दीपक.पवार

हा रिमझिम झरता

Submitted by deepak_pawar on 1 March, 2014 - 00:11

हा रिमझिम झरता श्रावण होतो भास तुझा
हा मातीचा गंध की दरवळला श्वास तुझा......

बहर फुलांचा येता भरते नभ गंधाने
हृदयी आठवणींचा दाटून सुवास तुझा......

ती उन्हात कुणा आधार तरूची छाया
भासत होता तैसा मज हा सहवास तुझा......

तू आता मज म्हण अपुला या झिडकार मला
राहीन बनूनी जन्मभरी मी दास तुझा......

शब्दखुणा: 

मेघ भरूनी येताना......

Submitted by deepak_pawar on 14 December, 2013 - 00:34

मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

रिमझिमती असते बरसात
चिंब चिंब भिजलेली रात
कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

मृदगंध भारला वारा
भारी गंधाने गगन धरा
वार्‍यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

हे तरूवर सर्व स्तब्ध शांत
सभोती उदास हा एकांत
अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

शब्दखुणा: 

कधी हसावे, कधी रुसावे किती बहाणे...

Submitted by deepak_pawar on 14 September, 2013 - 01:47

कधी हसावे, कधी रुसावे किती बहाणे
तिचे बहाणे किती जनांना करी दिवाणे..

तिला पाहता कधी कुणाला सुचते कविता
तिला पाहता मुक्यास वाटे गावे गाणे...

घायाळ करी तिची अदा ही भल्याभल्यांना
तिच्या अदानी खुळे जहाले किती शहाणे...

स्पर्श होता मिटते पर्ण तृण लाजरे
तसेच आहे मोहविणारे तिचे लाजणे...

लगीन व्हावे तिच्या सोबती तिचेच व्हावे
देवास मागती तरुण पोरं हेच मागणे...

शब्दखुणा: 

नाही चांदणे नभात...

Submitted by deepak_pawar on 21 August, 2013 - 01:33

अवसेची रात नाही चांदणे नभात
हरवलेल्या चांद राती दाटल्या मनात.....

मंद वाहे पवन झोपलीत पाखरे
अंतरीच्या नभी दुःख का पाझरे?
का मनाला जाळते आता विराणं रात...
हरवलेल्या चांद राती दाटल्या मनात...

ओळखीचे मला ते गीत वाटते
सूर उदास तेथे कोण छेडते
का फिरुनी दुःख माझ्या दाटते उरात....
हरवलेल्या चांद राती दाटल्या मनात...

शब्दखुणा: 

मुखवटे...

Submitted by deepak_pawar on 3 July, 2013 - 08:24

रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
थांग लागेच ना मन किती गहिरे
व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे
सभ्य वेषात या नांदती चोर हे
दान देण्या निघे अन जगाला लुटे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

शब्द फुलापरी मनी निखारा जळे
वेष संतापरी हृदयी विषारी तळे
लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

शब्दखुणा: 

डोळ्यात गोठलेले....

Submitted by deepak_pawar on 15 June, 2013 - 01:05

डोळ्यात गोठलेले वाहून थेंब जावे

गालावरील आसू कोणी तरी पुसावे....

ती वेस उंबर्‍याची ओलांडतो कधी मी

तेव्हा कुणीतरी बाहूंचे कुंपण करावे....

वादळ निघूनी जाता घरटे कुठे दिसेना

तेव्हा कुणीतरी मायेचे छप्पर धरावे....

जाती उडून जेव्हा या रंग जीवनाचे

वेचून या फुलांचे उधळून रंग जावे....

शब्दखुणा: 

येतेस तू अशी की ......

Submitted by deepak_pawar on 1 June, 2013 - 01:25

कधी येतेस तू अशी की
पाऊस उन्हातून यावा
दुःखाचा कणकण माझ्या
तू मायेनं शिंपीत जावा....

झुळूक वार्‍याची बनूनी
तू येशी झुलवीत अशी
शेवरीच्या कापसापरी
हा जीव तरंगत नेशी....

अळवावर दवबिंदू -
जसा,कधी येतेस तशी
जरा चमके विश्व माझे
अंधार पेटवून जाशी......

संध्येचे क्षितिजावरती
रंगाचे मेघ हे झरती
भाळावर चुंबून घेता
बघ नभी पेटल्या ज्योती....

शब्दखुणा: 

उठले होते वादळ आणि.....

Submitted by deepak_pawar on 10 May, 2013 - 08:18

उठले होते वादळ आणि
नको-नको त्या मनात शंका
कधी तुफानी लाटामधूनी
सावरेल का अपुली नौका.

आठवती मज पुन्हा-पुन्हा
तुझ्यासोबती फुलले क्षण
तू नसताना उरत नाही
तुझ्याविना माझे मी पण.

उगाच काही मनात येई
आणि छळती उदास गाणी
विसरून गेलो मी हसणे
भरून राहिले डोळा पाणी.

परी सरली रात काजळी
चहूकडे तेज पसरले
आनंदाची पहाट घेऊन
उमलून आली प्रीत फुले.

शब्दखुणा: 

भरून येईल आभाळ......

Submitted by deepak_pawar on 6 April, 2013 - 01:19

भरून येईल आभाळ दाटून येतील मेघ
बुडून जाईल अंधारात जेव्हा सारं जग
तेव्हा तू एक कर.......
माझा हाती हात धर.......

चिंब चिंब पावसात बीज भिजून जातं
झाड बनून मातीतून रुजून येतं
तसंच.... अगदी तसंच
मलासुद्धा तुझ्या मायेत चिंब चिंब भिजू दे
तुझ्या छायेत रुजू दे
फक्त तू एक कर......
बरसून येऊ दे...... तुझ्या मायेची सर..

शब्दखुणा: 

अश्रू जरा ओघळले तू जाताना....

Submitted by deepak_pawar on 16 March, 2013 - 02:18

अश्रू जरा ओघळले तू जाताना

ना शब्द ओठी फुटले तू जाताना...

जलप्रलय यावा तैसा पूर नदीला

आभाळ ही कोसळले तू जाताना...

ती रात होती पुनवेची तेव्हा ही

का चांदणे ना पडले तू जाताना...?

हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी

ना फूल कोठे फुलले तू जाताना...

उधळून जीवन गेले तेव्हा माझे

वादळ जरासे उठले तू जाताना...

ही वेस ओलांडूनी गेलीस तसे

आधार सारे तुटले तू जाताना...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - दीपक.पवार