गुंता हा भावनांचा, गुंता हा शब्दांचा,
न मिटलेल्या वादांचा, न सांधलेल्या भेगांचा,
चिमूटभर प्रेमाने, मणभर राग जिंकल्याचा,
पसाभर माया, कणभर अहंकारात विरल्याचा,
कुणामधे हरवण्याचा, कुणाला जोखण्याचा,
गुंता साऱ्या आयुष्याचा, सतत शोध घेण्याचा,
इवल्या थेंबात आकाश कवेत घेण्याचा,
आकाशी पसरून थेंबाला जपण्याचा॥
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर.
माझ्या आधीच्या गोष्टीला ज्यांनी अभिप्राय दिले आणि मला उत्तेजन दिले त्यांचे मनपुर्वक आभार.
एकदा मी आणि माझ्या college च्या मैत्रिणी माझ्या अमरावतीच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात माझी आत्या - आवडाबाई - आली आणि ती पण आम्हाला सामील झाली. आम्ही एका मैत्रिणीच्या लग्नाविषयी बोलत होतो. तेव्हा आत्याने मला म्हटले तुला तुझ्या आईच्या लग्नाची गोष्ट माहिती आहे का? सगळ्यांनी उत्सुकता दाखवल्यावर तिने गोष्ट सुरु केली.