बाग म्हटलं की डोळ्यात पानं फुलं तरळतात, कारंजी नाचतात. माणसं घोटाळतात, मुलं दुडदुडतात. कानात पक्षी किलबिलतात. हिरव्यागार फुलवेलीच्या कमानीखालून चालताना कोणतरी आपल्या स्वागतासाठी हा पानाफुलांचा मांडव सजवलाय असं वाटतं. बाजूनं वाहणा-या पाण्यातले गोलगोटे मनसोक्त न्हाताना पाहिले की आपल्यालाही तो खळाळ कुरवाळावासा वाटतो. फुलपाखरू होऊन फुलं चुंबाविशी वाटतात. हिरवळ पांघरावीशी वाटते. मलबारहिल सारख्या ठिकाणी वयानं मोठं झालं तरी म्हातारीच्या बुटात शिरावं वाटतं. प्राण्यांच्या आकाराच्या झाडांशी लपाछपी खेळावी वाटतं. हिरवळीवरच्या मोठ्या घड्याळाच्या काट्याला धरून गोलगोल फिरावं वाटतं. कठड्यावरून अफाट मुंबापुरी पाहविशी वाटते. सायंकाळी डोक्यावरून मटका कुल्फी विकायला आलेल्या कुल्फीवाल्याकडून कुल्फी खावी वाटतं.
बाग ही चैन सामान्य माणसांसाठी कुठं होती पूर्वी. हे सुख राजेरजवाडे यांच्यासाठी असायचं. मुघल गार्डन व्हाईसरॉय साठी झाली. तिची निर्मिती वास्तुरचनाकार एडवर्ड लुटियन्सने निशात बाग आणि शालीमार बागेच्या धर्तीवर लेडी हार्डिंगच्या मनाप्रमाणे केली. या लेडी हार्डिंग तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्या पत्नी होत्या. निशात बाग या उर्दू शब्दाचा अर्थ आनंद बाग. परंतु या आनंदबागा मुघलकालीन अय्याशीचे दर्शन घडवतात. शालीमार बाग जहांगीरने आपली पत्नी नूरजहाँ साठी तयार केली. या बागेचा वरचा हिस्सा हरम मधल्या महिलांसाठी राखीव होता. हरम मध्ये बादशहाच्या दासी, अंगवस्र व अन्य स्त्रिया असत. तिथे पुरुषांना मज्जाव असे. फक्त हकीम आणि किन्नर इथं मदतीसाठी जात.
इथे मला बाबा आमटेंची आठवण आली. ज्यांच्या हातापायाची बोटं झडलेत अशांच्या मनात आनंदाचं वन रुजवलं. अशांच्या गावाला आनंदवन हे सार्थ नाव दिलं. याच झडलेल्या बोटांमध्ये बाबांना अजिंठ्याची सुंदर शिल्प दिसली. अशी जीवंत शिल्प असलेलं ते उपवन, आनंदवन.
रामायणातील अशोक वाटिका, बाग हे प्रकरण किती पुराणे आहे याचे निदर्शक आहे. बागेला दुसरा समानअर्थी शब्द उपवन असाही आहे, म्हणजे बाग ही मोठ्या वनाचं मिनीएचर असं मला वाटतं. यावरून ठाण्याचे उपवन आठवले. येऊर वनाचं उपवन म्हणून ते उपवन असं बारसं झालं असावं.
“घाशिराम कोतवाल” नाटकातलं गाणं
“सख्या चला बागामदीssss
रंग खेळू चला” ऐकलं की तत्कालीन राजविलासी रंगेलपणा डोळ्यासमोर उभा राहतो. बहुतेक राजेरजवाडे राणीवसा बरोबर घेऊन बागेत मौजमस्ती करत असत.
याच नाटकात पर्वती जवळ रमण्यात कन्नड ब्राह्मण आंबे तोडतात तेव्हा त्यांना शिक्षा होते. म्हणजे बागा तेव्हा बहुजन हिताय, बहुजन सुखाय नव्हत्या.
अलीकडे शहरात काही बागा, बागा अधिक व्यायामाच्या जागा झालेत. मी अशाच एका बागेचे अंतरग उघडतोय.
एक बाग छोटीशी, शांत, शितल. शहरात पण हमरस्त्यां पासून थोडी दूर. कोलाहला पासून अलिप्त. सरत्या आक्टोबरची सकाळची उन्हं अंगाला चटके देत असताना नुकत्याच सरत्या पावसानं स्वच्छ झालेली झाडांची तजेलदार हिरवी पालवी मन तजेलदार करतेय. हिरवळीचा ओलावा तनामनात झिरपतोय. आजूबाजूच्या सिमेंट क्रॉक्रीटच्या रखरखीत जंगलातला ओयासीसच. असा ओयासीस निर्मित्या हातांना किती धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच. धुरानं काळवंडलेल्या माणसांसाठी ही तजेलदार फुफ्फुसे.
या बागेत वेगवेगळी लोकं सकाळ संध्याकाळ फिरायला येतात. ही माणसं कुणी गर्दीत असून एकटी, कुणी त्रासलेली, कुणी अडलेली, नडलेली,रंजलेली , गांजलेली, कुणी आत्मसुखी, कुणी हळवी, कुणी सुष्ट , कुणी दुष्ट, कुणी संतुष्ट कुणी असंतुष्ट, सुखी दुःखी , आनंदी, करवादलेली वगैरे, वगैरे. प्रत्येकाच्या मनातली उलथापालथ बाग टिपतेय. क्षणभर त्यांच्या मनाची घालमेल शांतावतेय. एक हळुवार फुंकर मनावर घातली जातेय.
मध्येच वारा पडतोय, मधेच छान गार झुळूक येतेय. वारा पडला की झाडं वेली चिडीचूप. असं वाटायचं ती कान देऊन ऐकताहेत बागेचे अंतरंग. मधेच वा-याची झुळूक आली की थोडी पानाफुलांची हालचाल. जणू बाग स्वतःचे अंतरंग वाचतेय त्याला माना डोलवत झाडं वेली दाद देतायेत.
मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या डाव्या हाताला ओपन जिम आहे.
उजव्या हाताला एक लॉन त्यामध्ये एक सुंदर झाड.
त्यांच्या प्रत्येक फांदीच्या टोकाला पानं आहेत आणि त्यांना छान गोलाकार आहे. त्या झाडाच्या समोर पाच-सहा बाक ठेवलेले. सायंकाळी यातील गेटच्या साईडच्या दोन बाकावर एक आठ दहा माणसांचा जथ्था ठाण मांडून बसलेला. बहुतेक सेवानिवृत्त वरिष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या मोठ्या मोठ्याने गप्पा चाललेल्या असतात. बहुतेक गप्पा ‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्’ या प्रकारच्या. त्यात ते तरुण असताना कुठले सिनेमे आले. कुठली नायिका कशी होती. कुठला नायक कसा होता. क्रिकेटर कुठले आणि कसे खेळायचे. महाविद्यालयीन जीवन कसं सुंदर होतं आणि हल्लीचं राजकारण वगैरे. तर अन्य कुठेतरी माझी सून कशी चांगली अथवा खत्रूड आहे, मुलगा/मुलगी ऐकत नाही, बायको किती समंजस अथवा वय झालं तरी पीळ सुटत नाही असे आशय बाहेर निघताना चेह-यावरच्या झिरमिळ्यांची विचित्र सळसळ जाणवतेय.
याच बागेत एक गप्पांसाठी कट्टा आहे पण तो शेडमध्ये असल्याने तिथे कोणी फिरकत नाही. बहूतेक जण बाकांवर बसलेत. मग लक्षात येतं या वरिष्ठांचं निसर्गमय वातावरणालं हे एक मुक्त विद्यापीठ आहे. यांच्या बाजूच्या हिरवळीवर बसा खूप शिकायला मिळेल गुरुदक्षिणा न देता. फक्त कान, डोळे उघडे ठेवा.
दुसरीकडं ओपन जीमवाले जीवाचं रान करताहेत. त्यातल्या काहींसाठी शरीर माध्यम् खलु धर्म साधणंम् असावं. सकाळचे १० वाजता जोरदार व्यायाम चाललाय. प्रत्येकजण व्यायामाची सगळी उपकरणं वापरतोय. खरं तर सकाळी १० वाजता कामधंद्याला जायची वेळ पण इथे व्यायाम करणारे बहुतांश सेवानिवृत्त झालेले असावेत. काही एवढ्या वेगाने हातपाय चालवताहेत की पाहणा-याला वाटावं घरात लुडबुड करू नका जा बाहेर एकदाचे म्हणून बाहेर हाकलले असावेत.
हल्ली आंतरजालामुळं आणि सर्रास उच्च रक्तदाब, मधुमेह या मुळे लोकांच्यात व्यायामाची हौस निर्माण झालीय. त्यामुळे भगवंत नामस्मरणासारखं शहरी लोक कुठंही कितीही वाजता व्यायाम करतात. मध्येच कार्यालयाचे जीने चढतात, उतरतात. या सगळ्यात सातत्य नसतं.
एवढं सगळं करुन चरबी उतरत नाही हे पाहिल्यावर काही लोक वेगळ्या भुमिकेत जातात. आपली तुंदिलतनू ही परमेश्वरी देण आहे ती कशाला घटवा त्यापरिस बाकावर स्वस्थ बसून राहू. हलवायचच तर मान (होकायंत्रासम) , डोळे हलवू.
सोयीनुसार यांची भुमिका बदलते. म्हणे व्यायाम करणा-यालाही हृदयविकाराचा झटका येतोच ना. अहो आमच्या कार्यालयाचे योग गुरू करोनानं गेले. ते रोज प्राणायाम करायचे तरी त्यांना प्राणवायू कमी पडला. त्यापेक्षा माणसानं कासवाच्या आदर्श घ्यावा; म्हणजे आपली शक्ती जपून वापरावी आणि १५० वर्ष जगावं. आमच्या हापिसातला मदन सोनोपंत सुखात्मे अगदी नाईलाज झाला तर काम करायचा. त्याला आम्ही मजेनं सोन्याच्या चमचा तोंडांत घेऊन जन्मलेला माणूस म्हणायचो. त्याला बिनचूक काम करतो म्हणून मेरीट सर्टिफिकेट मिळायचं. असं करत तो ३६ वर्षाची निष्कलंक सरकारी सेवा बजावून नुकताच सेवानिवृत्त झाला. मस्त जगतोय सरकारी पेन्शनवर.
पॅगोडा समोर एक मध्यमवयीन गृहस्थ कराटेसम व्यायाम करतोय. मध्येमध्ये हवेत हातवारे चाललेत. पाय समोर डोक्याच्या पातळीवर वेगात नेणे चाललंय. आता एकदम पालथा पडून नाक जमिनीला घासतोय. मनातल्या मनात शरण तुला भगवंता चालू असावं.
अशा या साजेशा कसरतीला पार्श्वभूमीवर साजेसा पॅगोडा.
पॅगोडा बहुतेक मनःशांती अनुभवण्यासाठी असावा. इथल्या एका बाकावर कोणी तरी भ्रामरी प्राणायामाचा भुंग्याचा आवाज करतोय. त्याच्या समोरच्या बाकावर एक तरुण जोडपं एकमेकाला बिलगून बसलंय. मोबाईलवर गाणं वाजतय
गुनगुना रहे हैं भँवरे,
खिल रही है कली-कली
पॅगोडात एका बाकावर गंपा, संपाला गावची तीव्र आठवण आलीय. निवडणूका आलेत आणि पुढा-याने गंपावर प्रचाराची धुरा सोपवलीय. लोकशाहीचा उत्सव लई मोठ्ठा असतोया. कुणी हाताला लागल त्याला धराया लागतया. गंपा म्हणतोय
“ लका संप्या काय हाय हितं. वाईच गावाला जाऊ. मोटारसायकलला झेंडं लावून फिरु.”
“नुसतं झेंडा लावून पोट भरतं का?”
“गाडीला पेट्रोल नको का?”
“आर गाडीला पेट्रोल मिळतं आन पोटात टाकायला बी मिळतं.”
“आरं साहेब धाब्यावर जेवायची सोय करतोया आन बरुबर चपटी पण देतुया. तू काय घेऊन बसला जेवायचं. आजून दक्षिणा मिळती मतदारांसाठी ती यगळीच.”
“पण मतदारांचं पैसं त्यांना द्यायला नगं का?”
“आरं द्यायचं थोडं बाकीचं आपल्या खिशात.”
“नाय पण हे बरं नाही बाबा.”
“आरं पुढारी कुठलं इमानदार असतंय. डबल, टिबल कममावतं निवडून आल्याव.”
“आरं आताच जाऊ मग चल.”
इथेच एक वरिष्ठ नागरिक बाजूच्या हिरवळीवर पकडापकडी खेळणा-या लहान मुलीकडं एकटक पाहतोय. ती तिच्या बाबाला पकडायला धावतेय. बाबा तिच्या सारखंच दुडदुडतोय. फक्त थोडा वेग जास्त आहे. काही वेळानं बाबा थकला आणि त्या चिमूरडीनं बाबाला पकडलंय. बाबाच्या चेह-यावरलं हसू सांगतयं चिमूरडीचा आनंदच त्याचा आनंद आहे. चिमूरडीलाही क्षणभर निखळ हसू आलंय. थोड्याच वेळात त्या चिमूरडीला रंगबिरंगी फुलपाखरं दिसतात. मोठी माणसं स्वप्न पकडायला धावतात तशी तिही या रंगबिरंगी स्वप्नांमागं धावतेय.
वरिष्ठ नागरिक त्याच्या नकळत भूतकाळात गेलाय. असंच मोठी झाली त्याची चिमणी अन् भूर्कन अमेरिकेला गेली. तिच्या आकांक्षांना आकाश ठेंगणं पडू देऊ नये म्हणून त्यानं आनंदाने हा दुरावा स्विकारला. पण समोरच्या घरातला तुलनेनं कमी मिळवता पोरगा जेव्हा रात्रीचं जेवण आईबाबा सोबत घेताना दिसतो तेव्हा त्यांचं काळीज पिळवटतय. त्याला वाटतय इथं असती तर किती बरं झालं असतं.
थोडक्यात पॅगोडावाले आपापल्या धुंदीत मस्तमगन.
जॉगिंग ट्रॅकवर कोण ब्रिस्क वॉक करतोय. कोण धावतोय. काही वरिष्ठ घोळक्याने गप्पा मारत चाललेत. कुणी गोरीगोमटी कानाला हेडफोन लावून ठुमकत चाललीय.
बागेत येणारे हे लहानथोर व्यायामग्रस्त एका भयंकर काळजीने ग्रासलेत. मी अक्षय निर्विकार, निकोप कसा राहील.
इतक्यात बागेत एक तरुण जथ्था आलाय. सगळे तरूण तरूणी तिशीच्या आत असावेत. काळे कोट ,काळ्या पॅन्ट, सफेद शर्ट,निळे टाय अन त्यांच्याबरोबर आलेल्या मुलीं शॉर्ट्स, वनपीस परिधान केलेल्या. मुलं नुकतीच बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागली असावीत. सगळा कसा सळसळता उत्साह. वेगवेगळे खेळ झाले. मग विना संकोच छान फोटो सेशन. एकमेकांनी एकमेकाचे फोटो मोबाईल मध्ये संग्रहीत केले. माझ्या डोळ्यासमोर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून एका शैक्षणिक सहलीला गेलो ते दिवस आले. राज्यभरातील विविध विद्यापीठ प्रतिनिधी मध्ये मुलीही होत्या पण आमचा ग्रुप फोटो काढताना काही मुलींना ओढून आणायला लागले फोटोसाठी त्याकाळी. तेव्हाचा तो ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो फक्त मनातल्या मनात नांदतोय आता. बरीच वर्ष सांभाळून ठेवला होता. ते चेहरे आता कसे आणि कुठे असतील ठावूक नाही; पण मनाला चुटपुट लागलीय आपण सर्वांशी संपर्क ठेवायला हवा होता. निदान मुंबईत आल्यावर ज्यांच्या घरी गेलो. भेटत राहिलो त्यांच्याशी तरी संबंध ठेवायला हवे होते. शिक्षण संपलं. नोकरी लागली. मग कधीतरी अधूनमधून भेटत गेलो लग्न होईपर्यंत. नंतर सगळे दुरावले. आता फक्त उरल्या एकांताच्या सावल्या. असो या सावल्यांची ही वेगळी मजा आहे. त्यातही आम्ही बोलतो एकमेकांशी. दुधाची तहान ताकावर; काय करायचं.
बागेत एका बाकावर एक विजोड जोडपं आहे. एकमेकांचे हात हातात घेऊन बसण्या ऐवजी दोघांच्या हातात मोबाईल आहे. डोळे मोबाईल स्क्रीनवर. मोबाईल मध्ये भांडणं मिटवणारं एआय अॅप अजून आलेलं नसलं तरी युट्यूबवर “तुम रुठा ना करो मेरी जां मेरी जान निकलती है” हे गाणं आहे याचा विसर पडला की काय . मोबाईल हल्ली दोघांत तिसरा झालाय. साधारण अर्ध्या तासानं ते उठून गेले. जाताना त्यांची पावलं यंत्रवत पडत होती. हाताची बोटं, डोळे मोबाईल स्क्रीनवर व्यस्त. कशाला बागेत आले हे बागेलाही समजलं नाही.
क्वचित कुणी पानाफुलात रममाण झालय. अरे हे फुलझाड किती छान आहे. ही जास्वंद, कर्दळी,सोनचाफा किती सुंदर फुलं फुललीत. त्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने ते तांबड्या, पिवळ्या फुलांचे ताटवे, ट्रॅकसोबत शर्यत लावल्या सारखे धावताहेत. एकाच उंचीचे ते ताटवे एखादा हिरवा, तांबडा, पिवळा गालिचा अंथरल्या सारखे दिसताहेत.
एका फुलांच्या ताटव्याची खुरपणी चाललीय. अॅप्रन घातलेल्या दोन महिला खुरप्यानं अलगद तन उपटून एका घमेल्यात टाकताहेत. संसारातही असंच माजोरी तन उपटत लेकरा बाळांना सांभाळत असतील. लेकरांनी शिकावं. वाईट संगत करु नये म्हणजे अनावश्यक तनापासून रक्षण करणंच की . बाहेरचं जसं तन तसं घरातलं ही असेल. व्यसनी आळशी नवरा, आजारपणं, संसारातील चणचण वगैरे.
एका कोप-यात माळीबुवा झाडांना पाणी पाजतोय. तोही पोटच्या पोरांसारखं जपतोय झाडांना. कुठलं झाडाला काय हवं त्याला बरोबर कळतंय. कुठलंही झाड तो सुकू देत नाही. झाडंही आईबाबाकडून पोरांनी लाड पुरवून घ्यावेत तशी माळीबाबा कडून पुरवून घेतायेत . झाड वेडंविद्र दिसू नये म्हणून मायेच्या हलक्या हातानं त्यांची छाटणी होतेय.
मध्येच मी एका झाडाला लटकलेली पाटी वाचली. आता आपण डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करतो पण जुन्या काळी उष्णकटिबंधीय “ब्रम्हदंड” नामें झाडाच्या रसाने रोम मध्ये मोतीबिंदू बरे केलेत. अशा ब-याच पाट्या होत्या त्यात झाडाचे प्रचलित आणि बॉटेनिकल नाव व त्याचा उपयोग थोडक्यात दिलेला.
याच छोट्या बागेत कुणीतरी आपल्याशी बोलावं म्हणून आलेली माणसं मला भेटली. घरी दोन मोटारी, ३ मोटारसायकल, मोठं घर, गावी बंगला, मुलगा मोठ्या हुद्द्यावर पण म्हाता-याला बोलायला कोणी नव्हतं.
एक उच्चविद्याविभूषित वरिष्ठ नागरिक त्या ठिकाणी येणा-यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत होते. कुठल्या इस्पितळात काय मदत मिळते हे सांगत होते. हे त्यांचं रुटीन होतं. घरी बायको आणि मिस्टर गोरे दोघेच. शरीर थकलं वय ८२ तरी इतरांचा विचार करणारा हा प्राणी पाहिल्यावर वाटतं असेही सुंदर तरुण जगात आहेत.
असे अनोळखी चेहरे ज्यांची वर्षानुवर्ष मैत्री आहे असे वाटावं अशी माणसं इथंच भेटली. ही माणसं एकमेकांचं मंगल चिंतणारी, एखादा नियमित येणारा तीनचार रोज आला नाही तरी त्याची काळजी वाहणारे इथंच भेटले.
ही बाग जशी माणसांचं अंतरंग टिपते तसंच इथल्या हिरवळींचं, वृक्षवल्लींच,पक्षांच. कुठे एखाद्या फुलझाडाचं जरा जरी बिनसलं तरी माळीदादाला ती साद घालते. सुकलेल्या पानाफुलांचा सुवास ती पोटात साठवते. पानाफुलांचंही या बागेच्या मातीशी घट्ट नातं असतं. सुकलेली पानंफुलं बरोबर इथल्या मातीचा मळवट नेतात. पक्षांना इथं फांदीवर हितगुज करता येतं. बाग ते एकाग्रतेने ऐकते.
पलीकडं माळीदादानं स्पींक्लर चालू केलाय. तो आईंच्या मायेनं हिरवळीला मृदगंधांचं उटणं लावून आंघोळ घालतोय.
इथल्या माणसांशी, लतावेलींशी,झाडांशी माझं मैत्र जडलय. एक अनवट ओढ असते बागेत जाण्यासाठी. बाहेर पडताना पाय जडावतो.
कधी कधी बागेत वरचेवर जाणं होतं नाही; अशा वेळी पुन्हा बागेत जातो तेव्हा तिथली माणसं, झाडं, वेली, हिरवळ, पक्षी सगळे मला गराडा घालतात अन् विचारतात काय बरेच दिवस दिसला नाही. तब्बेतपाणी ठिक आहे ना? घरचं क्षेमकुशल आहे ना? मी सगळं ठीक आहे पण कार्यबाहुल्यामुळे उशिरा येणं झालं असं सांगतो तेव्हा कुठं त्यांचा जीव भांड्यात पडतो. मी ही त्यांची आपुलकीने चौकशी करतो. बागेत असे तोवर त्यांच्याशी मनसोक्त गप्पा गोष्टी करतो. पुन्हा लवकर भेटू म्हणतो आणि दूर जाईतो मागे वळून हात हलवत निरोप घेतो. या सगळ्यांच्या सहवासात जात, धर्म, देव, देश आदी सगळे संदर्भ नकळत गळून पडतात. उरतात ते फक्त शुभ्र मैत्रीचे रेशमी धागे.
© दत्तात्रय साळुंके
छान आहे दीर्घ चिंतन.
छान आहे दीर्घ चिंतन.
“सामान्यांसाठी बाग” हा जगभरातील नगर रचनाकारांचा आवडता विषय आहे.
उत्तम.
उत्तम.
*ही बाग जशी माणसांचं अंतरंग टिपते तसंच इथल्या हिरवळींचं, वृक्षवल्लींच,पक्षांच. कुठे एखाद्या फुलझाडाचं जरा जरी बिनसलं तरी माळीदादाला ती साद घालते. .... >>>
वा, झकास !
नेहमी प्रमाणे चित्रदर्शी
नेहमी प्रमाणे चित्रदर्शी लिखाण! सगळी चित्रे कधीना कधी नजरे खालून गेलेली.
आवडले. मनोगत मस्त उमटलय.
आवडले. मनोगत मस्त उमटलय.
मनोगत छान आहे !
मनोगत छान आहे !
छान उलगडलंय अंतरंग.
छान उलगडलंय अंतरंग.
मस्त लेख ..!
मस्त लेख ..!
निरीक्षण शक्ती अफाट..
फोटोही नजरेला सुखावणारे...
अनिंद्य खूप धन्यवाद.. खरं आहे
अनिंद्य खूप धन्यवाद.. खरं आहे 'सामान्यांसाठी बाग' नगररचनाकारांचा आवडता विषय आहे.
कुमार सर.... खूप आभार...
केशवजी.... खूप धन्यवाद...जे तुम्ही पाहिले ते मीही टिपले. नजरेतील साम्य.
सामो... अनेकानेक धन्यवाद
नि.३ .... खूप धन्यवाद
SharmilaR... खूप धन्यवाद
रूपालीताई... अनेकानेक धन्यवाद
नेहमीप्रमाणे चित्रदर्शी लेख.
नेहमीप्रमाणे चित्रदर्शी लेख. छान लिहिले आहे.
बागेचे बारकावे टिपले आहेत.
मुंबईत अनेक बागा आहेत त्यात सकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत निरनिराळ्या प्रकारचे लोक येतात. एक हक्काची जागा. व्यायामाला, अभ्यासाला, प्रियकरांना भेटायला, वामकुक्षीसाठी, गप्पा मारायला, भांडायला, शिकवायला, जेवायला, खेळायला, मीटिंग करायला, ध्यान करायला अश्या अनेक कारणांसाठी बाग एक हक्काची जागा आहे.
ऋतुराज खूप धन्यवाद...
ऋतुराज खूप धन्यवाद...
खरं आहे तुमचं.
मुंबईत विशेषता गिरणगावात जागेची खूप टंचाई होती. एका १०×१२ च्या खोलीत १५-२० गिरणी कामगार राहात. कामाच्या वेगवेगळ्या पाळ्यामुळे कसंतरी जमवत. पण खरी अडचण सार्वजनिक सुटीच्या दिवशी. मग काही लोक चाळीची गच्ची, गॅलरी तर काही राणीबाग फुटपाथ जवळ करत.
कॉटन ग्रीन रात्री शांत असायचे मी तिथे काही दिवस अभ्यास केला सुरवातीला. नंतर फोर्टच्या जे. एन्. पिटीट लायब्ररीचा मेंबर झालो. इथे सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत बसायचो सुटीचे दिवशी. वर्षाचे ३६५ दिवस उघडी असणारी लायब्ररी. अगदी पटेटीलाही रिडिंग रुम उघडत. नंतर अजून तीन लायब्ररी मिळाल्या काऊन्सिल हॉल, ब्रिटिश काऊन्सिल, मुंबई विद्यापीठ.
सध्याचे जिजामाता उद्यान तेव्हा राणी बाग होते. तिथे बाहेर डाव्या हाताला हिरवळ होती. त्यासाठी तिकीट नसायचे. तिथे बहुतेक गिरणी कामगार लोळत गप्पा मारायचे. रविवारी फंडाच्या मीटींग्स, गाव मीटींग होत. बाजूला एक खुला रंगमंच तिथे बहुतेक वेळा तमाशा असायचा.
आठवणी चाळवल्या.
सुंदर आठवणी. मुंबईचा तो भाग
सुंदर आठवणी. मुंबईच्या लायब्ररीज, बागा ईज लव्ह !
दसा,
दसा,
खरोखर. तुम्ही म्हणत आहात ते कॉटन ग्रीन गुदामाच्या बाजूच्या रस्त्यावर निदान दहा वर्षाआधी पर्यंत तर मुलं अभ्यास करत असत. शांत परिसर.
मुंबईत विशेषता गिरणगावात जागेची खूप टंचाई होती. एका १०×१२ च्या खोलीत १५-२० गिरणी कामगार राहात. कामाच्या वेगवेगळ्या पाळ्यामुळे कसंतरी जमवत. पण खरी अडचण सार्वजनिक सुटीच्या दिवशी. मग काही लोक चाळीची गच्ची, गॅलरी तर काही राणीबाग फुटपाथ जवळ करत.
गिरणी कामगार लोळत गप्पा मारायचे. रविवारी फंडाच्या मीटींग्स, गाव मीटींग होत. बाजूला एक खुला रंगमंच तिथे बहुतेक वेळा तमाशा असायचा.>>>>>>माझे आजोबा खटाव मिल मध्ये होते, त्यांच्याकडून अशी वर्णने ऐकली आहेत.
>>>सुंदर आठवणी. मुंबईच्या
>>>सुंदर आठवणी. मुंबईच्या लायब्ररीज, बागा ईज लव्ह !>>> खरं आहे अनिंद्य... मलाही या बागा, लायब्ररी विशेष आवडीची स्थळं होती.