या जगण्याचे

य़ा जगण्याचे

Submitted by आनंदयात्री on 14 April, 2011 - 10:24

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही

कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!

छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही

रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही!

बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही

गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही

गुलमोहर: 
Subscribe to RSS - या जगण्याचे