मज दुःखा चे वावडे नाही
की सु:खा ची कांक्षा नाही
अंता ची आहे जाणिव
मात्र मृत्यू चे भय नाही
काटे अनेक रुतले मनात
तरी हृदयांत वेदना नाही
जरी दुखावले मन माझे
कोणतीही कटुता नाही
जीवनाची वाट आहे कठिण
मात्र सोबत कुणी ही नाही
रात्र संपत आली तरी ही
या प्राचीस तरी सुर्य नाही
तो जरी म्हणवतो मित्र माझा
पण मज तो ओळखत नाही
फुले वेचली बकुळी ची
का त्यांना सुगंध नाही
आयुष्य चालले पुढे सरकत
दिशा मात्र का अजूनही नाही
देव्हारा हृदयाचा का रिकामा
देवा ची प्रतिष्ठा अजुन ही नाही
तुझ्या प्रिती च्या बकुळ फुलांनी गुंफलेल्या आठवणी ।
त्या जिवलग हळुवार क्षणांनी विणलेल्या आठवणी ।।
हिंदोळ्यावर तु उंच झुलावे, माझे मन ही हिंदोळा व्हावे।
आकाशी तू अलगत झेपतांना टिपलेल्या आठवणी।।
जणू हिरवी पैठणी जेव्हा रानांत मोर नाचे श्रावणी।
ती पैठणी तू नेसतांना हृदयांत साठल्या आठवणी।।
तू यमन आळवावा मी सुरांत तुझ्या सूर मिसळावा।
मावळतीच्या यमन रंगांत मिसळलेल्या आठवणी।।
रात्र सारी जागून सरली पहा उगवला शुक्र तारा ।
मादक स्पर्शांनी तुझ्या गंधाळलेल्या आठवणी।।
शब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी...
पाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं, आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट....
भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.