दुसरबीडकर

तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..

Submitted by दुसरबीडकर on 24 May, 2017 - 05:11

'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..
तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..!!

डांबरी सडकेत ती हरवून गेली..
एक गाडीवाट जी गावात जाते...!!

एेवढ्या जोरात भांडे बोलते की..
बातमी मग नेमकी चौकात जाते...!!

'फोडुनी' घर चांगले गावातले मग..
ती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..!!

पावसाला वेळ लागू लागला की ..
स्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..!!

एक नाते ओघळाया लागल्यावर..
तावदानी मन जुन्या काळात जाते..!!

गणेश शिंदे दुसरबीडकर

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..

Submitted by दुसरबीडकर on 13 December, 2015 - 05:24


जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!

ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!

जिथे झाड आंब्याचे व्हावे तिथेच बाभुळ झालो..
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!

कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!!

एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..

Subscribe to RSS - दुसरबीडकर