वसंतऋतूतील रान आणि क्षणभंगूर गवतफुले

Submitted by स्वाती२ on 23 April, 2021 - 09:17

कडक हिवाळ्यानंतर येणार वसंत ऋतू नेहमीच चैतन्य घेवून येतो. यावर्षी तर या चैतन्याची मनाला फारच गरज होती. सुदैवाने ही चैतन्याची उधळण शोधायला फार लांब जायचे नव्हते. आमच्या काउंटीतल्या निसर्गप्रेमी आणि उदार कुटुंबाच्या द्र्ष्टेपणामुळे ४८ एकराचे रान मौल्यवान निसर्गठेवा म्हणून जपले गेले आहे. दिड्शे वर्षांपेक्षाही जास्त काळ कसलीही मानवी ढवळाढवळ न झालेले रान - ओल्ड ग्रोथ फोरेस्ट . १८५७ मध्ये जॉन मेल्तझर यांनी शेती करण्यासाठी १६० एकराची जागा खरेदी केली. पुढे त्यात त्याच्या मुलाने आणि नातवाने भर घालून जागेची मालकी २८० एकरापर्यंत विस्तारली. शेतीच्या हेतूने घेतलेल्या जागेचा काही भाग कधीच वापरला गेला नाही. तिथली झाडे आणि इतर निसर्गवैभव जैसे थे ठेवले गेले आणि शेवटी ४८ एकराचे हे रान मेल्तझर वुड्स म्हणून राज्याच्या क्लासिफाईड फॉरेस्ट प्रोग्रॅमचा भाग झाले.

ओल्ड ग्रोथ फॉरेस्ट प्रकारच्या रानात मोठे वृक्ष असतात तसेच नवीन झाडेही असतात. बहरणारी झाडे असतात तसेच वठलेले वृक्षही असतात. बहरणार्‍या झाडांप्रमाणेच हे वठलेले वृक्षही पक्षांना निवारा आणि अन्नासाठी महत्वाचे. अशा प्रकारच्या जंगलात झाडांचा पाला पाचोळा, मोडून पडणार्‍या फांद्या, त्याआधारे जगणारे किटक, भूछत्र, वठलेल्या झाडांची हळूहळू ठिसूळ होत जाणारी मुळे, कचर्‍याचे विघटन करणारे विविध बॅक्टेरीया, मधेच वाहाणारे छोटे ओढे, ओलाव्याला वाढणारे मखमली शेवाळ, नेचे, पानथळीच्या आसर्‍याला असणारे गोड्यापाण्यातले कवचीधारी क्रॉडॅडस आणि त्यांची मातीची घरे असे बरेच काही रान जमिनीच्या अव्याहत सुरु असलेल्या निसर्गचक्राचा भाग असतात. या रानाचे एक वैभव म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करणारी क्षणभंगूर गवतफुले - spring ephemerals.

पानझडीच्या जंगलात दाट छाया असलेले मोठे वृक्ष, त्या खाली नवी तुलनेने तरुण झाडे, त्याखाली लहान झुडूपे अशी साधारण नैसर्गिक व्यवस्था असते. जोडीला पानगळी सोबत सुप्तावस्थेत जात आपले अस्तित्व मिटवून टाकणारी आणि वसंतऋतूत पुन्हा जागी होणारी पण साधारणतः उन्हाळ्यात फुलणारी काहीशी झुडूपासारखीच पण काष्ठहीन झाडेही असतात. कडक हिवाळ्यात पर्णहीन झालेल्या झाडांना पालवी फुटून त्याची छाया पसरण्याआधीचा जो छोटासा काळ असतो तो काळ असतो क्षणभंगूर गवतफुलांचा. जानिनीवरचा स्नो पुरता वितळलेलाही नसतो तेव्हा जागे होवून पालवून, फुलून ही गवत फुले वसंताची वर्दी देतात आणि काही आठवड्यात जीवनचक्र पूर्ण करुन पुन्हा मुळे, कंद या रुपात जमिनीत सुप्तावस्थेत जातात. जरी या गवतफुलांचे जीवन क्षणभंगुर असले तरी ते निसर्गचक्रात फार मोलाची भूनिका बजावते. यांचे पराग कण, मध(नेक्टर) आणि बीया हे कडक हिवाळ्यानंतर जागे होणार्‍या किटकांची तसेच पक्षांची आणि वाघळांची भूक भागवतात, प्रथिने आणि कर्बोदकाचा पुरवठा करुन त्यांचे जीवनचक्र सुस्थितीत ठेवतात आणि एकंदरीतच निसर्गाचे चक्र सुरळीत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

मेल्तझर वुड्सची आणि तिथल्या गवतफुलांची ही काही छायाचित्रं
foresttrail.jpgforest6.jpgforestfloor.jpgforest2.jpgwhite oak.jpg पुरातन व्हाईट ओक
crawdad home.jpg क्रॉडॅड्सचे घरटे
fungi on wood.jpgभूछत्रं
dutchman's britches.jpgडचमन्स ब्रिचेस. उलट्या टांगलेल्या पँन्ट्सारखे दिसते म्हणून
violets.jpg वायलेट्स
yellow violets.jpgपिवळी वायलेट्स
jack in the pulpit.jpgजॅक इन द पल्पिट
may apple.jpgमे अ‍ॅपल
solomon's seal.jpgसोलोमन्स सील
toad trillium.jpgटोड ट्रिलियम
white trillium.jpgव्हाईट ट्रिलियम
drooping trillium.jpgड्रुपिंग ट्रिलीयम
white trout lily.jpgव्हाईट ट्राऊट लीली
wild ginger.jpg वाईल्ड जिंजर
bellwort.jpgबेलवर्ट
buttercup.jpg बटरकप
common flox.jpg साधे फ्लॉक्स

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षी तर या चैतन्याची मनाला फारच गरज होती. >>>> +१
सुदैवाने ही चैतन्याची उधळण शोधायला आम्हालाही अजीबात कष्ट घ्यावे लागले नाहीत.
ही उधळण आमच्यासोबत वाटून घेतल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

आहा
किती मस्त लिहिलयस आणि फोटोही सगळे सुंदर
थांकु छान सफर करवलीस Happy

खूपच छान...
जागा ही आणि लेखन ही.
बघू, पहाण्याचा योग येतो का.. Happy

छान.
फोटो पाहून डोळे निवले. उलट्या पँटसारखी फुलं फार आवडली.

(काही फोटो सुस्पष्ट नाहीत.)

पुन्हा एकदा धन्यवाद.
निरु, करोनाचे संकट टळो आणि आमच्या भागात भट्कंतीचा योग लवकरच येवो.
ललिता-प्रिती, काही फोटो सुस्पष्ट नाहीत कारण रानाच्या काही भागातला अंधूक प्रकाश आणि ढगाळ हवेत भरुन आलेली आद्रता यामुळे आपल्या डोळ्यांनाही असेच अस्पष्ट दिसते. त्याशिवाय रान जमिनीवर कमीत कमी ढवळाढवळ करायची असल्याने आखीव मार्ग न सोडता सेलफोनच्या कॅमेर्‍यातून फोटो काढताना येणार्‍या मर्यादा. या फोटोंवर रिसाईझ करणे सोडल्यास इतर कुठले संस्कार केले नाहीत.