"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.
नको रे कान्हा
नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी
नको लगट दावू उगीचच खेटूनी ||
नार मी भोळी साधी सरळ हरणी
रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी
सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले
अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी ||
गोरी माझी काया तू रे सावळा
मनात दुजे काही चेहेरा भोळा
नको छेडाछेडी दिसे मग सार्यांना
ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी ||
श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा
केशव मुरलीधर माधवा गोविंदा
अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी
विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी ||
तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण
तुझ्याविण जग सारे होई वैराण
रिमझिम पाऊस किती पडे
सोड कन्हैया वाट गडे ||
साडी जांभळी सारी भिजली,
चोळी जरीची चिंब जहाली,
शहारलेरे अंग गोजीरे पाउल माझा पुढे न पडे||
खुशाल हससी धरुनी पदरा,
का करिशी रे जीव घाबरा,
पाणवठ्यावर रोज सख्यांच्या नजरा असती दोघांकडे ||
हवा हवा तू वाटे मला,
मी तूपण भेद न उरला,
तरी जाउदे नकोस घालू राधेवरती रे साकडे ||
रंगताना रंगामध्ये
यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी
दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी
पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला
घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी
सोडीयेली धार कशी? सररररर
रंगताना राधा बोले अररररर
बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे
तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे
मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे
रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे
आतातरी थांब ना रे.....!
कान्हा, आतातरी थांब ना रे.....!
अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,
रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II
माळ तुटली कशी? मोती गळले कसे?
कंकण टिचकून हातात रुतले कसे?
कृष्णा पुरे थट्टा अशी नाही रे बरी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी !
फोडुनी माठ साडी भिजवी भरजरी
केलीस खोडी आता नाहि का पुरी,
मारिल रे सासु माझी रागिट भारी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी,
भर मध्यान्ह झाली घट डोइवरी
चढुनी घाट धाप लागली उरी,
संगतिला नाही कुणि ऐक श्रीहरी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी,
धरु नको पदरा भर रस्त्यावरी