पुणेरी
ही गझल असली तरी एक उपहासात्मक हास्य गझल आहे. वाचकांनी केवळ विनोद बुद्धीने वाचावी.
साऱ्या जगात भारी माझेच गाव आहे.
अभिमान हा पुणेरी आम्हास राव आहे.
तासोन तास आम्ही गाड्या धुवूत अमुच्या.
धरणामधे जलाचा जरिही अभाव आहे.
घेऊ जरा दुपारी ही झोप पेशवाई.
आम्हावरी तयांचा अजुनी प्रभाव आहे.
लिहितो अशाच पाट्या, चर्चा करा कितीही.
आज्ञेवरून तेथे अमुचेच नाव आहे.
दडपून मांडतो रे आम्ही मते कुठेही.
ज्ञानी अम्हीच आम्हा सारेच ठाव आहे.
साधेच बोलणेही तिरके तुम्हास वाटे.
असलेच बोलणे हा अमुचा स्वभाव आहे.
- समीर.