डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार २०१६
Submitted by अतुल ठाकुर on 26 February, 2016 - 00:10
एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.
"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.
"तीनशे साठ."
"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."
"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."
"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."
"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.