आनंदयात्री

कवीला कधीच विचारू नये...

Submitted by आनंदयात्री on 8 May, 2011 - 10:30

कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?
त्यालाही हे माहित नसतं की कुठली वेदना कधी प्रसवली?
नेमकी कुठली शिवण उसवली?
असा कुठला धागा कातरला गेला आणि
ओळ विणून तयार झाली?

बाकीचे जे बोलून मोकळे करून टाकतात
ते हा शब्दात बांधत बसतो..
जुनी कहाणी जुन्या दुखण्यासारखी
पुन्हा उगाळत बसतो...
तेव्हा वाटतं, की जावं आणि हलवावं त्याला.
अशा वेळी एखादा कोरा कागद त्याच्यापुढे द्यावा
आणि समजून घ्यावं आता इथून पुढे त्याची आणि आपली वाट वेगळी...
पण कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?

कवितेवरून कवीच्या भूतकाळाची चिकित्सा वगैरे अजिबात करू नये,
कारण तोही तेच करतोय...

गुलमोहर: 

य़ा जगण्याचे

Submitted by आनंदयात्री on 14 April, 2011 - 10:24

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही

कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!

छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही

रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही!

बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही

गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही

गुलमोहर: 

केवळ त्याच्यासाठी... (निपुण दीक्षित यांच्या एका नितांतसुंदर लेखाचा भावानुवाद)

Submitted by आनंदयात्री on 15 March, 2011 - 10:43

(निपुण दीक्षित यांनी CWC 2011 मधल्या भारत-द. आफ्रिका सामन्यानंतर लिहिलेल्या एका नितांतसुंदर लेखाचा मी केलेला भावानुवाद)

गुलमोहर: 

मोल

Submitted by आनंदयात्री on 5 August, 2009 - 10:18

जे घडले ते तुजला बहुधा नंतर कळले होते
अपुल्यामधले अंतर तोवर फसवे बनले होते

दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते

वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते

सावध झालो तेव्हा आधी तुझी आठवण झाली
तूच मला बोलावुन अलगद दूर ढकलले होते

शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते

पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - आनंदयात्री