आता तरी फुलांना, सांगा बघा फुलोनी
आला वसंत ऋतू हा आला पहा फिरोनी
एकेक पान गळले, गेले तरु सुकोनी
तुम्हावरी तयांची आशा असे टिकोनी
कोकीळ गातसे पुन्हा, साची सुरेल गाणी
करीतो तुम्हास दिसतो पुन्हा पुन्हा विनवणी
या रे फुलून या रे घेऊन रंग भुवनी
ते इंद्रचाप गेले, आहे पहा विरोनी
©निखिल मोडक
कडक हिवाळ्यानंतर येणार वसंत ऋतू नेहमीच चैतन्य घेवून येतो. यावर्षी तर या चैतन्याची मनाला फारच गरज होती. सुदैवाने ही चैतन्याची उधळण शोधायला फार लांब जायचे नव्हते. आमच्या काउंटीतल्या निसर्गप्रेमी आणि उदार कुटुंबाच्या द्र्ष्टेपणामुळे ४८ एकराचे रान मौल्यवान निसर्गठेवा म्हणून जपले गेले आहे. दिड्शे वर्षांपेक्षाही जास्त काळ कसलीही मानवी ढवळाढवळ न झालेले रान - ओल्ड ग्रोथ फोरेस्ट . १८५७ मध्ये जॉन मेल्तझर यांनी शेती करण्यासाठी १६० एकराची जागा खरेदी केली. पुढे त्यात त्याच्या मुलाने आणि नातवाने भर घालून जागेची मालकी २८० एकरापर्यंत विस्तारली.