दीपक.पवार
येशील तू की ही मनाची भूल आहे..
येशील तू की ही मनाची भूल आहे
सळसळली दूर पाने वाटले तुझी चाहूल आहे.
तुझ्या तनूचा गंध घेऊन
येती तुझ्या गावचे वारे
मनात माझ्या आठवणींचे
फुलवीत प्रीत पिसारे
ज्या हृदयी तू राहसी ते प्रीतीचे राऊळ आहे.
तू नसताना मनात वसती
प्रीत भारले क्षण हळवे
हेच जीवाला वेड लागले
स्वप्नात तुझ्या गुंतावे
कळते मला स्वप्न क्षणांची ही मनाला हूल आहे.
डोळ्यांची भाषा आता...
डोळ्यांची भाषा आता डोळ्यांना कळते आहे
हृदयिचे गाणे अपुल्या ओठावर फुलते आहे.
स्वप्नातच सरतो दिस अन् स्वप्नातच कटती राती
स्वप्नाच्या झोक्यावरती मन माझे झुलते आहे.
तुजलाही कळले सारे मजलाही कळते आहे
पण भाव मनीचे न कुणी ओठांनी वदते आहे.
हा रोग असा जडता जीवाला ना सुचते काही
भान हरपते आणि कुठे मन वणवण फिरते आहे.
ही जी वाट घराच्या पाशी बघ आहे जात तुझ्या
पाऊल माझे का हे आता तिकडे वळते आहे.
कुणाचं मन अजूनपर्यंत....
कुणाचं मन अजूनपर्यंत माझ्यावर भाळलं नाही
म्हणूनच प्रेम म्हणजे काय अजून मला कळलं नाही.
आपण सुद्धा कुणाच्या प्रेमात पडलं पाहिजे
आपलं सुद्धा कुणावर मन जडलं पाहिजे
असं कधी वाटतं ना? मनात वादळ उठतं ना?
मला सुद्धा वाटलं होतं........
आपण सुद्धा प्रेमात चिंब भिजावं
आपल्या आठवणीने कुणी रात्र-रात्र जागावं...
पण आमचं मात्र कुठेही जुळलं नाही.
म्हणूनच प्रेम म्हणजे काय अजून मला कळलं नाही.
खरं सांगतो एकदा मात्र मनात
प्रेमाचं रान उठलं होतं....
बेभान होवून प्रीतीचं
गाणं म्हटलं होतं
स्वप्नांच्या फांदीवर मन सारखं झुलत होतं
वेलीवरच्या कळीसारखं मनात प्रेम फुलत होतं
पण कस ते कळलं नाही?
कळले मला न काही....
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी
डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी
कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी
सांगून टाक आता जे सलते मनात राणी
येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे
जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी
ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी
या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.
शब्द तुझे, तुझेच गाणे.......
शब्द तुझे, तुझेच गाणे,सारे तुझेच होते
वाटे मज तुझ्याविना हे जगणे उणेच होते
तो घडला जरी गुन्हा पण मी मानतोनं आता
अग प्रेमात माफ येथे सारे गुन्हेच होते
होते रान माणसांचे मी एकटा तरीही
मज गर्दीत माणसांच्या जग हे सुनेच होते
माझ्या स्वागतास येथे जे लोक भोवताली
तेच कधी निघून गेलेले मित्र जुनेच होते
शब्द तू, संगीत तू,
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.
बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.
रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.
तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने........
आले भरुनी आभाळ
आले भरुनी आभाळ, आला आला पावसाळा
आज दाटुनिया येइ मनी दु:खाचा उमाळा.
मेघ दाटले दाटले, जग अंधारले सारे
आज जुन्या आठवांचे मनी वाहती का वारे?
लागे मातीस तहान, फुटे नभास पाझर
तसा दु:खासही माझ्या मिळे अश्रुंचा आधार.
जाता पडुनी पाऊस, सुटे मातीला सुवास
राहतात आठवणी तशा भारुनी मनास.
मतदान
कुणी कुणी येत होतं मतं मागत होतं
हे देऊ ते देऊ, काहीबाही सांगत होतं.
डांबरी रस्ते..घरात पाणी..वीज देऊ
जगासंगे आपणसुध्दा पुढे पुढे जाऊ.
एवढा मोठा माणूस, खोटं कसं बोलेल,
वाटलं होतं गावासाठी काहीतरी करेल.
दिली होती मतं ,आला होता निवडून,
गावामध्ये विजयाचा गुलाल गेला उधळून.
एक वर्षी पाऊस आला सारं काही धुऊन नेलं
दुसर्या वर्षी सुका दुष्काळ कुणी नाही बघून गेलं.
अजून गावात वीज नाही रस्त्यात उडतेय धुळ
कधी तरी पेटत असते आता इथली चूल.
पाच वर्षे झाली आता पुन्हा येऊ लागलेत
काहीबाही सांगून पुन्हा मतं मागू लागलेत.
काहीतरी सलत असतं
काहीतरी सलत असतं
आपणास मात्र कळत नसतं
कुणाच्यातरी आठवणीने मन
आतल्याआत जळत असतं
होवून कधी बेभान
झुलत असतो
फुलासारखं आपण सुध्दा
फुलत असतो
कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं.
असं कसं कुणावरही
आपण प्रेम करुन बसतो
पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं
अन् आपण आयुष्यावर रुसतो
ती आपल्याला झिडकारते
किंवा तो आपल्याला झिडकारतो
कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं.