मैं तुम्हें फिर मिलूंगी
आज रविवार. रविवारी संध्याकाळी सूर्याची किरणे खिडकीतून आत येतात, खिडकीच्या ग्रीलची सावली भिंतीवर पसरते आणि हळू हळू मोठी होत जाते. पलाश काल रात्री चेन्नईला गेला. ऑफिसचे काम. तो असा नेहमीच जातो. मुंबईला बदली होऊन सात महिने झाले आज. अशी एकटी राहायची सवय झालीय आता. जेवल्यावर पुस्तक हातात घेऊन पलंगावर पडले आणि वाचता वाचता कधी झोपेच्या आधीन झाले कळलंच नाही. भिंतीवर पडलेली सूर्याची किरणे परावर्तीत होउन जेंव्हा डोळ्यात खुपायला लागली तेंव्हा जाग आली.