एका बागेचे अंतरग
बाग म्हटलं की डोळ्यात पानं फुलं तरळतात, कारंजी नाचतात. माणसं घोटाळतात, मुलं दुडदुडतात. कानात पक्षी किलबिलतात. हिरव्यागार फुलवेलीच्या कमानीखालून चालताना कोणतरी आपल्या स्वागतासाठी हा पानाफुलांचा मांडव सजवलाय असं वाटतं. बाजूनं वाहणा-या पाण्यातले गोलगोटे मनसोक्त न्हाताना पाहिले की आपल्यालाही तो खळाळ कुरवाळावासा वाटतो. फुलपाखरू होऊन फुलं चुंबाविशी वाटतात. हिरवळ पांघरावीशी वाटते. मलबारहिल सारख्या ठिकाणी वयानं मोठं झालं तरी म्हातारीच्या बुटात शिरावं वाटतं. प्राण्यांच्या आकाराच्या झाडांशी लपाछपी खेळावी वाटतं. हिरवळीवरच्या मोठ्या घड्याळाच्या काट्याला धरून गोलगोल फिरावं वाटतं.