अो चाँद जहाँ वो जाये...
दोन बहिणी... खरं तर चार; पण याच दोघींवर सगळ्यांच प्रेम आणि लक्ष केंद्रित होतं. अर्थात त्याला कारणंही अनेक आहेत, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखं या जगात कोणी नाही... याआधी झालं नाही आणि पुढचं कोणी पाहिलंय? मजा म्हणजे त्या दोघींमध्येही फारसं साम्य नाही. दोघींची गाण्याची जात निराळी, अदा निराळी, पेशकारी निराळी; इतकंच काय, पण दोघींच्या आवाजातला दर्दही निराळा... मोठीने अगदी टिपीकल फिल्मी गोष्टीसारखं वडिलांच्या अकाली निधनानंतर कोवळ्या वयातच सगळ्या घराची जबाबदारी घेऊन, भावंडांना लहानाचं मोठं केलं, आईचा सांभाळ केला; ज्या-ज्या भावंडांची इच्छा होती, त्यांचे संसार मांडून दिले आणि आपण मात्र व्रतस्थ योग्यासारखी संगीतसाधना करत राहिली, जीव अोतून गात राहिली. कितीतरी भावना स्वतः न अनुभवतादेखिल असा एकही भाव नसेल जो तिने समर्थपणे आपल्यासमोर मांडला नाही; जणू तिचं स्वतःचं आयुष्य ती त्या गाण्यांमधून जगत असावी इतक्या आर्ततेने.
दुसरी त्याच टिपीकल फिल्मी गोष्टीत असते तशी बंडखोर आणि मनस्वी निघाली. लहान वयात सगळ्यांचा विरोध झुगारुन देऊन तिने लग्न केलं. नवरा कसलीच जबाबदारी घेत नाही म्हटल्यावर संसार-मुलं सांभाळण्यासाठी जे जे कष्ट पडतील ते उचलले. वारशाने तिलाही मिळाली ती फक्त गानकला. तेव्हा तेवढं एकच उपजिविकेचं साधन तिच्याकडे होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जी मिळतील ती गाणी गायली, अगदी कोरसमध्येसुद्धा! हळुहळु तिच्या आवाजाचं सामर्थ्य आणि मुख्य म्हणजे त्यातली विविधता लोकांसमोर आली आणि तिची स्वतंत्र अोळख निर्माण व्हायला लागली. आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य ती स्वतःच्या तत्त्वांनुसारच जगली. तिनेही अफाट संगीतसाधना केली, तीही कायमच जीव अोतून गात राहिली. फरक इतकाच, जीवनातील बऱ्या-वाईट अशा सगळ्या प्रकारच्या प्रसंगांतून तावून-सुलाखून निघाल्यामुळे तिची गाणी अगदी वेगळ्याच तेजाने झळाळली. तिनेही गाण्यातून व्यक्त केली नसेल असा भाव नाही. काय गायली नाही ती? प्रेमगीतं, विरहगीतं, आईने म्हटलेली गाणी, मुलाने म्हटलेली गाणी, बालगीतं, पडद्यावर जुगलबंदी असलेली गाणी, कव्वाली, गज़ल, क्लब साँग, अाणि मुख्य म्हणजे तिच्यावतीने वडिलांना जणू श्रद्धांजलीच अशी नाट्यगीतं.
दोघी बहिणींचे चाहते अक्षरशः न मोजता येण्यासारखे! आणि तेही किती कडवे असावेत - तर ही बहीण जास्त चांगली गाते की ती यावरून जवळपास महायुद्ध सुरू होऊ शकतं! कधी वाटतं, चाहत्यांच्या या अशा प्रतिक्रिया वाचून त्यांची चांगलीच करमणूक होत असेल. दोन सुरांत डावं-उजवं ठरवता येतं का? सरस्वती आणि गणपती दोन्ही ज्ञानाच्या, विद्येच्या, कलांच्या देवता. त्यातली कोणती देवता श्रेष्ठ? शैव आणि वैष्णव यांचं अजिबात पटत नाही, त्याची आठवण होते मला... विश्वाचं धारण-पोषण करणारा विष्णू आणि विश्वात अमंङल, पाप यांचं साम्राज्य वाढू लागल्यावर नवनिर्मितीसाठी त्याचा विनाश करणारा शिव यांत कोणी लहान-मोठं आहे का?
तर - या दोघींनी अनेकोनेक गाणी जवळपास सगळ्या भाषांत गायिली, जवळपास सर्व संगीतकारांकडे गायिली, सगळ्या सहगायकांबरोबर गायिली पण लता आणि आशा यांनी एकमेकींबरोबर मोजकीच गाणी गायिली. तेही बरोबरच आहे म्हणा! आपल्याला जरी कितीही आवडली त्यांनी एकत्र गायिलेली गाणी ऐकायला, तरी गाण्याशी संबंधित बाकी सगळ्यांसाठी ते दोन शिवधनुष्य एकदम उचलण्यासारखं आहे. अशाच काही गाण्यांची आठवण काढायचं मनात आहे.
जब जब तुम्हें भुलाया - गाण्याची सुरुवात होण्यापुर्वीच्या प्रसंगात अौरंगजेब आपली मुलगी जहाँ आरा हिला वाढदिवासानिमित्त भेटी देतो आणि सांगतो की खास तिच्यासाठी दरबारात मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. गाण्याच्या सुरुवातीला दोन नर्तकींपैकी मिनु मुमताज एक शायरी पेश करते, 'मैं तेरी नज़र का सुरुर हूँ, तुझे याद हो के ना याद हो...' जहाँ आरा एकदम चमकते कारण ती गज़ल तिच्या प्रियकराने लिहिलेली असते. तलत महमूदच्या आवाजात ती गज़ल आपल्या अोळखीचीही आहे. प्रत्यक्ष गाण्याला आणि नृत्याला सुरुवात होईपर्यंत जहाँ आराचा मैफिलीमधला रस निघुन जाऊन त्याची जागा एक प्रकारच्या व्याकुळतेने, विषण्णतेने घेतलेली असते. पण आपल्यासाठी मात्र गीत आणि नृत्याची मेजवानीच सुरु होते! मिनु मुमताजच्या अोळी लताने आणि कोवळ्या अरुणा ईराणीच्या अोळी आशाने म्हटल्या आहेत. तशी या चित्रपटाची सगळीच गाणी गाजली. अर्थात मदन मोहनचे संगीत असल्यावर यात विशेष असं काहीच नाही. पण प्रसंग आनंदाचा, अतिशय सुंदर कत्थकच्या अंगाने जाणारे नृत्य आणि गाण्याचे शब्द मात्र जीवघेणे हे असं रसायन खूपच विरळा.
जैसे के लाश अपनी, खुद ही कोई उठाये
जहाँ आराच्या मनातली खळबळ समजल्यामुळे जणू तिला वाट देण्यासाठी या अोळी लिहिल्या असव्यात असं मला नेहमी वाटतं. पडद्यावर माला सिन्हाने आपल्या अभिनयाने, मिनु मुमताज आणि अरुणा ईराणी या नृत्यकुशल अभिनेत्री असल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर गाण्याचे भाव आरशासारखे दिसतात. माझं प्रचंड आवडतं गाणं - बघायलाही आणि अर्थातच ऐकायला.
कर गया रे, कर गया मुझ पे जादू - बसंत बहार हा चित्रपट मुख्यतः मन्ना डेंनी गायलेल्या एकाहून एक सरस शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. संगीत हाच जणू प्राण मानणारा गोपाल आणि त्या शहरात दुर्दैवाने एका नृत्यगृहात सापडलेली गोड गळ्याची आणि सुंदर नृत्य करणारी गोपी यांच्या जगावेगळ्या प्रेमकहाणीचा धागा गोपालच्या संस्थानातील सर्वश्रेष्ठ गायक होण्याच्या महत्त्वाकांक्षेशी अशातऱ्हेनी जोडला गेला आहे की एकाला दुसऱ्यापासून वेगळं करणं अशक्य! काही कारणाने (आता प्रेमिकांची भांडणं आणि रुसवे-फुगवे इतक्या असंख्य आणि भलभलत्या कारणांवरुन होतात की 'काही कारण' हे पुरेसं आहे, मला वाटतं) गोपी आणि गोपाल यांच्यात गैरसमज आणि अबोला होतो. तिची आई असल्याचा बहाणा करणारी त्या नृत्यगृहाची मालकीण गोपीच्या भेटीचा आणि तिचं गाणं ऐकण्याचा मोबदला म्हणून गोपालकडून पाच हजार रुपये मागते. तेव्हा स्वतःचा आवाज गहाण ठेवून गोपाल ते पैसे देतो. हे काहीच माहीत नसलेली आणि त्यामुळे गोपालवरची नाराजी कायम असलेली गोपी आणि तिची सखी चित्रा हे गाणं म्हणतात. चित्राची भूमिका करणाऱ्या कुमकुमच्या नृत्यातही तिचं गोपीवरचं बहिणीसारखं प्रेम आणि गोपालवरचा राग सहज कळतो. गोपीच्या भूमिकेतील निम्मी आणि कुमकुम यांच्या तोंडचं हे गाणं गोपीची कैफियत गोपालपर्यंत पोहोचवण्याचं काम किती छान करतं! कर गया रे, कर गया मुझ पे जादू, सांवरिया । ये क्या किया रे, गज़ब किया रे, चोर को समझी मैं साधु, सांवरिया, कर गया मुझ पे जादू
मैफिल में नाचे तुम्हारी पुजारन
मत पूछो दिल किधर गया
'जब जब तुम्हें भुलाया' मध्ये गाण्याचा भर लतावर आणि नृत्याचा भर मिनु मुमताजवर आहे. आशाचा गाण्यातला सहभाग आणि अरुणा ईराणीचा नृत्यातला सहभाग हा मुख्य चित्राला महिरपीची सजावट असावी तसा आहे. अर्थात महिरप मुख्य चित्राइतकीच सुरेख आणि सुरेल असल्याने दोन्ही एकमेकांना खुलवतात. तसं इथे होत नाही; लता आणि आशा बरोबरीने गातात. कदाचित निम्मी आणि कुमकुम जिवलग मैत्रीणी - अगदी काही गुपीत एकमेकींत नसलेल्या - असल्याने तसं असेल, पण त्यामुळे आशाच्या आवाजाची बहार लताच्या बसंताला अगदी इतकी साथ देते की डावं-उजवं करणं कठीण व्हावं; खरं तर अशा गोष्टीत डावं-उजवं करायचा विचारही करु नये कारण ते अशक्य तर आहेच पण अन्यायकारकही आहे.
मन क्यों बहका रे बहका - १९८४ सालचा 'उत्सव' हा चित्रपट अनेक अर्थानी व्यावसायिक हिंदी चित्रपटाची ठराविक चौकट मोडतो. चित्रपट शुद्रक-लिखित 'मृच्छकटिक' आणि भासाने लिहिलेल्या 'चारुदत्त' या नाटकांवर आधारित आहे. गिरीश कर्नाडनी या दोन नाटकांचा संगम करुन अप्रतिम पटकथा लिहिली आहे. चित्रपटाच्या निर्मितीत शशी कपूरने कसलीही कसर सोडली नाही किंवा काटकसर केली नाही. वसंतसेनेचे दागिने असोत, प्रत्येक छोट्या-मोठ्या पात्राची वेशभूषा-रंगभूषा असो, छायाचित्रण असो किंवा अभिनेत्याची पात्रांसाठी निवड असो - गिरीश कर्नाड आणि शशी कपूर यांनी घेतलेले कष्ट, केलेलं संशोधन एक वेगळा चित्रपट पाहिल्याचं समाधान देतो. या गाण्याबद्दल बोलायचं तर त्याची पार्श्वभूमी आपण स्वप्नातही कल्पना करणार नाही अशी आहे. चारुदत्त्ताची पत्नी माहेरी गेल्याची संधी मिळाल्यामुळे वसंतसेनेला रात्र चारुदत्ताबरोबर त्याच्याच घरी घालवायची संधी मिळते. सकाळी चारुदत्त काही कामासाठी बाहेर पडतो, वसंतसेना अजुन रात्रीच्या आठवणीत हरवलेली असते. अचानक शयनगृहाचा दरवाजा उघडुन एक अगदी साध्या वेषातील तरुण स्त्री हातात काहीतरी घेऊन येते. वसंतसेना तिला विचारते की ती चारुदत्ताची दासी आहे का. त्यावर तिला (आणि आपल्यालाही) अगदीच अनपेक्षित उत्तर मिळतं. ती स्त्री सांगते की ती चारुदत्ताची पत्नी आहे आणि सांपत्तिक स्थिती फार चांगली नसल्यामुळे वसंतसेनेच्या स्नान-श्रृंगारासाठी ती फक्त चंदनाचा लेप तेवढा आणू शकली. वसंतसेना चमकते, अवघडते; तिला विचारते की ती माहरी गेली होती ना? पत्नी हसून म्हणते, 'हो, पण मला माहीत होतं की मी नसले की तू येशील आणि वसंतसेनेला भेटण्याची संधी एरवी कशी मिळणार; म्हणून मी लवकर परत आले.' नंतर पत्नीच्या भूमिकेतील अनुराधा पटेल रेखाच्या वसंतसेनेला श्रृंगार करायला मदतही करते आणि त्यावेळेस दोन मैत्रिणींनी एकत्र गाणं म्हणावं तसं हे गाणं - 'मन क्यों बहका रे बहका आधी रात को? बेला महका रे महका आधी रात को'. या चित्रपटाची गाणी वसंत देवांनी लिहिल्यामुळे हिंदी भाषेचं सौंदर्य अधोरेखित होतं, शिवाय त्यांच्या भाषेवरच्या प्रभुत्त्वामुळे चित्रपटाचा काळ, एकूण मूड फार छान जपलं गेलं आहे.
उसको टोको न रोको आधी रात को
लाज लागे रे लागे आधी रात को
बिना सिंदूर सोऊँ आधी रात को
आँख खोलेगी बात आधी रात को
हम ने पी चाँदनी आधी रात को
चाँद आँखों में आया आधी रात को
आधी वातों की प्रीत आधी रात को
रात पूरी हो कैसी आधी रात को
रात होती शुरू है आधी रात को
गाण्याच्या शब्दांतच इतकी गेयता, नाद, स्वतःचीच चाल आहे की मला (चुकून) वाटतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं अर्ध काम तर देवांच्या शब्दांनी आधीच करुन ठेवलं आहे. लता आणि आशा यांचे आवाज इतके सुंदरपणे गोफ विणावा तसे गाण्यात गुंफले आहेत की कधी लता सुरु करते आणि आशा अोळ पुढे नेते कळतही नाही!
अो चाँद जहाँ वो जाये - एक प्रियकर आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या दोघी (कधी परिस्थिती उलटीही असते) हा प्रेमाचा त्रिकोण चित्रनिर्माते त्यांचा हुकमी एक्का असल्यासारखा वापरतात. 'शारदा' चित्रपटात पुढे ते तेवढ्यावर भागत नाही तो भाग वेगळा - म्हणजे हा चित्रपट मी का पाहिला असा हताश भाव सतावत राहतो. पण ते नंतरचं... आयुष्यात पहिल्यांदा परदेशी गेलेल्या प्रियकराची खुशाली कळवण्याचं काम दोघी प्रेयसी चंद्रावर सोपवतात. 'अो चाँद जहाँ वो जाये, तू भी साथ चले जाना । कैसे है, कहाँ है वो, हर रात खबर लाना' चित्रपटाची नायिका मीना कुमारी असल्यामुळे ती अगदी सात्त्विक, सद्गुणांची पुतळीच जणु! नायकावर प्रेम करणारी दुसरी ही श्रीमंत घरची, मॉडर्न मुलगी श्यामा. गाण्याचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या स्वभावातला फरक त्यांच्यासाठी गाण्यात ज्या अोळी लिहिल्या आहेत, त्यातही जाणवतो. असं नेहमीच होत नाही - त्यासाठी राजेंद्र कृष्णांसारखा संवेदनशील आणि चित्रपटाच्या कथेत चपखल बसणारी गाणी लिहिण्याचं सामर्थ्य असलेला गीतकार हवा. उदाहरणार्थ गाण्याचं शेवटचं कडवं बघा -
श्यामा - कहना के मेरा तुम बिन मुश्कील यहाँ रहना
इक दर्द के मारे को अच्छा नहीं तड़पाना
हर रात खबर लाना
मीना कुमारीसाठी लताचा आवाज आणि श्यामासाठी आशाचा. दोघींच्या गाण्याची जातकुळी पाहूनच जणू दोन्ही नायिकांचं स्वभावचित्रण चित्रपटात केलं गेलं असावं इतके ते आवाज चपखल बसतात. केवळ या गाण्यासाठी चित्रपट बघण्याचं दुःख सहन करावं लागलं कारण तेव्हा YouTube ची सोय नव्हती!
सखी री सुन बोले पपीहा उस पार - 'मिस मेरी' हा AVM चा अगदी टिपिकल दक्षिणी चित्रपट. मुख्यतः 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारीने खरं तर सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. या चित्रपटात अगदी खेळकर भूमिका आहे तिची, दिसतेही गोड - तेव्हा तिच्यासाठी १९५७ सालचा लताचा आवाज वापरला नसता तरंच आश्चर्य! चित्रपटात मीना कुमारी गाणं शिकवण्याचं काम करत असल्यामुळे हे गाणं तशाच रुपात आपल्या समोर येतं. हेमंत कुमारनी गाण्याची चाल शास्त्रीय संगीताच्या खूप जवळुन जाणारी बांधली आहे. गाणं सुरु होतं संथ लयीत आणि हळुहळु लय वाढत जाते, आलाप आहेत, शिकवताना गुरु एक अोळ म्हणतो आणि शिष्य ती अोळ पुन्हा म्हणून दाखवतो, शिवाय जमेल तेव्हा गुरुच्या बरोबर गायचा प्रयत्नही करतो. खरोखरच गाणं ऐकताना किंवा पाहताना आपण संगीतशिक्षणाचा प्रसंग पाहतोय असं वाटतं. त्यामुळे लता एक अोळ म्हणते किंवा आलाप शिकवते आणि आशा ते तसंच्या तसं म्हणून दाखवते. अतिशय विलक्षण कल्पना आहे ही आणि अगदी साध्या-सरळ चालीत, अगदी कमी पार्श्वसंगीत यामुळे गाणं अत्यंत श्रवणीय आहे.
मेरे मेहबुब में क्या नहीं - 'मेरे मेहबूब' चित्रपटात प्रेमाचा त्रिकोणच काय, चौकोनदेखिल म्हणता येईल! पुर्णपणे मुस्लिम वातावरण - इतकं की आधी जे सेंसॉरचं प्रमाणपत्र दाखवलं जातं त्यावर चित्रपटाची भाषा उर्दू लिहिली आहे. त्यामुळे नायक-नायिका एकाच कॉलेजमध्ये शिकत असले तरी एकमेकांचं दर्शन त्यांना होत नाही यात काही आश्चर्य नाही. शिक्षण संपल्यावर दोघं लखनौमध्ये येतात - म्हणजे ती तिच्या घरी आणि तो नोकरीच्या शोधात. तो रहायला जिथे जागा घेतो तिथे समोरच एक सुंदर तरुणी रहात असते, नसीम - थोडी पुढारलेली असावी कारण खिडकीशी येते ती बुरखा न घालता. दोघांची अशी नुसती पाहूनच अोळख पण ती मात्र त्याच्या प्रेमात पडते. इकडे नायक-नायिकेची प्रत्यक्ष भेट होते, प्रेमाच्या आणा-भाकाही होतात. नायिका 'हुस्ना' आपल्या जिवलग मैत्रीणीला, नसीमला भेटायला येते तर तेवढ्यात नसीम नोकराणीचा बुरखा घालून नायकाला भेटून यायचं धाडस करुन आलेली. दोघी मैत्रिणी लगेच एकमेकींजवळ आपापल्या प्रियकराचं वर्णन आणि स्तुती करायला लागतात आणि एक अतिशय खेळकर, प्रसन्न गाणं आपले कान तृप्त करतं! दोघी जेव्हा आपल्या प्रियकराचं वर्णन करु लागतात खरं तर तेव्हाच कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते कारण त्या म्हणतात,
है झलक मेरे अफ़सानों की
लता - दास्तानें हैं मिलती हुई
अल्लाह हम दोनों परवानों की
दोघी - एक ही शमा हो ना कहीं
वो तो लाखों में है एक हसीं, इक हसीं
इथे लता कोणासाठी गाते आणि आशा कोणासाठी, वगैरेनी काही फरक पडत नाही. दोघींच्या आवाजात प्रेमात पडलेल्या दोन अल्लड तरुणींची निरागसता, आनंद, प्रेम अगदी पुरेपूर जाणवतं.
लायी कहाँ ऐ ज़िंदगी - 'टॅक्सी टॅक्सी' नावाचा म्हटलं तर आर्ट फिल्म प्रकारात मोडणारा एक चित्रपट १९७७ साली आला होता. त्या काळात अमोल पालेकरनी अनेक लोकप्रिय चित्रपट दिले. एका बाजुला जंज़ीर, शोले, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी सारखे हाणामारीचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय होत असताना, अमोल पालेकरनी रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर, घरोंदा, बातों बातों में, गोलमाल यांसारखे सामान्य माणसाचे जीवन, त्याचे छोटे-छोटे आनंद, त्याची स्वप्नं यांवर केंद्रित चित्रपट दिले. साहजिकच ते खूप भावले कारण सर्वसामान्य लोकांना ते आपलेच चित्रपट वाटले. यातच मध्ये केव्हा तरी 'टॅक्सी टॅक्सी' आला आणि गेला. टॅक्सी ड्रायव्हर असलेला अमोल पालेकर चित्रपटात पार्श्वगायिका बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने मुंबईत आलेल्या पण त्या दुनियेच्या व्यापाराची काहीच माहिती नसलेल्या ज़ाहीराला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतो. अोळखी काढून कुठूनतरी तिला कोरसमध्ये गाण्याची संधी मिळवून देतो. मुख्य गायिका असते आशा. चित्रपटात त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा प्रसंग आहे. आणि अहो आश्चर्यम्! मुख्य गायिकेचं गायन पडद्यावरही स्वतः आशाने केले आहे. खरोखरच्या रेकॉर्डिंगला जशी ती जात असेल तशीच पडद्यावर दाखवली आहे - मेकअप नाही (म्हणजे निदान मला तरी असल्याचं कळलं नाही असं म्हणू आपण फार तर), साधी साडी. चित्रपट पाहायला जाताना या मेजवानीची अजिबात कल्पना नसल्याने तो प्रसंग सुरु झाल्यावर माझा वरचा श्वास वर आणि खालचा खाली अशी अवस्था झाली! अचानकपणे माणूस श्वास घेणंसुद्धा कसं विसरतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. सुरुवातीला फक्त आशा गाते - आणि कोरस. पण कोरसमध्ये गाण्याचीही ज़ाहीराची हिंमत होत नाही. कदाचित कोरसमध्ये गाणं म्हणजे हार मानण्यासारखंही वाटत असेल तिला. पण अचानक काय होतं तिला? न राहवून ती आजुबाजूचा कोरस विसरुन गायला लागते ते लताच्या आवाजात आणि जणू हृदय दुःखाने फाटावं अशी गाते - इतकी की मुख्य गायिका आशाही हे भान हरपून पाहात-ऐकत राहते.
जान-ए-मन इक नज़र देख ले - हे अगदी विचित्र गाणं. विचित्र अशासाठी की 'मेरे मेहबूब' प्रेमाचा त्रिकोण वर लिहिल्याप्रमाणे आहेच. पण या गाण्याच्या वेळी अमीता आपलं प्रेम बाजूला ठेवून मैत्रीणीच्या सुखात आपलं सुख पाहते. आणि साधना आणि राजेंद्रकुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी हे गाणं म्हणते. आता हा प्रसंग सांगितल्यावर कोणीही म्हणेल की मग हे गाणं या यादीत का? कारण साधना हे गाणं अजिबात गात नाही. पण तरी लता आणि आशा, दोघींनीही हे गाणं गायलं आहे. पडद्यावर पूर्ण गाणं अमीताच म्हणते - म्हणजे एकाच पात्रासाठी, एकाच गाण्यात दोन आवाज वापरले आहेत. का? कुणास ठाऊक! खरं तर नौशादसारख्या संगीतकाराकडून असं होण्याची शक्यता जवळपास नाही. तेव्हा गाणं रेकॉर्ड करताना काही एक विचाराने केलं गेलं आणि चित्रीकरण होईपर्यंत काहीतरी गडबड-घोटाळा झाला असावा... (यावरुन आठवलं, याच्या अगदी उलटा प्रकार नौशादनेच संगीत दिलेल्या 'दिल दिया दर्द लिया' मधल्या 'क्या रंग-ए-महफ़िल है दिलदारम्, अो जाने आलम' या गाण्यात आहे. मुळात हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्याचं संगीत नौशादचं आहे हे काही केल्या पटेचना! कारण हिंदुस्थानी राग-रागिण्यांवर आधारित गाणी हा नौशादचा 'ट्रेडमार्क'च आहे. गाणं मुख्यतः वहिदा रहमान गाते पडद्यावर आणि प्रसंग पार्टीचा असल्यामुळे त्याला थोडयाश्या पाश्चात्य धर्तीच्या नृत्याची जोडही आहे. चित्रपटात तिची होणारी नणंद श्यामा नृत्यात सहभागी असते. संपूर्ण गाणं लता आणि काही साथीदार यांनी म्हटलं आहे. पण पडद्यावर मध्येच काही अोळी श्यामाही गाते, लताच्याच आवाजात. म्हणजे गाणाऱ्या दोघी पण आवाज फक्त लताचा. या निर्मात्यांची काय गणितं असतात त्यांची त्यांनाच ठाऊक! हे गाणं ऐकलं नसेल तर मात्र जरुर ऐका...नौशादचं अगदी वेगळ्या धर्तीचं, थोडंसं पाश्चात्य संगीताकडे झुकणारं संगीत विरळाच. नौशादचं संगीत आणि गाण्याबद्दल - तेही लताच्या - अजिबात तक्रार नाही. समजत नाहीत ती पडद्यामागची कोष्टकं आणि राजकारण.)
मितवा, तेरे लिये जीना, तेरे लिये मरना - लेखाचा शेवट अशा गाण्याने जे रेकॉर्ड तर केलं गेलं, 'शान' या चित्रपटासाठी त्याचं चित्रीकरणही झालं, पण १९८० सालच्या सेंसॉर बोर्डाला न झेपल्याने गाण्याला कात्री लागली. दुर्दैवाने हे गाणं मला कुठे पहायला मिळालं नाही, पण ऐकलं आहे. गाण्याचं संगीत थोडं पाश्चात्य वेळणाचं असलं तरी लताच्या अोळी नेहमीप्रमाणे भारतीय वळणानेच जातात. चित्रपट १९८० सालचा असल्यामुळे असेल पण आशाच्या आवाजात पाश्चात्य वळण अगदी ठसठशीतपणे दिसतं पण अर्थातच सुराला पक्कं! त्यामुळे ते इतकं सहज आणि आकर्षक वाटतं की या गाण्याततरी मला आशाचा आवाज खूपच जास्त आवडतो. आता एकविसाव्या शतकात (तेव्हाच्या सेंसॉर बोर्डाला कात्री लावाविशी वाटली त्यापेक्षा) खूपच जास्त 'प्रगती' हिंदी चित्रपटांनी, सेंसॉर बोर्डाने आणि प्रेक्षकांनी केली आहे, त्यामुळे नुसतं हे गाणं जरी निर्मात्यांनी कुठे उपलब्ध करुन दिलं तर फारच छान होईल.
तर अशी ही दोन सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या बहिणींनी रसिकांना एकत्र येऊन दिलेली मेजवानी. ही संपूर्ण यादी अर्थात नाही, पण ही माझ्या आवडीच्या गाण्यांची संपूर्ण यादी म्हणायला हरकत नाही.
मस्त लेख ! दोघींची एकत्र गाणी
मस्त लेख ! दोघींची एकत्र गाणी हा पण अगदी जिव्हाळ्याचा विषय ! ओ चाँद जहाँ वो जाये हे सर्वात आवडतं माझं ! शेवटची दोन्ही गाणी नवीन आहेत मला, ऐकणार नक्कीच आता.
मस्त विषय आणि लेख. एकदम
मस्त विषय आणि लेख. एकदम मनापासून आणि अभ्यासपूर्ण.
१. चोरी चोरी - 'मन भावन के घर जाये गोरी' (यातलं 'हमे ना भुलाना' दोघींनी आपल्या खास अदाकारीत म्हणलंय)
२. ज्वाला - जिया ले गयी, छबी सुंदर सलोने गोपाल की
३. हलाकू - अजि चले आओ ( गाण्याचा वेग खूप जास्त असूनही त्यातली सादगी कुठेही हरवत नाही)
४. संजोग - मन मंदिर मे प्रीत का डेरा
५. मै हसीन नाझनी कोई मुझसा नही - बाझी
६. क्या हुवा ये मुझे क्या हुवा - जिस देशमे गंगा बहती है
७. झुले मोरा ललना - प्यार की प्यास
८.पड गये झुले सावन रुत आयी रे - बहु बेगम
९. छाप तिलक सब लिनी मोसे नैना मिलायके - मै तुलसी तेरे आंगन की (ह्या गाण्याचं पिक्चरायझेशन अतिशय हास्यास्पद आहे)
आत्ता इतकी आठवली पटकन लेख वाचल्यावर.
मस्त गाणी आणि लेख. मन क्यू
मस्त गाणी आणि लेख. मन क्यू बहका आणि ओ चांद माझी आवडती.
आरती, खरंय तुझं. फूलों की सेज
आरती, खरंय तुझं.
फूलों की सेज - आज की रात मुहोब्बत का नशा ले
प्रोफेसर - हमरे गांव कोई आयेगा
आये दिन बहार के - ऐ काश किसी दीवाने को हम से भी मुहोब्बत हो जाए
भरोसा - धडका ओ दिल धडका
पडोसन - मैं चली, मैं चली देखो प्यार की गली
शिकार - जब से लागी तोसे नजरिया
राजकुमार - नाच रे मन बदकम्मा
दू़ज का चांद - सजन सलोना मांग लो जी कोई (गाणं खूपच गोड आहे)
मयूर् पंख - ये बरखा बहार सौतनिया के द्वार
ही अशीच आत्ता पटकन तुझी यादी वाचून आठवलेली आणखी काही. गाणी. अर्थात हेतू गाण्यांची एकत्रित यादी करणे नसून वेगवेगळ्या कारणांसाठी माझ्या आवडीच्या गाण्यांची आठवण काढणं एवढाच होता हे सांगणे नलगे... तुझी यादी वाचायला नक्कीच आवडेल.
अश्विनीमामी, शिल्पा - लेख वाचून आवडल्याचं लगेच कळवल्याबद्दल मनापासून आभार.
वा ! मस्त गाणी आहेत ही
वा ! मस्त गाणी आहेत ही पण.
अर्थात गाणी ही आठवण काढण्यासाठी, परत परत ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठीच असतात.
शिवाय संगीत हा विषय आनंदासाठी आहे. लेख वाचून कनेक्शन वाटलं कुठेतरी म्हणुन इतक्या उत्फुर्तपणे अजून गाणी आठवली आणि लिहिली. त्यात यादी देणं हा अर्थातच हेतू नव्हता.
कृपया गैरसमज नसावा आणि तसा तो झाला असल्यास क्षमस्व
आरती, त्या स्मायलीमुळे वाचलीस
आरती, त्या स्मायलीमुळे वाचलीस नाही तर विचारच करत होते तू सध्या कुठे आहेस ते कसं कळेल - येऊन भेटले असते. गैरसमज काय, क्षमस्व काय... आता लिही बरं यादी लवकर, म्हणजे तू आणि मी मिळून भाग-२ लिहू...
- रुठी जाये रे गुजरीया ना
- रुठी जाये रे गुजरीया ना बोले रे (दो फूल) - लहानपणी लता आणि आशा अश्याच भांडत असतील का खेळताना असं वाटतं हे गाणं पाहुन.
- जा जा रे जा साजना, काहे सपनोंमे आये (अदालत) - मदन मोहन ची कमाल रचना
- दिल दै दै , ना लै लै, जा देखे तेरे जैसे मैने पहले कै कै ( सेनापती) - अजुन एक मस्त जुगलबंदी
- आईना है मेरा चेहरा (आईना) - एकत्र म्हणलेलं शेवटचं हिंदी गाणं बहुधा. पण यात सुरेश वाडकर पण आहे शेवट्च्या कडव्यात.
- नीलम के नभ छायी (उत्सव)
- दुनिय के सितम हमको जुदा कर नही सकते, जो प्यार के बंदे है कभी मर नही सकते (खून और पानी)
- सारे शहर मे एक हसी है, और वो मै हू और कोई नही है (अलिबाबा और चालीस चोर) - पडद्यावर झीनत आणि हेमा मालिनी
- तोड दे तू इस बंधन को ये फर्ज है दस्तुर नही (दिल और दिवार)
उरलेली आठवतील तशी. आता ती आठवल्याशिवाय चैनही पडणार नाही
लिहायचं काम तुझं. ते मला जमत नाही. मी गाणी ऐकायचं आणि वाचायचं काम करणार ..
आणि हो, टॅक्सी टॅक्सी मी अजुन पाहिला नाहीये. या गाण्याचं पिक्चरायझेशन बद्दल वाचून सही वाटलं. आता सिनेमा शोधून पाहायलाच हवा
काहे तरसाये जियरा पण दोन
काहे तरसाये जियरा पण दोन गायिकांनी गायलेले आहे. मस्त गाणे आहे.
http://www.youtube.com/watch?v=xdgIhkeeltc&feature=related
अरे वा रार, प्रिया मस्त मस्त
अरे वा रार, प्रिया मस्त मस्त गाण्यांची मेजवानी
आईना नंतरचं लता-आशा-जगजीत यांचं नॉनफिल्मी गाणं आठवलं - कहीं कहीं से हर चेहरा तुम जैसा लगता है तुमको भूल ना पायेंगे हम ऐसा लगता है - हेही प्रचंड आवडतं माझं. बहुतेक रिमा आणि रायमा सेन या दोघी होत्या त्या गाण्याच्या व्हिडिओमधे.
गाण्यांबरोबरच चित्रपटातले
गाण्यांबरोबरच चित्रपटातले प्रसंगही लिहिल्याने , गण्यातले शब्द व्यक्तिरेखांशी, कथेशी जुळवल्याने मजा वाढला. गीतकारालाही (कधी नव्हे तो) मान दिला गेला.
'ऐ चांद' आणि 'जब जब तुम्हें' या दोन गाण्यांवर, या दोघींच्या एकत्र युगुलगीतांतील सर्वाधिक आवडत्या जागेचा हिंदोळा झुलत राहतो.
टॅक्सी टॅक्सी पाहिल्यासारखा वाटतोय, पण गाणं आठवत नाही.
लेख झक्क जमलाय. आशा-सुधा,
लेख झक्क जमलाय.
आशा-सुधा, लता-गीता अशा गाण्यांबद्दल पण लिहिणार ना ?
छान
छान
आनंदाने लेख वाच्ला.. आवडला हे
आनंदाने लेख वाच्ला.. आवडला हे सांगणे नलगे.
लेख फारच सुरेख
लेख फारच सुरेख
लेख आवडला प्रिया,
लेख आवडला
प्रिया, रार
यादीची कल्पना छानच, लवकर पुर्ण करा
लेख वाचल्याबद्दल आणि
लेख वाचल्याबद्दल आणि आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल सगळ्यांचे आभार, पण मित्र-मैत्रीणींनो, काही आवडलं नसलं तर तेही बिनदिक्कत सांगा कारण त्यानेही मला उपयोगच होईल.
आरती (रार) - मन भावन के संग, सजन सलोना आणि जा जा रे जा बेवफ़ा वगळताना खूप-खूप वाईट वाटलं. पण आधीच फार मोठा झालाय लेख अशी भीति वाटत होती. पण तरी जा जा रे जा बेवफ़ा बद्दल तरी लिहायला हवं होतं...
लेख मस्तच आहे. यादीची वाट
लेख मस्तच आहे. यादीची वाट बघतोय
फक्त गायिकांनीच गायलेल्या द्वंद्वगितांची पण यादी येऊ दे - लता, आशा, उषा, शमशाद, गिता दत्त.
खूप सुरेख लेख. बरीच गाणी नवीन
खूप सुरेख लेख.
बरीच गाणी नवीन कळलीत. आता ऐकणार
गाण्यांबरोबरच चित्रपटातले प्रसंगही लिहिल्याने , गण्यातले शब्द व्यक्तिरेखांशी, कथेशी जुळवल्याने मजा वाढला >>> अगदी अगदी
धन्यवाद, मित्रहो! सुरुवात तर
धन्यवाद, मित्रहो! सुरुवात तर केली आहे माझ्या मनात खास स्थान मिळवलेल्या गाण्यांबद्दल लिहायला. त्यामुळे ज्या सुचना आल्या आहेत इतर काही गायकां/ गाण्यांबद्दल लिहिण्याच्या तिथे कधी पोहोचेन माहीत नाही, पण नवीन काही विषय सुचवल्याबद्दल आभार...
मस्त लेख. खुप आवडला. मन क्यु
मस्त लेख. खुप आवडला. मन क्यु बेहका, मै चली मै चली तर ऑल टाईम फेवरेट्स आहेत माझी
एक सुचना: ओकारार्थी शब्द लिहीताना small letter 'o' वापरावे, म्हणजे तो शब्दामध्ये वर्तुळ दिसणार नाही...युनीकोड कॉपी पेस्ट केला असल्यास असे होऊ शकते, मग त्यात सुधारणा करावी प्रकाशीत करायच्या आधी
किती छान लिहिलंय... मला काय
किती छान लिहिलंय... मला काय सुचलं सांगू का? विविध भारती वर एक महक नावाचा कार्यक्रम असतो सकाळी. हा सुंदर लेख वाचून असे वाटले की अशा कार्यक्रमासाठी खूप छान स्क्रिप्ट तयार होईल. म्हणजे ही सगळी सुंदर गाणी लगेच ऐकताही येतील.
पुढील लेखाची वाट बघतेय.
हाही लेख सुंदर. मन क्यों बहका
हाही लेख सुंदर.
मन क्यों बहका रे बहका...माझं ऑलटाइम फेवरेट. कसल्याही मनस्थितीमध्ये असले तरी जादूची छडी फिरल्यासारखं छान वाटतं.
लेखासाठी धन्यवाद.
मेरे मेहेबूब मध्य्ही आणखी एक
मेरे मेहेबूब मध्य्ही आणखी एक गाणे आहे ना? दोघीनी एकेक कडवे म्हटलेले? पण ते गाणे एकाच नटीचे आहे पडद्यावर