गोकुळ
गोकुळ
दान मोतीयाचं अस रानात सांडलं
भेगाळलं मन चिंब चिंब झालं
गाणं पावसाचं रिमझिम कानात वाजलं
एक झिम्माड सपान डोळ्यात साठलं
चारा मिळता हिरवा, गाय कपिला तुष्टली
राजा, सर्जानेही समाधानी डरकाळी दिली
कुस धर्तीची उजवे , पीक तरारुन आलं
झिम्मा फुगडी खेळत रान वाऱ्यावर डुलं
चांदण लेवून कणसं आभाळी गेली
दौलत कुबेराने रिती मळयावर केली
मोती पवळयाची रास अशी खळयात सांडली
चिंतातुर चेहऱ्यावर हास्य लकेर हिरवी ओली
घर गोकुळ अवघे
यशोदा ताक घुसळीती
लोणी श्रीधर चाखती
नंद कौतुके पाहती