अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या
रविवारची रटरटीत दुपार. कोण निघणार बाहेर त्या उन्हात. एकीकडे सारी दुनिया मस्त आरामात. आमचेच दुकान तेवढे खुले. म्हणून हा अंड्या तेवढा व्यस्त आपल्या कामात. अर्थात, दुकानात दुपारच्या वेळेला फारसे कोणी येण्याची शक्यता नसल्याने आराम हेच एक काम. पण भिंतीला तुंबड्या लाऊन बसेल तर तो अंड्या कसला. हल्ली फावल्या वेळेत माझे काही ना काही खरडवणे चालूच असते. दुकानाच्या दारात काऊंटरवर बसल्या बसल्या कधी मी आकाशातल्या पाखरांकडे बघून एखादी चारोळी रचतो, तर कधी समोरच्या चाळीतले एखादे पाखरू नजरेस पडल्यास त्याच कागदावर शेरोशायरी उतरते. पान भरभरून निबंध मी कधी शाळेतही लिहिला नव्हता.