मीच मला पाहतो
आजही अॉफिसमधून निघायला उशीरच झाला. आता घरी गेल्यावर आधी अोजसची आणि मग नलिनीची समजूत काढायला लागणार. एरवी नलिनी बायको म्हणून खूपच समजूतदार आहे पण अोजसच्या स्कूल प्रॉजेक्टमध्ये घरी गेल्यावर मदत करायचं मीच कबूल करुन बसलो होतो आणि अोजसच्या बाबतीत माझ्या हातून असं काही झालं की मग मात्र नलिनीचा समजूतदारपणा कुठे नाहीसा होतो कोणास ठाऊक! मग ती ‘अनंतकाळची माता’ असल्याचं सिद्धच करते. याच विचारांच्या नादात मी गाडी चालवत होतो. खरं तर जगजित सिंगच्या गजल ऐकत गाडी चालवली की घरी पोहोचेपर्यंत अॉफिसचा ताण मागे पडतो. पण आज का कोणास ठाऊक, तिकडे लक्ष नव्हतं. घराजवळ पोहोचलो आणि गराज उघडलं तर माझी गाडी आत!