पाहुणा (सरुची गोष्ट)
सरूला माडीसमोरच्या पत्र्यावर घातलेलं वाळवण दिसत होतं. हळूच जाऊन त्यातल्या २-३ तरी सालपापड्या पळवाव्यात असं केव्हापासून तिच्या मनात होतं. पण बाहेर इतकं ऊन होतं की पायाचाच पापड झाला असता आणि पत्र्यावर जरा जरी पाय पडला तरी आई, आजी सगळी कामं सोडून धावत वर येतील हे तिला पक्क माहिती होतं. एकदा तिने हळूच काठीने वाळवणाची चादर आत ओढता येते का पाहिलं पण तरी आईचा खालून आवाज आला, “अगं बाई, मांजर आली का काय पत्र्यावर? या मांजरींचा काही तरी बंदोबस्त केला पाहिजे." मग सरू तिथे पटकन लपून बसली म्हणून वाचली.