गुढी
उधळलास तू आयुष्याचा सारीपाट
पुन्हा भिजला हा नयनांचा काठ
दिली पुन्हा जुन्याच अश्रूंना वाट
आता कुणाची मी पाहू वाट
किती आठवू पुन्हा पुन्हा
जगलेले ते अनमोल क्षण
मोडली आयुष्याची चौकट
ना त्याला आता कोणता कोन
बदलून आयुष्याचा जोडीदार
घाव घातलास तो पण हळूवार
तुझ्या लेखी होता फक्त व्यवहार
हरपला मी जिवाभावाचा आधार
ठेऊन जुन्या स्मृतीवर कलश
अन पचवूनी कडूलिंबाचा मोहोर
जोडून पुन्हा संसाराची काडी
निर्धाराने उभारली आज गुढी
राजेंद्र देवी
गुढी
ना वाजले कधी
पैंजण तिचे
ना वाजले कंकण तिचे
सहवासात तिच्या उजळले
परम भाग्य माझे
ना ल्यायली कधी
भरजरी नव वस्त्रे तिने
लज्जास्तव फटे पुराने
ना मधु शर्करा मुखी
ना कडूलिंबाचे गाऱ्हाणे
ताठ मानेने उभी कुडी
माझ्या अंगणी गुढी
नतमस्तक मी त्यापुढे
सुखी ठेव एवढेच साकडे
चैत्री पाडव्याकडे
राजेंद्र देवी
हरी किर्ती गुढी
हरीनाम सार । हरी संकीर्तन । हरी गुणगान । संत गाती ।।
हरी महिमान । संतांसी प्रमाण । हरी हे निधान । संतजना ।।
गुढी उभारोनी । हरी महात्म्याची । मिरविती साची । हरीभक्ती ।।
हरिविणे जिणे । व्यर्थ वाटे संती । नित्य रमताती । हरीनामी ।।
प्रेमे जाऊ आम्ही । संतांसी शरण । तेणे हरी जाण । संतुष्टेल ।।
प्रेम भक्तीभाव । सुख समाधान । लाभे कृपादान । अनायासे ।।
हरी किर्ती गुढी । उभारू आनंदे । तेणे विश्व कोंदे । निजानंदी ।।