“आई…, जेवण तयार झालं का?” पायातल्या चपला काढत दारातूनच मी आवाज दिला. “माझं ताट कर लवकर. उशीर झालायं, गाडी चुकेल.”
“आत तर ये आधी. का दारात उभा राहून जेवणार आहेस?” माझी आई बोलण्यात माघार घेणारी नव्हती.
मी गडबडीनं आत आलो, कपडे बदलले आणि हात धुवायला गेलो.
संध्याकाळचे सात वाजले होते. आठला शहराकडे जाणारी शेवटची गाडी होती. ती चुकवून चालणार नव्हतं. नाहीतर उद्या कामावर जायला उशीर झाला असता आणि मग बॉसची बोलणी खावी लागली असती.
माझं गाव नोकरीच्या शहरापासून दोन तासांच्या अंतरावर आहे. आठवडाभर मी शहरात राहतो आणि विकेंड ला गावी येतो. मग दोन दिवस गावातल्या मित्रांबरोबर मजा मस्ती करण्यात कसे निघून जातात कळत सुद्धा नाही. गप्पांचा फड जमला कि उठावेसे वाटत नाही, मग परत जायच्या वेळी अशी गडबड होते.
टॉवेल ला हात पुसतच मी पाटावर बसलो.
“कशाची भाजी आहे?” मी आईला विचारलं.
“मेथी आणि पिठलं.” आईनं तव्यावरून भाकरी काढली आणि माझ्या ताटात टाकली.
आईनं नुकत्याच भाजलेल्या भाकरीचा खरपूस वास येत होता. सोबतीला पिठलं, मेथी आणि कच्चा कांदा. नुसत्या दर्शनानेच तोंडाला पाणी सुटलं. मी फुगलेल्या भाकरीचा घास मोडला. भाकरीतली वाफ हाताला लागून बोटं भाजत होती. मला मात्र दम निघत नव्हता. कसाबसा घास करून तोंडात टाकला. आणि डोळे बंद करून त्या रुचकर घासाचा आस्वाद घेऊ झालो.
“दुपारी पक्याची आई भेटली होती.” आईच्या आवाजानं भानावर आलो.
“अच्छा. काय म्हणत होती?” मी सावधपणे विचारले.
प्रकाश हा माझा शाळेतला जिवलग मित्र. दहावीनंतर त्याने शाळा सोडली आणि घरची शेती बघू लागला. मी कॉलेज पूर्ण केले आणि नोकरीला लागलो. आमचे मार्ग भिन्न झाले तरी आमची मैत्री तुटली नाही. आजही गावी आल्यावर माझी आणि प्रकाशची भेट चुकत नाही. आमच्या मैत्रीमुळे आमच्या कुटुंबांचेही जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रकाशची आई आणि माझी आई या मैत्रिणी होत्या.
“काही नाही, पण नाराज दिसत होती. तुझे आणि पक्याचे काही भांडण झाले का?” आईने विचारले.
“नाही,” मी म्हणालो. माझे आणि प्रकाशचे काही भांडण झाले नव्हते, पण त्याची आई का नाराज होती ते मात्र मला माहित होते.
“मग काय झाले? नक्की तूच काहीतरी केले असशील. सकाळी पक्याच्या घरी गेला होतास ना?” आई विषय सोडायला तयार नव्हती.
आईला कसे सांगावे याचा मी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणालो, “होय, गेलो होतो. पक्याकडून मी काही पैसे घेतले होते, ते परत द्यायला गेलो होतो.”
“मग?”
“मग काय? पक्या घरी नव्हता. मी त्याच्या आईला पैसे दिले.”
“मग यात नाराज होण्यासारखे काय आहे?”
“तिचे म्हणणे असे पडले कि पक्याने ज्या नोटा मला दिल्या होत्या, त्याच नोटा मी परत द्यायला हव्यात.”
“म्हणजे?”
“म्हणजे पक्याने मला शंभराच्या पाच नोटा दिल्या होत्या. पण मी परत देताना पाचशेची एक नोट दिली. यावर पक्याच्या आईचे म्हणणे असे कि मी शंभराच्या पाच नोटा परत द्यायला हव्यात. याच कारणावरून ती नाराज आहे.”
हे ऐकून आई बराच वेळ माझ्या तोंडाकडे बघत राहिली. तिच्या चेहेऱ्यावर संशय होता. बहुदा तिला माझे सांगणे पटले नसावे. पण शेवटी ती म्हणाली, “जर रक्कम तेवढीच असेल, तर वेगळ्या नोटा दिल्या तर काय हरकत आहे?”
“तेच तर म्हणतोय मी,” मी हात धुतले आणि पाटावरून उठलो. यावर काय बोलावं ते आईला बहुदा सुचेना. पण मला गडबड होती, म्हणून तिने तो विषय वाढविला नाही.
मी बॅग भरली आणि घराबाहेर पडलो.
माझ्या घरापासून एसटी स्टॅन्ड चालत दहा मिनिटांच्या अंतरावर होते. गाडी सुटायला सुद्धा अजून बरोब्बर दहा मिनिटांचा अवकाश होता. त्यामुळे मी लगबगीने पावले उचलू लागलो. चालता चालता आज सकाळी प्रकाशच्या घरात घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.
***
“नमस्ते काकू,” मी प्रकाशच्या घरात शिरत उद्गारलो.
“अरे सुधीर, ये, ये. बऱ्याच दिवसांनी आलास.” काकूंनी हसत माझं स्वागत केलं.
मी सोफ्यावर बसलो. काकू टीव्ही पाहत भाजी निवडत होत्या. प्रकाशची बहिण अभ्यासाचे पुस्तक तोंडासमोर धरून बसली होती पण तीचे ही सारे लक्ष टीव्हीतच होते.
“पुढच्या आठवड्यात हिची बारावीची परिक्षा आहे, पण हीचं टीव्ही पाहणं काही कमी होत नाही.” काकू तक्रारीच्या सुरात मला म्हणाल्या. हे ऐकून प्रकाशच्या बहिणीने तिच्या आईकडे एक रागीट कटाक्ष टाकला व पुन्हा टीव्ही पाहण्यात गुंग झाली. मी काहीच बोललो नाही, फक्त स्मित केले.
“प्रकाश आणि पिंट्या बाहेर गेलेत. पण येतीलच परत इतक्यात.” काकू म्हणाल्या.
पिंट्या हा प्रकाशचा पाच वर्षांचा मुलगा. प्रकाशचे लग्न झाले होते, पण पिंट्या च्या जन्मानंतर प्रकाशची बायको प्रकाशला व पिंट्याला सोडून निघून गेली होती. तिला खेड्यात राहणे शक्य होत नव्हते. शहरी जीवनातील सुखसोयी तिला हाक मारीत होत्या. आणि प्रकाश गाव सोडून शहरात राहायला तयार नव्हता. यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत आणि मग त्याची परिणीती घटस्फोटात झाली. पिंट्याला प्रकाशने स्वतःकडेच ठेऊन घेतले होते. पिंट्या चा सांभाळ प्रकाश आणि त्याचे कुटुंबीयच करत होते. पिंट्या घरातल्या सर्वांचा लाडका होता.
“खरे तर मला तुमच्याशीच बोलायचे होते,” मी काकूंकडे पाहत म्हणालो.
हे ऐकूण काकूंना आश्चर्य वाटले असावे. मला त्यांच्याशी काही बोलायचे असेल याची त्यांनी अपेक्षा केली नसावी. त्यांनी भाजीची टोपली बाजूला ठेवली व माझ्याकडे वळून म्हणाल्या, “बोल ना.”
मी सावरून बसलो, घसा साफ केला आणि म्हणालो, “गेल्या आठवड्यात प्रकाश मला असे म्हणाला की, तुम्ही पिंट्यावर विषप्रयोग करतायं”
हे ऐकून त्यांना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. “काय म्हणालास?” बहुदा आपल्याला चुकीचे ऐकू आले असे वाटून त्या म्हणाल्या.
“तुम्ही बरोबर ऐकलंत काकू. प्रकाश मला असे म्हणाला कि तुम्ही पिंट्यावर विषप्रयोग करताय.” यावेळी मी थोड्या मोठयाने व सावकाश म्हणालो.
माझे बोलणे ऐकून प्रकाशच्या बहिणीने तिचे पुस्तक बाजूला ठेवले, टीव्ही बंद केला व तीही आमचे संभाषण लक्ष देऊन ऐकू लागली.
“असे म्हणाला प्रकाश?” काकूंचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
“होय,” मी ठामपणे म्हणालो.
“नक्की काय म्हणाला तो? मला जरा सविस्तर सांग.” आता मात्र काकूंच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे आणि त्रासिक भाव यांचे मिश्रण होते.
“तो म्हणाला की तुम्ही पिंट्या च्या जेवणात रोज एक थेंब उंदीर मारायचे औषध टाकता.”
“काय?” काकू संतापाने म्हणाल्या. “हे खरे नाही. मी असे काहीही केलेले नाही.”
“मी ही प्रकाशला तेच म्हणालो. काकू असे कधीही करणार नाहीत. पण तो मात्र त्याच्या बोलण्यावर ठाम होता. वर तो असेही म्हणाला की एका थेंबाने पिंट्याला काही अपाय होणार नाही. म्हणजे इतक्यात तरी नाही. झालाच तर आणखी दहा-पंधरा वर्षांनी काही अपाय होईल. तेव्हाचे तेव्हा बघू. तेव्हा गरज लागली तर त्याला डॉक्टर कडे नेता येईल व त्याच्यावर उपचार करता येतील.”
“पण मी असं काही करतंच नाही” काकू रागाने म्हणाल्या. “पिंट्या माझा नातू आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याच्या जेवणात विष घालायला मला काय वेड लागलंय का?”
“ते तुम्ही प्रकाशलाच विचारा. त्याने जे मला सांगितले, ते मी तुम्हाला सांगितले.”
“विचारेनच. येउ दे त्याला घरी, मग पाहते मी त्याच्याकडे.” काकूंच्या रागाचा पारा खूपच चढला होता.
“बस मला एवढेच सांगायचे होते. निघतो मी.” असे म्हणून मी त्यांचा निरोप घेतला.
***
मी एसटी स्टॅन्ड वर पोहाचलो तेंव्हा गाडी सुटायच्या बेतात होती. मी गाडीत चढलो आणि खिडकीकडेच्या एका सीटवर बसलो. खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक येत होती. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे ती गार झुळूक सुखद वाटत होती. थोड्याच वेळात वाहक आला. मी त्याच्याकडून तिकीट घेतले व खिशात ठेवून दिले. मग मी डोके मागे सीटला टेकून, डोळे बंद करून प्रकाशच्या प्रकरणाविषयी विचार करू लागलो. गेल्या आठवड्यात जेंव्हा मी गावी आलो होतो तेंव्हा माझे व प्रकाशचे झालेले संभाषण मला आठवले.
गावी गेल्यावर माझी शेताकडे एखादी तरी चक्कर व्हायचीच. प्रकाशचे शेत आमच्या शेताला लागूनच होते. तेव्हा त्याचीही भेट व्हायची. गेल्या आठवड्यात मी असाच फिरत प्रकाशच्या शेतात गेलो होतो. प्रकाश काहीतरी काम करत होता. त्याचा मुलगा, पिंट्या जवळच खेळत होता. मी पिंट्याशेजारी जाऊन बसलो. मला पाहून तो गोड हसला.
“काय पिंटूशेठ, काय चाललंय?”
बाहुला बाहुली खेळतोय” पिंटू म्हणाला.
“अरे वा !”
पिंट्या बाहुला बाहुली खेळत राहिला आणि मी त्याचा खेळ बघत बसलो. थोड्या वेळाने पिंट्याने बाहुली हातात घेतली आणि जमिनीवर जोरात आपटू लागला.
“अरे पिंटू, असे का करतोस?” मी न राहवून विचारले.
“मी बाहुलीला शिक्षा करतोय” पिंटू म्हणाला.
“का बरं?”
“कारण ती खूप वाईट आहे. बाहुल्याला सोडून ती दूर जायचं म्हणते. सगळ्या बाहुल्या अशाच असतात. खूप खूप वाईट. त्या सगळ्यांना शिक्षा करायला पाहिजे.” असे म्हणून तो त्या बाहुलीला जोरजोरात आपटू लागला.
इतक्यात प्रकाश तेथे आला. “पिंट्या असं नाही करायचं.” त्याने ती बाहुली पिंट्याच्या हातातून घेतली. “जा, काकांना पाणी घेऊन ये.” त्याने पिंट्याला पिटाळले.
मला पिंट्याचे वर्तन पाहून धक्का बसला होता. साहजिकच मी प्रकाशाला याबद्दल विचारले.
“या सगळ्याला माझी आई जबाबदार आहे.” तो म्हणाला.
“ते कसे काय?”
“ती सतत पिंट्याच्या समोर त्याच्या आईबद्दल वाईट बोलत असते. याचा पिंट्याच्या मनावर परिणाम होत असणार. मग तोही तसाच विचार करतो आता. त्यालाही त्याची आई खूप दुष्ट वाटते. त्याची आई त्याच्याशी बोलायला फोन करते तेंव्हा तो फोनवरसुद्धा येत नाही. मग ती बाहुली म्हणजे त्याला सोडून गेलेली त्याची आई आहे असे मानून तिला शिक्षा करत असतो. परवा तर त्याने त्या बाहुलीला शिवी दिली.”
हे ऐकून मी सुन्न झालो. “मग तू काकूंना असे न करण्याबद्दल समजावून सांगितले नाहीस का?”
“सांगितले, पण तिच्यात काही फरक पडला नाही. तिला माझे म्हणणे पटले नाही. पिंट्याला बाहुलीला शिक्षा करताना पाहून तिला आनंदच होतो.”
“अरे पण यात पिंट्याचं खूप मोठं नुकसान होतंय हे त्यांच्या लक्षात येत नाही का? त्याच्या मनात त्याच्या आईबद्दल द्वेष, तिरस्कार, घृणा निर्माण होणे चांगले नाही. आणि पुढे जाऊन त्याला सर्व स्त्रियांच्याबद्दल तिरस्कार वाटू शकेल. सर्व स्त्रिया अश्याच असतात असे त्याला वाटू लागेल. मघाशी तो म्हणाला पण कि सगळ्या बाहुल्या अशाच असतात.”
“खरे आहे तुझे म्हणणे. पण मी तरी काय करू. मी माझ्या परीने त्याला समजावून सांगतो. पण दिवसातला बराच वेळ तो त्याच्या आजी जवळच असतो. ती जे सांगेल ते त्याला खरे वाटते.” प्रकाश निराशेने म्हणाला.
यावर मी निशब्ध झालो. बराच वेळ आम्ही दोघे आपापल्या विचारात मग्न शांत बसून होतो.
थोड्या वेळाने प्रकाश मला म्हणाला, “तू माझ्या आईला समजावून पाहतोस का?”
“मी?” मी आश्चर्याने म्हणालो, “जर तू सांगून काही फरक पडला नाही, तर माझ्या सांगण्याने असा काय फरक पडेल?”
“तू शिकला आहेस, शहरात नोकरी करतोस. तुझ्याबद्दल तिला खूप आदर आहे. जर तू सांगितलेस तर कदाचित तिला पटेल.”
प्रकाशच्या या प्रस्तावावर मी बराच वेळ विचार केला व शेवटी त्याला मदत करायचे कबूल केले. पण प्रकाशच्या आईला समजावणे सोपे नव्हते. मला असे काहीतरी करावे लागणार होते की ज्यामुळे तिच्या मनावर खोलवर परिणाम होईल आणि माझा मुद्दा तिला पटेल.
मी आठवडाभर यावर बराच विचार केला व शेवटी आज सकाळी प्रकाशच्या आईला भेटायला गेलो. मी ठरवल्याप्रमाणे संभाषण करून आलो होतो. पण याचा काय परिणाम होणार आहे हे मला माहित नव्हते. माझ्या आईच्या सांगण्यानुसार तरी काकू माझ्यावर नाराज होत्या.
त्यानंतरचे दोन-तीन दिवस कामाच्या गडबडीत मी प्रकाशचे प्रकरण विसरून गेलो. एके दिवशी अचानक मला प्रकाशचा फोन आला.
“बोल पक्या, काय म्हणतोस?”
“काय बोलू? तू माझ्या आईशी बोलून गेल्यापासून ती माझ्या वर चिडून आहे. तिने माझी चांगलीच खरडपट्टी काढली. मी तिला सांगितले की तु जे तिच्यावर आरोप केलेस ते मी तुला सांगितलेच नव्हते. पण तिचा माझ्यावरचा राग अजून शांत झाला नाही.”
प्रकाशचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. “सॉरी यार पक्या, माझ्यामुळे तुला…”
“पण तुझी मात्रा मात्र बरोबर लागू पडली.” माझे बोलणे तोडत प्रकाश म्हणाला.
“म्हणजे? मी समजलो नाही”
“म्हणजे तुझ्या धक्का तंत्राचा माझ्या आईवर योग्य तो परिणाम झाला. तिने पिंट्या च्या समोर पिंट्या च्या आई बद्दल वाईट बोलणे बंद केले आहे. काल पिंट्या च्या आईचा फोन आला होता. तिला पिंट्याशी बोलायचे होते पण पिंट्या फोनवर यायला तयार नव्हता. तेव्हा माझ्या आईने पिंट्याची समजूत घालून त्याला त्याच्या आईशी बोलायला लावले.” प्रकाश हरकून मला सांगत होता.
“क्या बात है” मी आनंदून म्हणालो. “म्हणजे आपला उद्देश सफल झाला तर”
“एकदम शंभर टक्के सफल” प्रकाश म्हणाला.
“आता मी पुढच्या आठवड्यात गावी आल्यावर काकूंना भेटून त्यांची माफी मागतो. म्हणजे त्यांची माझ्यावरची नाराजी दूर होईल.”
“माझ्या आईच्या नाराजीची तू चिंता करू नकोस. तिची चूक तिला पटली आहे. तिची नाराजी एक दोन दिवसात निघून जाईल. पण तुझी आई तुझ्यावर जाम नाराज झाली आहे त्याचे काय?” प्रकाश म्हणाला.
“माझी आई? ती का नाराज झाली आहे बुवा?”
“तू मारलेल्या थापांमुळे. शंभरच्या पाच नोटा आणि पाचशेची एक नोट.”
“अरे हो, ती गोष्ट मी विसरूनच गेलो होतो.” मी म्हणालो. “पण माझा मुद्दा कसा बरोबर आहे ते तिला पटावे म्हणून मी तसे सांगितले.”
“काळजी करू नकोस. तू माझ्या आईची समजूत काढलीस. आता मी तुझ्या आईची समजूत काढेन.” प्रकाश हसत हसत म्हणाला.
समाप्त
छान आहे कथा.
छान आहे कथा.
धन्यवाद. कथा वाचून तुम्ही
धन्यवाद. कथा वाचून तुम्ही समाधानी आहात हे पाहून आनंद वाटला.
कथा आवडली पण एक महत्वाची
कथा आवडली पण एक महत्वाची गोष्ट समजली नाही. प्रकाशच्या आईवर आरोप केल्यावर ती तिच्या नातवाला त्याच्या आईबरोबर बोलू द्यायला कशी काय तयार झाली? म्हणजे ते जेवणात विष घालणे व मनात विष भरवणे याची सांगड घातली आहे का?
मला कळलीच नाही
मला कळलीच नाही
खूपच आवडली कथा.
खूपच आवडली कथा.
तुमच्या शैलीने लगेचच उड्डाणपूल पार करून कमाल वेग गाठला आहे.
वाचत असताना डोळ्यापुढे राजा परांजपेंच्या काळातला सिनेमा चालू आहे असे वाटले.
पहिला प्रतिसाद द्यायचा मान हुकला.
( मी मायबोलीवर कधी असेन याची विपू करून मग पोस्ट करा पुढची कथा :))
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
मला कळलीच नाही>>+१
मला कळलीच नाही>>+१
काहीच कळली नाही
काहीच कळली नाही
योगी९००, किल्ली, रानभुली, अ
योगी९००, किल्ली, रानभुली, अ'निरु'द्ध, SharmilaR, Sadha manus - सर्वांचे मनापासून आभार
या कथेचा नायक (किंवा निवेदक म्हणूयात) आपला मुद्दा पटविण्यासाठी दोनवेळा रूपकाचा वापर करतो. परंतु हा वापर करत असताना हे रूपक आहे ते सांगितले जात नाही. ऐकणारा त्या रूपकाचा निष्कर्ष मनात काढतो. पण जेंव्हा त्याला हे दुसऱ्या गोष्टीचे रूपक आहे हे समजते, तेंव्हा त्या गोष्टीला सुद्धा तोच निष्कर्ष लावला जातो. आणि सांगणाऱ्याचे म्हणणे अधिक प्रभावीपणे ऐकणार्यापर्यंत पोचते.
रानभुली , तुमच्या
रानभुली , तुमच्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार , तुमच्यासारख्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा हुरूप वाढतो .

वाचत असताना डोळ्यापुढे राजा परांजपेंच्या काळातला सिनेमा चालू आहे असे वाटले. >>>> म्हणजे नेमके काय? मी त्यांचे चित्रपट पहिले नाहीत म्हणून विचारतोय
बघा मग.
बघा मग.