खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाळा-कॉलेजच्या वर्षात आम्ही बिल्डींग मधली पोरं गच्चीवर क्रिकेट खेळायचो. त्या वेळेस चे पनवेल म्हणजे उंच इमारती नसलेलं आणि विशेष रहदारी नसलेलं देखील. कमी लोकांकडे गाड्या असल्यामुळे सबंध अवकाशात होर्नचा कोलाहल नसलेलं पनवेल. संध्याकाळी किंवा रात्री तीन मजल्यांच्या इमारतीच्या गच्चीवर देखील वरून जाणाऱ्या विमानाचा स्वछ आवाज ऐकू येणारे पनवेल! त्या वेळेस संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घरापासून साधारण २० मिनिटे अंतरावर असलेल्या मशिदीतून अझान सुरु होयची.
दोन दिवसांपूर्वी रविवारी माझ्या बायकोने मला भाजी आणायला धाडले तेव्हा ती दिसली. चेहऱ्यावर हास्य आणि तिचा हात हातात धरून शेजारी चालणारा तिचा लहान मुलगा, हे नक्कीच एक सुंदर दृश्य होतं. गेल्या १५ वर्षात काहीच बदललं नव्हत. ती अजूनही तशीच आणि तितकीच सुंदर होती. ती एका भाजीवाल्याकडे जात असतानाच दोन बाईकस्वार कॉलेज तरुण तिच्याकडे बघत बघत पुढे गेले. शेजारी उभ्या बायका काहीसा मत्सर डोळ्यात साठवून तिच्याकडे बघत होत्या. १५ वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये हेच दृश्य तर घडत असे. आणि थोडं पुढे येताच तिने मला पाहिले. आश्चर्य, अविश्वास, आनंद हे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.