कवडसा
गर्द घनदाट छायेच्या प्रदेशात
ओल्या सुखद अंधारात
तू कवडसा होऊन ये
अंगा- खांद्यांवरून वावर
मनात झिरपत जा
तिथे तुला अनेक ठसे दिसतील
अशाच कुठल्या कवडश्यांचे
आत आत उमटून वस्ती करून राहिलेले
त्यांनी तमा बाळगलीच नव्ह्ती
अंधाराची
किर्र झाडीची
बिकट वाटेची
तिथे खोल पोहोचण्याचा हक्क मिळवला होता त्यांनी
कुठला डोळ्यांतून उतरला
कुठला श्वासांतून
तू ही पोहोच!
तुझी वाट तूच निवड!
त्यांच्या ओळीत जाऊन बैस
त्यांच्यातला होऊन जाऊ नकोस