बालपण मुंबईत गेले. अर्ध्याहून अधिक आयुष्य खरे तर. जिथे जंगल म्हटले की ते सिमेंट काँक्रीटचे. ज्याच्या खिडकीत चार कुंड्या तो निसर्गप्रेमी. आमच्याकडे त्याही दोनच. एकीत आपली संस्कृती आणि परंपरा जपत लावलेली तुळस तर दुसरीत आवड जपत लावलेला गुलाब. पुढे कधीतरी अंधश्रद्धा जपत मनीप्लांट देखील आला. पण त्यापलीकडे फार काही वेगळे प्रयोग नाहीत.
पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर.. आमचे एक वेगळेच नाते असते. तिघातले दोघे उपस्थित असलो तरी मेहफिल जमते. सध्या पावसाचा सीजन असल्याने वारंवार तिथे जाणे होते. मोजून सांगायचे झाल्यास, गेल्या तीन महिन्यात पाच वेळा. मी आणि सोबत माझी दोन पोरे. त्यांनाही तिथल्या जादुई वातावरणाची आवड लागली आहे. कधीही ऊठा, जीन्स चढवा आणि निघा. कंटाळा येतच नाही. उलट आला कंटाळा की ऊठा आणि तिथला समुद्र गाठा. नुसता समुद्रच नाही तर त्या भोवती पसरलेला कट्टा, आणि त्या कट्ट्याभोवतीचा पट्टा, कितीही गजबजलेला का असेना कधी गर्दीचा वाटत नाही. मन रमतेच..
प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह
अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध कार्यक्रम. प्रचंड गर्दी असूनही व्यवस्थित सुरक्षा चेक करूनच प्रवेश मिळाला.
खुप क्रिएटीव फोटो नाहीत, जिथे जागा मिळाली तिथुन शक्य होईल तसे काढलेले आहेत.