पूर्वीची मी ..... आताची मी
पूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे ।
आता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही
कुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे
बिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे ।
आताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही
कुणी खात असेल तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे
अनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाचा यज्ञ करत असे ।
आता चुकूनही जास्त बोलायला आवडत नाही
कुणी बडबडत असेल तर आवडतही नाही ।।