आयुष्याचे विषय
इतिहासातील तह-कलमांनी
मनात गुंता झाला
टुंड्राच्या अभ्यासाने
भुगोल वेडा झाला!
बीज-गणितातील "क्ष" ही
राक्षसातील वाटून गेला
नाते त्रिज्येशी भूमितीत
परिघाशी "पाय" अडला !
गणितातील शून्याचे
असेच काही झाले
गुणपत्रिकेतच त्याचे
स्थान पक्के झाले!
हायड्रा अमीबा प्राणीशास्त्रातले
भिंगातूनही ना दिसले
अल्गी-फंगी वनस्पती कां ते
शास्त्रानेही ना सांगितले !
शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !
‘जे पिंडी ते ब्रम्हांडी!!’ .....
.......
आयुष्याच्या slambook कडे जरा डोकवून पाहिलं तर भूमितीचेच आकार डोळ्यासमोर उभे राहतात. समांतर आणि छेदणाऱ्या रेषा, प्रतल हे जणू परस्पर मानवी संबंधाचे प्रतिक असल्याचा भास का बरं होतो? समज आल्यापासून आपण कितीतरी मिती अनुभवतोच की !!!.....
.......
समांतर रेषा म्हणजे आयुष्याच्या रुळावर कधीही न भेटणाऱ्या किंवा अनोळखी व्यक्तींसारखाच... तर एकमेकांना छेदणाऱ्या रेषा अगदीच कुठेतरी भेटल्याची खुण असल्यासारख्याच नाहीत काय?
......
भूमिती
लेकीच्या गालावरचा गोल गोड तीळ
तरुण नातवांच्या आकडेबाज मिशांचा पीळ
नातीची उभट मोहक खळी
भुवयांची काळीशार धनुकली
नातवाचे लंबवर्तुळाकार कुरळे केश
पुतण्यांचे विविधाकार वेश
नेत्र टपोरे गोल भाचीचे
चामखीळ चेह-यावर पुतणीचे
या सर्वांची जरीही बनते एक प्रिय भूमिती
खचित परंतु आगळी यांहून अशी एक आकृती
बहिणींच्या चेह-यावरची
एक एक सुरकुती