संभाषण (कथा)
“आई…, जेवण तयार झालं का?” पायातल्या चपला काढत दारातूनच मी आवाज दिला. “माझं ताट कर लवकर. उशीर झालायं, गाडी चुकेल.”
“आत तर ये आधी. का दारात उभा राहून जेवणार आहेस?” माझी आई बोलण्यात माघार घेणारी नव्हती.
मी गडबडीनं आत आलो, कपडे बदलले आणि हात धुवायला गेलो.
संध्याकाळचे सात वाजले होते. आठला शहराकडे जाणारी शेवटची गाडी होती. ती चुकवून चालणार नव्हतं. नाहीतर उद्या कामावर जायला उशीर झाला असता आणि मग बॉसची बोलणी खावी लागली असती.