद्द्यांना अनुमोदन, विशेषतः वर्तमानात जगण्याच्या.

नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं ..>>> या वाक्याला कडाडून टाळी!!!

आपण दुसर्‍याशी संवाद साधतो एकतर त्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे कळण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात काय चाललेय हे सांगण्यासाठी. थोडा खोलात जाउन विचार केला तर मला या दोन्ही गोष्टी करणे प्रचंड अब्सर्ड आहे असे गेल्या काही वर्षात फार तीव्रतेने जाणवू लागले आहे. असं काय ग्रेट घड्तं सारखचं आपल्या आयुष्यात? बरं तसं काही झालं तर ते किती लगेच, किती जणांना आणि का शेअर करायचं? मला माझ्या अनुभवाबरोबर जरा राहू द्या, तपासू द्या, रिचवू द्या. मग काही निखळ हाती लागलं तर करुच की शेअर, त्या काहींशी ज्यांना खरचं त्याची कदर आहे, जाण आहे.
मी जे जगतो आहे त्याच्या रुटीन डिटेल्स पलीकडे जाउन कोणाशी काही वाटता येत असेल अशाच नात्यांमधे माझा इंटरेस्ट उरला आहे.

फारच अवांतर झालेय बहुतेक पण हा लेख वाचून एकदम वाटले ते लिहिले.

उत्तर शोधण्यासाठी आपल्याच मनाचा ब्राऊजर वापरून गूगल करणं आवश्यक झालं आहे का? Happy

लेख छान, प्रतिसादही छान!

बस्के
खुपचं छान लिहिलं आहे. अगदी रिलेट करता येतयं...

आगाऊ
तुम्ही वर लिहिलेल्या वाक्यांना +१०००००००००

किती जणांना आणि का शेअर करायचं? मला माझ्या अनुभवाबरोबर जरा राहू द्या, तपासू द्या, रिचवू द्या. मग काही निखळ हाती लागलं तर करुच की शेअर, त्या काहींशी ज्यांना खरचं त्याची कदर आहे, जाण आहे.मी जे जगतो आहे त्याच्या रुटीन डिटेल्स पलीकडे जाउन कोणाशी काही वाटता येत असेल अशाच नात्यांमधे माझा इंटरेस्ट उरला आहे.
>>> हे म्हणजे खुपच पटलं.

आणि जे 'शेअर' करतात त्यांना ते खरच 'शेअर' करावस वाटतं का? की उगाच सगळेजण करतात म्हणुन आपणही?

बस्के, छान लिहिलेस.. आवडले.. अगदी शब्दाशब्दांना अनुमोदन..

लेख छान, प्रतिसादही छान!, मंजूडी ++१

बस्के प्रचंडSSSSSSSSSSSSSSSSS पटला लेख!

इंटरनेटवर काहीही शोधलं तरी उत्तरं मिळतात या प्रकाराबद्दल लिहायचे होते. >> ऑफीसात मला गुगली म्हणतात. वाट्टेल ते अगदी वाट्टएल ते गुगलून झालेय... शेवगा, चिबूड आणि असंच काही बाही... निष्कारण... त्या त्या वेळचं निरर्थक कुतूहल... त्या वेळी त्या वेळापुरतंच महत्वाचं वाटलेलं व्यसनासारखं.

फायदा एकच झालाय... ऑनलाईन जाहीराती व टॅगलाईन, कॅचलाईन साठी परफेक्ट चित्रांचा संग्रह कुठून कुठून जमवता येतो... बाकी निव्वळ व्यसन!

नवर्‍याने असाच वात आणलेला इकडचे तिकडचे ढकललेले इमेल्स, गूगल यांवरून रोज एक तरी नवा आजार, आरोग्याचे धोके, भेसळीचे दुष्परीणाम, लहान मुलांमधील नवनवे आजार असल्या बातम्यांनी आधी स्वतःचं बीपी वाढवून मग माझं वाढवायला ते प्रिंट्स घरी आणायचा. गमतीत म्हटलं तुझा प्रॉब्लेम आहे, सतत हे आजार शोधतोस नेटवर... हाही एक आजारच. याची माहीती शोध बरं काय दुष्परीणाम आहेत ते... शोधलं असेलच त्याने बहुदा!

बाळ झालं तेव्हापासून कमी झालेय हा गुगलण्याचा प्रकार... त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मात्र आमच्या घरचाच गूगल बरा... आमच्या मातोश्रींचा! Happy नुसतीच माहीती नसते. ट्राईड अँड टेस्टेड कृतीही असते.

बी | 12 September, 2012 - 14:02 नवीन
मला वाटत इथे बस्केचा लेख कुणालाच कळलेला नाही.

हे वाचून मला काय वाटलं ते मलाच कळलं नाहीये.

मला यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच कळत/ सुचत नाहीये.>>> प्रचंड अनुमोदन! मला तर एवढीही प्रतिक्रिया सुचली नाही!!!

Pages