वारीच्या निमित्ताने (आषाढीचा सोहळा )
आषाढीचा सोहळा, आवडे मनाला |
जावे पंढरीशी, ध्यास हा जीवाला ||
संत सज्जनांनी, दावियेली वाट |
चालता पार, दुस्तर भवघाट ||
पंढरीचा देव, उभा विटेवर |
भक्तांसी भेटण्या, होतसे आतुर ||
एकमेका दोघे, भेटण्या आतुर |
धावती आषाढीला, सोडूनी घरदार ||
सासुरवाशीण लेक, ओढ माहेरची |
तयापरी गति, होई वारकऱ्यांची ||
मातेला तळमळ ,लेकीच्या येण्याची |
तैशीच अवस्था, माझ्या विठूरायाची ||
वाळवन्टी जमती, टाळमृदंग गर्जती |
नामाची महती, नाचुनिया गाती ||
जैसे जलामाजी, लवण विरघळती |
होता दर्शन, देवभक्त एक होती ||