दीपक.पवार

काहीतरी सलत असतं

Submitted by deepak_pawar on 30 December, 2011 - 08:40

काहीतरी सलत असतं
आपणास मात्र कळत नसतं
कुणाच्यातरी आठवणीने मन
आतल्याआत जळत असतं

होवून कधी बेभान
झुलत असतो
फुलासारखं आपण सुध्दा
फुलत असतो
कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं.

असं कसं कुणावरही
आपण प्रेम करुन बसतो
पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं
अन् आपण आयुष्यावर रुसतो
ती आपल्याला झिडकारते
किंवा तो आपल्याला झिडकारतो
कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रदूषण

Submitted by deepak_pawar on 15 December, 2011 - 09:16

फ़ुललेली ती हिरवी झाडे
सुगंध पेरीत वाहणारे वारे
मोटार गाड्यांच्या धूरातून
हरवून गेले आता सारे

झुळझुळणारी एक नदी
कधी इथेही नांदत होती
आज तिला दृष्ट लागूनी
गटार बनूनी वाह्त होती

भकास झाले डोंगर माथे
भकास दिसती रानमळे
झाडावरती घाव घालता
दूर चालले पावसाळे

विज्ञानाच्या वाटेवरती
एक मात्र कळले आता
घेता घेता शोध सुखाचा
प्रदूषणाच्या आल्या लाटा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नोकरी

Submitted by deepak_pawar on 12 December, 2011 - 23:02

रोजच जात होतो कामावर अपमान गिळून
शरीर थकून जाईस्तोवर मालक घेत होता पिळून

वाटतं कधी? लाथ मारून सारं झुगारून द्यावं
पण मन म्हणत असतं, पोटासाठी काय खावं?

घरात वाट पाहत बसलेली भुकेलेली पोरं
लाज झाकून जात होतो तरी त्यांच्या म्होरं

कळत नव्हतं काय करू मन होतं झुरत
तरीसुध्दा जगण्याची आस नव्हती सरत

किती तरी प्रश्न असे मनात होते सलत
जसा मध्यान्हीचा सूर्य, माळ होता जाळत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुला पाहता

Submitted by deepak_pawar on 9 December, 2011 - 23:58

या विषयावर बर्‍याच कवींनी लिहीले आहे. म्हटलं आपणसुध्दा प्रयत्न करु

तुला पाहता असे वाटले
वसंतात ही बहरली फ़ुले

निळे सावळे मेघ तसे तव नयन भासती
नभापरी या तव गालांची रंगसंगती
रजनीचे काजळ तुझिया केसात गुंतले
तुला पाहता असे वाटले........

गंध फ़ुलांचा तसा तुझा दरवळे श्वास
वार्‍यापरी चहुकडे तुझाच पसरे भास
झुळझुळणारा झरा तसे पैजण छनछनले
तुला पाहता असे वाटले.........

रंग धुक्याचा...गोंदले तू रवीबिंब भाळी
वेलीवरची कळी जणू गालावरी खळी
रंग फ़ुलांचे तुझिया ओठावरी रंगले
तुला पाहता असे वाटले..........
(सहज सुचलेल्या काही विनोदी ओळी)

रानवेलीजश्या तव केसांच्या बटा भासती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धरण

Submitted by deepak_pawar on 6 December, 2011 - 03:27

धरणासाठी सरकारला जमीन दिली
आयुष्यभर वाट्याला वणवण आली

म्हटले होते घर देवू; पोरासाठी नोकरी
वाटलं होतं पोटभर, मिळेल आता भाकरी

घर नाही, जमीन गेली, बेकार झाली पोरं
शेतकरी हात आता बनू लागलेत चोरं

चोरी करता गावला म्हणून पकडून होतं नेलं
एक पोट कमी झालं, वाटलं होतं बरं झालं

सहा महिने काळजी गेली, तिथं कसा तरी जगेल
राहिली एक म्हातारी, ती भीक तरी मागेल

विचार करुन त्यानं मग फास लावून घेतला
आयुष्याची वणवण संपली, एकदाचा सुटला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - दीपक.पवार