मभागौदि २०२५- निसर्गायण - सी फेस ते सी शोअर - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2025 - 14:53

बालपण मुंबईत गेले. अर्ध्याहून अधिक आयुष्य खरे तर. जिथे जंगल म्हटले की ते सिमेंट काँक्रीटचे. ज्याच्या खिडकीत चार कुंड्या तो निसर्गप्रेमी. आमच्याकडे त्याही दोनच. एकीत आपली संस्कृती आणि परंपरा जपत लावलेली तुळस तर दुसरीत आवड जपत लावलेला गुलाब. पुढे कधीतरी अंधश्रद्धा जपत मनीप्लांट देखील आला. पण त्यापलीकडे फार काही वेगळे प्रयोग नाहीत.

पक्षी म्हणाल तर बालपणीच्या चिमण्या वयात येईस्तोवर भुर्र उडून गेल्या. कबूतरे घाण करायला शिल्लक राहिले. त्यांना पिटाळून लावले की कावळे तेवढे हक्काने रोज दारात येऊन जेवून जायचे. वर्षातून एखादा पोपट, एखादी मैना, एखादी खारुताई दिसली की ती बातमी ठरायची. बघायला ही गर्दी जमायची.

पण माणसे सारी आपली वाटायची. चार दिवस गावाला किंवा एखाद्या निसर्गरम्य स्थळी जाऊन मन कितीही सुखावले तरी त्यात चार दिवसांपुरतीच मजा आहे हे मनाला पक्के ठाऊक असायचे. जसे पुष्पक सिनेमातील कमल हसनला कबुतरांच्या आवाजाची सवय झाली होती तसे आपल्याला या माणसांच्या गर्दीची, घर आणि दुकानांच्या गजबजलेल्या वस्तीची, गाड्यांच्या रहदारीची सवय झाली आहे हे स्विकारून झाले होते.

अश्यात नवी मुंबईला शिफ्ट व्हायचे ठरवले. मुंबईच्या तुलनेत निसर्ग ईथे थोडा जास्त. ऑफिसमधील नव्वद टक्के जनता नवी मुंबईत राहणारी. मित्रांमध्ये बहुतांश खारघर परीसरात राहणारे. त्यांच्या टॉवरच्या खिडकीतून दिसणार्‍या हिरव्यागार डोंगररांगांचे ते नेहमी कौतुक सांगायचे. पवसाळ्यात जरा जास्तच खुलायचे. पण तिथे माणसांची गजबज कमी. आणि मला नेमके हेच नको होते. म्हणून मग नवी मुंबईत स्वत:चे हक्काचे घर घेण्याआधी तिथे भाड्याचे घर घेऊन काही काळ राहायचे ठरवले. थेट खारघर न गाठता वाशीला सासुरवाडीजवळ राहायचे ठरवले.

वाशीच्या मिनी सी शोअर जवळील "सेक्टर ९-ए" चा एरीया पाहिला आणि दादरच्या हिंदू कॉलनीतली शाळा आठवली. तश्याच शांत गल्ल्या, स्वच्छ परीसर, रस्त्याकडेला दुतर्फा पुरेशी सावली देणारे वृक्ष.. मन नॉस्टेल्जिक झाले. म्हटले, आता नवी मुंबईकर व्हायचेच आहे तर ईथेच राहायचे. त्यासाठी सासुरवाडीच्या सोसायटीत राहायला सुद्धा तयार झालो Happy पण बायकोलाच माहेर ईतक्या जवळ नको असल्याने चार गल्ल्या सोडून घर बघितले.

ईथे दर दुसर्‍या गल्लीत एखादे गार्डन होते. याचे तेव्हा फार अप्रूप वाटायचे. कारण मुंबईत आमच्याईथे गार्डन म्हटले की माझगावचा डोंगर नाहीतर थेट राणीची बाग, विषय संपला. असे शंभर पावलावर एखादे सार्वजनिक उद्यान बघायची सवय नव्हती. त्यात मुलगी केवळ दोनच वर्षांची असल्याने तिला जवळपास रोजच कुठल्या ना कुठल्या गार्डनमध्ये खेळायला घेऊन जायचो. तिच्या आनंदात आपला आनंद शोधू लागलो तसे हळूहळू ती छोटीमोठी उद्याने, तेथील पाने-फळे, फुले-पाखरे सारेच आवडू लागले. तेथील स्वच्छता आणि शांतता आवडू लागली. पण या सर्व छोट्या मोठ्या उद्यानांची काशी मक्का मदिना होते ते आमचे मिनी सी शोअर!

दक्षिण मुंबईकर म्हटले की मरीन ड्राईव्ह हे पहिले प्रेम! पुणे आणि उर्वरीत महाराष्ट्राला जेव्हा वादात हरवायचे असते तेव्हा आमच्याकडे समुद्र आहे म्हटले की विषय संपला. पण त्या पलीकडेही तो नेहमीच आवडत आलाय. आजही दर दुसर्‍या महिन्याला मुलांना घेऊन मरीनड्राईव्हची एखादी तरी फेरी होतेच. सकाळ संध्याकाळच नाही तर अगदी मध्यरात्री सुद्धा त्याने साद दिली की काळवेळ न बघता उठतो आणि निघतो. तिथली गर्दी ही कधी त्रासदायक वाटली नाही. उलट आपणही त्याच गर्दीचा एक भाग आहोत आणि तो समुद्र आपल्या सर्वच मुंबईकरांचा आहे असेच नेहमी वाटत आले.

मिनी सी शोअर मात्र त्याहून जवळचे वाटले. ते समस्त वाशीकरांचे नाही तर त्याच्या शेजारच्या गल्लीत राहणार्‍या आमचे घरचे अंगण वाटले. नवी मुंबईकर व्हायचे मनाने स्विकारले त्याचे ते पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण ठरले.

सुट्टीच्या दिवशी सकाळी उठलो, ब्रश केला, आंघोळ केली की निघालो घरातून बाहेर सी शोअरवर हुंदडायला. पावसाळ्याचा सीजन असला, पाऊस पडत असला की आंघोळ न करताच भिजायला बाहेर पडायचो. पावसात भिजावे तर मिनी सी शोअरलाच हा जणू आमच्याकडे नियमच बनला होता.

संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो किंवा रात्री जेवल्यावर शतपावली करायला निघालो की पावले आपसूक सी शोअरच्या दिशेने- वळायची. गार्डनमध्ये खेळायचे, वाळूत लोळायचे, तलावाच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसायचे. सोबत डब्यात आणलेला खाऊ तिथेच बसून खायचा. थोडा खाऊ तिथे पाण्यावर आलेल्या पक्ष्यांना द्यायचा. तर कधी बसून वैताग आला की पाण्यात दगडे मारायचा खेळ करायचा. कधी पुर्ण तलावाला फेरी मारायची. कधी चालत तर कधी सायकल घेऊन फिरायचे. तर कधी एका जागी थांबून शंख शिंपले गोळा करायचे. कधी खारुताईच्या मागे पळायचे, तर कधी बेडकाचा दिनक्रम काय याचा शोध घ्यायचा.

मुलांच्या बालपणीच्या कित्येक आठवणी येथील निसर्गाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि हे सर्वात विशेष वाटते कारण माझ्या बालपणीची एक फार आवडीची आठवण म्हणजे आईसोबत निर्माल्य विसर्जन करायला चौपाटीवर जायचे आणि तिच्या सोबत तिथेच वाळूत बसून खार्‍या वार्‍यासोबत भेलपुरी खायची. उद्या माझी मुले सुद्धा अश्याच आठवणी जपतील या विचारांनीच छान वाटते. म्हणून मुलांना मॉल आणि त्यामधील प्ले झोनमध्ये फिरवायचे काम मी मुलांच्या आई आणि मावश्यांवर सोडले आहे. आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जायची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे Happy

असो, एका लेखात आणि काही शे शब्दांत संपणारा हा विषय नाही. त्यामुळे काही मोजके फोटोच शेअर करतो.

प्रचि १ - मरीन ड्राईव्ह आणि पावसाळा!

ऊंचच ऊंच उसळणार्‍या लाटा, पावसाचा जोरदार तडाखा, खाली समुद्र आणि वर क्षितिजापर्यंत भरून आलेले आकाश असे कैक ठरवून काढलेले फोटो आणि विडिओ आहेत माझ्याकडे, पण त्यातला हा एक आवडीचा जो सिग्नलला उभे असताना सहजच क्लिक करावेसे वाटलेला. दरी खोर्‍या, झाडे झुडपे, नदी झरे, पर्वतरांगा काही नाही या फोटोत तरी या मंतरलेल्या वातावरणातील जादू बघताक्षणी आपल्याही आतवर झिरपते आणि लागलीच पुन्हा तिथे जावेसे वाटते.

N01.jpg

प्रचि २ - मरीन ड्राईव्ह आणि संध्याकाळ!

कुठलाही फिल्टर न लावलेले खरेखुरे तांबडे झालेले आकाश आणि माझी किंबहुना कित्येक मुंबईकरांची आवडीची स्काय लाईन Happy

N02.jpg

प्रचि ३ - मरीन ड्राईव्ह आणि नाईट लाईफ!

ईथे एकदा जागा पकडून वर आकाश बघत लवंडले की वेळकाळाचा बिलकुल अंदाजा राहत नाही. कारण या परीसराला झोप हा प्रकार ठाऊकच नाही.

N03.jpg

प्रचि ४ - आणि हे आमचे फेवरेट मिनी सी शोअर!
माझ्या फ्रेंडलिस्टमधील कित्येक जणांच्या मते मी या जागेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे Happy

N04.jpg

प्रचि ५ - सी शोअर संध्याकाळ!

N05.jpg

प्रचि ६ - सी शोअर सकाळ!

N06.jpg

प्रचि ७ आणि प्रचि ८ - आमचे फेवरेट कट्टे!
ईथे निवांत बसावे आणि समोरचे विलोभनीय द्रुश्य बघत राहावे.

N07.jpg
.
N08.jpg

प्रचि ९ आणि प्रचि १० - सीशोअर म्हणजे फक्त जलाशय नाही.
वर लेखात आलेले सारे किडे मस्ती आम्ही ईथे एंजॉय केली आहे.

N09.jpg
.
N10.jpg

प्रचि ११ - आणि हो, पावसात भिजणे अगदी चिखलात लोळणे सुद्धा Happy

N11.jpg

प्रचि १२ आणि प्रचि १३ - गेल्या सात-आठ वर्षात येथील गार्डनचे रूप अनेकदा बदलले आहे.
त्यामुळे हे अगदी ताजे ताजे म्हणजे काल परवाचे शनिवार दिनांक १ मार्च २०२५ चे फोटो.

IMG-20250302-WA0047.jpg
.
IMG-20250302-WA0046.jpg

प्रचि १४ - आणि ही एक तशीच हृदयाच्या जवळची आठवण!

वाशीच्या घराच्या खिडकीतून दिसणारी निसर्गसंपत्ती. या फुलसाईज खिडकीला लागूनच आमचा बेड होता ज्यावर मी आणि माझी लेक झोपायचो. सकाळी उठल्याउठल्या बाहेर पाहिले की छान प्रसन्न वाटायचे. पानाफुलांनी बहरलेले वृक्ष, त्यावर बस्तान बसवलेले पक्षी, कंपाऊंड वॉलवर बागडणारी खारुताई, एखाद दुसरी मनीम्याऊ, त्या पलीकडे बिलकुल रहदारी नसलेला शांत, स्वछ रस्ता!

रोज सकाळचा ब्रश, सुट्टीच्या दिवशी माझे चहापाणी, पोरांचे खाणेपिणे सगळे त्या खिडकीच्या कट्ट्यावर, आणि त्या बेडवरच व्हायचे. रोज दिसणारे चिऊकाऊ, खारुताई ओळखीच्या झाल्या होत्या. मांजरींना नावे देण्यात आली होती. ते समोरचे वृक्ष म्हणजे एक अधिवासच होते...

आणि एके दिवशी ते पडले.

त्या दिवशी सजीवांचे आणखी एक लक्षण समजले, हालचाल न करणार्‍या झाडांना सुद्धा सजीव का म्हटले जाते हे समजले.. कारण ती सुद्धा जीव लावतात, आणि आपलाही जीव त्यांच्यात गुंतला जातो.

N12.jpg

-- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान झाला आहे लेख. आवडला. फोटोही मस्त आहेत. तुमच्या खिडकीतून दिसणारे दृष्यही छान. निवांत वाटले. तो पहिला फोटो आणि परीचा गोगलगाय दाखवतानाचा व छोट्या ऋ चा पावसातल्या पाण्यात खेळतानाचे फारच छान आले आहेत.

छान लिहीलेय.फोटोज ही छान.
पुणे आणि उर्वरीत महाराष्ट्राला जेव्हा वादात हरवायचे असते तेव्हा आमच्याकडे समुद्र आहे म्हटले की विषय संपला. >>> हो अगदी या एका वाक्यात विषय संपतो.
पावसाळ्याची चिक चिक वाली मुंबई अनेकांना आवडत नाही (कदाचित अस्वच्छतेमुळे)पण मुंबईत समुद्रकिनारी पावसाळ्यात जी फिरण्याची मजा आहे ती इतर कुठेही नाही.

छान आहे लेख. फोटो पण छान आलेत.
नरिमन पॉइंट ची संध्याकाळ तर लाजवाब! मला पण तो एरिया खूप आवडतो. तासनतास त्या कठड्यावर बसले तरी मन भरत नाही.

लेखात मधून मधून डोकावणारा निसर्ग ... मुंबईकरांच्या वाटेला असाच मधेच थोडा थोडा येतो..
पुणे आणि उर्वरीत महाराष्ट्राला जेव्हा वादात हरवायचे असते तेव्हा आमच्याकडे समुद्र आहे म्हटले की विषय संपला>>:)

मुंबईत समुद्रकिनारी पावसाळ्यात जी फिरण्याची मजा आहे ती इतर कुठेही नाही >>> अगदी असाच नाही पण परत मरीन ड्राइव्ह आठवतोच

मस्त लिहीले आहेस
एकदम मनापासून उमटलेले साधे सरळ आणि तितकेच रसाळ

सर्वांनाच मनापासून धन्यवाद Happy

पावसाळ्याची चिक चिक वाली मुंबई अनेकांना आवडत नाही (कदाचित अस्वच्छतेमुळे)पण मुंबईत समुद्रकिनारी पावसाळ्यात जी फिरण्याची मजा आहे
>>>>>>

हो, मुंबईच्या पावसाची दोन रूपे आहेत..
मला बेकार आवडतो हा सीजन..
प्रतिसाद लिहायला घेतलेला तो खोडला..
कारण यावर स्वतंत्र लेख घेतो.. हा जवळचा आणि हक्काचा विषय आहे.
पण आता नको, पावसाळा जवळ आला की..

कधीच्या काळची वाशी आहे ही.
नुसता गडबड गोंधळ आहे तिथे. आमचे एक ओळखीतले/नातेवाईक तिथेच रहातात सीशेल का असेच नाव असलेल्या ईमारतीत.
ते ही असेच सी शोअरचे कौतुक सांगतात. भयानक मच्छर असलेला भाग वाटला.
असो. हा माझा अनुभव आहे. तुमचे एकंदरीत वाशीचे मसालेदार वर्णन छान आहे. Wink

झकासराव, झंपी, मानवमामा, धन्यवाद

झंपी, मच्छरांचा त्रास तर नवी मुंबईत खाडी आणि नाले यामुळे जिथे तिथे आहेच. पण मच्छर संध्याकाळी सूर्य मावळल्यावर बाहेर पडतात. तोपर्यंत आम्ही इथून गेलो असतो. दिवसा मात्र बिलकुल त्रास नाही. कारण इथला परीसर मुंबई तुलनेत काही पटींनी स्वच्छ आहे.

धन्यवाद. केया Happy

पोरांचा गोडवा ही सुद्धा निसर्गाचीच देण असते आपण फक्त जपायची असते Happy

ऋन्मेष मिनी सी शोअरचे फोटो पाहून मस्त वाटले.
माझ्या होस्टेलपासून वॉकिंग डिस्टन्सवर होते. त्यामुळे शनिवार संध्याकाळ इतर काही प्लॅन्स नसले तर सी शोअर ही हक्काची जागा. कधी हुक्की आली तर हॉस्टेल मध्ये २-३ ग्रुप मिळून जायचो. मग इतका दंगा असायचा आमचा कि बस्स.
सेक्टर ६च्या मोकळ्या रस्त्यांवरून फिरणे हा ही एक छान अनुभव असायचा. त्यावेळी तिथे बंगले होते. आता माहित नाही.
एकदा वाशीत राहिले की छोट्या छोट्या गार्डन्सची सवय होऊन जाते मग इतर ठिकाणी कंटाळा येतो.

मरिन ड्राईव्ह ही एकेकाळची आवडती जागा. त्यातही एनसीपीए एंडला जास्त आवडायचे कारण तिथे जरा कमी गर्दी असते. पण आता एक नवा स्पॉट शोधलाय त्यामुळे मरिन ड्राईव्हला पास.

लेख आवडला. सरांच्या टिपिकल स्टाइलमध्ये आहेच.

सोबोबद्दल तुम्ही लिहिलंय ते वाचून कम ला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन अजून आहेत ना, असा प्रश्न पडला. स.का . पाटील उद्यान हे तर बातम्यांमध्ये सुद्धा वाचायला मिळायचं. चर्नीरोड की ग्रँटरोड स्टेशन सुटताच एक बाग दिसायची असं आठवतं.

आमचं उपनगर याबाबत सुदैवी आहे. राष्ट्रीय उद्यान आहेच. पण मी जिथे राहतो, तिथून तीन दिशांना प्रत्येकी दहा - पंधरा मिनिटांच्या अंतरावर पार्क्स आहेत. एक वनउद्यान मार्ग आहे. चर्चगेटला चर्च आणि गेट दिसत नसले तरी हा मार्ग एका उद्यानाच्या शेजारूनच जातो.

आहा सुरेख लेख, मस्त आठवणी! वृक्ष उन्मळून पडलेला पाहून वाईट वाटले.

दोन्ही पोरं cute आहेत तुमची. >>> +१

पूर्वी (१९९५ आसपास) VJTIला जाणे झाले तेव्हा माटुंग्याच तो भाग बर्‍यापैकी निसर्गरम्य वाटला. उंच झाडे, पक्षी, उद्द्याने. VJTI गेलो की त्या भागात फिरायला आवडायचे.

माझेमन, भरत, मामी, मानवमामा धन्यवाद Happy

वाह वाह मानवमामा, VJTI .. फाईव्ह गार्डन.. काय आठवण काढलीत.. माझेच तर कॉलेज Happy

डिप्लोमा चार वर्षे आणि डिग्री दोन वर्षे.. आणि त्यानंतर देखील रंग दे बसंती मधील आमीर खान सारखा कित्येक वर्षे मी तिथे आणि तिथल्या हॉस्टेलमध्ये पडीक असायचो. तिथला परिसर छानच आहे.
वर लेखामध्ये तिथेच जवळच्या दादरच्या आमच्या किंग जॉर्ज शाळेच्या हिंदू कॉलनी परीसराचा उल्लेख याचसाठी केला आहे.
माझी जेव्हा बारावीला गाडी रुळावरून सरकली होती तेव्हा मी याच परिसरात वेड्यासारखा भटकत राहायचो..

माझेमन,
@ सेक्टर ६ चे बंगले,
येस, रो हाऊस आहेत आजही. म्हणजे तीन चार वर्षापूर्वी आम्ही नवीन घर बघताना त्या एरियात फिरून आलेलो. पण अशा बंगल्यात मुलांना खेळायला मोठा ग्रुप मिळणार नाही म्हणून सोसायटीच बघायचे असे ठरवले.
पण म्हणजे तुम्हाला सागर विहार इथले जागृतेश्वर मंदिर जवळ असेल.. ते सुद्धा एक आवडीचं ठिकाण.. बोले तो पुढचा धागा त्यावरच काढतो. तूर्तास नोंद करून ठेवतो Happy
..

<<<< एकदा वाशीत राहिले की छोट्या छोट्या गार्डन्सची सवय होऊन जाते मग इतर ठिकाणी कंटाळा येतो >>>>
याला +७८६ अनुमोदन

<<<< त्यातही एनसीपीए एंडला जास्त आवडायचे कारण तिथे जरा कमी गर्दी असते.
>>>>
अगदी अगदी, आणि तिथल्या टोकावर आपला फोटो सुद्धा छान येतो Happy
रिक्षा फिरवतोच आता..

ती, मी आणि मुंबईची खादाडी ! (मरीन ड्राईव्ह)
https://www.maayboli.com/node/82547

<<<< पण आता एक नवा स्पॉट शोधलाय त्यामुळे मरिन ड्राईव्हला पास.
>>>
हे तेवढे जमल्यास शेअर करा Happy

भरत,
कमला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन म्हटले तर एकच झाले. मुले तिथे बोअर झाली होती. कारण फार गजबज गर्दी होती. त्या म्हातारीच्या बुटात तर गुदमरून जीव गेला होता. कशीबशी सुटका झाली.
पुढच्या वेळी कधीतरी निवांत पावसाळ्यात जाऊ म्हटलेले पण मुले तयारच नाही झाली. त्यापेक्षा खाली गिरगाव चौपाटीला जास्त राहू लागले. प्रियदर्शनी पार्क त्यांना जास्त आवडले. हँगिंग गार्डन पेक्षा छान आमचे माझगाव डोंगरावरचे गार्डन आहे. आणि हे त्यांचेच नाही तर माझेही मत आहे. दोन्ही रिक्षा फिरवतो.

प्रियदर्शनी पार्क, मुंबईच्या समुद्रकिनारी लपलेली एक सुंदर जागा
https://www.maayboli.com/node/83506

माझगाव ची शान माझगाव चा डोंगर
https://www.maayboli.com/node/83604

पण मुद्दा तो नाहीये..
जसे वर माझेमन यांनी सांगितले तसे इथे दर दुसऱ्या तिसऱ्या गल्लीत छोटी छोटी गार्डन आहेत. ती मजा जागेअभावी मुंबईमध्ये नाहीये.

अरे काय मस्त फोटो आणि लेखही! एकदम आवडला. लाल रंगाचे आकाश आणि मरीन ड्राइव्ह वगैरे मस्तच. आम्ही मागच्या वर्षी एकदा रात्री मरीन ड्राइव्हच्या एनसीपीएच्या बाजूला गेलो होतो. तेव्हाही गर्दी होतीच आणि माहौलही मस्त होता. मुलीचे झोपाळ्यावरचे, पाण्यातले फोटोही छान आहेत. शॉवर कॅप!!! Happy

मिनी सी शोअर हे ठिकाण ऐकले नव्हते.

शॉवर कॅप!!!>>> हे अचूक निरीक्षण Happy ती याचसाठी विकत घेतली होती दोघांनी. पावसात भिजायला वापरायचो. त्यामुळे कितीही भिजले तरी केस ओले होत नाहीत, आणि आजारी पडायची शक्यता कमी होते.